मुरगुड विद्यालयात ग्रंथ दान, प्रदर्शन उत्साहात संपन्न
कोल्हापूर / प्रतिनिधी
"वर्षानुवर्षे सातत्याने हजारो रुपयाचे ग्रंथ दान करणारे गुरुवर्य हेच विद्यार्थी, शिक्षक,शाळा आणि समाजाचे खरे हितचिंतक असतात. वाचनातून येणारी 'प्रगल्भता' आणि 'विवेक' ही आयुष्यभर न सरणारी संपत्ती आहे. असा संपन्न खजिना समाजासाठी खुला करणारे गुरुवर्य जीवन साळोखे यांचे कार्य सतत प्रेरणादायी ठरेल."असे गौरवोद्गार शिक्षक नेते दादा लाड यांनी काढले.
ते शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालय ज्यूनिअर कॉलेजमध्ये लेखक,पत्रकार,माजी मुख्याध्यापक जीवन साळोखे यांच्या पुढाकाराने ग्रंथदान आणि ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. आर.पाटील होते.
शिक्षक नेते दादा लाड, कोजिमाशीचे जेष्ठ संचालक, शिक्षक प्रतिनिधी बाळ डेळेकर यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.याप्रसंगी जीवन साळोखे यांनी मुरगूड विद्यालयाच्या स्थापनेस 75 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्त 25 हजार रुपयांची, शंभरावर ग्रंथ संपदा भेट दिली.
माजी प्राचार्य जीवन साळोखे म्हणाले," वाचन हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. वाचनामुळे वाचा आणि मस्तक प्रगल्भ होते.मस्तक परिपूर्ण असणाऱ्या माणसाच्या हातातून चुकीची कृती होत नाही बदलत्या परिस्थितीत शिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सामना करताना स्वतःला ग्रंथ वाचनातून अद्ययावत ठेवावे लागेल.'शिवीगाळ' आणि 'अर्वाच्य भाषा' ही आपल्या समाजाची ओळख बनत चालली आहे. वाचन संस्कृती वाढली तर हा सामाजिक दुर्गुण घालवताता येईल". असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्राप्त शिक्षक एम बी टिपुगडे व विक्रमसिंह घाटगे फौडेशनचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार विजेते आर.जी.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.तसेच एन.एम.एम.एस.तसेच इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील यशस्वितांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कोजिमाशीचे संचालक अविनाश चौगले,अभय वंटे,मुख्य लिपीक के.बी. वाघमोडे,इस्माईल नायकवडी,शिवाजीराव मोहिते,बाळासो किल्लेदार,उपमुख्याध्यापक संजय सूर्यवंशी,उपप्राचार्य एस.पी.पाटील,पी.बी. लोकरे,ए.एच.भोई, पी. एस. पाटील, जीवरक्षक दिनकर कांबळे, आदि मान्यवर हजर होते. स्वागत प्रास्ताविक एस. आर. पाटील यांनी तर सुत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार पर्यवेक्षक सुधाकर निर्मळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment