Wednesday, 15 February 2023

एसटी फेरी बंद.. मुलींचे शिक्षणही बंद..! एसटीच्या फेऱ्या रोडावल्या. हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर टाच;मुक्कामी गाड्या व फेऱ्या नियमित करण्याची मागणी;मुरगूड विद्यालयाच्या विद्यार्थिनींची गारगोटी आगाराकडे मागणी


कोल्हापूर / प्रतिनिधी

   मुरगूड परिसरातील पन्नास हुन अधिक खेडेगावातील मुला मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या मुरगूड विद्यालय जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी येथील एसटी नियंत्रण कक्षाकडे निवेदन देत"आपले शिक्षण बंद करू नका" अशी कळकळीची मागणी केली.
  इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा जवळ आल्या आहेत तरीही गारगोटी आगाराकडून मुरगुड आणि परिसरातील प्रवासी वाहतूक नियमित केली जात नाही.यापूर्वी अनेकदा विविध शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी विद्यार्थिनीनी बंद,धरणे,एसटी रोको आंदोलन करून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला पण अद्याप प्रशासनाचे डोळे उघडलेले नाही. या परिसरात खाजगी शैक्षणिक संस्थांच्या  विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस नियमित सुरू असतात.पण शासनाच्या विद्यार्थी कल्याण योजने अंतर्गत सुरू गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत व अल्प मोबदल्यात शैक्षणिक संकुलापर्यंत प्रवास देणाऱ्या सर्व योजना ठप्प पडल्या आहेत.बस फेऱ्या नियमित नसल्यामुळे डोंगरी दुर्गम खेड्यापाड्यातील शेकडो मुला मुली शाळेपासून वंचित आहेत.इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी या माध्यमिक व उच्च माध्यमिक  वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलींचे गळतीचे प्रमाण वाढले आहे.निपाणी मुरगूड ते मुधाळ तिट्टा रस्ता उभारणीचे काम अपूर्ण आणि धोकादायक स्थितीमध्ये कासव गतीने सुरू आहे.अशा परिस्थितीत मिळेल त्या वाहनातून प्राथमिक माध्यमिक शाळेची मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात.
या सर्व प्रकारास कंटाळून अनेक पालकांनी आपल्या मुला मुलींचे शिक्षण थांबवले आहे.ही स्थिती पुरोगामी महाराष्ट्राला शोभनीय नाही.या पार्श्वभूमीवर मुरगूड विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी अत्यंत शिस्तबद्धपणे शिक्षक पालकांसह बस स्थानकावर उपस्थित राहून लेखी निवेदन  मुरगुड वाहतूक नियंत्रण कक्षाकडे आपले निवेदन दिले व एसटी सेवा नियमित करण्यासाठी विनंती केली.सोमवार पर्यंत एस टी वाहतूक फेऱ्या नियमित केल्या नाहीत तर विद्यार्थी पालकांसह मुरगूड बस स्थानकावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य एस.आर.पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी.सूर्यवंशी,उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य एस.पी.पाटील प्रशालेचे पर्यवेक्षक एस.एच.निर्मळे,तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे,महादेव कांबळे,एम.बी.टिपूगडे,अमित भोई,विजय पाटील,समीर कटके,अनिल पाटील,एन.एन. गुरव,एस.एस. 
कळंत्रे,ए.एस. चंदनशिवे,महादेव खराडे,रवी बुरुड,सौ.वाय.इ. देशमुख,एस जे गावडे, जी पी गोधडे, के.एस.पाटील,संपत कोळी,पिंटू बोंडगे,सुनील गवळी,दयानंद कांबळे,सोपान खराडे,जोतिराम खराडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment