Wednesday, 3 June 2020

15 जूनपासून शाळा सुरू करण्यास शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध - उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

हातकणंगले / प्रतिनिधी

मिलींद बारवडे
  १५ जून,२०२० पासून महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्यास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या तीव्र विरोधाबाबत लेखी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.

 लेखी निवेदनातील आशय असा की ,वृतपत्रे व इतर सामाजिक माध्यमातून गेली दोन-तीन दिवस अशा बातम्या येत आहेत की. महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये दि.१५ जून, २०२० पासून सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे.  याबाबत विचार करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्गत असणा-या विविध शैक्षणिक संघटनाच्या
पदाधिका-यांची सभा  मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन  सभागृहात व्यासपीठाने सभाध्यक्ष मा.एस.डी.लाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
      विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी दि. १५ जून,२०२० पासून शासनाने शाळा सुरु केल्यास विविध समस्या निर्माण होवू शकतात असे मत व्यक्त केले. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी दिवसेदिवस वाढतच आहे. जून मध्ये हा प्रादूर्भाव अधिकच पावेल असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या महाराष्ट्रात
आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने जिल्हा प्रशासनांनी विविध शाळा, महाविद्यालये,वसतिगृहे, निवासी
शाळा, आश्रमशाळा व अन्य संस्था विलगीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या आहेत. दि. १५ जून पासून शाळा सुरु
केल्यास वरील उल्लेख केलेल्या संस्था जिल्हा प्रशासनाकडून लवकर मिळणार नाहीत, तसेच जिल्हा बंदमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात अडकून पडले आहेत. आणि काही पालक परराज्यात आपल्या मुलांना घेऊन गेले आहेत. 
       अजूनही पालकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी ती भिती असल्याने ते आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाहीत. शाळा सुरु झाल्यास सामाजिक अंतराचा नियम पाळणे सर्वाना शक्य होणार नाही. ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा फायदा महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी घेवू शकत नाहीत. इंटरनेटची सुविधा ग्रामीण व दुर्गम भागात उपलब्ध होत नाही. सध्या कोरोनासाठी शेकडो शिक्षक सेवा बजावत आहेत. ते शाळेत रुजू होण्यापूर्वी त्यांचे सुध्दा विलगीकरण करणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींचा सर्वकंष विचार करून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने असा निर्णय घेतला आहे की, दि. १५ जून पासून शाळा सुरु करू नयेत पण, या दिवसापासून शैक्षणिक वर्ष सुरु करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळामध्ये उपस्थित राहतील. तसेच इ. १ ली  ते इ.८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय क्रमिक पुस्तकाचे वितरण सदरचे शिक्षक करतील.
      दि. १५ जून नंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार, शिक्षक नेते, शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी व पालक संघटनांचे पदाधिकारी यांचेशी येणा-या सर्व
समस्यांची चर्चा करून नंतरच शालेय शिक्षण विभागाने अधिकृतपणे शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घ्यावा.
  ज्या ज्या शाळा,वसतिगृहे.आश्रमशाळा याची विलगीकरण्यासाठी ताब्यात घेतलेल्या आहेत त्या रिकाम्या करून व निर्जतुकीकरण करून संबधित व्यवस्थापनाच्या ताब्यात दिल्या गेल्या पाहिजेत. शाळा सुरु झाल्यानंतर सॅनिटायझेनसाठी लागणारी सामग्री सर्व शाळांना पुरविण्यात यावी अशीही मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ करत आहे.
            ईमेलद्वारे शालेय शिक्षणमंत्री नाम. प्रा.वर्षाताई गायकवाड, शिक्षण आयुक्त पुणे, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक   शिक्षण संचालक , शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर, प्रशासन अधिकारी कोल्हापूर महानगर पालिका आदींना लेखी निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत. या प्रसंगी एस.डी. लाड, प्रा. जयंत आसगावकर, भरत रसाळे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे,इरफान अन्सारी, उदय पाटील, राजेश वरक, अतुल जोशी  आदी उपस्थित होते.
       फोटो 
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना लेखी निवेदन देताना एस.डी. लाड, प्रा. जयंत आसगावकर, भरत रसाळे व इतर .

No comments:

Post a Comment