लेख - डॉ.अजितकुमार पाटील,
( पीएच डी मराठी साहित्य )
विद्येशिवाय सामाजिक क्रांती अशक्य आहे, हा महत्त्वाचा सिद्धांत लक्षात घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी अज्ञान-अंधःकारात हजारो वर्षे खितपत पडलेल्या दीन-दलितांच्या व स्त्रियांच्या शिक्षणाला सर्वश्रेष्ठ स्थान दिले. भावी मातांच्या शिक्षणासाठी प्रथम त्यानी पुण्याच्या बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात १८४८ साली मुलींची शाळा सुरू करून स्त्री-शिक्षणाच्या नव्या युगास आरंभ केला. पाठोपाठ पुणे येथेच वेताळ पेठेत म्हणजेच सध्याच्या अहिल्याश्रमात महार-मांग मुलांसाठी शाळा चालू केली. सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या पुण्याचा विचार केल्यास सनातन्यांचा बालेकिल्ला होऊन राहिलेल्या या पुण्य नगरीत यां घटना घडाव्यात हे सनातन्यांच्या दृष्टीने महापाप होते. त्यांच्या देवांच्या व धर्माच्या विरुद्ध हे सर्व होते. कलियुग आले. आता कल्पित देवांचा कोप होणार, अशी कोल्हेकुई भट भिक्षुक सनातन्यांनी चालू केली. परंतु जोतीरावांनी यास भीक घातली नाही. जोतीरावासारख्या एका भारतियाने या देशात धर्मांध, प्रस्थापित व सर्वेसर्वा असलेल्या भिक्षुक- शाहीविरुद्ध हे जे दिव्य केले त्यास तत्कालीन इतिहासात तोड नाही खोट्या देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली दीन-दलित व स्त्रिया यांच्यावर प्रदीर्घकाळ या देशात अन्यात होत होता. ज्यांना कुत्र्यामांजरा- इतकीसुद्धा किंमत नव्हती त्यांना शिक्षणाची संजिवनी देऊन माणसात आणण्याचे आणि 'माणूस' म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून देण्याचे महान क्रांतिकार्य फुल्यानी आरंभिले. यामुळे आधुनिक भारतात नवयुगाला आरंभ झाला. असे म्हणणे यथायोग्य आहे.
म. फुले यांना समाज क्रांतिकार्यात झोकून घेण्याची प्रेरणा अनेक प्रसंगातून मिळाली. अशा प्रकारची दिव्य प्रेरणा घेणारे त्यांचे संवेदनाक्षम मन होते. ते आजच्यासारख्या प्रस्थापित, सुखवस्तू व स्वार्थी लोकांसारखे बोथट नव्हते. एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमधून आनंदाने व ऐटीने चालणारे जोतीराव एकाएकी वरातीमधून निघून गेले. ब्राह्मण मित्राची जरी वरात असली तरी जोतीरावासारख्या एका शूद्राने सर्वांत मागे न राहता इतर ब्राह्मणांबरोबर चालावे हा मक्तेदार सनातनी ब्राह्मणांचा घोर अवमान होता. त्यांनी जोतीरावास सुनावले व सर्वांत मागे जाण्यास सांगितले समुद्राला पौर्णिमा अमावास्येला जसे उधाण यावे तशी त्यांच्या मनात प्रचंड खळबळ माजून राहिली. हा मानवजातीचा घोर अवमान त्यांना सहन होण्यासारखा नव्हता. एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कसा असू शकेल ? कोणत्या धर्मात ही भोंगळ शिकवण आहे. याचा त्यांनी सर्व धर्मग्रंथ अभ्यासून शोध घेतला. परंतु तसे त्यांना कोणत्याच धर्मग्रंथात आढळले नाही. हा भट भिक्षुकांचा बनाव आहे हे त्यांच्या पक्के लक्षात आले. शूद्रातिशूद्र आणि स्त्रिदास्या- विरुद्ध त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सामाजिक व मानसिक गुलामगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी रणशिंग फुंकले. यामुळे आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचा आरंभ झाला. सामाजिक क्रांतीच्या नव्या पर्वाची ही गंगोत्री होय.
जोतीरावांच्या समाजक्रांतीचा आलेख काढावयाचा झाल्यास शूद्रातिशूद्र, स्त्री-समाज, शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगार, अनिष्ठ रूढींना बळी पडणारे स्त्री-पुरुष आणि न्हावीसुद्धा त्यांच्या समाज सुधारणा कार्यक्षेत्रात आलेले आहेत हे विशेष होय. तळागाळातील बहुसंख्य समाज शिक्षित व जागृत झाल्याशिवाय स्वातंत्र्याला काही अर्थ नाही, असे त्यांचे मत होते. आज देशातील सुमारे ७० टक्के समाज निरक्षर व अज्ञानी असल्यामुळे आपली लोकशाही कशा पद्धतीने चालू आहे याचा कटू अनुभव आपण घेतच आहोत. सुधारणेच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी जे विचार मांडले त्याप्रमाणे ते कृतीत आणले. उक्तीप्रमाणे कृती करणारा हा १९ व्या शतकातील एकमेव महात्मा म्हणावा लागेल.
जय हिंद!
No comments:
Post a Comment