एके काळी निसर्गसाखळीच्या दृष्टीने मृत घोषित कऱण्यात आलेला नैनी तलाव हा दिल्लीतील मॉडेल टाऊन या एका मोठ्या वसाहतीत आहे. गेली कित्येक वर्ष या तलावाचा मुद्दा महापालिकेसाठी आणि स्थानिक राजकारण्यांसाठी वादाचा मुद्दा राहिलेला आहे. दोन वेळा या तलावाच्या जागी उद्यान होता होता राहिले आहे आणि हा तलाव अजूनही टिकून राहिला आहे. नशीबाने, ज्या स्थानिकांनी या तलावाचे सौंदर्य पाहिले आहे त्यांनी या तलावाला वाचविण्यासाठी कडवा लढा दिला. त्यांनी या तलावाचे अजून एक टाकाऊ उद्यान होण्यापासून तसेच शहरातील इतर पाणवठ्यांप्रमाणे या तलावाचा दुर्गंधीयुक्त नाला होण्यापासून बचाव केला.
स्वच्छ शहराच्या मुद्द्यासाठी लढणाऱ्या नागरिकांपैकीच एक आहेत , ७४ वर्षांचे जलेश्वर नाथ पांडे हे निवृत्त शिक्षक. नैनी लेक आणि उत्तर दिल्लीमधील इतर अनेक उद्याने आज इतर उद्यानांच्या तुलनेत स्वच्छ राहिली आहेत , यात पांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. ते 'वन मॅन आर्मी' आहेत आणि क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ही म्हण त्यांनी कृतीत आणली आहे. गेल्या सात वर्षांहून अधिक काळापासून पांडे रोज पहाटे नैनी तलावापाशी जातात आणि तो परिसर आपल्याकडील केरसूणीने स्वच्छ करतात आणि त्यानंतर इतर उद्यानांमध्ये जातात. त्यांच्या आजुबाजूने जाणारे त्यांची थट्टाही करतात, पण त्याने ते अजिबात विचलित होत नाहीत. हे ज्येष्ठ नागरिक आपला रोजचा नेम चुकवत नाहीत आणि ही स्वच्छता करताना त्यांचे मनही स्वच्छच असते.
केवळ कल्पना करून शेतात पिक येऊ शकत नाही, चांगल्या गोष्टी घडण्यासाठी मेहेनत करावीच लागेल, यावर त्यांचा विश्वास आहे. सार्वजनिक ठिकाणच्या या त्यांच्या स्वच्छता अभियानाची थट्टा होते, पण ते त्या थट्टेकडे दुर्लक्ष करतात. स्वच्छ भारत अभियानात प्रत्येक नागरिक त्याचा वाटा उचलत नाही तोपर्यंत ही योजना उपयोगाची नाही, असे त्यांचे मत आहे. जलेश्वर नाथ अगदी विनम्रतेने, अभिमानाने आणि हसतमुखाने सांगतात की त्यांच्या वैयक्तिक स्वच्छता अभियानापासून त्यांना काहीही आणि कोणीही थांबवू शकत नाही.
बजाज व्ही इन्व्हिन्सिबल इंडियन्सच्या सौजन्याने
No comments:
Post a Comment