आपण आपल्या आहारात काय जेवतो हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कसे जेवतो, केव्हा जेवतो, हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. केवळ समतोल आहार घेण्याने आपल्या आहाराचे सगळे प्रश्न सुटले असे होत नाही. यातला एक महत्त्वाचा प्रश्न आपण कोठे जेवतो, तो परिसर कसा आहे याचा विचार आपल्या खाण्यापिण्याशी, तसेच पचनाशी व इतर आरोग्याशीही संबंधित आहे.
" स्वच्छ हवा पाणी,आरोग्याची गुरुकिल्ली "असे आपण म्हणतो हे खरे पण आपण जो आहार घेतो तो परिसर स्वच्छ हवा, हे काही मुद्दाम सांगण्याची गरज नसते. तथापि, अनेक वेळा माणसे आपल्या घराबाहेर अन्नपदार्थांचे सेवन करतात. काही वेळा तशी गरज असते. बहुतेक वेळा काही बदल म्हणून तर कधी कधी केवळ जिभेचे चोचले पुरविण्याकरिता, तर कधी केवळ तसे करणे म्हणजे आपल्या मित्र-मैत्रिणींत बोलण्याचा विषय असावा म्हणून बाहेरचे खाणे होते. 'परान्नम् प्राप्य दुर्बुद्धे मा प्राणांसि दया कुरू। दुर्लभानि परान्नानि प्राणाः जन्मनि जन्मनि ।।' याचा अर्थ परान्न (घरी न शिजवलेले, बाजारचे किंवा मिळेल तिथले चवदार अन्न) खावयास मिळाले तर हे मंदमतीच्या माणसा, सोडू नकोस. हे करताना तुझ्या प्राणावर बेतले तरी चालेल. कारण प्राण तर काय दर जन्माला मिळणार आहेच, पण असे (फुकटचे, चवदार) परान्न मिळणे मोठे कठीण असते बाबा!
या सुभाषिताचा आधार घेणारी माणसे जागोजागी रस्त्यावर, चौकात,वेगवेगळ्या चौपाटीवर,विविध सार्वजनिक बागांच्या बाजूला,भाजीपाला मार्केट, रेल्वे स्थानकांच्या बाजूला, पर्यटनस्थळी, एसटी बस थांब्याच्या बाजूला मिळेल त्या आहाराचा उपभोग घेताना दिसतात. हे अन्न शिजवण्यापूर्वी तरी चांगले ताजे सकस होते का? त्यात वापरलेले तेल आधी किती वेळा उकळलेले असेल ? अन्न ज्या भांड्यात शिजवले गेले असेल ती भांडी स्वच्छ होती ना? स्वयंपाक करणाऱ्याने आपले हात स्वच्छ धुतले असण्याची किती शक्यता आहे? ज्या ठिकाणी आपण हे अन्न घेत आहोत तेथे कचरापेटी, उघड्या नलिका, प्राणी व क्वचित मानवाच्या मलविसर्जनाच्या जागा आहेत का? तेथून या अन्नावर येणाऱ्या माश्या,मच्छर व आसपास झुरळे असतील का? आपल्याला ज्या बशीतून अन्न देतात किंवा हे अन्न घेतो आहोत ती तरी स्वच्छ आहे, का एका बादलीतल्या पाण्यात बुचकळून काढलेली आहे? अन्न देणाऱ्याचे हात कसे असतील? आपले स्वतःचे तरी हात स्वच्छ आहेत ना? असे अनेक प्रश्न खाणाऱ्यांच्या मनात येतात किंवा कसे हे कळण्यास मार्ग नाही.
एवढे मात्र खरे, की अशा अन्नसेवनातून होणारे आजार पाहिले म्हणजे हे प्रश्न पडत नसावेत, असे वाटते. साधे पोट बिघडणे किंवा अपचनापासून विषमज्वर, कावीळ, अमिबिक, डिसेंट्री, बॅसिलरी डिसेंट्री, पोलिओ मायलायटिस, पॅराटाय- फॉइड, लहान मुलांना व्हायरसमुळे होणारे जुलाब, जियार्डियासिस, पोटातील विविध प्रकारचे जंत - राउंड वर्क्स, व्हिप वर्क्स, थ्रेड वर्क्स आणि हायडाटिड डिसीज (जो सहसा यकृतात होतो) असे अनेकविध जीव घेणारे रोगजंतू अशा अस्वच्छ खाण्यातून व पाण्यातून आपल्या शरीरात जातात. विषमज्वर, पॅराटायफॉइड या आजारांवरून आपल्याला सामाजिक स्वच्छतेची कल्पना येऊ शकते. युनायटेड किंग्डममध्ये दर दहा लाख लाकसंख्येत प्रतिवर्षी विषमज्वराची एक केस आढळते. ती देखील परदेशांतून तेथे स्थायिक होण्यात आलेल्यातच बहुतेक वेळा असते. भारतीय आरोग्य सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की वेगवेगळ्या भागांत विषमज्वराची लागण कमी-जास्त प्रमाणात होते. हा आजार केवळ माणसाच्याच मलाने प्रदूषित झालेले पाणी प्यायल्याने होतो, हे पाहिल्यावर ज्या लोकांना घराबाहेर खाण्यावाचून गत्यंतर नाही, त्यांनी शक्यतो स्वच्छ परिसर निवडून आपल्यासमोर भाजलेले (पोळी, भाकरी) अन्न घ्यावे. ज्या फळांची साल आपण स्वतः काढून खाऊ शकतो, अशी फळे निवडून घ्यावीत. पाण्यात बर्फ घालून घेऊ नये. ज्यांना असे खाणे आवश्यक नाही त्यांनी बाहेर खाऊन आजाराला आमंत्रण दयावे किंवा देऊ नये याचा विचार करावा.आपल्या घरामधील आपली जेवणाखाण्याची जागा व परिसर महत्त्वाचा असतो. टीव्ही पाहण्याची जागा व खाण्याची जागा एकच नसावी. विशेषतः शाळा-कॉलेजमधील मुलांना याची जाणीव करून देणे आवश्यक वाटते. वेळी-अवेळी टीव्ही पाहणे, तो पाहत असताना विविध पदार्थ भले घरी केलेले आणि स्वच्छ असले, तरी ते रोज खाणे प्रकृतीला हानिकारकच असते. ऑफिसमधून दमून घरी आल्यावर टीव्ही पाहत चहा व सोबत असले पदार्थ खाल्ले तर रात्रीचे जेवण कसे जाईल ? दिवसभर शाळेत पाणी न पिण्यामुळे तहानलेली मुले घरी आल्यावर समोर दिसेल ते पेय गटागट पिऊन टाकतात. मग सकस अन्न घेण्यास भूक शिल्लक राहत नाही. शाळेतून मूल घरी येण्यापूर्वीच त्याचे खाणे व जमल्यास दूध तयार असेल तर हा प्रश्न येणार नाही. चहा-कॉफी, टीव्ही समोर खाणे खात राहण्याने आरोग्याचे नुकसान होते. टीव्ही पाहत असताना आपण काय खातो आहोत? किती पाणी पितो आहोत याचे भान राहणे कठीणच. अशा बेताल खाण्याने व केवळ बसून राहण्याने मेदवृद्धी न झाली तर नवलच. हृदयविकार व रक्तदाबाला हे आमंत्रणच आहे. मधुमेह ताब्यात येणे कठीणच होणार. त्यातून गुडघे दुखणे, पाठीच्या मणक्यांचे आजार, पित्ताशयातील खडे, हायटस हार्निया असे विकार वाढणार. हे सगळे टाळायचे तर टी. व्ही. समोर बसून खाणे-पिणे,मालिका पाहणे,क्रिकेट पाहणे हे थांबवले पाहिजे. तशी शिस्त कुटुंबप्रमुखाला स्वतःला हवी. इतर कुटुंबातील घटकांना ती लावण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडली पाहिजे.
" मन करा प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण , तुका म्हणे "
जेवणघरातील वातावरण फार महत्त्वाचे असते. जेवताना मन प्रसन्न राहील असे वातावरण असणे आवश्यक असते. स्वच्छ परिसरात शांतता असणे जरुरीचे असते, मोठा रेडिओ किंवा टीव्ही लावला आहे, माणसे एकमेकांशी उगाचच मोठ्या आवाजात बोलत आहेत, भांडीकुंडी आपटल्याचे कपबश्या फुटण्याचे आवाज येत आहेत, रस्त्यावर रहदारीचे आवाज येत आहे. अशा वेळी आपल्या स्वतःच्या घरी शांत बसून जेवणे दुरापास्तच होते. जेवताना बोलायचा विषय माणसाचे मन प्रसन्न राहील असा असावा. नर्म विनोदी संभाषण असावे. जेवणाची सुरवात सहनाववतु। सहनौभुनक्तु।। सहवीर्यंकरवावहै। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम् शांतिः शांतिः शांतिः ।। असा कठोपनिषदातील श्लोक म्हणण्याने मनातले इतर ऐहिक विचार जाण्यास मदत होते. 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।' असा साधा श्लोकदेखील हेच काम करतो. अशा प्रसन्न वातावरणात, शांत परिसरात केलेले जेवण हेच खरे यज्ञकर्म असते, असा आशय यातून आपल्या मनात येतो. जेवताना सावकाश जेवावे. कारण अन्न नीट चावल्या शिवाय लाळेतील टायलिन नावाचा पाचक रस आपल्या घासात पूर्णपणे मिसळला जात नाही. तो मिसळल्याखेरीज अन्नातील पिष्टमय पदार्थांच्या पचनास सुरवात होत नाही. शिवाय अन्नाची गोडी नीट समजत नाही. जेवताना किंवा जेवणापूर्वी मन अस्वस्थ झाले तर केवळ लाळच नव्हे, तर जठर व लहान आतड्यातील पाचक रस तयार होण्यात मोठा अडसर निर्माण होतो. लाळ न आल्यामुळे तोंड कोरडे पडते. घास पाण्याबरोबर ढकलला जातो. पाण्याने पोट भरते. पोट फुगते. अन्नाची चव न कळताच घेतलेले अन्न कसेबसे दोन-चार घासच सेवले जाते. जे जेवले जाते ते पचत नाही. जेवणापूर्वीच खूप पाणी प्याले असेल, त्याचबरोबर इतर चमचमीत, खारवलेले, तळलेले खादयपदार्थ यथेच्छ खाण्यात आलेले असतील किंवा सोबत काही खाणे होत असेल, तर जेवण हा एक उरकून टाकण्याचा विधीच होतो. जेवताना स्वयंपाकाचे गुणगान करणे हे केवळ पाहुण्यांचे नव्हे, तर कुटुंबीयांचे महत्त्वाचे कर्तव्य असते, याचा विसर पडून एखाद्या पदार्थातील क्षुल्लक अभाव हाच चर्चेचा विषय बनतो. हे कटाक्षाने टाळणे आहारगृहातील वातावरण चांगले ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
आहारातील अन्नघटकांचा स्वाद चांगला यावा याकरिता ते गरम वाढण्याचा, गरम असताना खाण्याचा प्रघात आहे. हे स्वाददेखील पाचक रस तयार होण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. ताजे व गरम अन्न घेणे या दृष्टीने आदर्श आहे. ते केवळ सकाळी केलेले आहे म्हणून संध्याकाळी त्याज्य होत नाही. आता शीतपेट्या व मायक्रोवेव्ह, ओव्हन घरोघरी आहेत. तेव्हा तसा शिळेपणा अन्नाला नसतो. बाहेरच्या अन्नात शिळे अन्न असू नये. कारण अन्नावर जिवाणू व बुरशी वाढली असली तरी अपायकारक असते. ते सेवण्यापूर्वी पुन्हा तेवढेच गरम केले तर हा धोका जातो. त्यातल्या त्यात उकळण्यापेक्षा तव्यावर भाजण्याने तापमान अधिक होऊ शकते.
कारण उकळताना १०० अंश सेल्सिअस एवढेच तापमान वाढू शकते. प्रेशरकुकरने तापमान वाढू शकते. तेलात तळताना त्यापेक्षाही जास्त मिळते. तव्यावर भाजताना लोखंडी तवा २५० अंश सेल्सियसपर्यंत सहज तापतो, तर प्रत्यक्ष विस्तवावर किंवा ज्वाळेत खूपच जास्त (६०० अंश सेल्सियसपेक्षा जास्त) तापमान मिळते. इतक्या तापमानात विषाणू-जिवाणू किंवा बुरशी जगू शकत नाहीत. कच्चे अन्न कोशिंबिरीसारख्या पदार्थांतून घेणे जरुरीचे असते, त्याच्याबद्दल स्वच्छतेचा विचार आपण प्रथम केलेला आहेच. शिवाय बऱ्याच कच्च्या पदार्थांत पाचक द्रव्ये परिणामकारक न होण्याचे गुणधर्म असतात, याचाही जाणीव ठेवणे जरुरीचे असते.
पावसाळ्यात यामधील महत्त्वाचे विषय म्हणजे याबद्दल जागरुकता आपण ठेवली पाहिजे हे महत्वाचे आहे.
( लेखक मराठी विज्ञान साहित्याचे पीएच डी आहेत.) डॉ अजितकुमार पाटील, केंद्रमुख्याध्यापक,कोल्हापूर.
No comments:
Post a Comment