Friday, 8 April 2022

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक

कोल्हापूर / प्रतिनिधी

  वित्त विभागाकडे उर्वरित शिक्षकांची सहा हजार पदे भरण्याचा पाठपुरावा सुरू आहे. अल्पसंख्याक स्वायत्त संस्थांना पदे भरू शकतात. भरती प्रक्रियेचे अवलोकन करून सर्वांनी संधी देण्याचे प्रयत्न असतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
  हॉटेल सयाजी येथे आयोजित शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. 
   शिक्षणमंत्री गायकवाड पुढे म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यापासून ऊर्जा मिळते. त्यांनी सर्व जातीधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केली. शिक्षकांनी कोरोना काळात शिक्षण प्रणाली सुरू ठेवून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले. विनाअनुदानित शाळांच्या २० व ४० टक्केचा त्रुटीचा प्रश्न व प्रचलित धोरणानुसार अनुदानाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. मंत्रीमंडळ बैठकीत फाईल ठेवणार असून प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
  जुनी पेन्शनबाबत सम्यक समितीने तयार केलेला अहवाल प्राप्त झाला आहे. 'एनपीएस'च्या पावत्या व त्याचा हिशेब शिक्षकांना मिळालेला नाही. याबाबत लवकरच मोहीम राबविणार आहे.
  या प्रसंगी शिक्षक संघटनांनी निवेदने देण्यासाठी व्यासपीठावर गर्दी करून निवेदने दिली. हॉटेल सयाजी येथे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक झाली.  
  प्रास्ताविक शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले. सरकारची शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका असल्याचे सांगितले.
त्रुटी पूर्तता यादी १ वर्षाहून आधिक काळ प्रलंबित आहे, अघोषीत यादी जाहीर करावी, प्रचलित अथवा पुढील टप्पा  जाहिर करणे, १ नोव्हेबंर २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवा संरक्षण द्यावे, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करावीत, अनुकंपा तत्त्वावरील भरती तात्काळ करावी, एन पी एस स्लिपा मिळाव्यात , शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हाव्येत आदी मागण्या  आपल्या प्रास्ताविकातून शालेय शिक्षणमंत्री यांच्या समोर मांडल्या.
  शिक्षक संघटना नेत्यांनी भाषणाअगोदर शिक्षकांचे प्रश्न मांडू द्या. मगच सर्व प्रश्नांचे उत्तर द्या, अशी भूमिका घेतली. यावेळी शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या, शिक्षकांचे सर्व प्रश्न माहीत आहेत. मी दिवसभर कोल्हापुरात आहे, त्यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू. राजेंद्र कांबळे यांनी सेवा ज्येष्ठता मुद्दा मांडला. त्यानंतर शिक्षक बँकेचे नेते राजाराम वरूटे यांनी जि. प. शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षण की ग्रामविकास विभाग असा गोंधळ सुरू आहे. प्राथमिक शिक्षकांची एकही बैठक लावली नाही, असे सांगितले. यावेळी मंत्री गायकवाड यांनी शिक्षक असताना शिस्त पाळत नाहीत, मग कसे होणार असे बोल शिक्षकांना सुनावले. त्यानंतर विविध शिक्षक संघटना नेत्यांनी व्यासपीठावर जाऊन निवेदने देण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी मंत्री गायकवाड निवेदेन स्वीकारले.  स्वागत भरत रसाळे यांनी केले. यावेळी विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
   या प्रसंगी शिक्षण उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, बोर्ड सचिव सत्यवान सोनवणे, सहसचिव डी एस पोवार, शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले, भैय्या माने, धैर्यशील पाटील, शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड ,बी जी बोराडे, चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, खंडेराव जगदाळे , बाबासाहेब पाटील, कोजिमाशी चेअरमन बाळासाहेब डेळेकर, सुधाकर निर्मळे,प्रा. सी एम गायकवाड,उदय पाटील, के के पाटील, संदीप पाथरे, मोहन भोसले, काकासाहेब भोकरे, संतोष आयरे, प्राचार्य एस आर पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
     फोटो 
कोल्हापूर : शिक्षण विभागातील प्रलंबीत प्रश्नांच्या आढावा बैठकित बोलतांना शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर व अन्य मान्यवर.

No comments:

Post a Comment