Sunday, 29 August 2021

एक गाव एक गणपती आवाहनाला चांगला प्रतिसाद

हेरले / प्रतिनिधी

कोरोनाचा समुह संसर्ग होऊ नये तो रोखण्यासाठी खबरदारी म्हणून आगामी होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरोली एमआयडीसी पोलिस  ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या १२ गावां पैकी सहा गावांमध्ये ' एक गाव एक गणपती' गणेश उत्सव करण्यासाठी तरुण मंडळांची बैठक घेऊन संकल्पना यशस्वी केली आहे. उर्वरीत सहा गावांमध्ये काही दिवसातच बैठक घेऊन ही संकल्पना पूर्णत्वास आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून या गावांमध्येही सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमाद्वारे दिली.
           शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचा प्रभार स.पो.नि राजेश खांडवे यांनी नुकताच स्विकारला आहे. पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सादळे ,मादळे, कासारवाडी, टोपे, हालोंडी, मौजे वडगांव या सहा गावांमध्ये गणेश उत्सव साजरा करण्याबद्दल सर्व तरुण मंडळांची मिटींग बोलवून या सभेमध्ये गेली दिड वर्षा पासून कोरोनाच्या संसर्गाची आपत्ती, कोरोनाची नियमावली, कोरोनाच्या डेल्टा विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य धोका, येणारी कोरोनाची तिसरी लाट यामुळे आपल्या सर्वांना संसर्गाचा संभाव्य धोका ओळखून कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून गणेश उत्सव व विविध उत्सव जल्लोषाने गर्दी न करता साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. सण, उत्सव साद्या पद्धत्तीने साजरे करुन आपल्या जिविताचे रक्षण करणे या विश्व आपत्ती परिस्थितीत महत्त्वाचे आहे. असे भावनिक आवाहन करीत या गावातील सर्व मंडळांना 'एक गाव एक गणपती ' उत्सव करण्यासाठी आवाहन केले. या सहा गावांतील तरुण मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
        पुलाची शिरोली,शिये ,भुये, संभापूर, जठारवाडी, नांगाव या गावांमध्ये लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तरुण मंडळे यांच्याशी संवाद साधून एक गाव एक गणपती गणेश उत्सव करण्यासाठी बैठकीचे आयोजन करणार आहोत. या गावातही नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळेल. एमआयडीसी पोलिस ठाण्यातंर्गत येणा-या बारा गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना साकार होईल असा अशावाद त्यानी व्यक्त केला.
      सपोनि राजेश खांडवे यांनी   एमआयडीसी पोलिस ठाण्यातंर्गत  येणाऱ्या बारा गावांमध्ये तसेच एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याची सूचना सर्व बिट अंमलदार यांना देऊन अवैध धंदा सुरु असल्याचे आढळल्यास अवैध धंदेवाल्यांवर  कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Saturday, 28 August 2021

पुरग्रस्त शेतकर्‍यांना योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा

हेरले / प्रतिनिधी

 पाच सप्टेंबरच्या जलसमाधी आंदोलनाची सुरुवात प्रयाग चिखली येथून ( पंचगंगा नदी मुळ संगम )  १ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी  संघटनेची  पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू होणार आहे. या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणेसाठी  हेरले (ता. हातकणंगले) येथील शेतकरी विकास सेवा सोसायटीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी,जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी सभापती राजेश पाटील,  संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणिस मुनिर जमादार यांच्या मार्गदर्शनाने सभा संपन्न झाली. 
       पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामा होऊन २०१९ साली मिळालेल्या भरपाई प्रमाणेच योग्य भरपाई मिळावी. तसेच नियमित शेती कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेली पन्नास हजाराची मदत  १ सप्टेंबर पूर्वी मिळावी याच बरोबर इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाच सप्टेंबरला कृष्णा पंचगंगा नदी संगमाजवळ जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पदयात्रेत हेरले परिसरातील शेतकरी व पूरग्रस्तांनी सहभागी होण्यासाठी आवाहन करणेसाठी या सभेचे नियोजन केले होते.
    पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरुवात  १ सप्टेबर रोजी होऊन आंबेवाडी , वडणगे येथील जवळील गावे करत शिये येथे मुक्काम  , २ सप्टेबंर रोजी शिरोली  हालोंडी दुपारी जेवण हेरले मार्गे चोकाक मुक्काम, ३ सप्टेबंर रोजी सकाळी अत्तीग्रे , रुकडी धरणावरून चिंचवाड ,वळीवडे, वसगडे , पट्टण कोडोली बिरदेव मंदिर मुक्काम , ४ सप्टेबंर रोजी  इंगळी , रुई , चंदूर  इचलकरंजी ,शिरदवाड ,अब्दूललाट मुक्काम , ५ सप्टेबर रोजी येथून नरसोबाचीवाडी येथील जलसमाधीसाठी प्रस्थान होणार आहे.जास्तीतजास्त पूरग्रस्त शेतकऱ्यांचा सहभाग , दिलेल्या मागण्या शासनाने अग्रक्रमाने मान्य कराव्यात आणि पूर बाधितांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी. या मागण्यासाठी या पदयात्रेचे नियोजन केले आहे.  
    शेतक-यांनी मोठ्या संख्येंनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केले. ही पदयात्रा यशस्वी करणेसाठी मोठ्या संख्येने शेतकरीवर्ग व पूरग्रस्त सहभागी होऊन ही पदयात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहू असा निर्धार  माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केला.
    या प्रसंगी सरचिटणिस मुनिर जमादार,अरुण मगदूम , लक्ष्मण निंबाळकर, राजगोंड पाटील,अशोक मुंडे,उदय चौगुले,संदीप चौगुले, बाळगोंड पाटील,अमोल पाटील,सुरेश चौगुले, महंमद खतीब,अस्लम मगदूम,सुनील खोचगे, राजेंद्र कदम,राहुल शेटे,फरीद नायकवडी,दादासो कोळेकर, सरदार जमादार आदी मान्यवरांसह  शेतकरी व पूरग्रस्त उपस्थित होते.

Saturday, 21 August 2021

एन. एन . एम. एस परीक्षेत बालावधूत हायस्कूलच्या विद्यार्थिनीचे यश


हेरले / प्रतिनिधी
दि.21/8/21
          महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एन .एन. एम. एस.) परीक्षेमध्ये मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील बालावधूत हायस्कूलची विद्यार्थिनी कु. समीक्षा यशवंत कुंभार हिने २०० पैकी १०८ गुण मिळवून प्रतिवर्षी बारा हजार रुपये प्रमाणे पुढील चार वर्षात शासनाच्या ४८ हजार रु.च्या शिष्यवृत्तीस पात्र झाली आहे. एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने मिळविलेल्या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यासाठी तिला संस्थेचे संस्थापक व शालेय समितीचे चेअरमन सदाशिव चौगुले ,मुख्याध्यापक एस ए.चौगुले, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांचे मार्गदर्शन लाभले.

Wednesday, 18 August 2021

वृक्षारोपण व पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू - शिक्षक रत्न सदाशिव चौगुले


हेरले / प्रतिनिधी
दि.18/8/21
         निसर्ग मानवाला खूप काही  देत असतो . याची जाण ठेवून आपण निसर्गाचे देणे आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या भागात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन बालावधूत हायस्कूल मौजे वडगावचे संस्थापक व शालेय समितीचे चेअरमन शिक्षक रत्न सदाशिव चौगुले यांनी व्यक्त केले. ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील बालावधूत हायस्कूलच्या प्रांगणात १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. 
           कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन मिळेनासा झाला आहे. ऑक्सीजन शिवाय रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे .भविष्यकाळात ऑक्सिजन पुरवठा करणारी कार्यक्षेत्र निर्माण झाली पाहिजेत. त्यामुळे वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जतन करावे असे मत व्यक्त केले. यावेळी शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण, तंबाखूमुक्त शपथ, अटल लॅबमध्ये प्रशिक्षण, इत्यादी कार्यक्रम पार पडले.
        या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव चौगुले ,उपाध्यक्ष नारायण संकपाळ, सेक्रेटरी संजय चौगुले, मुख्याध्यापक एस. ए .चौगुले, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार आर. एस. स्वामी यांनी मानले.
 
 फोटो 
शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करताना संस्थेचे संस्थापक सदाशिव चौगुले,  उपाध्यक्ष नारायण संकपाळ ,सेक्रेटरी संजय चौगुले, मुख्याध्यापक एस. ए .चौगुले, व इतर मान्यवर ( छाया सुरेश कांबरे )

Sunday, 15 August 2021

राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार


कसबा बावडा प्रतिनिधी : दि 15 प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका संचलित मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये 15 ऑगस्ट भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्त कोरणा काळामध्ये काम केलेल्या व महापुरा मधील पूरग्रस्त व्यक्तींना स्वतःचा जीव पणाला लावून त्यांच्या राहण्याची व जेवण्याची सोय मोफत करणाऱ्या व कामगिरी मध्ये असलेल्या कसबा बावडा मधील सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले, आर्किटेक्चर इंजिनियर सुनील पोवार ,आरोग्य रक्षक मनोज कुरणे, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत जाधव, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, आरोग्य विभाग पाच कसबा बावडा येथील प्रमुख डॉक्टर सोनाक्षी पाटील, सदर बाजार विभाग प्रमुख डॉ.निखिल पाटील,मच्छिंद्र दाते, तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कोरणा काळामध्ये सध्या भारतीय स्वातंत्र्य दिन शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून करण्यात आला.
 मनोगतामध्ये डॉ. अजितकुमार पाटील यांनी एकविसाव्या शतकात भारत महासत्ता देश बनत असताना भूतकाळापासून दूर जाण्यासाठी आपण तीन महत्त्वाच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा व प्रगती कडे लक्ष पाहिजे. भारतामध्ये 1991 मध्ये आर्थिक सुधारणांचे पर्व सुरू झाले भारतामध्ये टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रात विकास दिसून येऊ लागला देशाच्या साक्षरता मध्ये मोठी सुधारणा झाली. आयुर्मान मनुष्यबळ विकास निर्देशांकामध्ये भारतीयांचे जीवन सैन्यामध्ये शिक्षणामध्ये तसेच प्रत्येक गोष्टींमध्ये सुधारणा होत गेली पण, आज भारत एका विशिष्ट टप्प्यावर उभा राहिला आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा या विज्ञान वाद लक्षात ठेवुन जगणं जगलं पाहिजे आपण आपल्या आरोग्यविषयक जीवनाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जगलं पाहिजे ,कारण आपल्याला कोरणा सारख्या महामारी सारखी आणखी कोणती वैदिक आपत्ती टाळायची असेल तर आपण आपल्या जेवण मनात व राहणीमानात बदल केला पाहिजे तरच आपण सक्षम राहू त्याचप्रमाणे पर्यावरणातील भाग म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. जीवन जगत असताना आपण जर जगायचं असेल तर आपले विचार देशाच्या प्रगतीसाठी सक्षम व खंबीर नेतृत्व करणारे असावी लागते असे मनोगत व्यक्त केले.
 कोरोनाकाळ कामगिरीवर असलेले शिक्षक सुजाता आवटी ,आसमा मुजावर, सुशील जाधव,तमेजा मुजावर, उत्तम कुंभार, शिवशंभु गाटे ,विद्या पाटील ,मंगल मोरे ,हेमंत पाटोळे यांचा सत्कार डॉक्टर सोनाक्षी पाटील, सचिन चौगुले ,अभिजीत जाधव, सुनिल पोवार यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन व संचालन तमेजा मुजावर, विद्या पाटील यांनी केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार,अनुराधा दाभाडे,दिपाली चौगुले व इतर सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार उत्तम कुंभार यांनी मानले.

Tuesday, 10 August 2021

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबीर संपन्न

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे भव्य रक्तदान शिबिर


वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज व कोल्हापूर शिवाजी पेठ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड 19  चे सर्व शासकीय नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे रक्तदान शिबीर घेण्यात आले..
 पहिले आलेले तीन रक्तदाते यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले
 वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ही संघटना कोणतीही जात धर्म न पाहता वैद्यकीयबाबतीत मदत करते. या संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे झालेली आहेत व भविष्यात होत राहतील. 
 वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मराठा प्रविण, अवधूत सुर्यवंशी, दिनेश कदम, सचिन खेतले, शिरीष देवरे, दत्ता जगदाळे, देव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम सुरू आहे. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या जाणिवेतून महाराष्ट्रात 72 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराला प्रचंड मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रात 5023 व कोल्हापूर जिल्ह्यात 205 ब्लड बॅग चे रक्तसंकलन झाले आहे
कोल्हापूर येथे श्री विकास जाधव, संताजी पाटील, जितू साबळे, रोहित लांबे -  पाटील तसेच सर्व ॲडमिन व स्वयंसेवक यांनी संयोजन केले.

Monday, 9 August 2021

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना ऑगष्ट क्रांतीदिनी विविध मागण्यांचे निवेदन सादर.

जुनी पेन्शन योजना लागू करणे, परिविक्षाधीन शिक्षकांना १८००० रुपये मानधन करणे, शालार्थ आयडी चा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावा आदी मागण्यांचा समावेश.

*कोल्हापूर* : ९ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी कोल्हापूर जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले .शिष्टमंडळात शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे,कार्याध्यक्ष बाळ डेळेकर , कोल्हापूर शहराध्यक्ष सूर्यकांत चव्हाण , शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हा अध्यक्ष गजानन चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने विविध शैक्षणिक मागण्याबाबत शिक्षण उपसंचालक सत्‍यवान सोनवणे यांच्याशी चर्चा  करण्यात आली. निवेदनामध्ये खालील  प्रमुख मागण्यांचा समावेश होता. सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानां जुनी पेन्शन योजना लागू करणेत यावी, घोषित -अघोषित विनाअनुदानित शाळांना 100% वेतन अनुदान देण्यात यावे, 17 मे 2017 चा रात्र शाळाबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी तुकडीचा निकष शहरी भाग 25, ग्रामीण भाग 20 डोंगराळ भाग 15 विदयार्थी हा निकष कायम ठेवावा, कला- क्रीडा व आय.सी.टी. शिक्षकांचा संचमान्यतेत समावेश करण्यात यावा, सावित्री -फातिमा   शिक्षक कुटुंब स्वास्थ्य योजना त्वरित लागू करण्यात यावी , वेळखाऊ व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे शालार्थ आयडी संगणकप्रणाली रद्द करण्यात यावी व शालार्थ आयडी चा अधिकार शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षक यांना देण्यात यावा,परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षकांना किमान वेतन मानधन 18 हजार रुपये देण्यात यावे, 2018 पासून प्रलंबित असलेली माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सदोष संच मान्यता दुरुस्त करण्यात यावी, कोविड  व अन्य आजाराने मयत शिक्षक-  शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाल्यांना अनुकंपावर तात्काळ नोकरी देण्यात यावी,पोस्ट कोविड आजाराचा वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत समावेश करण्यात यावा , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून वगळण्यात यावे व ऑनलाईन - ऑफलाइन शैक्षणिक कामकाजासाठी त्यांना पुरेसा वेळ देण्यात यावा, शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देताना नोकरी व शेतीतून मिळणारे उत्पन्न वगळून अन्य उत्पन्नाचा आधार घेण्यात यावा, महापूर व कोविड परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटसमयी विद्यार्थ्यांची इयत्ता दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले . वरील सर्व मागण्या राज्य शासनाकडे तात्काळ पाठविल्या  जातील असे शिक्षण उपसंचालक सत्‍यवान सोनवणे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. या धरणे आंदोलन प्रसंगी शिक्षक भारतीचे जिल्हा सचिव अनिल चव्हाण, शिक्षक भारतीचे  ज्यूनियरचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, तालुका पदाधिकारी मोहन कोलते, प्रकाश कोकाटे, रमेश कुंभार,शांताराम तौदंकर ,मच्छिंद्र शिरगावकर ,मदन निकम, सुभाष पाटील, रवींद्र मोरे ,सुधाकर  डोणोलीकर, संजय व्हनागडे, अशोक मानकर ,विश्वास धुरे , सुभाष भोसले ,कादर जमादार, राजेंद्र कुंभार, दत्तात्रय सुतार , प्रदीप जाधव, दिनकर कुंभार , संजय म्हावळे, दिलीप भोसले, मनोहर पाटील, शिवाजी माने , सर्जेराव लोहार, बाबुराव राजीगरे, तसेच शिक्षक भारतीचे  प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, 4 August 2021

हेरलेत महापूरामुळे खंडित विद्युत पूरवठा महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने सुरळीत

हातकणंगले / प्रतिनिधी


हेरले ( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीचे नदीकडील गाव पाणी पुरवठयाची विदयुत वाहिनीचे डांब व डिपी अतिवृष्टीने महापूरामध्ये बुडाल्याने अकरा दिवस विजपुरवठा बंद पडला होता. महावितरणचे कनिष्ठ अभियांता संदिप कांबळे त्यांचे सहकारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी मंगळवारी दिवसभर अथक प्रयत्नाने  विजपुरवठा पूर्ववत सुरु केला.
  महापूरामुळे  नदीकडील भागातील गाव   पाणी पुरवठ्याच्या विद्युत जोडणीसाठी असणारे उच्चदाब वाहिनीचे जवळपास दहा ते बारा खांब हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले होते. त्यापैकी दोन पोल पाण्याच्या जास्त दाबामुळे पूर्णपणे झूकून विद्युत वाहिनीच्या तारा खाली आल्या होत्या. तसेच बऱ्याच ठिकाणी पोलवर नदीच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता.  पाणी पूर्णपणे ओसरले मात्र  मोठ्या प्रमाणात चिखल  आणि दलदल असल्यामुळे काम करण्यास अडचण येत होती. तरीही झुकलेले  दोन पोल सरळ करून घेतले. खाली आलेल्या तारा पूर्णपणे व्यवस्थित करून घेऊन विद्युत लाईनवर अडकलेला कचरा काढून घेतल्याने लाईन चालू करण्यात यश आले. 
   यामध्ये महावितरणचे कर्मचारी जगन्नाथ शिंगे, संतोष जाधव  तय्यब मुल्ला, वैभव पाटील, अश्रफ खतीब,  वैभव  अपराध, विनायक सुतार,  युवराज चौगुले, प्रमोद चौगुले व ग्रामपंचायत कर्मचारी राहूल निंबाळकर ,महावीर दाबाडे ,मनोज लोखंडे, राजू सोळंखी, दिलीप जाधव आदी सहभागी होऊन कार्यरत होते.

     फोटो 
हेरले : नदीकडील गाव पाणी पुरवठा विद्युत वाहिनीवर महापूरामुळे अडकलेला कचरा काढतांना महावितरणचे कर्मचारी.

Sunday, 1 August 2021

हेरले ते मौजे वडगांव रस्ता खचल्याने वाहतूकीस धोकादायक

हेरले / प्रतिनिधी

हेरले ते मौजे वडगांव रस्त्यावरील कासार मळा येथील विहीरीचा भाग खचल्याने संरक्षक भिंत पडून रस्त्याचाही काही भाग खचला आहे. त्यामुळे हा रस्ता अवजड वाहनांच्या वाहतूकीस बंद झाला असून सर्वच वाहनांच्या वाहतूकीस  धोकादायक बनला आहे. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ विहिरीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करून खचलेल्या रस्त्याचा भराव करून या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववतपणे सुरळीत करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
      मागच्या आठवडयात शुक्रवारी अतिवृष्टीने मौजे वडगाव - हेरले रस्त्यावरील कासार मळा येथील विहिरीची संरक्षक भिंत पडून रस्ता खचला आहे. त्यावेळी पासून हा रस्ता अवजड वाहने, चारचाकी, तीनचाकी वाहनांसाठी वाहतूक बंद केली आहे. हा रस्ता नागाव, मौजे वडगाव,  एमआयडीसी शिरोली ,पेठवडगांव आदी गावाकडे जाण्याचा सोयीचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाहतुक होत असते. मात्र सद्या अवजड वाहनांना हा रस्ता बंद असल्याने गौरसोय होत आहे. 
    या रस्त्यावरील उजव्या बाजूच्या दोन विहिरी व डाव्या बाजूच्या दोन विहिरीवर संरक्षक भिंती नसल्याने हा रस्ता वाहतूकिस धोकादायक बनला आहे. तरी या रस्त्यावरील चारही विहिरीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने करून हा रस्ता  वाहतूकिस सुरक्षित पूर्ववत करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
       फोटो 
हेरले ते मौजे वडगांव रस्त्यावरील कासार मळा येथील विहिरीची संरक्षक भिंत खचून रस्ताही खचल्याने हे ठिकाण वाहतूकीस धोकादायक बनले आहे.

शिक्षिका कोळेकर मॅडम यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सदिच्छा निरोप समारंभ संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 

 म.न.पा हिंद विद्यामंदिर रूईकर काॅलनी कोल्हापूर शाळेतील सहाय्यक शिक्षिका मा.श्रीमती शांतादेवी कोळेकर मॅडम यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सदिच्छा निरोप समारंभ पार पडला .सदर कार्यक्रमाला मा.नगरसेविका  मा.उमा इंगळे मॅडम, शै. पर्यवेक्षक मा.विजय माळी साहेब, शै.पर्यवेक्षक मा.बाळासाहेब कांबळे साहेब, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचेराज्य उपाध्यक्ष मा.डाॅ.अजितकुमार पाटील सर, शहर शाखा उपाध्यक्ष दिलीप माने सर,  शिक्षक समितीचे नेते मा.सुधाकर सावंत सर, समिती शहराध्यक्ष मा.संजय पाटील सर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष मा.विलास पिंगळे सर , विठ्ठल देवणे सर,आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रतापसिंह निकम सर, मा.डांगरे सर, नामदेव वाघ सर, राजेंद्र कांबळे सर, सहदेव शिंदे सर इतर मान्यवर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी सर्वांनी कोळेकर मॅडम यांना निरोगी आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे " एकविसाव्या शतकात भारत जगात महासत्ताधीस व जगाला मार्गदर्शनाचे काम करेल  हे स्वप्न आपण प्रत्येकाने कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे एकजुटीने साकार करूया " एकविसाव्या शतकात भारताला सर्वसामान्य मूलभूत प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षकांनी कोरोना कालावधीमध्ये सुद्धा आपले शैक्षणिक योगदान दिले आहे त्यासाठी त्यांनी ऑनलाइन शिक्षण आपलं शिक्षण दीक्षा ॲप विविध प्रकारचे शैक्षणिक ऍप वापरून विद्यार्थ्यांना सक्षम व समर्थपणे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच आज कोरोना कालावधीमध्ये सुद्धा शिक्षक दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करण्याचे काम अहोरात्र करत आहेत त्यांच्या जिद्दीला माझा सलाम आहे .आजच्या पिढीला कोळेकर मॅडम यांच्यासारख्या संस्कारक्षम व मूल्य शिक्षण वर आधारित शिक्षण देणार्‍या शिक्षकांची गरज आहे  असे विचार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ अजितकुमार पाटील सर यांनी व्यक्त केले व त्यांना पुढील शैक्षणिक, वसामाजिक कार्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. मुख्या- मा.मनोहर सरगर सर यांनी केले,सूत्रसंचलन  शिंगण मॅडम यांनी केले तर आभार विजय सुतार सर यांनी मानले!