Wednesday, 5 August 2020

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार - गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी जाग्या



ज्ञानराज पाटील - कोल्हापूर 
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुराचे संकट कायम आहे.  गेल्या दोन दिवसापासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी जवळपास 88 बंधाऱ्यावर नदीचे पाणी  येवून संबंधित गावांचा थेट संपर्क तुटला असून या गावांना पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. आधीच कोरोनामुळे हतबल झालेले जनजीवन मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाले आहे. 

धरणाच्या क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने सर्वच धरणातून मोठया प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. येत्या दोन दिवसात कोल्हापूर सह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.
राजाराम बंधारा इशारा पातळी 38 फुटांवर असून असाच पाऊस सुरू राहीला तर लवकरच इशारा पातळी ओलांडली जाईल. कारण काल पासुन फक्त एका रात्रीत दहा फुटांवर पातळी वाढली आहे.
दरम्यान कोल्हापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. शाहूपुरी सहावी गल्ली, अॅस्टर आधार हॉस्पिटल परिसर, पंचगंगा नदी परिसरात पाणी शिरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांत पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी खालील प्रमाणे मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.


हातकणंगले- 7.50 (228.88), शिरोळ- 3.86 (199.29), पन्हाळा- 49 (664.29), शाहूवाडी- 43.67 (947.83), राधानगरी- 55 (953.33), गगनबावडा- 137 (2604), करवीर- 29.09 (495), कागल- 39.86 (663), गडहिंग्लज- 27.14 (481.57), भुदरगड- 36 (784.20), आजरा- 62.75 (1077.75), चंदगड- 72.50 (1077.83) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.


सतत पडणार्‍या धूंवाधार पावसाने लोकांच्या काळजाचा ठोका चुकला असून 2019 च्या महापूराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. यामुळेच प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी सांगितले आहे. 
तर अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात जोतिबा-केर्ली हा मार्ग गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खचला होता त्याच ठिकाणी पुन्हा खचला आहे. हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

No comments:

Post a Comment