Tuesday, 13 October 2020

हेरलेतील पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये व्रनोपचारक व पर्यवेक्षक या दोन पदांची तात्कळ नेमणूक करावी : शेतकरी वर्गाची मागणी.


हेरले / वार्ताहर


हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ हा आहे. या दवाखान्यामध्ये हेरले हालोंडी मौजे वडगांव या तीन गावच्या पशुंवर मोफत उपचार केले जातात. तीन गावचे क्षेत्र पाहता दवाखान्यामध्ये एक पशुधन  विकास अधिकारी व एक शिपाई कार्यरत आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांना पशुवर उपचार व इतर वैद्यकिय सेवा देण्यासाठी फार धावा -धाव करावी लागत आहे. त्यामुळे  एक व्रनोपचारक व एक पर्यवेक्षक या दोन पदांची आवश्यकता असल्याने तात्काळ या पदांची नेमणूक व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
          हेरले, मौजे वडगांव व हालोंडी या गावांमध्ये शेतीस पूरक व्यवसायामध्ये  गायी व म्हैशी या पशुंचे पालन करून  दुग्ध उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. हा व्यवसाय विकसीत झाल्याने पशुंची संख्याही वाढली. या पशुना वैद्यकिय सेवा देण्यासाठी व पशुसंवर्धनासाठी १९७१मध्ये राज्यस्तरीय पशुवैद्यकिय दवाखान्याची हेरलेमध्ये स्थापना झाली. या दवाखान्यामध्ये म्हैस गायी,शेळी, मेंढी, कुत्रा, मांजर, घोडा व पक्षी कोंबडया आदी पाळीव प्राणी व पक्षी यावर मोफत  उपचार केले जातात.
          मोठ्या जनावरांवर वर्षातून दोन वेळा लसीकरण केले जाते. संप्टेबंर ते ऑक्टोबंर मध्ये लाळ खुरखत व पावसाळ्याच्या आगोदर मे ते जून दरम्यान घटसर्प आदी लसी दिल्या जातात. सद्या हालोंडी गाव पूर्ण झाले असून मौजे वडगांव व हेरले या दोन गावांत लसीकरणाची सेवा देणे सुरू आहे. तसेच पाळीव पशुंच्या कानात बिल्ले मारून त्यांना लसी देण्याचे कार्यही सुरू असल्याने सेवेत दिरंगाई होत आहे.
       दैनंदिन पंचवीस ते तीस जनावरांवर उपचार केले जातात. यामध्ये ताप येणे, वैरण न खाणे, पोट फुगी ,विषबाधा, संडास बिघडणे ,आडलेले, वार न पडणे, भांड बाहेर येणे आदी आजारावर उपचार केले जातात. तसेच शिंग काढणे,डोळ्याचे ऑपरेशन, तार खिळा काढणे, सिजेरियन, शवविच्छेदन आदी शस्त्रक्रिया ही कराव्या लागतात. तीन गावांमध्ये जाऊन कृत्रिम रेतन करावे लागते.आदी सेवा बजावत असतांना एक पशुधन विकास अधिकारी व शिपाई या दोघांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
      तीन गावांमध्ये तेराशे म्हैशी, सातशे गायी, चारशे शेळ्या व तेराशे मेंढ्या आदी संख्या पशुंची असून त्यांना नियमित वैद्यकिय सेवा बजावी लागत आहे.अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पशुंना वैद्यकिय सेवा देतांना दिरंगाई होत असल्याने शेतकरी वर्गाच्या रोषांना अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. तसेच या अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्त इचलकरंजी या पदाचा अतिरिक्त कार्यभार असून १४ दवाखान्याचे गुरूवार व शनिवार व केव्हांही पर्यवेक्षणाचे कार्य करावे लागते. त्यामुळे त्यांना कामाचा भार जास्त होऊन दमछाक होत आहे. हेरले परिसरातील पशुपालन व्यवसायास पशुसंवर्धनासाठी आधारवड असणाऱ्या या दवाखान्यांमध्ये जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तात्काळ दोन पदांची भरती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेरले, मौजे वडगांव,हालोंडी या तीन गावांमध्ये पशुधनसंख्या लक्षणिय आहे. या पशुंना वैद्यकिय सेवा देतांना कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने मर्यादा येतात. तरी एक व्रनोपचारक व एक पर्यवेक्षक या दोन पदांची भरती प्रशासनाने करावी.

        डॉ.ए.जे. पाटील
   पशुधन विकास अधिकारी हेरले

No comments:

Post a Comment