जगभर कोरोनाचे थैमान असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुलनेत परिस्थिती बरी होती. याला कारण पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतलेली काळजी. अगदी परप्रांतीय कामगारांची पाठवणी असो किंवा अलगीकरण कक्षांचा निर्णय, कोरोना तपासणी प्रयोग शाळा उभारणी याबाबत आतापर्यंत अत्यंत चांगले चालले होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत होता.
पण आता रेडझोन मधून येणाऱ्यांमुळे प्रशासनाची धास्ती वाढली आहे. आतापर्यंत सापडलेले तब्बल 22 रुग्ण हे बाहेरून आले आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन करणे शक्य नाही. तसेच काही लोक प्रशासनाची परवानगी न घेता चोरीछुपे येत आहेत. तसेच बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन सांगितले असुनही हे लोक बाजारात आले आणि संसर्ग सुरू झाला तर थांबवणे शक्य होणार नाही. प्रत्येक गोष्टीला सरकार आणि प्रशासन यांना जबाबदार धरणे योग्य नाही. नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी. आतापर्यंत लॉकडाऊन काळात बरीच शिथिलता आली आहे. यानंतरही सर्व व्यवहार सुरळीत होईल. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करणे, नियमित मास्क वापरणे, वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे, अनावश्यक बाहेर न पडणे एवढ्याच गोष्टी पाळल्यास आपण कोरोनाला हद्दपार करु शकतो अन्यथा देवसुद्धा बेजबाबदार लोकांना वाचवू शकणार नाही.
पुणे, मुंबई करांना ज्या वेळी प्रशासनाने घरी रहा असे आवाहन केले होते त्या वेळी त्यांनी कामाला जाणार नाही तर खाणार काय ? असा सवाल करीत आपलाच हेका चालवला होता. आता काय परिस्थिती आहे तेे तुम्ही पहात आहातच. हेच लोक आज तेथूून अक्षरशः झुंडीने बाहेर गावी जात आहेत. कोल्हापूरात तब्बल लाखावर असे लोक आल्याची माहिती आहे.
म्हणूनच घरी रहा सुरक्षित रहा
No comments:
Post a Comment