Monday, 13 July 2020

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्कार, करुणा आणि समाजहित जोपासावी- पदमश्री डॉ.प्रकाश आमटे


संजय घोडावत पॉलीटेक्नीक व ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन तर्फे 'संवाद' कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन 

हातकणंगले / प्रतिनिधी

मिलींद बारवडे

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव नेहमी आपल्या उराशी बाळगली पाहिजे, मुक्या प्राण्यांवर माणसाइतकेच प्रेम करावे, प्रत्येक व्यक्तीने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा, विद्यार्थ्यांना शिक्षणात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे, यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्कार, करुणा आणि समाजहित जोपासावी असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पदमश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे यांनी केले. संजय घोडावत पॉलिटेक्निक व डॉ.ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ''संवाद'' या ऑनलाईन वेबिनार मध्ये ते बोलत होते. 
ते पुढे म्हणाले'' माणसाने भौतिक सुखात न रमून जाता समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे आणि ते आपले परमकर्तव्य आहे हा दृढ निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. याबरोबरच त्यांनी आपला जीवन प्रवास कथित करून सर्वाना समाजकार्यात येण्यास प्रेरित केले.
यावेळी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री.विनायक भोसले, संजय घोडावत पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री.विराट गिरी, डॉ.ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन चे  श्री.रघुवीरसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. 
हा कार्यक्रम २७०० हुन अधिकांनी ऑनलाईन माध्यमातून लाईव्ह पाहिला. काही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी  डॉ.प्रकाश आमटे यांच्याशी थेट संवाद साधला. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व डॉ.प्रकाश आमटे यांची ओळख करून देताना प्राचार्य श्री.विराट गिरी यांनी डॉ.प्रकाश आमटे यांच्या समाजकार्यावर प्रकाशझोत टाकला. व म्हणाले'' डॉ.प्रकाश आमटे यांनी त्यांचे आयुष्य अतिशय कठीण  परिस्थितीत काढले आहे. आदिवासी व कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळा सुद्धा स्थापन केली. तसेच लोक बिरादरी प्रकल्प ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालवीत आहेत. प्राण्यांचे अनाथालय स्थापन करून त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण करून दिला आहे.त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना प्रतिष्ठित असा आशियाचे नोबेल रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे''
विद्यापीठाचे विश्वस्त श्री.विनायक भोसले यांनी संजय घोडावत विद्यापीठ व संजय घोडावत फौंडेशन यांच्यामार्फत आजवर केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती दिली. 
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.रघुवीरसिंग राठोड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य श्री.विराट गिरी, श्री.रघुवीरसिंग राठोड, प्रा,सागर चव्हाण, प्रा.पी.एम.पाटील, प्रा.विशाल तेली तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन मानले.

No comments:

Post a Comment