Thursday, 31 December 2020

श्री सद्गुरु निरंजन महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथी व शारदामाता जयंती निमित्त आश्रमामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

.
 हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.1/1/21
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगांव येथील श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रमामध्ये मंगळवार दि.५ रोजी श्री सद्गुरु निरंजन महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथी व शारदामाता जयंती निमित्त आश्रमामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
   सुर्योदय ७:१४ वा. 'श्री' चे पादुकांना अभिषेक सकाळी ८ ते ९ नोंदणी व चहापान,
सकाळी ९ ते ११ भजन : श्री भजनी मंडळ, हेरले सकाळी ११ते १२ प्रवचन : परमार्थभूषण ह.भ.प.श्री. नारायण महाराज एकल,जोगेवाडी.
दुपारी १२ ते १२:१५  श्री सद्गुरु निरंजन महाराज पुण्यतिथी सोहळा. 
श्री शारदामाता जयंती : फोटोपूजन व पुष्पअर्पण स्वामीभक्त पूज्य श्री नंदुआण्णा माणगांवकर यांच्या अमृत हस्ते,
दुपारी १२:१५ ते १:१५ : प्रवचन : ह.भ.प.श्री. अनंत कुंभार महाराज, बुधगाव, सांगली.
दुपारी १:१५ ते १:३० : सत्कार समारंभ 
दुपारी १:३० ते ३:३० : महाप्रसाद 
दुपारी ३.३० ते  भजन : श्री माऊली महिला भजनी मंडळ,हमिदवाडा
सायं. ५ ते ६ : प्रवचन : ह.भ.प.श्री. अशोक पाटील कौलवकर सुर्यास्त व आरती होईल 
या सर्व कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.  असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे पुरस्कार जाहीर.

कोल्हापूर / प्रतिनिधी 
दि.31/12/20
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या  बैठकीत सन २०२० चे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले.
    यामध्ये चंद्रकांत मिठारी ( दै.महासत्ता व्यवस्थापक ) यांना जीवन गौरव पुरस्कार, राजू पाटील ( दैनिक पुढारी ) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार प्रिंट मिडिया, विजय केसरकर (एबीपी माझा) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया,  दगडू माने ( दैनिक पुण्यनगरी ) जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार व  निवास कांबळे यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 
याशिवाय तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार - चंदगड -  लक्ष्‍मण व्हन्याळकर ( तरुण भारत ), आजरा - विकास सुतार ( महासत्ता ), गडहिंग्लज - गणेश  बुरुड ( सकाळ ), भुदरगड - शैलेंद्र उळेगड्डी ( पुण्यनगरी ), राधानगरी - रवींद्र पाटील ( पुढारी ), शाहुवाडी - श्रीमंत लष्कर ( पुढारी ), करवीर दक्षिण विभाग - राम पाटील (एस न्यूज ), करवीर उत्तर विभाग - सतीश पाटील ( तरुण भारत ) हातकणंगले पश्चिम विभाग - संतोष सणगर ( तरुण भारत ), हातकणंगले पूर्व विभाग - सुहास जाधव ( लोकमत ), पन्हाळा पश्चिम विभाग धनाजी पाटील ( सकाळ ), पन्हाळा पूर्व विभाग - संजय  पाटील (सकाळ),कागल मुरगूड विभाग -प्रकाश  तिराळे ( सकाळ),कागल विभाग-सागर लोहार ( तरुण भारत ),शिरोळ-निनाद मिरजे (पुण्यनगरी),हातकणंगले दक्षिण विभाग - संजय  साळुंखे ( पुढारी ) 
पुरस्कार वितरण समारंभ दहा जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
    कोल्हापूर येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीस अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी, अॅड. प्रशांत पाटील, प्रा.भास्कर चंदनशिवे, नंदकुमार कांबळे, प्रा.रवींद्र पाटील ,अतुल मंडपे, सुरेश कांबरे, भाऊसाहेब सकट, विवेक स्वामी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Saturday, 26 December 2020

वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा

हेरले / वार्ताहर
दि.27/12/20
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्येंबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीला यश आले असून  मंगळवार दि.२९ तारखेपासुन गावनिहाय भेटी देवून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.या याबाबतचे परिपत्रक नुकतेच जिल्हा अधिकारी यांनी काढले आहे. 
     १० डिसेंबर राेजी खासदार धैर्यशील माने यांनी चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प संघटनांतील पदाधिकारी व गौरव नायकवडी यांना सोबत घेऊन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याबरोबर बैठक घेतली होती.यामध्ये वसाहतींचे विविध प्रलंबित प्रश्न मांडले होते.प्रत्येकी सोळा वसाहतीमध्ये समक्ष जाऊन प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले होते.
        खासदारांच्या या बैठकीनंतर नुकतेच जिल्हा अधिकारी यांनी प्रत्यक्ष वसाहतींमध्ये जाण्यासाठी परिपत्रक काढले आहे.यामध्ये पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता,प्रादेशिक वनविभागाचे  उपवनसंरक्षक,जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी,तसेच हातकणंगले,पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार यांचा समावेश असणार आहे.
      वसाहतींनुसार जमीन व भूखंड वाटपाबाबत प्रलंबित कामकाजाचा आढावा घेऊन कारवाई करणे,वसाहतीमध्ये ज्या नागरी सुविधा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्या जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणे,पूर्ण असलेल्या सुविधांमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास ती करणे, तसेच अपूर्ण असलेल्यां सुविधा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पाहणी करणे,वसाहतींमधील लोकसंख्ये प्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबतचे निकष तपासून वसाहतीमध्ये ग्रामपंचायती स्थापन करणे,वसाहतीनिहाय स्वतंत्र ७/१२ तयार करणे,ज्या वसाहतींना स्मशानभूमी नाही अशा वसाहतींना जमीन उपलब्ध करून देणे,प्रकल्पग्रस्तांच्या रस्त्यांबाबतच्या समस्यांवर कारवाई करणे अशा विविध अडचणी दूर करण्याचे काम या प्रत्यक्ष भेटी दरम्यान करण्यात येणार आहेत.यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपापले प्रलंबित प्रश्न घेऊन आपल्या गावातील नियोजित दिवशी,बैठकी ठिकाणी  उपस्थित राहावे असे खासदार माने यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

Friday, 25 December 2020

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थान देणाऱ्या स्थानिक गावविकास आघाडीमध्ये सहभागी होणार - माजी सभापती राजेश पाटील

हेरले / प्रतिनिधी
दि.25/12/20

हातकणंगले तालुक्यातील होणाऱ्या २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थान देणाऱ्या स्थानिक गावविकास आघाडीमध्ये सहभागी होणार  अशी भूमिका ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसंदर्भात  हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
       हातकणंगले तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ६२ गावांमध्ये संघटनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे. होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानिक आघाडीमध्ये स्थान देऊन त्यांनाही सत्तेच्या वाट्यात सहभाग करून घेतल्यास पूर्ण ताकदीनिशी स्थानिक आघाडीच्या पाठीशी राहून  ग्रामपंचायतीवर  स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी स्थानिक अघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार माजी सभापती राजेश पाटील यांनी केला आहे.
      हातकणंगले तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती पैकी २१ गावांतील ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने २०२०ते २०२५या कालावधीसाठी  ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये  हालोंडी, तासगाव, मिणचे ,नेज ,बिरदेववाडी, दुर्गेवाडी, किणी,मनपाडळे, माणगाववाडी, जंगमवाडी, वठार तर्फ वडगाव, कुंभोज, कबनूर,माणगाव,चंदुर, लाटवडे, पाडळी, खोची,रुई, वठार तर्फ उदगाव, तिळवणी आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मजबूत संघटन आहे. आदी गावांमध्ये स्थानिक गाव विकास आघाडीमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गावविकास आघाडीस स्वाभिमानीचा पूर्ण पाठींबा राहील असे पत्रक माजी सभापती राजेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Tuesday, 22 December 2020

डॉ. अजितकुमार पाटील यांना पीएच.डी. प्रदान

कसबा बावडा प्रतिनिधी - 
कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समितीकडील,म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ , कसबा बावडा, कोल्हापूर चे केंद्रमुखाद्यापक डॉ.अजितकुमार भिमराव पाटील  यांना राजस्थान मधील श्री. जगदीशप्रसाद झाबरमल तिबडेवाला विश्वविद्यापिठाची मराठी विषयातून त्यांना ही पदवी मिळाली.
" एकविसाव्या शतकातील मराठी विज्ञान साहित्याचे स्वरूप व सामाजिक विकासातील योगदान " या विषयावर हा प्रबंध सादर केला होता.त्यांना कोल्हापूर  शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस के यादव, डॉ प्रतिभा घाग, डॉ कुलदीप शर्मा, डॉ माधव भोसले, डॉ मधु गुप्ता,डॉ आनंद पाटील, डॉ अजित कुशवाह, डॉ जे व्ही पाथरवट, डॉ बी बी पाटील, डॉ रवींद्र आचार्य, डॉ जोतिराम पाटील इत्यादींचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे डॉ. अजितकुमार पाटील यांचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११ मध्ये झाले.त्यांची त्याच शाळेत केंद्रमुखाद्यापक म्हणून 2017 पासून ते या पदावर आहेत.

Monday, 21 December 2020

विश्वविक्रमवीर केदार साळुंखे यांना सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० ने सन्मानीत.


हेरले / प्रतिनिधी
दि.21/12/20
मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद, भारत यांचेवतीने देण्यात येणारा
 "सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
 २०२० "  विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डॉक्टर केदार विजय साळूंखे यास माजी खासदार राजू शेट्टी ,भारत कुस्ती संघाचे  सभापती डी.आर जाधव.व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत  सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम इचलकरंजीमध्ये संपन्न झाला .
     विश्र्व विक्रमवीर डाॅ.केदार साळुंखे यांने  अवघ्या सातव्या वर्षी सायकलिगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी   चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत  स्केटींग  व सायकलिग  मध्ये  १४विश्वविक्रम नोंदवले आहेत.डाॅ केदार यास वयाच्या सातव्या वर्षी  डॉक्टरेट इन ॲथलेटीक्स ही पदवी देऊन  द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू यांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक पुरस्कार  प्राप्त झाले आहेत.  अनेक स्पर्धेत विजेतेपद पटकावली आहेत. यामधे गाेल्ड वीस ,  सिल्वर सोळा , ब्राँझ पंधरा पदकासह  अन्य बक्षिसे हि मिळवली आहेत
    मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद, भारत यांचेवतिने देण्यात येणारा
 "सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
 २०२० " क्षेत्रातील नवीन उंची गाठण्यासाठी केलेली कठोर परिश्रम, समर्पण आणि आवेश ओळखण्यासाठी व  भवितव्य घडविण्यासाठी  उपयाेगी पडणार आहे.डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुलच्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर,   प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे  मार्गदर्शन लाभले आहे.

        फोटो 
भारत कुस्ती संघाचे सभापती डी आर जाधव डॉ.केदार साळुंखेस पुरस्काराने सन्मानित करतांना.

जुन्या पेन्शन योजनेसाठी गठित सम्यक समिती रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी :- बाबा पाटील घोटवडेकर


हेरले / प्रतिनिधी
दि.21/12/20
         शासनाने १०जुलै  २०२० रोजीची आधीसूचना रद्द करणेचा निर्णय घेतला आणि  १नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित , अंशत: अनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा मार्ग मोकळा झाल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. त्यामुळे राज्यातील साधारण २५ हजार शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अशा पल्ल्वीत झाल्या.पण हा आनंद फार काळ टिकला नाही . कारण शासनाने १८ डिसेंबर २०२० रोजी १नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त  विनाअनुदानित , अंशत: अनुदानित शाळांतील  शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजना लागू करणे बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सम्यक समिती गठित केलेली आहे.
            या समितीमध्ये कोणताही अन्यायग्रस्तांचा अगर शासकीय प्रतिनिधी म्हणून कोणत्याही शिक्षक आमदारांचा समावेश नाही. मुळात यातील समाविष्ट शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देणेसठी आता कोणत्याच समितीची आवश्यकता नसून समिती नेमणे म्हणजे केवळ वेळकाढू पणाचे लक्षण आहे.त्यामुळे आता शासनाने शिक्षक कर्मचाऱ्याच्या भावनेचा अंत न पाहता १८ डिसेंबर  २०२०ची सम्यक समिती रद्द करावी. १ नोव्हेंबर  २००५पूर्वी नियूक्त  विनाअनुदानित , अंशत: अनुदानित शाळांतील  शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन लागू करावी. कारण जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना कोणतीच निवृत्ती योजना लागू नसलेने बाहेर रोजंदारीवर जाण्याची वेळ आलेली आहे . त्यामुळे मायबाप सरकारने या गोष्टीचा विचार करून  १नोव्हेंबर २००५पूर्वी नियूक्त  विनाअनुदानित , अंशत: अनुदानित शाळांतील  शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजना लागू करून विधान परिषद निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे ही कळकळीची विनंती. अशा आशयाच्या प्रसिध्द पत्रकाद्वारे मागणी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी केली आहे.

Saturday, 19 December 2020

दीपक शेटे यांना पीएचडी प्रदान


हेरले / प्रतिनिधी
दि.19/12/20
स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिणचे या शाळेतील सहाय्यक शिक्षक दिपक मधुकर शेटे यांना
श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटीची गणित विषयातील पी.एच.डी. पदवी मिळाली . 
    अनालाझिंग द प्रोपर्टी अँण्ड एप्लीकेशन ऑफ फिजी टोपोलॉजी या विषयावर त्यानी प्रबंध लिहिला होता . गेली वीस वर्ष गणिताचे अध्यापन ते करतात या काळात त्यांनी गणिताची सात पुस्तके लिहिली आहेत . त्यांच्या स्वमालकीच्या गणित लॅबमुळे ते गणित संग्रहक म्हणून ओळखले जातात . उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे . आपल्या सेवा काळात त्यांनी डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट ,जर्नालिझम , एम ए शिक्षण शास्त्र या पदव्या घेतले आहेत .त्यांना डॉक्टर अलोक कुमार शर्मा मार्गदर्शक म्हणून लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी.एस.घुगरे,सचिव एम ए परीट , आई श्रीमती रजनी शेटे , सौ सुजाता शेटे , डॉ .विवेक शेटे यांचे प्रोत्साहन लाभले.

शाळातील शिपाईपद नवीन भरती रद्द आदेशाविरोधात आंदोलन

कोल्हापूर / प्रतिनिधी
    
शासनाने दि. ११ डिसेंबर, २०२० रोजी काढलेला शिपाई पदांसाठीचा अन्यायकारक शासन आदेश रद्द करून माध्यमिक शाळा संहिता व दि. १२ फेब्रुवारी, २०१५ च्या समिती अहवालाचा मध्य साधून नवीन आकृतीबंध लागू करून शिक्षकेत्तर भरती सुरु करावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीशुक्रवार दि.१८डिसेंबर, २०२० रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर सकाळी ११ ते ५ या वेळेत धरणे आंदोलन केले.
लेखी निवेदन शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर  यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हा अधिकारी भाऊ गलांडे यांना दिले.
     कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व
संघटनांच्यावतीने वेळोवेळी शिक्षकेत्तर कर्मचा-याच्या प्रलंबित असलेल्या मागण्या शासन दरबारी सादर केलेल्या आहेत. शासनाकडून माध्यमिक शाळा संहिता १९८१ च्या सेवा शर्तीच्या
नियमावलीनुसार पद भरती केली जात होती. तदनंतर चिपळूणकर समितीच्या अहवालातील शिफारसी मान्य करून दि. २८ जून, १९९८ च्या शासन आदेशाने शिक्षकेत्तर कर्मचारी भरती राज्यामध्ये सुरु होती. पुढे शासनाने दि. २५ नोव्हेंबर, २००५ रोजी नवीन आकृतीबंध सादर केला.सदर शासन आदेशास महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाच्या विरोधामुळे सदर शासन आदेशास
शासनाने स्थगिती दिली. पुढे २३ ऑक्टोबर २०१३ व दि. १२ फेबुवारी, २०१५ असे वेगवेगळे आकृतीबंधाचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले. ते शासन आदेश सुध्दा घातक आसलेने सदर शासन आदेशास स्थगिती देण्यात आली.
     असे असतानादेखील महाराष्ट्र शासनाने दि.११ डिसेंबर २०२० रोजी या राज्यातील माध्यमिक शाळा मधील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या भरती बाबतचा शासन आदेश निर्गमीत करण्यात
आला. सदर आदेशामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचा-याची नियुक्ती ग्रामीण भागासाठी रु ५०००/निमशहरी भागासाठी रु.७,५००/- व शहरी भागासाठी रु. १०,०००/- करण्याचा निर्णय घेतलेला
आहे. सदर निर्णय हा समान काम, समान वेतन या निर्णयाला तसेच १९८१ च्या सेवा शर्तीमधील कायद्याला छेद देणारा आहे. या निर्णयामुळे एका बाजूला बहुजन समाजातील युवक हा बेरोजगार
होणार आहे. तसेच दुस-या बाजूला ठोस मानधनावरती नियुक्त केलेला कर्मचारी हा किमान वेतन कायद्यापेक्षाही कमी मानधन मिळत असल्याने कर्मचारीही मिळणे कठीण होणार आहे. तसेच
नियमित वेतनश्रेणीत काम करणा-या कर्मचा-यांचे पालक, विद्यार्थी व विद्यार्थीनीचे असणारे काका,
मामा, मावशी असे प्रकारचे नाते संपुष्टात येण्याची शक्यता असुन विद्यार्थी- विद्यार्थीनीची काळजी कोण घेणार? असे अनेक प्रश्न यामुळे उद्भवू शकतात. किंबहुना त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतील व बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा फार मोठा धोका संभवत आहे.
    या धरणे आंदोलनामध्ये आम. जयंत आसगावकर,एस डी लाड, दादासाहेब लाड,वसंतराव देशमुख, बाबासाहेब पाटील, दत्ता पाटील, भरत रसाळे, गणपतराव बागडी , पुंडलिक जाधव, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे,उदय पाटील, के के पाटील, बाळासाहेब डेळेकर, प्राचार्य एन आर भोसले ,काकासाहेब भोकरे, व्ही जी पोवार, मिलींद पांगिरेकर, मिलींद बारवडे, डी एम पाटील, प्रा. समीर घोरपडे, पंडीत पवार,श्रीधर गोंधळी, तानाजी पाटील, अजित गणाचार्य आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
      फोटो 
कोल्हापूर : शिक्षक आम. प्रा. जयंत आसगावकर निवासी उपजिल्हा अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन  देतांना शेजारी एस.डी.लाड दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील, दत्ता पाटील, व्ही जी पोवार, सुधाकर निर्मळे आदीसह इतर मान्यवर.

Monday, 14 December 2020

शाळातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शासनआदेशाची होळी.

शुक्रवार १८ डिसेबंर रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ; शिक्षकेत्तर सेवक संघटना व शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय.

    
कोल्हापूर / प्रतिनिधी
मिलींद बारवडे

   महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेबंर रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत काढण्यात आलेल्या अन्यायकारक आदेशाची जाहिर होळी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर  शिक्षकेत्तर संघटना, मुख्याध्यापक संघ, शिक्षण संस्थाचालक संघ व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने केली.  या आंदोलनाचे नेतत्व शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, चेअरमन सुरेश संकपाळ , शिक्षक नेते दादासाहेब लाड ,बाबासाहेब पाटील , डी. एम. पाटील व शिवाजी माळकर  यांनी केले. 
      शासनाच्या आदेशाच्या जाहिर होळीनंतर वरील सर्व संघटनातर्फे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. शासनाने सदरचा आदेश त्वरीत मागे घेतला नाहीतर राज्यभर तीव्र आंदोलन करणाचा इशारा देण्यात आला.
   या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवार दि. १८ डिसेबंर रोजी कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते ५ या वेळेत धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्हयातील सर्व शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
       अन्यायकारक शासन आदेशाची होळी करण्यापूर्वी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन कार्यालयात वरील सर्व संघटनांची सभा होऊन हा आदेश रद्द होईपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
                                                                       या वेळी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, पुंडलिक जाधव, खंडेराव जगदाळे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे,डी.एम. पाटील , गणपतराव बागडी, डी.एस.घुगरे, प्रा.सी.एम.गायकवाड, उदय पाटील, के के पाटील, संजय पाटील ,चंद्रकांत लाड, मिलींद बारवडे, संदीप पाटील, अभिजीत गायकवाड, काकासाहेब भोकरे, राजेंद्र सुर्यवंशी,जगदीश शिर्के आदी प्रमुख पदाधिकारीसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

     फोटो 
कोल्हापूर ;-११ डिसेबंरच्या अन्यायी शासन आदेशाची होळी करतांना माजी आ. भगवानराव साळुंखे एस डी लाड दादासाहेब लाड बाबासाहेब पाटील, सुरेश संकपाळ खंडेराव जगदाळे.
     
विभागीय शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना निवेदन देतांना वरील मान्यवर.

छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या ऊस विकास अभियानास प्रारंभ...!'प्रगत ऊस तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचविणार' : माजी आमदार अमल महाडिक.


हेरले / प्रतिनिधी
दि.14/12/20
ऊस लागवडीचे क्षेत्र वाढतआहे पण ऊस उत्पादन वरचेवर घटत चालले आहे. घटत जाणार्‍या या अडचणीवर मात करायची असेल तर नव - नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती राजाराम कारखान्याने नुकतेच छत्रपती राजाराम ऊस विकास अभियानाला सुरुवात केली आहे . 
     या अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर होणाऱ्या ऊस उत्पादन वाढीच्या प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि जमिनीची सुपीकता वाढवून, बियाणे निवडीपासून ऊस तोडीपर्यंत नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करावा . याबाबत संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या  बांधापर्यंत पोचविणे हा उद्देश आहे. तो आम्ही पूर्ण करणारच असा ठाम विश्वास माजी आमदार व  कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी लाटवडे येथे बोलताना  व्यक्त केला. 
      शेतकऱ्यांसाठी आयोजित या सभेत बोलत असताना वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट चे माजी ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने - पाटील म्हणाले , उत्पादनाच्या बाबतीत जागतिक पातळीवर अनेक संशोधने झाली आहेत. या संशोधनाच्या आधारे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना आधुनिक ऊस तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कारखान्याच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांची भरघोस व दुप्पट ऊस उत्पादनाकडे वाटचाल होईल. 
        कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने म्हणाले, आम्ही ऊस उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न व प्रयोग करणार आहोत. त्यास ऊस उत्पादक शेतकरी राजाने सहकार्य करावे.या प्रसंगी चेअरमन  सर्जेराव माने ,संचालक दिलीप पाटील,  सिद्धू नरबळ,  श्री बिरदेव तांनगे , पत्रकार विनोद शिंगे आदीसह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
      फोटो 
ऊस विकास अभियान अंतर्गत शेत शिवारामध्ये प्रबोधन करतांना माजी आम.अमल महाडिक चेअरमन सर्जेराव माने व शेतकरी वर्ग.

Thursday, 10 December 2020

दूध उत्पादक शेतकरी हा गोकूळचा कणा - गोकुळ कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.10/12/20
 दूध उत्पादक शेतकरी हा गोकूळचा कणा आहे. तो अधिक मजबूत करण्यासाठी संघाच्या सर्व विभागाने निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करावे. असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे  कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांनी केले. ते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे आयोजित विक्री व्यवस्थापन कार्यशाळा समारोप प्रसंगी बोलत होते. पूणे येथील मार्गदर्शक अतुल पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   ते पुढे म्हणाले, गोकुळ दूध संघ हा येथील दूध उत्पादक शेतक-यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला देणारा महाराष्ट्रातील ऐकमेव संघ आहे. त्यांच्या जिवावरच हा संघ मोठा होत आहे. भविष्यात दूध उत्पादक शेतक-यांचे उत्पन्न आहे त्या पेक्षा दुप्पट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व दूध उत्पादक केंद्रस्थानी ठेवून गोकुळ संघ ना नफा -- ना तोटा या तत्त्वावर  महालक्ष्मी पशुखाद्य व फर्टिमिन चिलेटेड पावडर बनवत आहे. यामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती वाढते, फॅट, एस.एन.एफ , दूधात वाढ होते. तसेच दोन व्येतातील अंतर कमी होण्यास मदत होते. याची माहिती संस्था व दूध उत्पादकांपर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याचे घाणेकर यांनी सांगितले.
अतुल पेठे यांनी दोन दिवसांमध्ये संघ, संस्था व दूध उत्पादक यांचा सकारात्मक समन्वय कसा साधावा.  संघाच्या सर्व  विभागाकडून संघ सेवा सुविधा व विक्री वाढ कशी करता येईल याबाबत विविध पैलू  उलगडून सांगितले. तसेच आपल्या मनात दडलेल्या सकारात्मक व नकारात्मक गोष्टींचा उलगडा अतुल पेठे व सहकारी राजू यांनी केला.
स्वागत पशुखाद्य कारखाना व्यवस्थापक व्ही .डी.पाटील यांनी केले, आभार व्ही. टी. पाटील यांनी मानले. नियोजन संगणक प्रमुख आर.बी.पाटील, बी.पी.पाटील, राहूल जाधव, संग्राम पाटील यांनी केले.
    याप्रसंगी पशुसंवर्धन व्यवस्थापक यु.व्ही.मोगले, वैरण विकास अधिकारी भरत मोळे. डॉ. दळवी, डॉ.कामत, डॉ. बारवे . वरिष्ठ संकलन अधिकारी पंडित तेलवेकर, प्रा. एम.पी.पाटील, महिला नेतृत्व प्रमुख सौ. निता कामत, आर.आर.पाटील, सुरेश पाटील, राजू परुळेकर, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.
     फोटो
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने आयोजित कार्यशाळा समारोप प्रसंगी कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर अतुल पेठे, व्ही.डी.पाटील, डॉ.मोगले, दळवी आदी

Wednesday, 9 December 2020

संजय घोडावत पॉलीटेक्निकतर्फे 'ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याबाबत प्राचार्य विराट गिरी यांचे ११ डिसेबंर रोजी मार्गदर्शन.


हेरले / प्रतिनिधी
दि.10/12/20
तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्यावतीने डिप्लोमा प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी व तो निश्चित करण्यासाठी दिनांक १२ ते १४ डिसेंबर हा कालावधी घोषित करण्यात आला आहे. संजय घोडावत पॉलीटेक्निक मार्फत ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, योग्य शाखेची व  योग्य कॉलेजची निवड कशी करायची याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य  विराट गिरी सर यांचे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान शुक्रवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. 
   हे व्याख्यान ऑनलाईन वेबिनारद्वारे होणार आहे. विद्यार्थी व पालकांच्या मनातील ऑप्शन फॉर्म भरण्यासंबंधी असणारी संभ्रमावस्था दूर करण्यासाठी संजय घोडावत पॉलीटेक्निक मार्फत दरवर्षी ऑप्शन फॉर्म संबंधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते संजय घोडावत पॉलीटेक्निक ने  विनामूल्य ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरून देण्याची सुविधादेखील कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिली आहे. हा ऑनलाईन मोफत वेबिनार असून इच्छुक विद्यार्थी व पालकांनी  https://forms.gle/HvpFuxKYRvc9WGc1A या लिंक वर जाऊन आपले नाव, ई-मेल व संपर्क क्रमांक इत्यादी माहिती भरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनाच या करिअर वेबिनार ची लिंक पाठवली जाईल-अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी  ९०२८४५६६५३, ९९६०१७१८४१  या नंबर वर संपर्क साधावा.
या ऑनलाईन वेबिनारसाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Sunday, 6 December 2020

हेरलेत महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांच्या फंडातून १५ लाख रुपयांचा विकास कामाचा उद्घाटन शुभारंभ

हेरले / प्रतिनिधी
दि.6/12/20
        महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांच्या फंडातून १५ लाख रुपयांचा दलित वस्ती सुधार योजनेच्या  विकास कामाचा उद्घाटन शुभारंभ हेरले (ता. हातकणंगले) येथे संपन्न झाला.
        या प्रसंगी सभापती डॉ. पद्माराणी पाटील  म्हणाल्या, रूकडी जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच गावामध्ये विविध फंडातील विकास कामे मंजूर करून कामे सुरू आहेत. याच बरोबर हेरले गावासाठी जास्तीत जास्त विविध विकास निधी मंजूर करून गावाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
      दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत हायस्कूल जवळील मातंग समाज वसाहत रस्त्यासाठी १o लाख रुपये विकास निधीचे रस्त्याचे काम सुरू झाले आहे. ५ लाख रूपये संजय नगर खाबडे गल्ली येथे रस्ता करण्याचे काम सुरू झाले. या दोन ठिकाणच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
     प्रसंगी उपसरपंच  राहुल शेटे, माजी उपसरपंच संदिप चौगुले, माजी सरपंच रियाज जमादार, ग्रामपंचायत सदस्य सतीश काशिद,मस्जित लोखंडे, संतोष उलसार, दिपक जाधव आदी मान्यवरासह महिला उपस्थित होत्या.

        फोटो 
हेरले येथे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील व इतर मान्यवर.