Monday, 24 February 2025

कर्नाटक बस बंद प्रकरणी परिक्षार्थींनी तासभर आधी उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर / प्रतिनिधी

चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील घटनेमुळे कोल्हापूर विभागातून कर्नाटकच्या बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द केल्याचे वृत्त आहे. 
सध्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरू आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील दहावी बारावीचे जे परीक्षार्थी सार्वजनिक वाहतुकीवर (एसटी बसेसवर) अवलंबून आहेत, त्यांनी व त्यांच्या पालकांनी ही बाब लक्षात घेऊन परीक्षेस जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. बोर्ड परीक्षेसाठी नियोजित पेपर दिवशी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे व परीक्षा द्यावी. असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत करण्यात येत आहे.

शिवाय तशी सूचना सीमावर्ती भागातील गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख यांनी सर्व शाळांमार्फत पालकांपर्यंत पोहोचवावी. कोल्हापूर व सांगली माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी याबाबतची सूचना अधिनस्त सर्व संबंधितांना देण्याबाबत कळवण्यात आले आहे.

Sunday, 23 February 2025

हेरले येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप


हेरले /प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज्ञ मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पुणे येथे ऑनलाइन करण्यात आले.
         यावेळी हेरले( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत हेरले यांच्या वतीने मराठी शाळा येथे ऑनलाईन प्रक्षेपण दाखवण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण माजी सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर डॉ. पद्माराणी पाटील यांच्या शुभहस्ते ७० लाभार्थ्यांना  वाटप करण्यात आले.      
      यावेळी सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य बक्तीयार जमादार,मनोज पाटील, राकेश जाधव,उर्मिला कुरणे,सविता पाटील, शुभांगी चौगुले, सुशीला परमाज,रंजना माने, ग्रामपंचायत अधिकारी बी एस कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

फ़ोटो:-हेरले येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करत असताना माजी सभापती डॉ पद्माराणी पाटील, सरपंच राहुल शेटे,उपसरपंच निलोफर खतीब व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

मौजे वडगांव येथे ' प्रधानमंत्री ' आवास व पहिल्या हप्त्याचे वितरण


हेरले /प्रतिनिधी  

' प्रधानमंत्री ' आवास योजनेअंतर्गत राज्यात एकाच दिवशी १० लाख लाभार्थ्यांना मंजूरीपत्र व पहिला हप्ता जमा होत आहे . त्या अनुषंघाने मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करून प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण ) टप्पा २ अंतर्गत १३ लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरीपत्र व पहिल्या हप्त्याचे वितरण सरपंच कस्तुरी पाटील व उपसरपंच रघूनाथ गोरड यांच्या हस्ते करण्यात आले.
        सदरचा कार्यक्रम मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या योजनेतून लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी व रोजगार हमी योजनेतून १ लाख ४० हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे.
       यावेळी ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील , माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनिल खारेपाटणे, स्वप्नील चौगुले, सुरेश कांबरे, सविता सावंत, सुनिता मोरे, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , मिनाक्षी आकिवाटे , पोलिस पाटील अमिर हजारी, अविनाश पाटील, मुख्याध्यापक बाळासो कोठावळे , यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते .

कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्काराचे मान्यवरांचे हस्ते वितरण.


हेरले / प्रतिनिधी

 कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेचा सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण समारंभ व 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' पुरस्कार प्राप्त शाळांचा सन्मान सोहळा स्वामी विवेकानंद कॉलेज परिसरात  डॉ बापूजी साळूंखे स्मृती भवन कोल्हापूर येथे रविवार दि. २३  रोजी संपन्न झाला.समारंभाचे अध्यक्षस्थानी ॲड. धनजंय पठाडेसो (प्रसिद्ध विधी तज्ञ कोल्हापूर),
प्रमुख पाहूणे किरण पाटील ( विशेष लेखाधिकारी), कौस्तुभ गावडे (सीईओ, श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर), जयश्री जाधव (शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक), राहूल पवार (चेअरमन, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ) आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी केले. यावेळी त्यांनी कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सभासद हिताच्या योजनांची माहिती सांगितली. कर्जमुक्ती योजना, गुणवंत विद्यार्थी सत्कार व भक्कम आर्थिक प्रगतीचा आढावा आपल्या मनोगतातून दादासाहेब लाड यांनी घेतला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील ' मुख्यमंत्री माझी शाळा  सुंदर शाळा ' पात्र ४० शाळांना मानपत्र, भिंतीवरील घड्याळ, प्लास्टिक समृद्धीची बादली देऊन सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मयत सभासदांचे वारसाना कर्ज मुक्ती योजनेतून कर्ज माफी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दहावी - बारावी परीक्षा गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी,  शासकीय स्पर्धा राज्य व राष्ट्रीय स्तर खेळाडूचा सत्कार पारितोषिक ,सन्मानचिन्ह व रोख १००० रुपये देऊन  सुमारे ३०३ विद्यार्थ्याना सन्मानीत करण्यात आले.  यावेळी जिल्हा विशेष लेखा अधिकारी किरण पाटील, जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री जाधव यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय पठाडे म्हणाले, कोजिमाशि पतसंस्थेने सभासद हिताच्या अनेक योजना राबवून आदर्शवत कारभार केला आहे असे प्रतिपादन केले . गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशाची उच्च शिखरे गाठवित, स्पर्धेच्या युगात सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करावे असा संदेश दिला. 
   कार्यक्रमास शिक्षक नेते दादासाहेब लाड ( कोजिमाशि पतसंस्था तज्ञ संचालक), राजाराम शिंदे (चेअरमन कोजिमाशि), शरद तावदारे (व्हा. चेअरमन), जयवंत कुरडे (सीईओ),कोजिमाशि पतसंस्था  संचालक लक्ष्मण डेळेकर, अनिल चव्हाण, डॉ. डी एस घुगरे, राजेंद्र रानमाळे,श्रीकांत कदम, दिपक पाटील, मनोहर पाटील, सचिन शिंदे, ऋतुजा पाटील, मदन निकम , प्रकाश कोकाटे, श्रीकांत पाटील , उत्तम पाटील,  पाडूरंग हळदकर, अविनाश चौगले, सुभाष खामकर, जितेंद्र म्हैशाळे, राजेन्द्र  पाटील, शितल हिरेमठ, तज्ज्ञ संचालक आनंदा व्हसकोटी, उत्तम  कवडे (डे.सीईओ) आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एस पी पाटील यांनी केले.आभार चेअरमन राजाराम शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, सभासद, पालक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 19 February 2025

परीक्षेला सामोरे जाताना..-वारंवार विचारले जाणारे दहा निवडक प्रश्न व त्यांची उत्तरे


कोल्हापूर / प्रतिनिधी

 सध्या बोर्ड परीक्षांचा हंगाम सुरू आहे.इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेबाबत पालक व परीक्षार्थी यांच्याकडून वारंवार प्रश्न शाळा, शिक्षण विभागातील अधिकारी व मंडळाकडे विचारले जातात. त्यातील अधिकाधिक विचारल्या जाणाऱ्या दहा प्रश्नांचे संकलन राज्य मंडळ व विभागीय मंडळातील कामकाजाचा अनुभव असलेले प्रभारी सहसचिव दीपक पोवार यांनी केले आहे, ते प्रश्न उत्तरासह प्रसिद्ध करत आहोत.
-राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष,
कोल्हापूर व कोकण मंडळ.


प्रश्न ०१ : विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेबाबत कोणती काळजी घ्यावी ?
उत्तर :-विद्यार्थ्यांनी आपल्या बैठक व्यवस्थेबाबत परीक्षेच्या दिवसापर्यंत गाफिल न राहता किमान ०२ दिवस अगोदर बैठक व्यवस्थेची खात्री करावी. केंद्रावर बैठक व्यवस्थेबाबत फलक दर्शनी भागावर लावले जातात. अवगत होत नसल्यास आपल्या केंद्र शाळेशी किंवा आपल्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून बैठक व्यवस्था निश्चित करावी.

प्रश्न ०२ : परीक्षा दालनात परीक्षेसाठी किती वेळ अगोदर उपस्थित रहावे. ?
उत्तर :-विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर एक तास आणि परीक्षा दालनात किमान अर्धा तास म्हणजेच सकाळ सत्रासाठी स. १०:३० वाजता व दुपार सत्रासाठी दुपारी ०२:३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळ सत्रसाठी स. ११:०० नंतर व दुपार सत्रासाठी दु. ०३:०० नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांस परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा संचलन सुकर होणेसाठी घंटेचे वेळापत्रक पहावे. तसेच गजर व टोल चा क्रम लक्षात घ्यावा.

प्रश्न ०३ :परीक्षेसाठी कोणते साहित्य बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे. ?

उत्तर :प्रवेशपत्र, परीक्षेसाठी किमान ०२ पेन (निळी / काळी शाई) परीक्षा पॅड, ज्यावर काही लिहिलेले नसावे, पारदर्शक पाणी बॉटल, शुगरचा विद्यार्थी असल्यास आवश्यक औषधे, गणित विषयासाठी आवश्यक असणारी विहित सामग्री.
 विद्यार्थ्यांनी मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर किंवा इतर तत्सम इलेट्रॉनिक साहित्य परीक्षा दालनात घेवून जाऊ नये.

कोणत्याही परिस्थितीत अनावधानाने अगर जाणिवपूर्वक कोणताही कागद खिशामध्ये, कंपास बॉक्समध्ये राहणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.

प्रश्न ०४ : परीक्षा ब्लॉकमध्ये उत्तरपत्रिका वितरीत झाल्यानंतर काय करावे. ?
उत्तर :-सर्व प्रथम बेंच सुस्थितीत असल्याची खात्री करावी. ही समस्या असल्यास बेंच बदलून घ्यावा. उत्तरपत्रिका नीट तपासून घ्यावी. उत्तरपत्रिकावरील सुचना वाचून घ्याव्यात. सर्व पाने इ.१२ वी करिता २८ पाने, तर इ. १० वी करिता २० पाने सुस्थितीत असल्याची खात्री करावी. काही पाने खराब असल्यास, पान क्रमांक नसल्यास तातडीने पर्यवेक्षकांकडून सदरची उत्तरपत्रिका बदलून घ्यावी. जर पेपर लिहिताना काही वेळाने सदर बाब लक्षात आल्यास परीक्षार्थ्यांनी घाबरुन न जाता आपल्या पर्यवेक्षकास सदर बाब निदर्शनास आणावी.

प्रश्न ०५ :-एखाद्या पेपरला हॉल तिकिट विसरल्यास काय करावे

उत्तर :घाबरून न जाता पर्यवेक्षक / केंद्रसंचालक यांना सदर बाब निदर्शनास आणावी. केंद्रावर दुबार प्रवेशपत्र असल्याने पडताळणी करता येऊ शकते पण जाणीवपूर्वक विसरु नये. केंद्रसंचालकांकडे हमीपत्र लिहून द्यावे, दुसऱ्या दिवशीच्या पेपरवेळी प्रवेशपत्र (Hall Ticket) न चुकता आणावे, ते केंद्रसंचालकांना दाखवावे.

प्रश्न ०६:- उत्तरपत्रिकेमध्ये कच्चे काम केले तर चालू शकते का ?
उत्तर: कच्चा कामासाठी सोबत कागद न नेता उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर कच्चे काम अशी नोंद करावी, मात्र उत्तरपत्रिकेच्या कोणत्याही पानावर नाव, बैठक क्रमांक, देवाचे नाव, सांकेतिक खुण, पास करण्याची विनंती, नोटा चिकटवणे, विसंगत बाबी लिहिणे,इत्यादी प्रकार टाळणे आवश्यक आहे. कारण वरील कृती ही गैरमार्ग ठरुन चौकशी अंती सदर विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली जाते.(बैठक क्रमांक पहिल्या पानावर विहित ठिकाणी नमूद करायचा असतो.) 

प्रश्न ०७ :- खाजगी प्रकाशकांकडून वेळापत्रके प्रसिध्द होतात ती प्रमाणभूत मानावी का ?

उत्तर :-मंडळाने अधिकृत जाहीर केलेले जे आपल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रदर्शित केलेले आहे. तसेच मंडळाच्या मोबाईल अॅप मध्ये उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावरील परीक्षेचे वेळापत्रक प्रमाणभूत मानावे.

प्रश्न ०८ :-विद्यार्थ्यांस नैसर्गिक आपत्ती, अपघात, संप बंद, या कारणामुळे नियोजित वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहचू न शकल्यास काय करावे ?.

उत्तर :अपवादात्मक परिस्थितीत अशा प्रसंगी आपल्या नजिकच्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होता येते, पण संबंधित केंद्रसंचालकांना त्याची वस्तुस्थितीची खात्री पटवून देणे आवश्यक आहे.

प्रश्न ०९ :-विद्यार्थ्यांस माध्यम बदलून प्रश्नपत्रिका प्राप्त झाली किंवा अन्य विषयाची प्रश्नपत्रिका प्राप्त झाली तर काय करावे. ?

उत्तर :- सदर बाब तातडीने पर्यवेक्षक व केंद्रसंचालक यांच्या निदर्शनास आणून चुकीची प्रश्नपत्रिका जमा करुन योग्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रसंगी तातडीने सूचित करावे, वेळ वाया घालू नये.

प्रश्न १० :-एखादे उत्तर चुकल्यास किंवा उत्तर बदल करावयाचा असल्यास काय करावे. ?

उत्तर :-अशा वेळी त्या उत्तरावर काट मारावी, कोणत्याही परिस्थितीत उत्तर चुकले आहे म्हणून उत्तरपत्रिकेचे पान फाडू नये. घाबरुन ते सोबत घेऊन जाऊ नये. अशी कृती केल्यास व गैरमार्ग ठरवून शिक्षेस पात्र व्हाल, याची नोंद घ्यावी
- दीपक पांडुरंग पोवार
वरिष्ठ अधीक्षक तथा सहसचिव

परीक्षेत गैरप्रकार म्हणजे आगीशी खेळ बोर्ड परीक्षेसाठी विभागीय मंडळाचा पुन्हा इशारा.


मिशन दहावी, आढावा परीक्षा पूर्वतयारीचा. 

कोल्हापूर /प्रतिनिधी 

 २१ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या संचलनात हयगय केल्यास कडक कारवाईचा इशारा विभागीय मंडळाने क्षेत्रीय यंत्रणांसहित शाळांना दिला आहे. चालू वर्षीच्या बोर्ड परीक्षा कोल्हापूर व कोकण विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मिशन म्हणून हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

 विभागीय मंडळांने प्राचार्य डायट,जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना,  गटशिक्षणाधिकारी, परिरक्षक, केंद्र संचालक आणि माध्यमिक- उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची ऑनलाइन पद्धतीने दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

मागील डिसेंबर पासूनच जिल्हास्तरावर शाळा प्रमुखांच्या बैठका, भौतिक सुविधांची पाहणी, गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी कॉपीमुक्तीची शपथ, शाळा स्तरावर पालक बैठकांचे आयोजन, परीक्षेला सामोरे जाताना-विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उदबोधन कार्यक्रम व व्हिडिओ निर्मिती असे हटके उपक्रम करतानाच राज्य मंडळाच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यात शाळास्तरावर जनजागृती सप्ताह आयोजित केला. क्षेत्रीय यंत्रणांसह शाळा प्रमुखांच्या पाठपुरावा बैठकाही घेतल्या. त्यातच राज्यस्तरावरून मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाला या परीक्षांमध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले असल्याने चालू वर्षाच्या बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू आहेत.

१३ फेब्रुवारी रोजी विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी एम किल्लेदार, कोकण विभागीय सहसचिव दीपक पोवार यांनी विभागीय मंडळ कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली.

 परीक्षा आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये आणि गैरप्रकार मुक्त परीक्षा होण्यासाठी ही बैठक घेतल्याचे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा आयोजन करण्याचे निर्देश दिले असल्याचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळांची पूर्वतयारी आणि जिल्हा प्रशासनाची तितक्याच तोलामोलाची साथ यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या इयत्ता१२ वी परीक्षांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्याचप्रमाणे इयत्ता १०वीच्या परीक्षा सुद्धा चांगल्या वातावरणात पूर्ण होण्यासाठी जिल्हा,तालुका, परिरक्षण केंद्र, परीक्षा केंद्र व शाळा स्तरावरील नियोजन काटेकोरपणे पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही विभागीय अध्यक्षांनी सांगितले. दक्षता समितीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भरारी व बैठया पथकांच्या नियुक्त करून परीक्षेचे उत्तम नियोजन केले आहे.

बारावी परीक्षेच्या धर्तीवर दहावी परीक्षेलाही पाचही जिल्ह्यात संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. भरारी पथक आणि बैठ्या पथकांनाही सक्त निर्देश देण्यात आले आहेत. बारावी परीक्षेपूर्वी कोल्हापूर येथील एका शाळेत प्रवेशपत्रे आणि आवेदन पत्राबाबत झालेल्या गोंधळावरून सर्वच शाळांना आवश्यक पूर्वतयारीच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच गैरप्रकारास उत्तेजन देणाऱ्या, मदत करणाऱ्या आणि सामील असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

*शाळांनी करायची पूर्वतयारी.*
•सर्व विद्यार्थ्याची आवेदनपत्रे भरल्या बाबत खात्री करणे.
•सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राचे वाटप.
•प्रवेशपत्रावरील विषय, माध्यम दुरुस्ती मंडळाकडून समक्ष पत्र देऊन दुरुस्त करणे.
•तोंडी / प्रात्यक्षिक शाळा स्तरावर घेऊन गुण ऑनलाइन पद्धतीने मुदतीत भरणे.(गुण नोंदणीसाठी बारावी अंतिम तारीख१८ एप्रिल, दहावी साठी २४ एप्रिल)
•परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्या, बेंचेस, पंखे, वीजदिवे, स्वच्छतागृहे, पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याची सुविधा यांची उपलब्धता, दारे खिडक्या दुरुस्त करणे.
•कला,क्रीडा यासह वाढीव गुणांबाबत विहित मुदतीत कार्यवाही करणे. 
•गैरमार्ग यादीतील परीक्षा केंद्र असलेल्या शाळा प्रमुखांनी भौतिक सुविधा सुसज्ज करूनच बदललेल्या केंद्र संचालकांच्या ताब्यात शाळा इमारत देणे. 
•अखंड वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जनरेटरची व्यवस्था व त्याबाबत हमीपत्र.


शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रभावती कोळेकर सातारा, राजेसाहेब लोंढे सांगली, एकनाथ आंबोकर कोल्हापूर, सुवर्णा सावंत रत्नागिरी, कविता शिंपी सिंधुदुर्ग यांनी बारावी परीक्षेतील सद्यस्थिती आणि दहावी परीक्षेची पूर्वतयारी याचा आढावा सादर केला. कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत दहावी परीक्षेसाठी १ लक्ष ३२ हजार ९२३ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसाठी ३५७ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी गैरमार्ग यादीतील ५३ केंद्रावरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी वर्ग बदलण्यात येणार आहे. कोकण विभागीय मंडळांतर्गत २७ हजार ८४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार असून ११४ केंद्रावर दहावीची परीक्षा होणार आहे. गैरमार्ग यादीत एकही केंद्र नसल्याने कोकणात दहावीच्या कोणत्याही केंद्रावरील कर्मचारी वर्ग बदलण्यात येणार नाही.

*कोल्हापूर जिल्हा सांख्यिकी इयत्ता दहावी* 
•परीक्षार्थी-५४,८१०
•परिरक्षण केंद्रे-१७
•परीक्षा केंद्रे-१३८
•कर्मचारी वर्ग बदललेली परीक्षा केंद्र संख्या-३४
•परीक्षार्थी प्रविष्ट करणाऱ्या शाळांची संख्या-९७७

"क्षेत्रीय अधिकारी व शाळांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होऊ नये याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. 

-राजेश क्षीरसागर,
 विभागीय अध्यक्ष,
 कोल्हापूर व कोकण मंडळ.

Wednesday, 12 February 2025

पाच-सहा वर्षेच राहिलीत; तीही अशीच संपवता काय ?विनाअनुदानित शिक्षकांचा महायुती सरकारला संतप्त सवाल



   कोल्हापूर / प्रतिनिधी

 ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत सलग ७५ दिवस वाढीव टप्प्यासाठी वेगवेगळे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे विनाअनुदानित कृती समितीने शिकस्त केली, आझाद मैदानातसुद्धा लढा दिला. सरकारनेही अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन देऊन १४ ऑक्टोबरला वाढीव टप्प्याचा जीआर काढला. संभावित निधीची तरतूद करण्याचे मान्य केले. मात्र, आता चार महिने झाले तरी निधीची तरतूद न करता आश्वासन न पाळणाऱ्या महायुती सरकारविरोधात विनाअनुदान शाळेतील शिक्षक पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. हजारो शिक्षकांची आता पाच-सहा वर्षेच नोकरी राहिली असन. तीही अशीच संपवता काय, असा सवाल शिक्षक करीत आहेत. राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढीचा निर्णय होऊनसुद्धा गेल्या अधिवेशनात याची तरतूद न करता केवळ वाढीव टप्प्याचा जीआर निघूनही अद्याप अनुदानाची तरतूद नाही

   पुन्हा एकदा आश्वासन देऊन या शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. टप्पा वाढीच्या तरतुदीचे आश्वासन शासनाने पाळले नसल्यामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांत संतापाची लाट उसळली असून, आता आम्ही काय केले म्हणजे सरकार निधीची तरतूद करील. असा सवाल शिक्षकांनी सरकारला केला आहे.

   आंदोलनानंतर या शाळेतील शिक्षकांना २०१६ साली २० टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर ६०  टक्क्याचा वाढीव टप्पा अनुदानासाठी पुन्हा एकदा आंदोलन करावे लागले. त्यानंतर ६० टक्के अनुदान प्राप्त झाले. दरम्यान, ८० टक्के अनुदान टप्पा वाढीसाठी राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर आणि मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. यावेळी माजी शिक्षणमंत्री केसरकर यांनी ११ जून २०२४ पासून टप्पा वाढ देण्याचे मान्य केले होते. तसा जीआरही  निघाला; परंतु शासनाने या आश्वासनाची अद्याप पुर्तता केलेली नाही.

          चौकट
 गेली २५ वर्षे विद्यादान करणाऱ्या शिक्षकांना अनुदानासी आतापर्यंत तीनशे |आंदोलने करावी लागली. आता तरी शासनाने | गांभीर्याने विचार करून आगामी अधिवेशनात निधीची तरतूद करावी.

- शिवाजी कुरणे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, विनाअनुदानित शाळा कृती समिती
      चौकट
 शासनाने दिलेला शब्द न पाळल्यामुळे राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. सरकारने उन्हाळी  अधिवेशनात निधीची तरतूद करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार.

खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती

विहिरीला संरक्षक कठडा बांधण्याची मागणी


हेरले / प्रतिनिधी


हेरले येथील हेरले मौजे वडगाव रस्त्यावरील पाटील मळ्याजवळील विहिरीला संरक्षक कठडा बांधण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी विहिरीला चार ते पाच वर्षापासून तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याची पाने लावून संरक्षण भिंत उभी केली आहे त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी वाहन विहिरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.रस्ता एका बाजुला  खचला आहे, त्यामुळे अधिक धोका निर्माण झाला आहे. येथील मार्गावरून पेठवडगाव, शिरोली एमआयडीसी व पुढे महामार्गाला जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते शिवाय या मार्गावरून स्कूलबसेसची नेहमी ये जा चालू असते तरी सदर विहिरील कठडा बांधून घेणे अथवा लोखंडी ग्रील लावणे आवश्यक आहे या बाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने वेळीच खबरदारी घेऊन या विहिरीला संरक्षक कठडा बांधून घ्यावा अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे.

Tuesday, 11 February 2025

पुलाची शिरोली गावाचा कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत समावेश न करता स्वतंत्र नगरपालिका मंजूर करावी याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

हेरले /प्रतिनिधी

पुलाची शिरोली गावचा समावेश कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये न करता, शिरोली गावासाठी स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करावी. अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने करण्यात आली.याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात प्रस्तावित असलेल्या हद्दवाढीमध्ये पुलाची शिरोली या गावचा समावेश न करता, पुलाची शिरोली गावची भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन  स्वतंत्र  नगरपरिषद मंजूर करावी.या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले व माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  प्रकाशराव आबिटकर यांना देण्यात आले. 
      यावेळी बोलताना, जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पुलाची शिरोली गावाची भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्येचा विचार करता गावासाठी स्वतंत्र नगरपरिषद होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
 निवेदनावर बोलताना नामदार प्रकाश आबिटकर यांनी या विषयावर जिल्हास्तरीय बैठकीचे  आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
     यावेळी माजी जि.प.सभापती प्रवीण यादव, माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण, माजी ग्रा.पं. सदस्य शिवाजी पाटील ,शिवसेना उबाठा उपशहरप्रमुख अशोक खोत, सर्जेराव डांगे, सिद्धू पुजारी व इतर ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो..
पुलाची शिरोली गावाचा कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत समावेश न करता स्वतंत्र नगरपालिका मंजूर करावी याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देताना संजय चौगुले, डॉ.सुजीत मिणचेकर, महेश चव्हाण, शिवाजी पोवार आदी.

पुलाची शिरोली येथे हद्द वाढ विरोधी कृती समितीच्या बैठक संपन्न

पुलाची शिरोली/प्रतिनिधी 
महापालिकेचे कारभारी नगरसेवक व अधिकारी यांनीच कोल्हापुरातील बिल्डर लॉबीसाठी हद्द वाढीचा घाट घातला आहे. असा आरोप पुलाची शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी केला.
हद्द वाढ विरोधी कृती समितीची बैठक पुलाची शिरोलीत पार पडली याप्रसंगी ते बोलत होते.
 खवरे पुढे म्हणाले, कोल्हापूर महापालिका शहरांमध्ये नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यास अपयशी ठरली आहे. मग हद्द वाढ करून ग्रामीण भागातील जनतेला काय न्याय देणार? असा प्रश्न खवरे यांनी उपस्थित केला. तसेच ग्रामीण भागात विकास कामांना बळकटी देण्यासाठी भरीव निधीची शासनाने तरतूद करावी.अशी मागणी शशिकांत खवरे यांनी केली.
केवळ शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील उत्पन्न, ग्रामीण भागातील गायरानाच्या जमिनी या वर डोळा ठेवूनच कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकांचा हद्द वाढीचा हट्टाहास सुरू आहे. आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खेडेगावात पायाभूत सुविधा देण्यास सक्षम आहोत. तसेच ग्रामीण भागातील जनता ही कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला तीव्र विरोध करत आहे. याचा महायुती सरकारने विचार करावा व जबरदस्तीने हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केल्यास कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी दिला. याप्रसंगी वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी हद्द वाढीस तीव्र शब्दात विरोध दर्शवला.
याप्रसंगी सरपंच अमर पाटील शिंगणापूर , सरपंच सौ.शितल कदम शिये,उत्तम पाटील, बाजीराव सातपुते ,राजेंद्र सुतार, अतुल शिंदे, कपिल सावंत, विश्वास गुरव ,उत्तम आंबवडेकर, संदीप पाटोळे, निवास तायमाले, संग्राम पाटील, शामराव यादव, श्रीधर कदम, संदीप कुंभार, सुरज पाटील आदीसह कृती समितीचे निमंत्रक पदाधिकारी उपस्थित होते.
आभार बाजीराव सातपुते यांनी मानले.
फोटो..
पुलाची शिरोली येथे हद्द वाढ विरोधी कृती समितीच्या बैठकीत बोलताना माजी सरपंच शशिकांत खवरे, प्रसंगी उपस्थित मान्यवर

सुधाकर सावंत यांची ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय महासचिवपदी निवड

कोल्हापूर /प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नगरपालिका महानगरपालिका राज्यप्रमुख सुधाकर सावंत यांची राष्ट्रीय पातळीवरील प्राथमिक शिक्षकांची संघटना ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्स (पाटणा)नुकत्याच झालेल्या सातव्या राष्ट्रीय संमेलनामध्ये राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाली. 
        सुधाकर सावंत 30 वर्षाहून अधिक काळ शिक्षक -कर्मचारी चळवळीत कार्यरत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेत झालेल्या शिक्षक भरती प्रकरणी झालेल्या आंदोलनातून नेतृत्वाची सुरुवात झाली. शिक्षक समितीचे तेव्हाचे राज्यअध्यक्ष आणि सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थी दशेतही कॉलेजमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांमध्ये आघाडीवर होते. यापूर्वी त्यांनी शिक्षक समिती कोल्हापूर शहर चे सरचिटणीस व अध्यक्ष म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याचे कार्यालयीन चिटणीस, राज्यउपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्या नगरपालिका महानगरपालिका प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. राज्य सरकारी , निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांनी वेळोवेळी पुकारलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्याचबरोबर अनेक आंदोलनाचे नेतृत्वही करण्यात आघाडीवर होते. 
           शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी, मागण्यासाठी तसेच शिक्षण हक्क कायदा अस्तित्व यावा यासाठी नागपूर, मुंबई, दिल्ली पुणे भोपाळ व गोवा या ठिकाणी झालेल्या अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, नियोजनात पुढाकार घेतला. अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंचचे सदस्य म्हणूनही सातत्याने देशभरातील विविध शैक्षणिक परिषदांमध्ये व आंदोलनामध्ये सहभागी होत आलेले आहेत. संघटनात्मक कार्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही योगदान दिलेले आहे. पर्यावरण चळवळ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ही सक्रिय कार्य केले आहे. मिलिंद यादव यांच्या चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळी मध्येही सातत्याने सहभागी असतात. देशभरातल्या प्राथमिक शिक्षक संघटनांची नेतृत्व करणारी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन ही एक सक्षम संघटना असून या संघटनेच्या राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूलाल झा (झारखंड) राष्ट्रीय सचिव व्ही. अण्णामलाई (तामिळनाडू) सालिकराम पटेल (उत्तर प्रदेश) सुरेंद्र सौरभ (बिहार) के. नरसिंह रेड्डी (आंध्र प्रदेश) हरीमंदर पांडे (उत्तर प्रदेश) इत्यादींचे सहकार्य लाभले. अशी माहिती शहराध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे.

Sunday, 9 February 2025

महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन यशस्वी- प्रा. विजय शिरोळकर



कोल्हापूर / प्रतिनिधी

  शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथील शुक्रवार दिनांक ७ रोजी चे महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामधून जवळपास  ५५० पर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी,शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी, मयत कर्मचारी यांचे कुटुंबीय,उपस्थित होते. 
        या आंदोलनमध्ये मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांना , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना  तसेच २००५  पूर्वी अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ची जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता पुणे आयुक्त कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येवून मागणीचे निवेदन देवून  शिक्षण आयुक्त पुणे  यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये  संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.विजय शिरोळकर, कार्याध्यक्ष प्रा.योगेश्वर निकम, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, राज्य संपर्क प्रमुख  भास्कर देशमुख, पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गोविंद गोडसे आदींनी 
सहभाग घेतला. कुटुंब प्रमुख म्हणून पेन्शन विषयी तीव्र भावना शासनास कळविण्याचे  शिक्षण आयुक्त यांनी आश्वासित केले.
    राज्य कार्यकारणी सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने धरणे आंदोलनआयोजित करण्यात आले होते. पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गोविंद गोडसे आणि जिल्हा कार्यकारणीने आंदोलनाची तयारी उत्तम प्रकारे केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले सर्व उपस्थित शिक्षक शिक्षकेत्तर बंधू-भगिनी त्यांनी एकत्र येऊन जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय थांबायचं नाही अशा भावना मांडून निर्धाराने तीव्र आंदोलन छेडले.  महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जुनी पेन्शन बाबत निर्णय न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीमध्ये आझाद मैदान येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा  संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर  यांनी देवून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
      फोटो 
प्रा. विजय शिरोळकर शिक्षण आयुक्त पुणे  सचिंन्‍द्र प्रताप सिंह यांना निवेदन देताना शेजारी  संघटनेचे पदाधिकारी.

Saturday, 8 February 2025

मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने महिला कौशल्य प्रशिक्षण शिबिर संपन्न


हेरले (प्रतिनिधी ) 

मौजे वडगांव (ता . हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १५वा वित्त आयोग या निधीतून महिला व किशोरवयीन मुलींना कौशल्य विकास योजनेअंतर्गत ज्ञानदिप बहुउद्देशीय संस्थेमार्फत
शिवण क्लास व विविध कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ग्रामपंचायतीच्या हॉल मध्ये करण्यात आले होते.
        यावेळी ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील यांनी महिला व किशोरवयीन मुलींना कौशल्य विकासातून स्वयंरोजगार व स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शन केले तर आरोग्य अधिकारी जाधव मॅडम यांनी कॅन्सर व टिबी सारख्या आजारा संदर्भात माहिती दिली . सदर शिबिरामध्ये १५० हून अधिक महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या .
       सदर कार्यक्रमात महिलांनी मिळविलेल्या यशाचे कौतूक केले . आशा प्रकारच्या उपक्रमाची सातत्याने आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी अधोरेखित केले . या ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे महिलांना स्वावलंबनाचे बळ मिळत आहे . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे उपस्थित महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व भविष्यात देखील आशा प्रकारचे उपक्रम राबवावीत अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी  हळदी कुंकू व प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र व ग्रामपंचायतीच्या वतीने हॅन्डवॉश भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
      यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच रघूनाथ गोरड , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील, सविता सावंत, सुनिता मोरे , सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , मधुमती चौगुले, मिनाक्षी आकिवाटे, सुरेश कांबरे , सुनिल खारेपाटणे, स्वप्नील चौगुले , नितिन घोरपडे, अविनाश पाटील , डॉ. पंकज पाटील , जाधव मॅडम , यांच्यासह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रा पं . कर्मचारी व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Thursday, 6 February 2025

कॉपी झाल्यास परीक्षा केंद्र कायमचे रद्द


कोल्हापूर /प्रतिनिधी
गैरप्रकारास उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि गैरप्रकारात सामील अशांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार.
संवेदनशील केंद्रांचे ड्रोनमार्फत चित्रीकरण.

यंदाच्या १० वी १२ वी बोर्ड परीक्षा संचलनात राज्य मंडळांने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या परीक्षेत  जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व अधीक्षक, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव ऑनलाईन उपस्थित होते. 

राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधांची खात्री जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल. परिक्षा चालू असताना जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षा केंद्रांच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. ज्या त्या जिल्ह्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरारी पथके व बैठी पथके नेमण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची एफआरएस (चेहरा स्कॅनिंग करून ओळख) द्वारे तपासणी करण्यात येईल. प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास ओळखपत्र देण्यात येणार आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी १९८२ च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शिवाय दरवर्षीप्रमाणे परीक्षा केंद्रातील ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार असून परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.

सन २०१८ पासून मागील पाच वर्षात झालेल्या बोर्ड परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले आहेत त्या सर्व केंद्रांवरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात येत आहेत. चालू वर्षीच्या परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येथील अशा केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्यात येणार आहे. शिवाय ही परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

या परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी व कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, पालक सचिव, नामांकित व्यक्ती हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी आवाहन करणार आहेत. परीक्षार्थीसाठी राज्य मंडळाकडून ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आले असून त्यांचे मोबाईल क्रमांक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाने सहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विभागाबाबतचे आदेश विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी जारी केले आहेत.

कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या ३४ तर बारावीच्या २३ परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी हे इतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून नेमण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील दहावीच्या २ व बारावीच्या ४  , सातारा जिल्ह्यातील दहावीच्या १७ व बारावीच्या १२ केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलण्यात येत आहेत. 
कोकण विभागीय मंडळ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील बारावीच्या ३ केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलण्यात येत आहेत. मागील पाच बोर्ड परीक्षेत कॉपी प्रकार नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यात दहावीच्या केंद्रावरील कर्मचारी बदलण्यात येणार नाहीत. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी  व बारावीच्या कोणत्या केंद्रावर कॉपी प्रकाराची नोंद नसल्याने कोणत्याही केंद्रावरील कर्मचारी बदलण्यात येणार नाहीत. कोल्हापूर विभागात दहावीची ३५७ व बारावीची १७६ अशी एकूण ५३३ केंद्रे आहेत. कोकण विभागात दहावीची ११४ व बारावीची ६१ अशी १७५परीक्षा केंद्रे आहेत.

कोल्हापूर विभागीय मंडळ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ७३ हजार, सांगली जिल्ह्यातील ७२ हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील १ लक्ष ५ हजार असे सुमारे अडीच लक्ष विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. तर कोकण विभागीय मंडळ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ हजार असे एकूण ५२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

"सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रसंचालकांना समक्ष बैठकीत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ.

Wednesday, 5 February 2025

परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांची नजीकच्या केंद्रावर नियुक्तीची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी

 एस.एस.सी./एच.एस.सी. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक बदलाबाबत ब्लॅक लिस्टमधील परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांची होणारी गैरसोय पाहता त्यांची अदलाबदल करताना त्यांना नजिकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करुन सहकार्य करावे अशी मागणी  शिक्षक भारती पुणे विभाग अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी लेखी निवेदनाद्वारे विभागीय सचिव / अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभाग यांच्याकडे केली आहे.
    लेखी निवेदनातील आशय असा की,मागील पाच-दहा वर्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी सापडली असेल अशा केंद्रांचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये केलेला आहे. अशा केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक व कर्मचारी यांची लांब लांब अंतरावरील परीक्षा केंद्रावर आपण नियुक्ती केलेली आहे. उदाहरणार्थ- साधना हायस्कूल गडहिंग्लज केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांना आपणाद्वारे ३५ ते ४० कि.मी. अंतरा-वरील हलकर्णी हे परीक्षा केंद्र दिले आहे.त्यामुळे पुढील अडचणी निर्माण होणार आहेत.४० कि.मी. अंतरावरील परीक्षा केंद्रावर जाणे हे महिला /पुरुष यांना येणे जाणे त्रासदायक होणार आहे.पर्यवेक्षक मानधन आपणांकडून रु.२५/- दिले जाते. त्यामुळे येणे जाणेचा प्रवास खर्चाचा भुर्दंड संबंधितांवर बसणार आहे. इ.१० व इ.१२ वी ची परीक्षा ही सुमारे दीड महिना कालावधीची चालणार आहे. त्यामुळे इ.५ वी ते इ.९वी आणि इ.११ वी च्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू शकते. तसेच सकाळी लवकर तीन तास घेवून पुन्हा दिलेल्या लांबच्या परीक्षा केंद्रावर जाणे अशक्य आहे.
 शिक्षक / शिक्षिकांची या परीक्षाकामी वेळेत पोहचते वेळी धांदल व धावपळ होणार आहे. त्यात एखादा अपघात होवू शकतो.सबब आपणांस विनंती की, ब्लॅक लिस्टमधील परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांची होणारी गैरसोय पाहता त्यांची अदलाबदल करताना त्यांना नजिकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करुन सहकार्य करावे अशी माहिती शिक्षक भारती पुणे विभाग अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी  प्रसिद्धीस दिली आहे.

हेरलेच्या विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न

हेरले /प्रतिनिधी

  स्किल शिक्षा मार्फत आयोजित इंटरनॅशनल अबॅकस वर्ल्ड कप  या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या ए आर एस नवचेतना हेरलेच्या विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
हा सोहळा अहिल्या मल्टीपर्पज हॉल, इचलकरंजी फाटा (अतिग्रे) येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
   कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  आमदार अशोकराव माने उपस्थित होते. तसेच माजी सभापती राजेश पाटील, शकुंतला कुन्नुरे (सरपंच, रुई), सौ.राजश्री संतोष रुकडीकर (सरपंच, रुकडी), श्री.राहुल कुंभार (सरपंच, माले), संस्थापक- नितीन वर्मा, राकेश गुर्जर, राजगोंड पाटील (ज्येष्ठ पत्रकार), योगेश संभाजी कुंभार सर, राजकुमार बाळासो चौगुले, शैलेश संभाजी कुंभार, सचिन लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
   या सोहळ्यात खोत इंग्लिश मीडियम स्कूल रुकडी, आणि फिनिक्स स्कूल अतिग्रे, सह्याद्री विद्यानिकेतन सैनिक स्कूल माले, स्नेहल अकॅडमी स्कूल रुई, शांतिनाथ स्कूल इचलकरंजी,  शिवमुद्रा स्कूल, आळते, ओम अबॅकस क्लासेस येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या विद्यार्थ्यांनी गणितीय कौशल्यांच्या जोरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत जागतिक स्तरावर उज्ज्वल कामगिरी केली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके, ट्रॉफी आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
  या यशामागे ए आर एस नवचेतना हेरलेचे डायरेक्टर अर्चना शैलेश कुंभार आणि स्वप्ना राजकुमार चौगुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
संस्थेच्या वतीने भविष्यातही विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करावी, अशा शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यासाठी सर्व उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

फोटो 
आमदार अशोकराव माने, माजी सभापती राजेश पाटील  विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना

Sunday, 2 February 2025

वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या कामगारांच्या मुलांचे आभाळमायामुळे फुलले चेहरे


हेरले /प्रतिनिधी
 
कोल्हापूर येथील आभाळमाया  या सामाजिक व शैक्षणिक संस्थेने तावडे हॉटेलं कोल्हापूर येथील विविध जिल्ह्यातून वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या कामगारांच्या मुलांना स्वेटर ,ब्लॅंकेट ,खेळाचे   व शैक्षणिक साहित्य, खाऊ देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला .                                
  या वीटभट्टी कामगारांच्या मुलांना कडाक्याच्या थंडीत पंचगंगा नदीकाठी झोपड्यांमध्ये कुडकुडत रात्र काढावी लागते.हे लक्षात घेऊन आभाळमाया संस्थेच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील यांनी हा उपक्रम राबविला आभाळमाया संस्था अनाथ , ऊसतोड कामगार मुले , वीटभट्टी कामगार मुले , वृद्धाश्रमातील वृद्ध यांच्याकरिता संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाद्वारे समाजभान जपत आदर्श कार्य करत असून समाजातील दानशूर व्यक्तींना अशा मुलांना मदत करण्याची गरज असल्याचे संस्थापिका अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी सांगितले.
   या उपक्रमासाठी वीटभट्टी मालक अरविंद मते, सचिन मते,माजी 
डी. वाय. एस. पी. सुनीता नाशिककर कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. यावेळी आभाळमाया संस्थेचे पदाधिकारी  बाजीराव* *पाटील,विशाल कुंभार, अमित संकपाळ,सुशांत डाफळे , सपनाज मुलाणी,  सविता पोतदार,विद्या जाधव,*  *संगीता पाटील,  रेश्मा तांबोळी,  शुभांगी सुतार,  अर्चना कोराणे. प्रिया वारके, केतकी पाटील, सुयश* *पाटील,दर्श वारके, सुदेश पाटील, रुपेश घाटेघस्ती, अभिषेक शिंदे उपस्थित होते.

Saturday, 1 February 2025

ॲग्रीस्टॅक योजना पारदर्शकपणे राबविण्याचा आदेश

हेरले / प्रतिनिधी

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेलीॲग्रीस्टॅक( डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चर) ही योजना पारदर्शकपणे राबविण्याचा आदेश  तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी लागू केला आहे.
 ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जाहीर झाल्या असल्यामुळे या कामी कोणत्याही अधिकाऱ्याने दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना बेल्हेकर यांनी आदेशाद्वारे दिली आहे.
हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती व शेताचे भू संदर्भिकृत संच एकत्रित तयार करणे व ते सातत्याने अध्ययावत करणे करिता ॲग्रीस्टॅक योजना काम करणार आहे. 
केंद्र  शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुलभ ,पारदर्शक पद्धतीने व वेळेवर उपलब्ध होण्यासाठीच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त दराने कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा विपणन व्यवस्था निर्माण करुन देणे.स्थानिकांनी विशिष्ट तज्ञांचे मार्गदर्शन करणे. शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती व प्रवेश मिळवून देणे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व अत्यंत सोपी पद्धत विकसित करणे. राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनाच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे. शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचा डेटा व ॲग्रीटेक द्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना राबविणे.
 वरील प्रमाणे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी गावावार जाऊन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सदर गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी गावातील कार्यरत असलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर चे केंद्र चालक यांची मदत घेऊन त्यांचे आयोजन करण्याची सूचना तहसीलदार बेल्हेकर यांनी दिली आहे .तसेच योजनेबाबत निवडलेल्या गावांमध्ये नियोजित करण्यात आलेल्या कॅम्प मध्ये शेतकऱ्यांचे शेती ओळखपत्र (फार्मर आयडी)  तयार करून त्याचा दैनंदिन अहवाल व त्यांचे फोटो तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे सादर करण्याची आदेश बेल्हेकर यांनी दिले आहेत.

जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयाला ऑडिटरनी संस्था ऑडिट करण्याचे ठराव दाखल करूनही सहाय्यक निबंधकानी त्याच संस्थांचे ऑडिट करण्याचे काढले आदेश,हे आदेश रद्द करावेत,अन्यथा आंदोलनाचा संघटनेचा इशारा


 
         हेरले /प्रतिनिधी

 कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे ऑडिट  करण्याचे ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेले आहेत . या लेखापरीक्षणासाठी संस्थेना ऑडिटरनी संमती देवून नेहमीप्रमाणे सोबत ऑडिटर नियुक्तीचे ठराव जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांना सादर केलेले आहेत. तरीही काही सहाय्यक निबंधकानी संस्थेचे ठराव जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयाला सादर असताना सुद्धा सहाय्यक निबंधक यांनी अन्य लेखापरीक्षकांची ऑडिट साठी आदेश पारित केलेले आहेत. हे आदेश रद्द करावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्रमाणित लेखापरीक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले,सचिव विनायक पाटील यांनी केली आहे.अन्यथा आंदोलन  छेडण्याचा  ,आणि न्यायालयात जाण्याचा इशारा शाहू स्मारक येथे बोलावलेल्या जिल्ह्यातील लेखापरीक्षकाच्या बैठकीत देण्यात आला आहे.                                    महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम  नुसार सहकारी संस्थांचे ३०सप्टेंबर पूर्वीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लेखा परीक्षक नियुक्तीचे ठराव केले जातात. त्यानंतर या नियुक्तीला लेखापरीक्षकाकडून संमती दिली गेली आहे. त्यानंतर संस्थेचा नियुक्तीचा ठराव व लेखापरीक्षकाचे संमती पत्र जिल्हा लेखा परीक्षक वर्ग_ १ यांच्याकडे जमा केले आहेत. त्याच  ऑडिटरने त्या संस्थेचे ऑडिट करावे. मात्र ज्या ऑडिटरला परंतुकाचा आदेश मिळाला आहे त्यांनी या संस्थेचे ऑडिट करू नये असे ठरले.परंतु सन २०२१ च्या अधिसूचनेनुसार हे ठरांव सहाय्यक निबंधकाना  जमा करण्याची मागणी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून होत आहे. त्यामुळे लेखापरीक्षकात संभ्रम झाला असून पुढील ठराव जर सहाय्यक निबंधकांना आवश्यक असतील तर ते जमा करण्याची ग्वाही लेखापरीक्षक संघटनेकडून दिली जात आहे. फक्त चालू आर्थिक वर्षाचे सहाय्यक निबंधकानी पारित केलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली.विशेष म्हणजे सहायक निबंधकानी काढलेल्या याआदेशात एका मयत ऑडिटरचे नावे काही संस्थांचे आदेश काढण्यात आले आहेत.या वरती विचार विनिमय करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लेखापरीक्षकांची बैठक कोल्हापूर येथील शाहू स्मारक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत जर आदेश मागे घेतले नाही तर आंदोलन छेडण्याचा आणि न्यायालयाचा जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.