Wednesday, 28 February 2018

होळी ~~~

होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
 हा सण संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमी पर्यंत, या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव” असे संबोधले जाते.

हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या साठी त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला घट्ट धरून ठेवले . परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. 
             होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा .

सर्वांना होळीच्या शुभेच्छा !

निधन वार्ता


हेरले / प्रतिनिधी दि. २८/२/१८
हातकणंगले तालूक्यातील हेरले येथील जहॉगींर महमंद बारगीर ( वय ६२) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, तीन भाऊ, दोन बहिण, असा मोठा परिवार आहे. २ मार्च रोजी जियारत होणार आहे.

Tuesday, 27 February 2018

अस्थि विसर्जनाचा नवा पायंडा - स्वर्गीयांच्या आठवणी देतात मायेची सावली व ममतेची फळे

हजारो वर्षापासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा संगमनेर मधील गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता घरासमोर फळ देणारे झाड लावून केले जाणारं आहेत.
संगमनेर तालूक्यातील पठार भागात डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसं गाव सावरगावतळ. गावाची लोकसंख्या जेमतेम चार एक हजार. गावातील तरूणांनी एकत्र येत चार वर्षांपूर्वी विवेकानंद युवा जागृती प्रतीष्ठानची स्थापना केली. या मार्फत अनेक योजना राबविल्या जातात. यावर्षीपासून गावात अस्थिविसर्जन बंद करण्यात आलं आहे. तर फळझाडाच्या मुळात मृतव्यक्तीच्या घरासमोर या अस्थिविसर्जित केल्या जातायेत.
घरासमोर लावलेली झाडं आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देणार असल्याची भावना इथले गावकरी व्यक्त करतायत.

सहा महिन्यांपुर्वी वडीलांच्या निधनानंतर कारभारी गाडे यांनी घरासमोर लावलेल्या आंब्याच्या झाडाला आता बहर आला आहे.
दिड वर्षापुर्वी सुरू झालेल्या या नव्या परंपरेनंतर 51 कुटुंबांनी अशी झाडं लावली आहेत. आणि या झाडांची ते काळजीही घेतायत. यातून पर्यावरणालाही मदत होतेय हे नक्की.

एका छोट्या गावातल्या तरूणांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेल्या या नव्या संकल्पनेचं सगळ्यांकडून कौतूक होतं आहे.

आपण सर्व जण यापासून प्रेरणा घेऊन नक्कीच चांगला बदल घडवून आणू शकतो यासाठी वाचा आणि सर्वांना पाठवा.

साभार - प्रमोद गुळवे, काटकसर फेसबुक ग्रुप

Monday, 26 February 2018

ब्रेकिंग न्यूज - श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये पडून ? रक्तात अल्कोहोलचा अंश

श्रीदेवींच्या मृत्यूबाबत गल्फ न्यूजचा नवा  खुलासा..
श्रीदेवींच्या रक्तात अल्कोहोलचा अंश सापडला..  श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये पडून झाल्याचा दावा..
  फॉरेन्सिक अहवाल  कुटुंबीयांकडे सोपवला आहे.

स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण विभागास थकित वेतनासाठी निवेदन

कोल्हापूर / प्रतिनिधी
      मिलींद बारवडे    दि.२६/२/१८

कोल्हापूर जिल्हयातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन अदा न झालेने त्यांच्यावर आर्थिक अरिष्ट आले आहे. तरी शिक्षण विभागाने तात्काळ त्यांचे वेतन अदा करावे असे लेखी निवेदन स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण विभागास दिले आहे.
     निवेदनातील आशय असा आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन ऑफलाईनने आदा केलेले आहे. मात्र अजुनही बारा तालूक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक काही शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नोव्हेबंर ते जानेवारी अखेर तीन महिन्याचे वेतन आदा झालेले नाही.तसेच काही अतिरिक्त शिक्षकांचे ऑक्टोबंर पासून त्यांना आज अखेर वेतन मिळाले नाही.
     त्यामुळे त्यांचे कर्जाचे हप्ते थकीत असून त्यांच्यावर आर्थिक अरिष्ट आले आहे.तरी शिक्षण विभागास विनंती आहे की, जिल्ह्यातील एकूण शाळापैकी उर्वरीत किती शाळांचे वेतन थकीत आहे. याची आपण सहानुभूती व लक्षपूर्वक पाहणी करून तात्काळ त्या शाळांचे वेतन आदा करावे आणि  त्यांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करावे अशी आम्ही स्वाभिमानी शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे नम्र विनंती करीत आहोत.
       जिल्ह्यातील  ९४ शाळांचे वेतन थकीत असून त्यांना तात्काळ वेतन आदा करण्यासाठी शासन पातळीवर योग्य ती कारवाई सुरू आहे. लवकरच त्यांना वेतन मिळेल अशी ग्वाही शिक्षण उपनिरीक्षक डी.एस. पोवार उपशिक्षणाधिकारी एल.एस. पाश्चापुरे, वित्त लेखाधिकारी व.कृ. पाटील वेतन पथक अधिक्षक शंकरराव मोरे यांनी लेखी निवेदन स्विकारून सकारात्मक चर्चा केली.
       निवेदनच्या प्रती शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी  कोल्हापूर विभाग,माध्यमिक शिक्षणाधिकारी  किरण लोहार  जि.प. कोल्हापूर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले  जि.प. कोल्हापूर,शंकराव मोरे वेतन पथक व भविष्य निर्वाह कार्यालय कोल्हापूर आदी शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे नावे  लेखी निवेदन दिले आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, जिल्हा अध्यक्ष मिलींद बारवडे यांच्या सह्या आहेत.
         फोटो
शिक्षण उपनिरीक्षक डी.एस.पोवार व उपशिक्षण अधिकारी एल.एस. पाश्चापुरे यांना लेखी निवेदन देताना संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे

Sunday, 25 February 2018

राष्ट्रीय स्तरावरील अॅबॅकस स्पर्धेत 'डॉ. सायरस पूनावाला’ स्कूलचे घवघवीत यश


कोल्हापूर प्रतिनिधी :
    राजस्थान (कोटा) येथे 21 जानेवारी, 2018 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत डॉ. सायरस पूनावाला स्कूलच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश प्राप्त केले असून तीन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    या स्पर्धेत विविध राज्यातील एकूण 50हून अधिक शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत डॉ. सायरस पूनावाला स्कूलच्या 10 विद्यार्थ्यानी भाग घेवून घवघवीत यश संपादन केले. यामध्ये आर्या पवार, स्पंदन मिरजकर, आर्या कदम, रितेश उलपे, स्वर्णिम मडके , आदित्यराज षिंदे, संचित ढेरे, विराज पाटील, वरद पाटील, सुजित कुडाळकर या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.नियमितचा सराव आणि सातत्य याचा विद्यार्थ्याना खूप फायदा झाला आहे.  यामधील तीन विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणा-या अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिवा सौ. विद्या पोळ, स्कूलचे संचालक डॉ. सरदार जाधव यांचे प्रोत्साहन लाभले तर प्राचार्या स्नेहल नार्वेकर व अॅबॅकस मार्गदर्शिका सफिना मोमीन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Saturday, 24 February 2018

मुतखडा म्हणजे काय ?

कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट क‌िंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. का होतो मुतखडा, त्याची लक्षणे कोणती, जाणून घेऊया मुतखड्याविषयी....

मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये, यासाठी आयुर्वेदीक औषधे अधिक गुणकारी असतात.

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.

मुतखड्याचे प्रकार

कॅल्शियमचे- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.रक्तातील व लघवीतील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अॅसिडचे मुतखडे तयार होतात.

सामान्यतः मुतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.

सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते.

मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?

पाणी भरपूर पिणे.लघवी तुंबवून न ठेवणे.काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून त्याप्रमाणे पथ्य करावे.

मुतखड्यावर प्रभावी आयुर्वेदीक औषधी

वरुणादी काढा

निरी टॅबलेट व सायरप

सिस्टोन टॅबलेट व सायरप

स्टोनवील कॅप्सूल

वरील सर्व औषधे नियमित व तज्ञांच्या सल्ल्यानुसार घेऊन शस्त्रक्रिया टाळता येईल.

वरील माहिती सर्वांना शेअर करा !

विभागीय शिक्षण मंडळ सहसचिवपदी टी. एल. मोळे

कोल्हापूर :प्रतिनिधी

      शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय शुक्रवार दि. २३ रोजी जाहीर केला .जिल्ह्यातील चार गट शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे .आजरा ,गडहिंग्लजचे गटशिक्षणाधिकारी टी .एल .मोळे यांना कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ सहसचिवपदी पदोन्नती मिळाली आहे .

        महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब मधील उपशिक्षणाधिकारी व अन्य पदावर कार्यरत अधिकाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या निवडीनुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ (प्रशासन शाखा )मधील शिक्षणाधिकारी पदावर सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे .राज्यातील२३अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे .कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी एल.एस.पाच्छापूरे यांची भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाली .कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळातील सहाय्यक सचिव व्ही.पी .कानवडे यांची वर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी ,गगनबावडा गटशिक्षणाधिकारी टी. एन.नरळे यांना  वाशीम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे .

कोल्हापूरात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह चा थरार, स्वीफ्ट डिझायर नागरिकांनी फोडली

कोल्हापूर प्रतिनिधी

काल रात्री कोल्हापूरहून शिये कडे जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कार MH10 BM 1222 ने कसबा बावडा येथे भगवा चौक व चव्हाण गल्ली जवळ तीन दुचाकींना धडक दिली.
यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाठलाग करून पिंजार गल्ली जवळ कारला थांबवून जाब विचारला. यावेळी मद्यपान केलेला चालक भेदरला. तो बाहेर येत नाही हे पाहून नागरिक आक्रमक झाले. 
यावेळी घाबरुन चालकाने गाडी सुसाट पळवून पलायनाचा प्रयत्न केला पण समोरुन आलेल्या ट्रकला धडक दिल्याने गाडी ट्रक खाली गेली.
यावेळी नागरिकांनी मद्यधुंद चालकाला बाहेर ओढून बेदम मारहाण केली व संतप्त होऊन कारची प्रचंड तोडफोड केली.
सदर प्रकार रात्री 10.30 पासून सुरू होता नंतर तासाभराने आलेल्या पोलिसांनी नागरिकांना पांगवले व कार रस्त्यावरून बाजूला केली तोपर्यंत कारचा चक्काचूर झाला होता.
या सर्व पाश्र्वभूमीवर कोल्हापूर करांना पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्ह चा थरार अनुभवायला मिळाला. कारण असेच मागे एकदा मद्यधुंद ट्रक चालकाने अनेकांना उडवून जखमी केले होते.
व अजुनही वाहन चालक सर्रास मद्यपान करून वाहन चालवताना दिसत आहेत. तर पोलीस फक्त 31 डिसेंबरलाच कारवाई करतात काय असा प्रश्न उपस्थित होतो.

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची दगडफेक


आज शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर माढा तालुक्यातील रिधोरे येथे दगडफेक केल्याची घटना घडली.
या दगडफेकीत गाडी च्या काचा फुटल्या आहेत . सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक झाल्याप्रकरणी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी सत्ताधारी व सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कुर्डूवाडीजवळील टोलनाक्यावरही सदाभाऊ खोत यांच्या कारवर मका, तुरी, गाजर फेकण्यात आले. पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली आहे. यावेळी  शेतकर्‍यांच्या समस्यांना कंटाळून , राज्यातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्‍महत्या करीत असल्याच्या अशा विविध कारणांमुळे संतापलेल्या स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुर्डूवाडीजवळील रिधोर गावाजवळ राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली . मंत्र्यांच्या गाडीसोबत संरक्षक ताफा असताना देखील ही घटना घडली आहे.

लेखक जयवंत अहिर यांचे निधन

वाळवा - अजय अहिर (पत्रकार)

    पद्मभूषण,क्रांतिवीर, डॉ. नागनाथ (अण्णा) नायकवडी यांचे धडाडीचे  व विश्वासू कार्यकर्ते , जयवंत यल्लाप्पा अहिर(जयामामा) ( वय 74) काल सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते हुतात्मा  दूध संघाचे उपाध्यक्ष होते. अण्णाच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता .क्रांतिवीर डॉ नागनाथ (अण्णा )  नायकवडी व स्वातंत्र सैनिक खंडू दाजी शेळके यांच्या जीवनावर चरित्र लिहले. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाचे कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, पुतणे, नातू असा परिवार आहे.रक्षा विसर्जन  रविवार 25 फेब्रुवारीला आहे.

Thursday, 22 February 2018

माणुसकीचा झरा अखंड वाहू द्या ...!

कोल्हापूर प्रतिनिधी

      - गेल्या २६ जानेवारीला शिवाजी पुलावरून टेम्पो ट्रॅव्हलर कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या पुण्यातील वरखडे, केदारी, नांगरे परिवारांतील इतर सदस्यांनी आज येथे येऊन कोल्हापूरकरांच्या माणुसकीला सलाम केला. तशा आशयाचा फलक त्यांनी शिवाजी पुलावर लावला.
कोल्हापूर करांच्या नुसत्या एका हाकेसरशी काळवेळ रात्र न पाहता धावत जाण्याच्या आणि अंतःकरणातून मदत करण्याची हा सोशल मीडियापासून ते बीबीसी पर्यंत सर्व माध्यमातून जगभरात दखल घेतली गेली आणि पुरेपूर ते कोल्हापूर अशा कोल्हापूरात माणुसकीचा झराच नव्हे तर पंचगंगाच दुथडी भरून वाहत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Wednesday, 21 February 2018

ट्रैंडी व्हिल्स व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २७ फेब्रुवारी २o१८ फ्री चेकअप मेगा कँम्प

प्रतिनिधी दि. २१/२/१८
  प्रशांत तोडकर

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी कोल्हापूर जिल्हयाचे अधिकृत विक्रेते ट्रैंडी व्हिल्स प्रा.लि. व महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने १९  ते २७ फेब्रुवारी २o१८ या कालावधीमध्ये ७५ पॉईंट फ्री चेकअप मेगा कँम्प आयोजित केला आहे.
        या कॅम्पचे भव्य उद्गाटन समारंभ महाराष्ट्र श्री गोल्ड मेडल वैभव व्हनागडे व महिंद्रा आणि महिंद्राचे ए.एस.एम. राजेश सोंजे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी ट्रेंडी व्हील्सचे सी.ई.ओ. दिपक जाधव, जनरल मॅनेजर प्रशांत तोडकर , सतिश परमाज, राहुल पाटील, मदन डांगे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थितीत होते.
              फोटो
टेंडी व्हील्स प्रा.लि. नागांव येथे ७५पाँईट फ्री चेकअप कॅम्पचे उद्घाटन करतांना वैभव व्हनागडे व ए.एस.एम. राजेश सोंजे, दिपक जाधव, प्रशांत तोडकर व इतर मान्यवर

केंद्राप्रमाणे राज्यातील मुख्याध्यापकांना वेतनश्रेणी लागु करावी - व्ही जी पोवार


प्रतिनिधी दि.२१/२/१८
मिलींद बारवडे

        केंद्रीय मुख्याध्यापकांप्रमाणेे राज्यातील मध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना ७ व्या वेतन आयोगात वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी.पोवार यांनी केली.
       अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाध्यक्ष विजयसिंह गायकवाड होते. या बैठकीत शाळांच्या प्रशासकीय व शालेय अडचणी, अतिरिक्त कामे,  नवीन अंशदायी पेन्शन योजना, शालेय व शिक्षकेतर कर्मचारी भरती,  शैक्षणिक आदेश व शिक्षण सचिवांची कार्यपध्दती, शालार्थ मध्ये समाविष्ठ नसलेल्या कर्मचाऱ्यांना समाविष्ठ करणे, शाळा बंदबाबतचे शासन धोरण, निकषपात्र शाळा व तुकड्यांचे अनुदान तरतुदीबाबत आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले.
    यावेळी राज्य सचिव आदिनाथ थोरात, माजी अध्यक्ष अरुण थोरात, जे. के. पाटील, आर. वाय.पाटील, डॉ. ए.एम.पाटील, डी.एस.घुगरे, राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
        फोटो
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करतांना राज्याध्यक्ष विजयसिंह गायकवाड, उपाध्यक्ष व्ही.जी. पोवार व अन्य मान्यवर

Tuesday, 20 February 2018

अडीच लाखाच्या बनावट नोटांसहीत दोघे जेरबंद - कोल्हापूर पोलिसांची कामगिरी

कोल्हापूर प्रतिनिधी - संदीप पोवार

बनावट नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारासाठी आणणाऱ्या दोघांना कोल्हापूर गुन्हा अन्वेषणच्या अधिकार्यानी अटक केली आणि त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरोळ आणि कुरुंदवाड परिसरातून 100/500/2000च्या बनावट नोटा छापल्या जातात अशी गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली होती
त्या तपासानुसार विश्वास कोळी आणि जमीर पटेल यांना रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले. त्यांच्या कडे अधिक चौकशी केली असता बनावट नोटा छापून चलनात आणत असल्याची कबुली त्यांनी दिली.
त्यांच्याकडून एकूण 100रूच्या 638 नोटा,200रूच्या 177नोटा व 2000रूच्या 75नोटा तसेच बनावट नोटा छापण्याचे प्रिंटर मशीन बाॅन्ड पेपर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
पोलीस अधिक्षक संजय मोहिते,
अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे,
पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.