Tuesday, 28 May 2024

हेरले येथील ग्रामपंचायत सफाई कामगारची मुलगी दहावी मध्ये विद्यालयात प्रथम



हेरले /प्रतिनिधी

हेरले (ता हातकंणगले) हेरले हायस्कूल हेरले ची दहावीत शिकणारी समिक्षा मनोज लोखंडे हिने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला. 
      समिक्षा हिने परिस्थितीवर मात करत इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवीत विद्यालयात ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तिने ५०० पैकी ४६६ गुण मिळवीले. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून अत्यंत जिद्दीने तिने हे यश मिळवले. तिचे  वडील ग्रामपंचायत मध्ये  सफाई कामगार म्हणून काम करतात. तर आई खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करते.दररोज सात ते आठ तास अभ्यासाला वेळ देऊन यश मिळवले.या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने मुख्याध्यापक पी. आर शिंदे यांच्यासह शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो:- समिक्षा लोखंडे

Saturday, 25 May 2024

बारावी बोर्ड परीक्षा सायन्समध्ये हेरलेतील दिव्यांग विद्यार्थीनी कु.भाग्यश्री संदीप जाधवचे यश

हेरले / प्रतिनिधी

बारावी बोर्ड परीक्षेच्या सायन्स विभागामध्ये हेरलेतील दिव्यांग विद्यार्थीनी कु.भाग्यश्री संदीप जाधव हिने रुकडी केंद्रात दुसरा क्रमांक पटकाविला.
    महात्मा गांधी जुनियर कॉलेज रूकडी मधील कु.भाग्यश्री संदीप जाधव (रा. हेरले) या विद्यार्थिनीने 
८९ टक्के गुण मिळविल्याने तीचा रुकडी केंद्रात दुसरा क्रमांक आलाआहे. तीच्या या यशाने  सर्वत्र कौतुक होत आहे. तीच्या या यशाबद्दल रुकडी गावचे ग्रामपंचायत सदस्य पप्पू मुरूमकर,सुरज खोत युवा सेना शहर प्रमुख रूकडी, अभिषेक मगदूम सामाजिक कार्यकर्ते माणगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
      फोटो 
महात्मा गांधी जुनियर कॉलेज रूकडी मधील भाग्यश्री संदीप जाधव (रा. हेरले) या विद्यार्थिनीने 
८९ टक्के गुण मिळविल्याने तिचा रुकडी केंद्रात दुसरा क्रमांक आलाआहे तिचा सत्कार करतांना मान्यवर

Thursday, 23 May 2024

हेरले येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी


 हेरले /प्रतिनिधी 
 
  क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने, आणि अभत्याला सत्याने  जिंकता येते. असे विचार सांगणारे विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील  संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी यावेळी पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण संयुक्त ज्येष्ठांच्या वतीने केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील,उर्मिला कुरणे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. गौतम ज्येष्ठ नागरिक यांच्या विरंगुळा केंद्र मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांची मूर्तीचे प्रतिष्ठान माजी मुख्याध्यापक विश्वास भाटे व संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम  यांच्या शुभहस्ते  करण्यात आले. त्यावेळी धम्ममित्र अशोक कटकोळे यांनी सामुदायिक  पंचशील, विधायक पंचशील, व बुद्ध पूजा पठण  केले. या कार्यक्रम प्रसंगी संयुक्त बौद्ध  समाज मोठ्या उत्साहाने उपस्थित होता.

Tuesday, 14 May 2024

शिरोली कुस्ती स्पर्धेत हरियाणा केसरी प्रवीण भोला विजयी

हेरले /प्रतिनिधी

पुलाची शिरोली ग्रामपंचायतच्या वतीने पिर अहमदसो व बालेचाँदसो उरूस व काशिलिंग बिरदेव यात्रे निमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत सांगली तालमीचा मल्ल हरियाणा केसरी प्रवीण भोला यांनी आंतरराष्ट्रीय संकुल पुणे मल्ल गणेश जगताप याला गुणावर पराभूत केले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत समीर देसाई बुचडे कुस्ती केंद्र यांनी सेनादलाचा संग्राम पाटील यास पोकळ घिस्सा डावावर आसमान दाखवले. दसरा मैदान येथे आयोजित कुस्ती मैदानाचे उद्घाटन माजी उपसरपंच कृष्णात करपे, राजेश पाटील प्रकाश कौंदाडे विजय जाधव, संपत संकपाळ, विठ्ठल पाटील यांच्या हस्ते झाले महिला गटात दोन लढती झाल्या. इतर विजेते असे प्रदीप ठाकूर, वैभव हुबाळे, रोहन रणदिवे, शुभम मगर, आदर्श पाटील अभिजीत पवार, सागर राणगे, तौफिक सनदी, अथर्व चव्हाण ,विघ्नेश केसरकर, आयर्न रानगे.
 पंच म्हणून राम सारंग ,विठ्ठल पाटील, संदीप पाटील, बापूसो पुजारी युवराज पुजारी लखन घाटगे यांनी काम पाहिले  तर ईश्वरा पाटील यांनी निवेदक म्हणून भूमिका बजावली. या कुस्ती स्पर्धेवेळी प्रकाश कौंदाडे, अविनाश कोळी, महादेव सुतार, विजय जाधव, संपत संकपाळ, बाजीराव पाटील,धनाजी पाटील, विठ्ठल पाटील, दीपक यादव ,योगेश खवरे, श्रीकांत कांबळे , महमद महात, राजहंस पाटील, शिवाजी समुद्रे, संदीप शिंदे, हिदायत्तुल्ला पटेल, आरीफ सर्जेखान, सागर कौंदाडे, बटील देसाई आदी उपस्थित होते.
फोटो.....
पुलाची शिरोली येथील कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लास बक्षीस देताना सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवर.

Monday, 13 May 2024

शैक्षणिक लेख - " शिक्षण प्रक्रियेत ताण-तणाव व्यवस्थापनाची गरज "



विषय :- " शिक्षण प्रक्रियेत ताण-तणाव व्यवस्थापन शिक्षणाची गरज."
डॉ अजितकुमार भिमराव पाटील

केंद्रमुख्याध्यापक - राजर्षी शाहू विदयामंदिर शाळा क्र. ११, सेंट्रल स्कूल, कसबा बावडा,कोल्हापूर.
प्रस्तावना :- आधुनिक युगास "ज्ञानाच्या स्फोटाचे गुण असे संबोधले जाते. याचा अर्थ जगातील ज्ञानात प्रचंड प्रमाणात क्षणा क्षणाने वाढ होत आहे. ज्ञान संपादन करण्यासाठी औपचारिक व अनौपचारिक शिक्षण याची कौशल्ये आत्मसात करण्यास वेळ लागत आहे याचा परिणाम म्हणून विषयाची निवड करणे, विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी कुवत व क्षमता, बलस्थाने कोणती याची जाणीव पालक व विद्यार्थ्यांना समजली पाहिजेत म्हणजे ताण-ताणाव येणार नाहीत.
ताण म्हणजे काय? "ज्याच्यामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत विघटन घडून येते किंवा घडून येण्याचा धोका निर्माण होतो अशा घटनाद्वारा उ‌द्भवनारी प्रक्रिया म्हणजे ताण होय."

- लाझाराम, फोकन व टेलर.

ताण नेहमीच वाईट असतो असे नाही तुम्ही तो कशा पध्दतीने घेता यावर तो अवलंबून आहे. कधी-कधी ताण हा नवनिर्मितीसाठी यशस्वी घटनांसाठी प्रेरणादायी ठरतो. पण अपयशाचा बाबतीत हाच ताण अपमानास्पद ठरतो आणि अपयशासोबत तो येतोच.

तणाव अशी प्रक्रिया आहे जी परिस्थितीनुसार किंवा प्रसंगानुसार निर्माण होते. जे प्रसंग घटना आपल्याला शारीरिक अथवा मानसिकदृष्टया निराश करतात अथवा तशी स्थिती निर्माण करतात. व्यवस्थापन तज्ञ हेन्री फेयॉल यांच्यामते व्यवस्थापन करणे म्हणजे भविष्याचा अंदाज व नियोजन करणे, संघटन करणे, समन्वयन करणे, नियंत्रण करणे होय. सततच्या ताण-तणावामधून स्वभाव चिडखोर बनतो न्यूनगंडपणा, मत्सर, महत्वकांक्षी चिंता, भिती, ईर्षा, राग येणे, आजारी पडणे, नकारात्मक भावना निर्माण होणे यासारखे प्रक्रिया वाढीस लागतात.

ताण-तणावाचे व्यवस्थापन-

१. सभोवतालची परिस्थिती बदलणे बाहय परिस्थिती ज्यावेळी अधिक उद्दिपकता असते त्यावेळी नविन समस्या निर्माण होऊ लागतात. व त्यातूनच ताण-तणाव निर्माण होतो. अशावेळी सभोवतालची परिस्थिती बदलताना निर्भिडपणा घेणे, तडजोड करणे, अनुरूपता, वाटाघाटी या विधायक मार्गाचा अवलंब करावा.

२. आधुनिक जीवनशैली आजकाल जे ताण-तणाव निर्माण होतात ते आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात. ताण-तणावमुक्त जीवन जगण्यासाठी स्वतःला जाणून घेण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. सहनशीलता अंगी बानवणे, जीवनशैलीचा प्रभाव न टाकता स्विकारावी, स्वतःमध्ये बदल करावेत. सकारात्मक विचार करावेत दूरदृष्टिकोन ठेवावा.

३. प्रार्थना म्हणणे - प्रार्थनेमुळे मनातील वाईट विचार कमी होण्यास मदत होते. मन शांत होते व मनाची एकाग्रता वाढते. एकाग्रतेमुळे स्मरणशक्ती वाढते व ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.

४. विविध छंद जोपासने आपल्या अंगी वाचन, लेखन, संगीत, कला, पेंटींग, पोहणे, निसर्गात फिरणे, विविध वस्तूंचा संग्रह करणे अशाप्रकारचे छंदामधून सकारात्मकता वाढते व ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.

५. योगा - उत्तम आणि आदर्श जीवन जगण्यासाठी "योग" हे एक प्रायोगिक शास्त्र आहे. योगाच्या माध्यमातून आपल्या मनावर चांगले विचार रुजण्यास मदत होते. शरीर, मन, इंद्रीय, आणि आत्मा यासर्व घटकामध्ये एकसूत्रीपणा, मानसिक संतूलन, सहकार्य, सामंजस्य याप्रकारचे वातावरण निर्माण करण्यास उपयोग होतो. योग, ध्यान, धारणा, प्रत्याहार यांनी ताण-तणाव मुक्त करता येतात.

६. विपस्थना - मानवी सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही बाजूंनी बनलेले आहे. ज्याप्रमाणे एक रूपयाच्या नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे मानव कोणत्याही गोष्टीचा विचार करताना सकारात्मक व नकारात्मकदृष्टीने विचार करतो. ताण-तणाव वाढल्याने वर्तनात बदल घडतो. यासाठी ठराविक वर्षानंतर विपस्यना करावी. ताण-तणाव कमी करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

७. व्यायाम करणे शरीराला व मनाला योग्य वळण लावण्याचे सामर्थ्य व्यायामामध्ये आहे. व्यायामामुळे व मनाची प्रसन्नता वाढते. मनातील वाईट विचार, गैरसमज केवळ व्यायामामुळे कमी होण्यास मदत होते. नियमित व्यायाम करणे, चालणे यामुळे ताण-तणाव कमी होतात. सर्व वयातील व्यक्तींनी दरारोज व्यायाम करावा.

८. विरंगुळा - विरंगुळा व्यक्तिसापेक्ष असतो. विरंगुळा मिळवण्यासाठी नाना-नानी पार्क, हास्य क्लब, चिल्ड्रन पार्क, भजनी मंडळ, संस्कार केंद्रे यासारख्या ठिकाणी नियमितपणे ये-जा करावी. निसर्ग सहली, भटकंती, दुर्गभ्रमण याचा आनंद घ्यावा. आपल्या समवयस्कर वयाच्या व्यक्तींबरोबर ग्रुप करावेत म्हणजे एकटेपणा कमी होतो व विरंगुळ्याचा दैनंदिन जीवनात चांगला फायदा होईल.

९. खेळ खेळणे - मन प्रसन्न ठेवणे व खिलाडू वृत्ती बनवणे हे दोन उद्देश खेळामुळे साध्य होतात. खेळामुळे शरीरातील नकारात्मकता नाहीशी होऊन सकारात्मकता येते. व्यायामामुळे ताण-तणावाला, मोकळी वाट करून देता येते. रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

१०. हास्ययोग - सततच्या चिंता व काळजी यामध्ये गुरफटल्यामुळे मानवाच्या चेहऱ्यावरील हास्य निघून गेले आहे. वेगवेगळया उपक्रमाच्या वेळी विनोदाच्या प्रसंगातून हास्ययोग घडवून आणला पाहिजे. "मन करा प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण" याप्रमाणे आनंदी रहावे यामुळे ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.

११. व्यवस्थापन तंत्र व्यवस्थापन तंत्र हा नवीन शब्द नाही पण याचा अर्थ साधा असा आहे तो म्हणजे नियोजनबध्द रहाणे. व्यवस्थापन करणे म्हणजे उद्याचे किंवा भविष्यकालीन जीवनाचे नियोजन करणे होय. उद्या किंवा भविष्यात कोण-कोणती कामे, व्यवहार, आर्थिक नियोजन, घराचे नियोजन, अभ्यासाचे नियोजन, कार्यक्रमाचे नियोजन यासारख्या नियोजनामुळे आपल्या जीवनाला एक चांगले वळण व शिस्त लागते यामुळे आपल्या मनातील कल्पना व विचार यांना एक प्रकारची शिस्त लागते यामुळे ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.

१२. मनसिक तणाव कमी करावा प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक काही शारीरिक, मानसिक व बौध्दिक गरजा असतात. इच्छा-आकांक्षा असतात, आवडी निवडी असतात, त्यांची तृप्ती करण्यासाठी व्यक्ती धडपडत असतात. जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर व्यक्तीला दडपण येते व खोटे बोलणे अशा सवयी लागतात म्हणजेच मानसिक तणाव निर्माण होतो. समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांच्या मते अशा व्यक्तींच्या अभिव्यक्तींचा विचार जर नाही केला तर त्या वैफल्यग्रस्त होतात, चिडखोर बनतात, वाईट कृत्य करतात. त्यामुळे त्यांना चांगले व वाईट काय याचा विचारसुध्दा त्यांच्या मनात येत नसतो. म्हणून ताण-तणाव कमी करण्यासाठी आपल्या कुवतीनुसार ध्येय, इच्छा, आकांक्षा, नियोजन मर्यादित करावे यामुळे आपले आयुष्य सुंदर व संस्कारीत बनेल.
कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीस योग्य तो निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. आजच्या जीवन पध्दतीमध्ये झपाटयाने बदल होत आहेत. वेगवेगळया प्रश्नांवर चर्चा होत आहे. या सर्व बदलांना सामोरे जाण्यासाठी आपण स्वतः "अपडेट" असले पाहिजे नाहीतर आपण या प्रवाहातून बाजूला राहू शकाल. त्यासाठी सवयी बदला चांगल्या सवयी अंगी येण्यासाठी सतत प्रयत्न करा. कारण सवय म्हणजे शिक्षण होय. ताण-तणाव मुक्त राहून आपणास व्यक्तिविकास, समाजविकास, राष्ट्रविकास, विश्वविकास करायचा आहे. संत ज्ञानेश्वरांनी सुवचनाप्रमाणे "हे विश्वची माझे घर" अशा वचनास पूर्णत्वाकडे नेण्याचा विचार फक्त मानवच करू शकतो तो म्हणजे "आदर्श व्यक्ती" होय. म्हणून "जगा आणि जगू द्या" ताण-तणाव मुक्त जीवन जगा आणि इतरांना सुध्दा आपल्या सोबत घेवून चला. जीवन खूप सुंदर आहे याचा अनुभव घ्या.

डॉ श्री अजितकुमार भिमराव पाटील (केंद्रमुख्याध्यापक) (एम.ए, बी.एड्, एम.एड) मो. नं. ९८२३९९६९११ राजर्षि शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ कसबा बावडा, कोल्हापूर - ४१६००६

Saturday, 11 May 2024

शिक्षणः एक निरंतर प्रक्रिया. - डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर.

शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे.तो सतत शिक्षण घेणारा विद्यार्थीच असतो. प्राथमिक शाळा तसंच कॉलेजमधून औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर बाहेरच्या जगात खऱ्या अर्थाने आपली शिकवणी चालू होते, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एखादं काम अधिक चांगल्या पद्धतीने कसं करायचं, अत्याधुनिक व्यवस्थापन व कुशल नेतृत्व कसे हाताळायची, एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असल्यास नेमका कोणता रस्ता निवडायचा, एखादी चूक टाळण्यासाठी भविष्यात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची अशा छोट्या गोष्टींमधून आपण बरंच काही शिकत असतो.
एखादी नवीन गोष्ट शिकायची म्हटली की अनेकांच्या काय शिकायचे याचे प्रश्न पडतात. आजकाल मोबाइलचा वापर हा केवळ संवादाचं साधन म्हणून केला जात नाही. त्यात अनेक नवनवीन गोष्टींची भर पडली आहे. पण केवळ शिकायचा कंटाळा म्हणून त्याकडे कानाडोळा केला जातो. आपल्याला यातलं काही येत नाही, जमत नाही हे सांगण्याचा मोठेपणाही त्यांच्याकडे नसतो. आपल्याला यावली बरीच माहिती आहे, असं सांगत ते आपल्या अज्ञानावर पांघरूण घालतात. ही वृत्ती घर, कॉलेज, ऑफिस सगळीकडे पाहायला मिळते. एकदा कॉलेजची डिग्री हातात पडली की नवीन शिकायचं नुसतं म्हटले तरी ते नकोसं होतं. अभ्यास करावा लागेल म्हणून प्रमोशन लाथाडणारे महाभागही असतात,तंत्रज्ञानाची सत्ता असलेल्या आजच्या जगात दररोज बदल होत असताना ज्ञानात सातत्य राहत नाही. ज्याची आज चलती आहे, त्याला उद्या मागणी असेलच असं नाही. आपल्या ज्ञानाला बाहेर खप नाही आणि नवीन लोकांसमोर आपला टिकाव लागणार नाही या भीतीपोटी अनेकांना काम आवडत नसतानाही नोकरी करावी लागते. एखादी समस्या सोडवण्यासाठी माणसं नवीन गोष्टी शिकत असतात. ज्याप्रमाणे समस्या कधीच संपत नाहीत त्याप्रमाणे शिकणंही कमी होऊ शकत नाही. अवकाशयानाच्या शोधामुळेच मानव चंद्रापर्यंत पोहोचू शकला. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांवर आजही संशोधन चालूच आहे. शिकणं हे केवळ सार्वत्रिक पातळीवर नाही तर वैयक्तिक पातळीवरही चालू असतं. म्हणूनच आजकाल स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो. सतत शिकत राहिल्यामुळे आपला मेंदू तरुण आणि कार्यरत राहतो, असं एका निरीक्षणातून समोर आलं आहे. शिकण्याची ही प्रक्रिया अनेकदा आपल्या नकळत चालू असते.
वाचणं आणि अभ्यास करणं म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिकलेल्या गोष्ठी प्रत्यक्षात वापरणं महत्त्वाचं आहे. माणसाला गाडी म्हणजे काय हे वाचून समजू शकतं, पण ती चालवणं म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवातूनच समजू शकेल. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही, पण त्या अनुभवाचा आपण कसा वापर करतो, हे महत्त्वाचं असतं. कठीण प्रसंगात माणसाची कसोटी लागते. प्रत्येक समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग असतोच, गरज असते तो शोधण्याची, ही उत्तरे शोधत असताना आपण कसे आहोत, आपली तत्त्वं, ध्येयं, आयुष्यात काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळत जातं. हे शिकणं आयुष्यभर कामी येत या शिकवणीमुळे मिळणारा आत्मविश्वासही महत्त्वाचा असतो.
जे जमतं त्यातून जास्त शिकता येतं, पण चुकांमधूनही बरंच शिकता देते. मात्र चूक झाल्यास, ती आपली जबाबदारी नव्हती असं म्हणत त्यापासून पळणं बरोबर नाही. त्यापेक्षा त्यातून काही शिकता येतं का हे पाहावं. इतरांच्या चुकांमधूनही बोध मिळतो. मात्र त्यासाठी प्रत्येक वेळा स्वतःकडून चूक व्हायलाच पाहिजे, असे नाही. दुसऱ्यांना शिकताना आपलं शिकणं होतंच पण त्याचबरोबर आपल्या विचारांना दिशाही मिळते.
आपले जवळचे मित्र आपल्यातले दोष दाखवत असतात त्याबाबत चिडण्यापेक्षा नीट विचार केला तर दोष घालवता येतात. यातून स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःच्या विचारला,मनाला
स्वयंशिस्त, जवाबदारी,नाविन्यपूर्ण विषय,सामाजिक विद्यायक कार्य असे बदल घडवता येतात.

Friday, 10 May 2024

पत्रकार मारहाण प्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याचे निवेदन

शिरोली / प्रतिनिधी 
        मुरगुड (ता. कागल) येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांनी खरी,वस्तुनिष्ठ बातमी लावल्याच्या रागातून  शिवसेना जिल्हाप्रमुख (एकनाथ शिंदे गट ) व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान कादरखान जमादार यांच्यासह अन्य दोघांनी पत्रकार तिराळे यांना मारहाण केली . त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आले. पोलीस प्रमुखांच्यावतीने जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्विकारले. 
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील खजानीस सदानंद उर्फ नंदू कुलकर्णी , सुरेश कांबरे, प्रा. रविंद्र पाटील यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते .
  संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे कि, मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी मुरगुड येथील खरी व वस्तुनिष्ठ बातमी लावली होती . त्या रागातून राजेखान जमादार , आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार व  संदीप अशोक सणगर यांनी गुरूवार ता. ९ मे २०२४ रोजी सायंकाळी मारहाण केली. ही अरेरावी व मारहाणीची घटना पत्रकारिता आणि लोकशाहीला मारक असून पत्रकारांवर दहशत निर्माण करणारी आहे. या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. प्रकाश तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. घडलेल्या घटनेचे वॄत्तांकन करण्याचे काम पत्रकार प्रकाश तिराळे यांनी केले आहे. समाजात अनेक घटना घडत असतात. त्याची माहिती संकलीत करून कार्यालयात पोहोचविण्याचे काम पत्रकार करत आहेत. त्यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला भ्याड हल्ला आहे. त्यामुळे राजेखान कादरखान जमादार, आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार, संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. व गुन्हेगारांवर कडक कारवाई करणेची मागणी करण्यात आली आहे.
फोटो.....
पत्रकार मारहाण प्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याचे निवेदन पो.नि.तानाजी सावंत यांना देताना सुधाकर निर्मळे, अभिजीत कुलकर्णी,सुरेश पाटील, नंदू कुलकर्णी, प्रा. रविंद्र पाटील, सुरेश कांबरे आदी.

Monday, 6 May 2024

मुलांच्या क्षमता ओळखून... डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर.

-------------------------------------
21 व्या शतकात आपण मुलाच्या भवितव्यासाठी 24 तास अहोरात्र कष्ट करत असतात पण,
" ज्याप्रमाणे प्रवासात प्रवासापेक्षा दिशा महत्वाची असते, त्याप्रमाणे आपल्या मुलाच्या क्षमता गुण इतर कौशल्य यांचा अभ्यास करून पालकांनी आपल्या मुलांसाठी योग्यच निर्णय घेतला तरच तो विद्यार्थी एकविसाव्या शतकातील महान भारत सत्ताधीश बनणार आहे "
 त्यासाठी  भारतातील सक्षम व आव्हानांना सामोर जाण्यासाठी किंवा त्यांना पेरण्यासाठी तो भारताचा आदर्श नागरिक बनणार आहे. मुलाच्या अंगी असणारे सुप्त गुण हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात, त्यामुळे तो जो पालक बनत आहे तो आई वडील त्या दोघांच्या संस्काराच्या बिजातूनच नवीन रोपटे जन्माला येत असते व त्यावर संस्कार रुपी अनमोल विचार,संस्कृती,संस्कार, व्यवहारज्ञान,धाडसी व  नेतृत्व जबाबदार पेलण्याची क्षमता मैत्रीपूर्ण समभाव एकता ,नेतृत्व ,सहनशीलता असे अनेक प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, संस्कृतीक, धार्मिक गुण विद्यार्थ्यांच्या अंगी येत असतात, व त्यामधून तो मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून व मित्रांच्या सहवासात राहून तो समाजातील व वैयक्तिक जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम बनणार आहे.
केवळ गुण मिळवले म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणाच मूळी चुकीची आहे. नापास झालेली मुलेही समाजात पुढे भरीय कार्य करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आपल्या मुलांची क्षमता ओळखूनच ती वाढवण्यासाठी आणि क्रियाशील रुप देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढायला हवा. आपल्या घरातील एकमेकांशी सुसंवाद साधण्यासाठी 24 तासातील दहा मिनिटे वेळ काढलाच पाहिजे तरच एकमेकाचे असणारे नाते आपुलकीचे प्रेमाचे घट्ट राहणार आहे.
आज सगळा समाजच मुलांच्या वाढत्या आक्रमक आणि बेताल वागणुकीमुळे चक्रावून गेला आहे. आजची मुले आईवडीलांनी सांगितलेले ऐकत नाहीत. आधीची मुले अमूक एक गोष्ट कर म्हटल्यावर ऐकायची. का ? म्हणून विचारत नव्हती. चित्रपट, दूरदर्शन, इंटरनेटवरील हिंसेचे, लैंगिततेथे अनिर्बंध उदात्तीकरण, हिंसेच्या भावनेला खतपाणी घालणे, मुलांना उत्तेजित करणाऱ्या व्हिडिओ गेम्स, मुलांची बिघडलेल्या मित्र-मैत्रिणींची संगत, त्यांच्याकडे पालकांचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, स्वतः पालकांचे बेताल वागणे, आजूबाजूला फोफावत चाललेला चंगळवाद, या सगळ्यांचा यात थोडा थोडा वाटा आहे.
कुटुंबामधील मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे त्यासाठी नित्यनेमाने योगासन ध्यानधारणा दररोज 40 मिनिटे चालणे सुंदर विचार वाचत बसणे ऐकणे यासारखे छोटे छोटे गोष्टी केल्या तर नित्यनेमाने एकमेकांमध्ये राहणारे विचार एकमेकांच्या विचारांचा आदर राखला जातो त्याचे कारण मानसिक स्वास्थ नाही निर्मळ जीवन काय करेल साबण या उक्तीप्रमाणे ऐकण्यापेक्षा प्रात्यक्षिक किंवा वागण्यावर भर द्यावा तरच आपलं कुटुंब एका आदर्श कुटुंबासारखे राहणार आहे.
मुलांचे मनस्वास्थ्य ठीक नसेल, मूल्ये ढासळलेली कल्पनाविश्वात वावरायची सवय लागलेली असेल, तर मुले अयोग्य व चुकीचे निर्णय घेऊ शकतात. चुकीध वागले जाऊ शकते. विचार वजा केला की माणूस पशू किंवा यंत्र बनतो. गुणी, समंजस हरहुन्नरी मुले सगळ्यांनाच आवडतात. परंतु तसे घडवणे आपल्या हातात असते. त्याल आपण कितपत यशस्वी होतो ?

एकत्र कुटुंब हीच आपली पारंपरिक पद्धत होती. पूर्वी घरात खूप माणसे • असल्यामुळे मुले कशी मोठी व्हायची हे आईवडिलांना कळायचे नाही. घरात मोठे कुटुंब. त्यामुळे समवयस्क मुले एकमेकांबरोबर खेळायची, शाळेत जायची, मिळून अभ्यास करायची, झाडावर चढायची, नदीत पोहायला, सायकल चालवायला शिकायची, हे सगळे आपोआपच व्हायचे. आज काही तिकाणी एकाच घरात विभक्त कुटुंबे राहतात. त्यांच्यामधून विस्तवही जात नाही, दोघ भाऊ, सासू-सूना, जावा-जावा आपापसांत भांडतात. एकमेकांचे वाभाडे काढतात. मोठ्याने आवाज निघतात तेव्हा काही तरी चुकीचे, भीतीदायक घडते याची जाणीव होत असते, या घटना मेंदूच्या स्मरणकप्प्यात घट्ट रुतून बसतात. जिथे जिव्हाळा नाही त्या एकत्र कुटुंबाचेही दुष्परिणाम जास्त होतात. आईबाप करतात तसेच करायला पुलांना आवडते. आपल्या अवतीभोवती फिरणाऱ्यांचे बोलणे, वागणे टिपकागदाप्रमाणे टिपून घेतात. सभोवतालच्या वागण्यातून, भावनेतून मुलांवर संस्कार होत असतात.
प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञांचे असे मत आहे की, आयुष्यात निर्माण होणाऱ्या बहुतेक मनोविकारांचे मूळ बालपणात आढळेल. या वयात ज्या त्रासदायक अथवा दुर्दैवी घटना घडतात त्या घटनांतून मुले खूप काही शिकतात. यातील काही घटना मुलांच्या दृष्टीने खूपच त्रासदायक आणि उपद्रवी असतात. आपण पुलाला, तू मूर्ख आहेस, कुरूप आहेस, अडाणी आहेस अशी नाय ठेवली तर त्यामुळे मुलांत सूडाची भावना उत्पन्न होते. सतत चिंता आणि काळजी तया होते. अयोग्य वागणूक आणि लक्षणे तयार होतात. हळूहळू घरापासून लांब लांब राहू लागतात. रात्री अपरात्री घरी येणे किंवा रात्रच्य घराबाहेर राहण, दारू, अंमली पदार्थ, जुगार यांसारखी व्यसने कवटाळणे, मुर्तीची छेड काढणे, चोरी, दरोडा, मारामारी, बलात्कारासारख गुन्हे घडतात.

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात चार ते सहा वर्षे वय अत्यंत महत्त्वाचे असते. या वयातील मुलगा असेल तर त्याला आईचे प्रेम एकट्याला मिळावे आणि मुलगी असेल तर तिला वडिलांच्या प्रेमात भागीदार नको असतो.
या काळात मुलाचे विश्व हे आई-बाबा, आजी-आजोबा, यापर्यंतच सीमित असते. पुढे शाळेच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणी, अभ्यास, शिक्षकांशी सहवासाला महत्त्व येते. या वर्षात जे अनुभव मुले घेतात त्यातूनच त्यांच्या ● व्यक्तिमत्वाची बांधणी होते.
आपण मुलांना सद्वचन केवळ जिभेवर घोळायला लावतो. ते सद्वचन मन, बुद्धी आणि कर्म यांनी अभिमंत्रित केले तरच मुले सुसंस्कृत बनतील, शाळेत आजही. अश्वत्थाम्याला पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून पाजले जाते. केवळ पोपटपंची करणारे पाठांतर केले जाते. सर्वप्रथम आपण मुलांना मातृभाषेतून शिक्षण न देता इंग्रजी माध्यमातून सामोरे जाण्यास पुढे उभे करून त्यांना नकळत तणावाखाली नेण्याची सुरुवात करीत असतो.

आज घराघरात एकच मूल ही संकल्पना वाढत आहे. पण त्या एकाकडून भरपूर अपेक्षा असतात. त्यांना ओढ मुलाच्या ज्ञानाची नव्हे तर गुणांची वाटू लागली आहे. त्यामुळे पालकांचा दरारा सहन करीत मुलांना एका अनामिक भीतीने ग्रासले जाते. काही ठिकाणी तर विपरित स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पालकच मुलांना घाबरू लागले आहेत. याचे कारण अतिलाडामुळे मुल बेजबाबदार वागू लागली आहेत, जी जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन एका दगडात दोन पक्षी मारतात अतिलाडाचे विपरित परिणाम, अनेक समस्या अंगावर येऊ लागल्या.
आज आईवडील मुलांच्या वागण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मुले मोबाईल, लॅपटॉप यात मान खुपसून बसतात.
मुलांना अपेक्षा वाढत आहेत पण त्याप्रमाणे आई-वडील व पालकाचे पत्करलेल्या घरातील सदस्यांनी सुद्धा आपण कोणकोणते टीव्हीवरील मालिका पाहतो त्यांचे प्रत्यक्ष संस्कार म्हणून कसे घडतात त्याचा अभ्यास करावा त्यानुसार त्यांनी कोणत्या मालिका पहाव्या कोणत्या आदर्श मालिका पाहून नाहीये याची वेळापत्रक सुद्धा केले तर वावगे ठरणार नाही. मालिका पाहण्यात आईवडीलही मशगुल होतात, अभ्यासाच्या बाबतीत पालक 'रिंगमास्टर होत आहेत. याचा मुलांवर ताण पडतो. परंतु भीती, दबाव यामुळे त्यांना बोलून दाखवता येत नाही. त्यांच्या वागण्यातून त्यांचे ताण प्रगट होतात. त्यामुळे आपण मुलांचे मार्गदर्शक व्हावे, हुकूमशहा होऊ नये. मुलांकडून गुणांची अवास्तव अपेक्षा करू नये. कारण केवळ गुण मिळवले म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणाच मुळी चुकीची आहे. नापास झालेली मुलेही समाजातं पुढे भरीव कार्य करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आपल्या मुलांची क्षमता ओळखूनच ती वाढवण्यासाठी आणि क्रयाशील रूप देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढायला हवा. 'अभ्यास कर' हाच एक मंत्र मुलांना सतत ऐकवला जातो. मात्र त्यांना अवांतर वाचनासाठी प्रोत्साहित केले जात नाही. वाचनाने त्यांची प्रगल्भता वाढेल. विचार करण्याची क्षमता वाढेल. आपल्या मुलांना, नवीन पिढीला नवीन विचारांची शिदोरी दयायची आहे. त्यांच्यात सुरक्षितपणाची भावना, आत्मविश्वास, सृजनशिलता वगैरे निर्माण होईल, जेणेकरून ती मुले या समाजव्यवस्थेला सामोरे जायला ताठ उभी राहू शकतील.
एकुणच आपले मुल हे एक स्वच्छ व सुंदर निर्झर आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक शैक्षणिक नैतिक भावनिक प्रदूषण झालेले दिसून येत नाही त्यामुळे तो संसार कुटुंबामध्येच तो आपल्या भारताचा आदर्श नागरिक घडत राहणार आहे एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्याच्यासमोर सुंदर विचार चांगली पुस्तक वाचणे चांगला मित्र जोडणे आपल्या आई-वडिलांचे संस्कार नुसार वागणे इत्यादी छोट्या गोष्टी केल्या तरी तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याचा क्षमतेचा विचार करून त्यास शिक्षण द्यावे.