हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर- सांगली रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. भले मोठे खडडे, वेडीवाकडी वळणे यामुळे रोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती करावी, २० एप्रिलपर्यंत रस्ता दुरुस्त नाही झाला तर हातकणंगले बसस्थानक चौकांत रास्ता रोको करण्याचा इशारा एका निवेदनांद्वारे संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूरचे .कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला. यासोबतच या निवेदनाची प्रत .सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, हातकणंगले व .पोलीस निरीक्षक , हातकणंगले यांना देखील देण्यात आली आहे..
निवेदनांत म्हंटले आहे,सांगली-कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या मार्गावरच अतिग्रे याठिकाणी संजय घोडावत विद्यापीठाचा कॅम्पस आहे. या विद्यापीठात जवळपास १६ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मार्गावरती सतत शिक्षण संकुलात शिकणारी मुले, शिक्षक व इतर स्टाफ त्यांच्या वाहनाने ये-जा करत असतात. हातकणंगले बस स्थानकासमोरील या राज्य महामार्गाची सध्या दुरावस्था झाल्यामुळे जयसिंगपूर व सांगली परिसरातून येणाऱ्या विद्यार्थी व स्टाफ ना तसेच परिसरातील नागरिकांना देखील दररोज नाहक त्रास होत आहे.
तसेच हातकणंगले येथे या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे की दुचाकी चालविणाऱ्याना दररोज अपघाताला सामोरे जावे लागत आहे. परवाच हातकणंगले बसस्थानकानजीक मोठा अपघात होऊन एक युवती ठार झाली. येणाऱ्या पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये आणखी पाणी साचून हा मार्ग पूर्ण खचू शकतो. तसेच हातकणंगले ते शिरोली या मार्गात देखील ठिकठिकाणी दुभाजकाजवळ रस्ता खचला आहे व काहीठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. २०१४ साली अंकली टोल नाक्यावर हाच मार्ग सुस्थितीत करण्यासाठी शिक्षण संकुलाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी आंदोलन केले होते. परंतु वारंवार सांगून देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष्य केले आहे, या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण नाही.
दरवर्षी सांगली व कोल्हापूर जिल्हयातून व्हॅट, इन्कमटॅक्स, जीएसटी, रोड टॅक्स व इतर टॅक्स मिळून ५००० कोटींच्या वर टॅक्स भरला जात आहे. शासनाला एवढा महसूल मिळून देखील नागरिकांना हव्या त्या मूलभूत सुविधा, चांगले रस्ते, रोड लाईट व इतर प्रकारच्या प्राथमिक सोयीसुविधा मिळत नाहीत. रोजचे होणारे अपघात तसेच नागरिक, विद्यार्थी, पालक, स्टाफ यांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून हा रस्ता १५ एप्रिल पर्यंत सुस्थितीत करावा अशी मागणी विद्यार्थी परिषदेने निवेदनात केली आहे. २० एप्रिल पर्यंत जर रस्ता सुस्थितीत झाला नाही तर विद्यापीठाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व विद्यापीठ व्यवस्थापन हातकणंगले येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment