Thursday, 29 May 2025

गणितायन’च्या प्रयोगशीलतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दाद


शिक्षक डॉ. दीपक शेटे यांच्या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा

हेरले /प्रतिनिधी
“शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा प्रसार नव्हे, तर अनुभवातून प्रेरणा देणं,” हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूरातील एका शिक्षकाने अनोखा शिक्षण प्रयोग उभारला असून, त्याची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. ‘गणितायन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करत अजित पवार यांनी डॉ. दीपक शेटे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ. शेटे यांनी हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे स्वतःच्या घरी एक आगळी वेगळी गणित प्रयोगशाळा विकसित केली आहे. मागील १५ वर्षांत सुमारे ५० लाख रुपयांची स्वखर्चाने गुंतवणूक करत त्यांनी ‘गणितायन’ हे अनुभवाधिष्ठित गणित शिक्षण केंद्र उभारले आहे. यामध्ये मापन साहित्य, जुनी नाणी, मोजमाप उपकरणे, दुर्मीळ पोस्ट तिकीटे, नोटा, भिंतीवर लावले जाणारे पट्टे, प्राचीन घड्याळे आदी १०,००० हून अधिक वस्तूंचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना गणिताचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि संकल्पना समजावून सांगणाऱ्या या केंद्राची माहिती मिळताच उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. 
"शिक्षणात नावीन्य, समर्पण आणि प्रयोगशीलतेचा संगम म्हणजे शेटे सरांचा उपक्रम. महाराष्ट्रात असे शिक्षक आहेत हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे," असे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच, शिक्षण विभागाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी त्यांनी निर्देश दिले असून ‘गणितायन’ची राज्यस्तरावर नोंद घेण्याचेही सूचित केले आहे.
हे शिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना खुले असून आजवर हजारो विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, आमदार व कुलगुरूंनी येथे भेट दिली आहे. प्रयोगशील शिक्षणाचा हा प्रयोग केवळ स्थानिक नव्हे, तर राज्याच्या शैक्षणिक चळवळीचा एक महत्त्वाचा भाग ठरत आहे.

No comments:

Post a Comment