"
वाचन संस्कृती वाढण्यासाठी आणि ग्रंथप्रसार होण्यासाठी केवळ मराठी भाषा गौरव दिन किंवा राजभाषा दिन साजरे करून काही फारसे साध्य होणार नाही. त्याकरिता शाळा-महाविद्यालयातून ग्रंथदानासारखे उपक्रम राबवून विद्यार्थी "वाचते" होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. कोणत्याही शाळा-महाविद्यालयाचे ग्रंथालय हे त्या-त्या संस्थेचे वैभव ठरावे." अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रंथदाते प्राचार्य जीवन साळोखे यांनी व्यक्त केली.
ते न्यू एज्युकेशन सोसायटीच्या डी.एड.कॉलेज, पेटाळा येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य आर.जी.कुंभार होते.यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विदयार्थीनीनी मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर केले.तसेच थोर मराठी साहित्यिकांची माहिती मनोगतातून सांगितली.
आपल्या भाषणात जीवन साळोखे यांनी वाचनाचे महत्त्व विशद करून, वाचनातूनच अभ्यासू वृत्ती ,व्यासंग वाढून वैचारिक बैठक भक्कम होते, हे स्पष्ट केले. वाचनाचा "कंटाळा " म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाला "टाळा", हे कटू सत्य असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी प्राचार्य साळोखे यांनी तीन हजार रु.किंमतीची दहा पुस्तके ग्रंथालयासाठी प्राचार्यांकडे भेट दिली.
आपल्या भाषणात प्राचार्य कुंभार यांनी डीएड कॉलेजच्या परंपरेचा आढावा घेऊन, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही, ती रोजगाराची भाषा नाही याबद्दल खंत व्यक्त केली. वाचा, वाचत राहा,आणि इतरांना वाचू द्या यासाठी विद्यार्थ्यांनी आग्रही राहण्याचे त्यांनी आवाहन केले. मराठी विभाग प्रमुख प्रा.एस.एस.रावळ यांनी विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाचे संयोजन केले.
फोटो
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या डी.एड.कॉलेज, पेटाळा येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे बोलतांना प्रमुख पाहुणे शेजारी कॉलेजचे प्राचार्य आर.जी.कुंभार व अन्य मान्यवर
No comments:
Post a Comment