कोल्हापूर (प्रतिनिधी)
मरणादारी आणि तोरणादारी चुकवू नये, अशी आपली संस्कृती… पण कोरोनाने अनेक गोष्टी बदलून गेल्या आहेत. कोरानामुळे आरोग्य व्यवस्था ढासळलीच आहे, शिवाय अनेकांना आपल्या नातेवार्इकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणेही जमत नाही. अशा काळात कोल्हापूर मीडिया या व्हॉट्स अप ग्रुपमधील सदस्यांनी शिवाजी पेठेतील वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला इतकेच नाही तर वृद्धाची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करून त्यांची काळजीही घेतली.
शिवाजी पेठेतील काळकार्इ मंदिराशेजारी अपार्टमेंटमध्ये एक वयोवृद्ध दाम्पत्य राहत होते. त्यातील ८४ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे गुरुवारी सकाळी सात वाजता मृत्यू झाला. संबधित दाम्पत्य एकटेच राहत असल्याने त्यांच्या ओळखीचे कोणी नव्हते. शिवाय ही अपार्टमेंट आडमार्गाला असल्याने संपर्काला अडचणी येत होत्या. त्यांनी आपल्या चिपळूण येथील नातेवार्इकांना फोन करून त्याची माहिती दिली. त्या नातेवार्इकांनी बांधकाम व्यावसायिक आदित्य बेडेकर यांना दुपारी अडीच वाजता याबाबतची माहिती दिली. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती ‘कोल्हापूर मीडिया’ या ग्रुपवर टाकली. पत्रकार विजय पाटील यांनी तयार केलेल्या या ग्रुपवर सर्वच क्षेत्रातील मान्यवर असल्याने संबधित आजींना कोणती मदत करता येर्इल याबाबत चर्चा सुरू झाली. प्राचार्य महादेव नरके यांनी याबाबत नगरसेवक सचिन चव्हाण, तौफिक मुलाणी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बैतुलमाल कमिटीच्या सदस्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्काराची तयारी केली. रोहन स्वामी, तौफिक मुलाणी, संतोष पाटील, अब्दुल मलबारी यांच्यासह अन्य काहींनी पुढाकार घेत किट उपलब्ध करून दिले. त्यांनी काळजी घेत संबधित वृद्धाचे पार्थिव वाहनातून पंचगंगा स्मशानभूमीत आणला. सायंकाळ सहा वाजता हिंदू पद्धतीने बैतूलमाल कमिटीच्या सदस्यांनी विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले.
आजोबांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोनाबाधित आजींना एकटे कसे ठेवायचे असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. दरम्यान त्यांचे काही नातेवार्इकही परगावाहून आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आजींची समजूत काढली आणि त्या कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यास राजी झाल्या. संबधित सदस्यांनी त्यांना महासैनिक दरबार हॉल येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले.
एकीकडे कोरोनाबाधित व्यक्ती असोत अथवा अन्य आजारांमुळे हाल झालेल्या रुग्णांना उपचार मिळत नाही. अनेकदा माणुसकीचा अंत झाल्याची अनेक उदाहरणे पाहण्यात येत आहेत. मात्र, व्हॉटस् अप ग्रुपवर केवळ चॅटिंग न करता कोरोनाकाळात दाखविलेली माणुसकी कौतुकास्पद आहे.
No comments:
Post a Comment