कोल्हापूर /प्रतिनिधी
'शालेय वयात इयत्ता दहावी आणि बारावी इयत्तांच्या परीक्षांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. शालेय जीवनात हा टप्पा करियरसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थी या दोन इयत्तांच्या परीक्षांसाठी अभ्यासाची विशेष तयारी करतात. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे', असा सकारात्मक संदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूरचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या 'जिल्हास्तरीय ऑनलाईन उद्बोधन' सत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्ष क्षीरसागर यांच्याच संकल्पनेतून या उद्बोधन सत्राचे आयोजन करणेत आले होते. त्यांच्यासोबत विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील हे प्रमुख उपस्थित होते. डॉ. एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न झाली.
या अभिनव उद्बोधन सत्रासाठी कोल्हापुरातील दादासाहेब मगदूम विद्यालय आणि न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल येथील पन्नास निवडक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सहभाग घेण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थी,पालक यांना शंका निरसन करण्याची सुद्धा संधी देण्यात आली.या सर्व उद्बोधन सत्राचे आभासी पद्धतीने यूट्यूब आणि फेसबुक या समाज माध्यमांद्वारे प्रक्षेपण करून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ देण्यात आला.
इयत्ता दहावी,बारावी परीक्षेच्या अभ्यासाचे यापुढील वेळापत्रक कसे असावे यासंदर्भात दिगंबर मोरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी परीक्षापूर्व आणि परीक्षा काळात आपले आरोग्य सांभाळावे तसेच तणावमुक्तीसाठी कांहीं कृती कराव्यात, या अनुषंगाने डॉ. शशिकांत कुंभार आणि डॉ. प्रवीण माने यांनी अचूक मार्गदर्शन केले.
भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे,वाणिज्य या मूलभूत विषयांबाबत ज्ञानेश्वर नारायणकर, सागर वातकर, सुधीर आमणगी, बाबासो माळवे, उत्तम कांबळे, श्रीमती सौदागर, व्ही . व्ही. माणगावकर श्री उपाध्ये आदी तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
या उद्बोधन सत्रासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, दिगंबर मोरे, अजय पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार, डॉ. विश्वास सुतार, धनाजी पाटील, जयश्री जाधव, रत्नप्रभा दबडे आणि राजेंद्र कोरे, नवनाथ कुंभार, किरण खटावकर यांनी परिश्रम घेतले. जयश्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गजानन उकिर्डे यांनी आभार मानले.