*
रिकाम्या घागरीसह काळे झेंडे दाखवून शासनाच्या निर्णयाचा केला तीव्र निषेध
नंदगाव प्रतिनिधी -
नंदगाव ( ता - करवीर ) व परिसरातील शेतकऱ्यांनी दूधगंगा नदी वरून इचलकरंजी शहरास पाणी देण्यास तीव्र विरोध केला. पाण्याचा एक थेंब जरी नेण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील .अशा आक्रमक भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.शिवाय रिकामी ऊलटी पाण्याची घागर व काळे झेंडे दाखवून शासनाच्या या निर्णयाचा दूधगंगा नदी बचाव करवीर तालुका कृती समितीने निषेध सुद्धा केला. नंदगाव व खेबवडे या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवरील पुलावर परिसरातील पाचशेहून अधिक शेतकरी उत्स्फूर्तपणे या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये नंदगाव, खेबवडे, नागाव, इस्पुर्ली, द .वडगाव कोगील , येवती ,दिंडनेर्ली हलसवडे , वड्डवाडी, गिरगाव, या गावातील पाचशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते .
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ढवण म्हणाले, या धरणाच्या पुनर्वसनासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे हे आमच्या हक्काचे पाणी आहे. हे पाणी विविध कारणांनी प्रत्येक जण पळवून नेत आहे. त्यामुळे आपल्यावर एक दिवस पाणी पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे .या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी गट-तट बाजूला ठेवून सहभागी व्हावे. आपल्या नेत्यांच्या दारात जाऊन त्यांना हे पाणी वाचवण्यासाठी आपली भूमिका मांडण्यास भाग पाडावे. राजकीय श्रेयवादातून शेतकऱ्याला फसविण्याचे पाप कोणीही करू नये.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष संपत पाटील म्हणाले, दूधगंगा वेदगंगा लाभक्षेत्रातील ४० टक्के क्षेत्र अजून कोरडे आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे. परंतु नेतेमंडळी कागदावर चुकीची आकडेवारी दाखवून पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नेता म्हणजे जनता नव्हे. नेत्याची भूमिका म्हणजे जनतेची भूमिका नव्हे. या पाणी योजनेला जनतेचा तीव्र विरोध आहे. या जनमताचा विचार करून ही योजना रद्द करावी.
सुयोग वाडकर खेबवडेकर म्हणाले, कुठलाही गट-तट न मानता शेतकरी हाच गट म्हणून ही योजना रद्द होईपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी एकसंधपणे कडाडून विरोध करूया.
पंचायत समितीचे सदस्य रमेश चौगुले म्हणाले, वेगवेगळ्या नावाखाली शासन दूध गंगेचे पाणी चोरून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. तो आम्ही हाणून पाडू. या प्रश्नी समरजीतसिंह घाटगे यांनी घेतलेल्या भुमिकेच्या पाठीशी सर्व शेतकरी ठामपणे उभे राहू. यावेळी प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली .
*चौकट*
*मुळ विषयाला बगल देऊ नका*
यावेळी बोलताना राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील म्हणाले, काल झालेल्या मुरगूड येथील समारंभात तेथील तलावाच्या पाण्याचा मुद्दा मांडण्यात आला. मात्र हा प्रकार म्हणजे मूळ विषयाला बगल देण्यातील आहे. तसे न होता सध्या शेतकऱ्यांचा ज्या विषयावरून असंतोष आहे. त्या विषयावरच बोलावे. कॅबिनेट मध्ये ज्यावेळी हा विषय झाला त्यावेळी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या बैठकीला उपस्थित होते. शिवाय बैठकीआधी या विभागाचे सचिव त्यांना याबाबत सविस्तर माहिती सुद्धा देतात. आणि ते मात्र आपल्याला याबाबत माहित नाही. माहिती करून घेतो. असे सांगत आहेत. हा शुद्ध कांगावा आहे. असाही टोला त्यांनी लगावला.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक मारुती निगवे, संजय पाटील रंगराव तोरसकर, विलास पाटील, ज्ञानदेव पाटील' सनी नरके, डी .आर .पाटील, भुपाल पाटील, दीपक पाटील, कृष्णात शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
फोटो - नंदगाव येथे इचलकरंजी शहरास दूधगंगा नदीतून पाणी देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा रिकामी घागर व काळे झेंडे दाखवून निषेध करताना नंदगाव परिसरातील शेतकरी. ( छाया . विजय हंचनाळे नंदगाव . )
No comments:
Post a Comment