कोल्हापूर प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवरायांचे अत्यंत विश्वासू शिलेदार बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर आधारित अॅड. आनंद रा.देशपांडे लिखित "तो बहिर्जी होता"या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पन्हाळगड येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध उद्योजक आणि गुणीदास फौंडेशनचे अध्यक्ष शिरीष सप्रे यांच्या हस्ते करण्यात आले. राजप्रसाद धर्माधिकारी व डॉ. अजित शुक्ल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर आनंद देशपांडे यांनी पुस्तकातील 'सुटका' आणि 'काजवे' या दोन कथांचे वाचन केले. उपस्थितांच्या कडून त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अबोली झाडबुके, आण्णासाहेब मोहिते, दिलीप बनछोडे, अरुण नाईक इ विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले सोलापूरचे सुप्रसिद्ध लेखक अॅड आनंद रा देशपांडे यांनी या पूर्वी 'कातळ मनीचा ठाव, काही जनातलं काही मनातलं, श्री रायगड, आनंदाचे डोही, आनंद तरंग' इ पुस्तकांचे लेखन केले आहे.
बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या सैन्यदलातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. चार पाच प्रसंगापेक्षा जास्त सखोल तपशील त्यांच्या विषयी इतिहासात उपलब्ध नाहीत तरीही शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत त्यांची सावली सारखी उपस्थिती होती. अफझलखानाचा वध असो, आग्र्याहून सुटका असो, सिद्धी जोहारच्या वेढ्यातून पन्हाळगडावरून सहीसलामत सुटका असो, सुरतेवरील छापा असो वा लाल महालातील शाहिस्तेखानाच्या छावणीवर केलेला हल्ला असो, अशा प्रत्येक मोहिमेची अचूक आखणी करताना खडानखडा माहिती बहिर्जी नाईक आणि त्यांचे गुप्तहेर शिवरायांना देत असत. त्यामुळे प्रत्येक मोहीम फत्ते होण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान होते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील या आणि अशाच प्रसंगात बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेचे लेखन शक्यतेच्या चौकटीचा कस लावून कल्पना चित्रण स्वरूपात केले आहे. शिवाजी महाराजांच्या अनेक मोहीमा यशस्वी होण्यामागे गुप्तहेराची भूमिका बजावणारा सूत्रधार कोण होता, तर "तो बहिर्जी होता" .
एकूण सोळा कथांचा संग्रह असलेले हे पुस्तक अत्यंत रोचक आणि उत्कंठावर्धक आहे.
फोटो.......
पन्हाळा येथे बहिर्जी नाईक पुस्तकाचे प्रकाशन करताना शिरोली एमआयडीसीतील जेष्ठ उद्योजक शिरीष सप्रे. प्रसंगी राजप्रसाद धर्माधिकारी, अजित शुक्ल व आनंद देशपांडे.
No comments:
Post a Comment