हेरले / प्रतिनिधी
सल्फरची मात्रा कमी प्रमाणात ठेवून साखरेचे उत्पादन केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आणि दर दोन्ही चांगले आहे. याचा फायदा साखर कारखान्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केला. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, पुणे व विश्वराज शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. कोल्हापूर येथील हाॅटेल फर्न येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी संकेश्वरच्या हिरा शुगर्सचे अध्यक्ष निखिल कत्ती, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष व उगार शुगरचे सोहन शिरगांवकर, सचिन शिरगांवकर, व्ही. एम. बायोटेकचे विष्णूकुमार कुलकर्णी, कार्यकारी संचालक मुकेश कुमार हे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री कत्ती म्हणाले, साखरेतील सल्फर हा घटक माणसाच्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे साखरेतील सल्फरची मात्रा कमी करत सल्फरमुक्त साखरेची निर्मिती हे उद्दिष्ट ठेवून विश्वराज शुगरने उत्पादन प्रक्रियेत बदल केले. परिणामी कमी प्रमाणात सल्फरची मात्रा ठेवून साखर उत्पादन घेतले. या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आणि चांगला दर मिळाला. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा चांगला दर देता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते करण्यात आले.
विश्वराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मुकेश कुमार आणि स्वतंत्र कार्यकारी संचालक व व्ही. एम. बायोटेकचे विष्णूकुमार कुलकर्णी यांनी ऊसाच्या रसापासून थेट शुध्द साखरेची निर्मिती कशी करता येते याबद्दल माहिती दिली. यामुळे साखर कारखान्यांच्या रिफायनरी प्रकल्पावर होणार्या खर्चात बचत होईल. आणि त्याचा फायदा ऊस उत्पादकांना देता येईल याबाबतची तांत्रिक माहिती दिली.
नाथ मास्कोबा साखर कारखान्याचे डॉ. वाय. एस. नेरकर यांनी बीटापासून साखर उत्पादन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
मोहन डोंगरे यांनी साखर आणि इथेनॉल उत्पादनाबाबत माहिती दिली. मोहन पाटील यांनी रिसेंट टेक्निक टू इन्प्रू शुगर कलर या विषयावर मार्गदर्शन केले.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या वतीने एन. व्ही. थेटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा व बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते.
..................
फोटो
कोल्हापूर : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन व विश्वराज शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना कर्नाटकचे मंत्री उमेश कत्ती, शेजारी निखिल कत्ती, एस. बी. भड, सोहन शिरगांवकर, व्ही. एम. कुलकर्णी, मुकेश कुमार आदी.
...............................................................................................
No comments:
Post a Comment