प्रतिनिधी - सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांना तर जिणं मुश्किल झाले आहे तरीही असे बरेच श्रीमंत लोक पहायला मिळतात की दिवसातून दोनदा भाजी खरेदी करण्यात धन्यता मानतात. तर काही महाभाग पैसा कसा खर्च करायचा म्हणून काळजीत आहेत. पण
लॉकडाऊनचा काळ हा सर्वात मोठा आर्थिक गुरू मानला पाहिजे. याचा धडा घेऊन जे आर्थिक नियोजन, बचत आणि काटकसर या बाबतीत चोख राहतील त्यांना भविष्यात कितीही लॉकडाऊन किंवा महायुद्ध सदृश्य प्रसंग आले तरी चिंता नाही.
एक रूपयाची बचत म्हणजे एक रूपयाची कमाई" असे म्हटले जाते. पण विचार मात्र वेगळा आहे. एक रूपयाची बचत ही भविष्यातील खरी दहापंधरा रूपयांची कमाई असते. आजकालच्या नोकर्यांमधे गलेलठ्ठ वार्षिक पगार दिसत असले, तरी चंगळ केल्याने महिन्याच्या एक तारखेला त्यापैकी थुंकी लावून मोजता येतील अशा किती नोटा हातात पडतात, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. नंतर काही आवश्यक, काही वायफळ खर्च होऊन थोडीफार बचत होते.
पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीचे अंधानुकरण करणे आपण टाळले पाहिजे. क्रेडिट कार्डे, फालतू कारणासाठीची कर्जे, मॉल्स, मल्टिप्लेक्स या सगळ्या गोष्टींपासून आपल्या मध्यमवर्गाने शक्यतोवर दूर रहावे. सुद्धा सद्यस्थितीचा विचार केला असता बरीच बिकट परिस्थिती आहे. अनेकांच्या नोकर्यांवर टांगत्या तलवारी आहेत. काटकसरीने राहणे कायमच योग्य होते, पण आज ती काळाची गरज बनली आहे.
बचत सुरू करण्यास कधीही उशीर झालेला नसतो. आयुष्यात तुम्ही जितक्या लवकर बचतीची सवय लावून घ्याल तितक्याच तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उज्वल भविष्याच्या वाटा उपलब्ध असतील. महिन्याच्या उत्पन्नातून बचत हाच तुमचा पहिला खर्च असायला हवा .कारण खर्च झाल्यावर उरलेले पैसे बचत करु,बघू असे ठरविल्यास ते जमणार नाही .तुमचा पगार झाल्यावर त्यातून १०% भाग तरी बचतीसाठी बाजूला काढणे योग्य ठरेल . बचतीमध्ये नियमितता असणेही आवश्यक आहे. घरातील प्रत्येकाने जबाबदारीनुसार बचतीची साधी सवय लावून घेतल्यावर हे काम अवघड नाही.
प्रत्येक व्यक्ती बचतीचा अवलंब करत असेल तर वेळोवेळी संपत्तीची निर्मिती आणि जीवनाला आर्थिक स्थैर्य मिळविण्याचा हा उत्तम मार्ग आहे.