महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नगरपालिका महानगरपालिका राज्यप्रमुख सुधाकर सावंत यांची राष्ट्रीय पातळीवरील प्राथमिक शिक्षकांची संघटना ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्स (पाटणा)नुकत्याच झालेल्या सातव्या राष्ट्रीय संमेलनामध्ये राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाली.
सुधाकर सावंत 30 वर्षाहून अधिक काळ शिक्षक -कर्मचारी चळवळीत कार्यरत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेत झालेल्या शिक्षक भरती प्रकरणी झालेल्या आंदोलनातून नेतृत्वाची सुरुवात झाली. शिक्षक समितीचे तेव्हाचे राज्यअध्यक्ष आणि सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थी दशेतही कॉलेजमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांमध्ये आघाडीवर होते. यापूर्वी त्यांनी शिक्षक समिती कोल्हापूर शहर चे सरचिटणीस व अध्यक्ष म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याचे कार्यालयीन चिटणीस, राज्यउपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्या नगरपालिका महानगरपालिका प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. राज्य सरकारी , निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांनी वेळोवेळी पुकारलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्याचबरोबर अनेक आंदोलनाचे नेतृत्वही करण्यात आघाडीवर होते.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी, मागण्यासाठी तसेच शिक्षण हक्क कायदा अस्तित्व यावा यासाठी नागपूर, मुंबई, दिल्ली पुणे भोपाळ व गोवा या ठिकाणी झालेल्या अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, नियोजनात पुढाकार घेतला. अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंचचे सदस्य म्हणूनही सातत्याने देशभरातील विविध शैक्षणिक परिषदांमध्ये व आंदोलनामध्ये सहभागी होत आलेले आहेत. संघटनात्मक कार्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही योगदान दिलेले आहे. पर्यावरण चळवळ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ही सक्रिय कार्य केले आहे. मिलिंद यादव यांच्या चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळी मध्येही सातत्याने सहभागी असतात. देशभरातल्या प्राथमिक शिक्षक संघटनांची नेतृत्व करणारी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन ही एक सक्षम संघटना असून या संघटनेच्या राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूलाल झा (झारखंड) राष्ट्रीय सचिव व्ही. अण्णामलाई (तामिळनाडू) सालिकराम पटेल (उत्तर प्रदेश) सुरेंद्र सौरभ (बिहार) के. नरसिंह रेड्डी (आंध्र प्रदेश) हरीमंदर पांडे (उत्तर प्रदेश) इत्यादींचे सहकार्य लाभले. अशी माहिती शहराध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे.