कोल्हापूर /प्रतिनिधी
गैरप्रकारास उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि गैरप्रकारात सामील अशांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार.
संवेदनशील केंद्रांचे ड्रोनमार्फत चित्रीकरण.
यंदाच्या १० वी १२ वी बोर्ड परीक्षा संचलनात राज्य मंडळांने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या परीक्षेत जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व अधीक्षक, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव ऑनलाईन उपस्थित होते.
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधांची खात्री जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल. परिक्षा चालू असताना जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षा केंद्रांच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. ज्या त्या जिल्ह्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरारी पथके व बैठी पथके नेमण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची एफआरएस (चेहरा स्कॅनिंग करून ओळख) द्वारे तपासणी करण्यात येईल. प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास ओळखपत्र देण्यात येणार आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी १९८२ च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शिवाय दरवर्षीप्रमाणे परीक्षा केंद्रातील ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार असून परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.
सन २०१८ पासून मागील पाच वर्षात झालेल्या बोर्ड परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले आहेत त्या सर्व केंद्रांवरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात येत आहेत. चालू वर्षीच्या परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येथील अशा केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्यात येणार आहे. शिवाय ही परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.
या परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी व कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, पालक सचिव, नामांकित व्यक्ती हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी आवाहन करणार आहेत. परीक्षार्थीसाठी राज्य मंडळाकडून ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आले असून त्यांचे मोबाईल क्रमांक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाने सहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विभागाबाबतचे आदेश विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी जारी केले आहेत.
कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या ३४ तर बारावीच्या २३ परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी हे इतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून नेमण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील दहावीच्या २ व बारावीच्या ४ , सातारा जिल्ह्यातील दहावीच्या १७ व बारावीच्या १२ केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलण्यात येत आहेत.
कोकण विभागीय मंडळ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील बारावीच्या ३ केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलण्यात येत आहेत. मागील पाच बोर्ड परीक्षेत कॉपी प्रकार नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यात दहावीच्या केंद्रावरील कर्मचारी बदलण्यात येणार नाहीत. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या कोणत्या केंद्रावर कॉपी प्रकाराची नोंद नसल्याने कोणत्याही केंद्रावरील कर्मचारी बदलण्यात येणार नाहीत. कोल्हापूर विभागात दहावीची ३५७ व बारावीची १७६ अशी एकूण ५३३ केंद्रे आहेत. कोकण विभागात दहावीची ११४ व बारावीची ६१ अशी १७५परीक्षा केंद्रे आहेत.
कोल्हापूर विभागीय मंडळ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ७३ हजार, सांगली जिल्ह्यातील ७२ हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील १ लक्ष ५ हजार असे सुमारे अडीच लक्ष विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. तर कोकण विभागीय मंडळ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ हजार असे एकूण ५२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
"सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रसंचालकांना समक्ष बैठकीत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ.