Tuesday, 21 July 2020

सैनिक टाकळीमधील श्रीयाळ उत्सव रद्द....दोनशे वर्षापुर्वीची परंपरा पहिल्यांदाच खंडीत

सैनिक टाकळी प्रतिनिधी

...
कोरोनाच्या प्रसारामुळे गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय
..
शिरोळ तालुक्यामधील सैनिक टाकळीमध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्टी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. गावातील प्रमुख चार पाटील कुटुंबाच्या घरी चिखलाचा राजवाडा तयार करून त्यामध्ये नंदीची मुर्ती पूजली जाते. गावातील सर्व जाती धर्मांच्या लोकांचा यामध्ये सहभाग असतो. गावची शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुर्वजांनी दोनशे वर्षापुर्वी घालून दिलेल्या नियमांचे आजही काही प्रमाणात पालन केले जाते.

सैनिक टाकळीमधील या श्रीयाळ उत्सावाबाबत जून्या पिढीतील लोक सांगतात की श्रीयाळ नावाचा एक शिवभक्त व्यापारी होता. तो बैलावर धान्य लादून गावोगावी विकत फिरत होता. त्याचा व्यापार पुरेसा होत नव्हता. त्याने अनेक गरीब, दुःखी लोकांच्या समस्या जवळून पाहिल्या होत्या. त्याने भगवान शिवशंकराकडे हात जोडून प्रार्थना केली आपण राजा असतो तर सर्वांचे दुःख दूर केले असते.

भगवान शिवशंकराने श्रीयाळला दीड़ दिवसाचे राज्य करण्याची संधी दिली. त्याने राज्याची सर्व यंत्रणा कामाला लावली.गोर-गरीब,दीन -दुबळ्या लोकांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा केला. या दीड़ दिवसा दरम्यान राज्यात कुणीही उपाशी पोटी झोपला नाही. सर्वत्र शांतता,सुख, समृद्धी पसरली. अखंड विश्वात तो एक आदर्श ठरला.

टाकळी गावामध्ये पाटीलकी आणि सत्ता स्थानावरील वर्चस्वामधून वारंवार संघर्ष होत होता. हा वाद संपवण्यासाठी तञ्ज्ञ लोकांनी श्रीयाळ राजाचा आदर्श समोर ठेवला. गावची शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीचे विभाजन करून नियम ठरवले.

प्रत्येक वर्षी या जबाबदाऱ्या व नियमांचा दृढ संकल्प करण्यासाठी एकत्रीतपणे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी कोळी समाजाचे लोक चिखलाचा राजवाडा बनवतात, सुतार मखर तयार करतात, शिंपी सजावट करतात अशा प्रकारे बारा बलुतेदार आपआपल्या परिने सहकार्य करतात.
बाळासो पाटील,कुमार पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील या मुख्य पाटील कुटुंबामार्फत अन्नदान केले जाते. सायंकाळी गावचे सरपंच,उप-सरपंच, सदस्य,गाव कामगार पोलिस पाटील, कोतवाल आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित गावच्या मुख्य रस्त्यावरून श्रीयाळ राजाच्या प्रतिकात्मक राजवाडयातील नंदीची मिरवणूक काढली जाते. गावाबाहेरच्या तलावात अथवा विहीरीत विसर्जन केले जाते. चिरमुरे,गुळ, खोबऱ्याचा प्रसाद एकमेकांच्या मुखात घालून आनंद व्यक्त केला जातो.

गेल्या दोनशे वर्षापुर्वीपासून सुरू असलेली ही आदर्श परंपरा पहिल्यांदाच खंडीत होत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात येत आहे.

केवळ प्रतिकात्मक नंदीची  पूजा प्रमुख पाटील कुटुंबाच्या घरी होईल  इतर सर्व कार्यक्रम रद्द केले जात असल्याची माहिती संयोजकानी  दिली आहे.
.....

No comments:

Post a Comment