Saturday, 14 December 2024

उल्लास साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी - आता विभागीय मंडळांवरही राजेश क्षीरसागर यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती


कोल्हापूर / प्रतिनिधी
 उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य समन्वयक कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व विभागीय समन्वयकपदी रत्नागिरी मंडळ वगळता संबंधित विभागीय मंडळाच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्तपणे जारी केले आहेत.

 राज्य शासनाने केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे स्वीकारला आहे. हा कार्यक्रम सन २०२२ ते २०२७ या कालावधीत देशभर राबवला जात आहे. तर २५ जानेवारी २०२३रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्य, जिल्हा, तालुका व शाळा स्तरावरील समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयाकडून राज्यस्तरावरून वेळोवेळी या कार्यक्रमाचा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आढावा घेण्यात येतो तसेच क्षेत्रभेटी देण्यात येतात. यावेळी आलेले अनुभव लक्षात घेता क्षेत्रीय स्तरावर या कार्यक्रमाचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. 

या योजनेत असाक्षरांचे सर्वेक्षण व स्वयंसेवक सर्वेक्षण, त्यांची उल्लास ॲपवर ऑनलाइन नोंदणी व जोडणी, अध्ययन अध्यापन, परीक्षेचा सराव, परीक्षा पूर्व व परीक्षोत्तर कामकाजाची कार्यवाही तसेच क्षेत्रिय स्तरावरील जिल्हा, तालुका, शाळास्तर समित्यांचे कामकाज या बाबींचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना यांचा या योजने संदर्भातील कामकाजाचा आढावा, योजनेची प्रसिद्धी, उद्दिष्टानुसार केले काम याबाबत विभागीय समन्वयकांनाही आता लक्ष घालावे लागणार आहे.

स्वयंसेवक म्हणून इयत्ता आठवी व त्यापुढील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, एनसीसी, एनएसएस, अध्यापक विद्यालयाचे छात्र अध्यापक, शिक्षक यांचा अंतर्भाव करणे अपेक्षित आहे.

या योजनेत शाळा हे एकक असून स्वयंसेवक शिक्षकास कोणत्याही मानधनाची तरतूद नाही. जनभागीदारी (लोकसहभाग) हेही या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या योजनेत स्वयंसेवक म्हणून कामकाज करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांची तरतूद करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सप्टेंबर मध्ये शिक्षण मंत्री यांनी दिले होते. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

चालू वर्षीची असाक्षर ऑनलाइन नोंदणी व त्यापुढील कार्यवाही सुरू आहे. इयत्ता आठवी व त्यापुढील शालेय विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या बैठकांमध्ये याचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय मंडळांना संचालकांनी दिले आहेत.
सध्या विभागीय अध्यक्ष म्हणून राजेंद्र अहिरे-मुंबई, डॉ. सुभाष बोरसे -नाशिक, मंजुषा मिसकर-पुणे, अनिल साबळे-छत्रपती संभाजी नगर, सुधाकर तेलंग-लातूर, नीलिमा टाके-अमरावती, माधुरी सावरकर-नागपूर हे काम पाहत आहेत. उल्लास योजनेतील अनुभव लक्षात घेता आदेशानुसार राजेश क्षीरसागर यांना राज्य समन्वयक, कोल्हापुर विभाग समन्वयक आणि रत्नागिरी विभाग समन्वयक म्हणून काम पहावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment