Saturday, 13 March 2021

राहुल शेटे यांना आंतरराज्य विशेष सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर.


हेरले / वार्ताहर
दि.13/3/21
हेरले ता हातकणंगले येथील उपसरपंच व सृष्टी फौंडेशन संचलित जिजामाता विद्यालय चे अध्यक्ष  राहुल शेटे यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन आणि हेल्थ नेचर डेव्हलपमेंट यांचा या वर्षीचा अंतरराज्य विशेष सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
  कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यातून ग्रामीण भागातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. मेडल , प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व म्हैसूर फेटा देऊन त्यांचा विशेष सत्कार करणेत येणार आहे.
   सदर आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे 28 मार्च 2021 रोजी होणार आहे. नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन ची स्थापना बेळगाव चे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर ,भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत , अॅड. अनिल शिंदे , उद्योगपती सुरेशदादा पाटील व अभियंते मनोहर वडर यांनी केलेली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला कर्नाटक,महाराष्ट्र व गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी , सिनेकलाकार , शिक्षण खात्यातील अधिकारी, राजकीय नेते व मठाधिश उपस्थित राहणार आहेत. 
  उपसरपंच  राहुल शेटे यांनी हेरले सारख्या ग्रामीण भागात 25 वर्षात विविध सामाजिक उपक्रमातून मोठं कार्य केलेलं आहे जिजामाता विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्यासाठी संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने सेमी इंग्लिश स्कुल चालू केले आहे. शिवराज सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून सर्व सामान्य शेतकऱ्यांची जमीन बागायत करण्याचा प्रयत्न केला आहे. एकता कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. माईन मुळा या पिकासाठी G. I. ( *ग्लोबल आयडेंटिफिकेशन* ) मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. एकता ग्रुपच्या माध्यमातून विविध स्पर्धा,वृक्षारोपण,रक्तदान शबीरे,स्वछता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान,महिलांचे प्रशिक्षण वर्ग, दिव्यांगांना मदत,जेष्ठ नागरिकांना सहकार्य इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेत. 
    ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनांतून गरीब व सर्वसामान्य लोकांना सहकार्य , स्मशाभूमीत फळ झाड लागवड व संवर्धन, घनकचरा व सांडपाणी  व्यवस्थापनेसाठी प्रयत्न याच बरोबर ग्रामविकासाच्या नवं नवीन अनेक संकल्पनां राबविल्या आहेत.

No comments:

Post a Comment