Wednesday, 19 February 2025

mh9 NEWS

परीक्षेत गैरप्रकार म्हणजे आगीशी खेळ बोर्ड परीक्षेसाठी विभागीय मंडळाचा पुन्हा इशारा.


मिशन दहावी, आढावा परीक्षा पूर्वतयारीचा. 

कोल्हापूर /प्रतिनिधी 

 २१ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या संचलनात हयगय केल्यास कडक कारवाईचा इशारा विभागीय मंडळाने क्षेत्रीय यंत्रणांसहित शाळांना दिला आहे. चालू वर्षीच्या बोर्ड परीक्षा कोल्हापूर व कोकण विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मिशन म्हणून हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

 विभागीय मंडळांने प्राचार्य डायट,जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना,  गटशिक्षणाधिकारी, परिरक्षक, केंद्र संचालक आणि माध्यमिक- उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची ऑनलाइन पद्धतीने दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

मागील डिसेंबर पासूनच जिल्हास्तरावर शाळा प्रमुखांच्या बैठका, भौतिक सुविधांची पाहणी, गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी कॉपीमुक्तीची शपथ, शाळा स्तरावर पालक बैठकांचे आयोजन, परीक्षेला सामोरे जाताना-विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उदबोधन कार्यक्रम व व्हिडिओ निर्मिती असे हटके उपक्रम करतानाच राज्य मंडळाच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यात शाळास्तरावर जनजागृती सप्ताह आयोजित केला. क्षेत्रीय यंत्रणांसह शाळा प्रमुखांच्या पाठपुरावा बैठकाही घेतल्या. त्यातच राज्यस्तरावरून मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाला या परीक्षांमध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले असल्याने चालू वर्षाच्या बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू आहेत.

१३ फेब्रुवारी रोजी विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी एम किल्लेदार, कोकण विभागीय सहसचिव दीपक पोवार यांनी विभागीय मंडळ कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली.

 परीक्षा आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये आणि गैरप्रकार मुक्त परीक्षा होण्यासाठी ही बैठक घेतल्याचे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा आयोजन करण्याचे निर्देश दिले असल्याचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळांची पूर्वतयारी आणि जिल्हा प्रशासनाची तितक्याच तोलामोलाची साथ यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या इयत्ता१२ वी परीक्षांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्याचप्रमाणे इयत्ता १०वीच्या परीक्षा सुद्धा चांगल्या वातावरणात पूर्ण होण्यासाठी जिल्हा,तालुका, परिरक्षण केंद्र, परीक्षा केंद्र व शाळा स्तरावरील नियोजन काटेकोरपणे पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही विभागीय अध्यक्षांनी सांगितले. दक्षता समितीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भरारी व बैठया पथकांच्या नियुक्त करून परीक्षेचे उत्तम नियोजन केले आहे.

बारावी परीक्षेच्या धर्तीवर दहावी परीक्षेलाही पाचही जिल्ह्यात संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. भरारी पथक आणि बैठ्या पथकांनाही सक्त निर्देश देण्यात आले आहेत. बारावी परीक्षेपूर्वी कोल्हापूर येथील एका शाळेत प्रवेशपत्रे आणि आवेदन पत्राबाबत झालेल्या गोंधळावरून सर्वच शाळांना आवश्यक पूर्वतयारीच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच गैरप्रकारास उत्तेजन देणाऱ्या, मदत करणाऱ्या आणि सामील असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

*शाळांनी करायची पूर्वतयारी.*
•सर्व विद्यार्थ्याची आवेदनपत्रे भरल्या बाबत खात्री करणे.
•सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राचे वाटप.
•प्रवेशपत्रावरील विषय, माध्यम दुरुस्ती मंडळाकडून समक्ष पत्र देऊन दुरुस्त करणे.
•तोंडी / प्रात्यक्षिक शाळा स्तरावर घेऊन गुण ऑनलाइन पद्धतीने मुदतीत भरणे.(गुण नोंदणीसाठी बारावी अंतिम तारीख१८ एप्रिल, दहावी साठी २४ एप्रिल)
•परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्या, बेंचेस, पंखे, वीजदिवे, स्वच्छतागृहे, पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याची सुविधा यांची उपलब्धता, दारे खिडक्या दुरुस्त करणे.
•कला,क्रीडा यासह वाढीव गुणांबाबत विहित मुदतीत कार्यवाही करणे. 
•गैरमार्ग यादीतील परीक्षा केंद्र असलेल्या शाळा प्रमुखांनी भौतिक सुविधा सुसज्ज करूनच बदललेल्या केंद्र संचालकांच्या ताब्यात शाळा इमारत देणे. 
•अखंड वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जनरेटरची व्यवस्था व त्याबाबत हमीपत्र.


शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रभावती कोळेकर सातारा, राजेसाहेब लोंढे सांगली, एकनाथ आंबोकर कोल्हापूर, सुवर्णा सावंत रत्नागिरी, कविता शिंपी सिंधुदुर्ग यांनी बारावी परीक्षेतील सद्यस्थिती आणि दहावी परीक्षेची पूर्वतयारी याचा आढावा सादर केला. कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत दहावी परीक्षेसाठी १ लक्ष ३२ हजार ९२३ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसाठी ३५७ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी गैरमार्ग यादीतील ५३ केंद्रावरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी वर्ग बदलण्यात येणार आहे. कोकण विभागीय मंडळांतर्गत २७ हजार ८४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार असून ११४ केंद्रावर दहावीची परीक्षा होणार आहे. गैरमार्ग यादीत एकही केंद्र नसल्याने कोकणात दहावीच्या कोणत्याही केंद्रावरील कर्मचारी वर्ग बदलण्यात येणार नाही.

*कोल्हापूर जिल्हा सांख्यिकी इयत्ता दहावी* 
•परीक्षार्थी-५४,८१०
•परिरक्षण केंद्रे-१७
•परीक्षा केंद्रे-१३८
•कर्मचारी वर्ग बदललेली परीक्षा केंद्र संख्या-३४
•परीक्षार्थी प्रविष्ट करणाऱ्या शाळांची संख्या-९७७

"क्षेत्रीय अधिकारी व शाळांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होऊ नये याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. 

-राजेश क्षीरसागर,
 विभागीय अध्यक्ष,
 कोल्हापूर व कोकण मंडळ.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :