Monday, 16 July 2018

हेरले येथे अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून एक ठार तर तीन जखमी

हेरले / प्रतिनिधी दि.१६/७/१८

   

 हातकणंगले तालूक्यातील हेरले येथील रिक्षाचालक रविंद्र बापू काटकर यांच्या घराच्या भिंती कोसळून पत्नी अनिता काटकर मयत झाल्या. तर त्यांच्यासह दोन मुले असे तीनजण गंभीर जखमी झाले. सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी पहाटे चार वाजता घडली.

        रविंद्र बापू काटकर ( वय ४६) हे रिक्षाचालक हनुमाननगर सुतार गल्ली माळभाग हेरलेमध्ये दोन खोल्यांचे घरामध्ये पत्नी दोन मुले यांच्यासह राहतात. रविवारी रात्री पत्नी अनिता रविंद्र काटकर ( वय ३७), मुलगा अनिकेत रविंद्र काटकर ( वय२० ), मुलगी शिवानी रविंद्र काटकर ( वय १७) हे चौघेजण झोपी गेले होते. पहाटे चारच्या दरम्यान अचानक दोन्ही खोल्यांच्या भिंती त्यांच्या अंगावर कोसळल्या यामध्ये दगड विटा यांचा मार मोठया प्रमाणात या चौघांनाही बसला.पत्नीच्या डोक्यास व पोटास मार बसला त्यामध्ये त्या अंत्यत गंभीर जखमी झाल्या. रविंद्र काटकर व त्यांच्या दोन्ही मुलांना पायांला हाताला मोठी दुखापत होऊन गंभीर जखमी झाले.

    

   भिंती कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारील अमिर पेंढारी, गुंडू परमाज, रफिक पेंढारी, पोपट सुतार यांनी प्रसंगावधान राखत या ठिकाणी थाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. चौघांच्या अंगावरील दगड, माती , वीटांचा थर बाजूला करीत ढिगाऱ्यातून चौघांना बाहेर काढले.तात्काळ खाजगी वाहनातून उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरला पाठविण्यात आले. चौघांवर उपचार करीत असतांना अनिता रविंद्र काटकर यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू असतांना मयत घोषित करण्यात आले. तर तिघांना पायाला हाताला गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.

       सलग चार दिवस पावसाची रिपरिप सुरू असल्याने परिसरात घराच्या  भिंतीची पडझड होत आहेत. रविंद्र काटकर रिक्षाचालकाचे काम करतात. त्यांचा मुलगा अनिकेत दुचाकी मिस्त्री काम शिकत आहे तर मुलगी शिवानी उच्च माध्यमिकचे शिक्षण घेत आहे. या गरीब कटुंबाचा चरित्राचा गाडा रविंद्र चालवत आहेत. मात्र निसर्गाच्या कोपाने हे गरीब कुटूंब उघडयावर आले आहे.पत्नी अनिताही खाजगी कंपनीत नोकरी करीत  संसारास हातभार लावत होती. मात्र त्यांच्यावर काळाने झडप घालून दोन्ही मुलांचे मातृछत्र हिरावून घेऊन त्यांना निराधार केले.

             चौकट

    रविंद्र काटकर यांच्या गरीब कुटुंबास शासनाने तात्काळ घराची बांधणी करून निवाऱ्याची सोय करीत मोठी आर्थिक मदत देत त्यांच्या संसारास हातभार लावावा. पत्नी मृत व स्वतःसह तिघे जखमी असल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक संकट निर्माण झाले आहे तरी त्यांच्यावर मोफत उपचार करून तंदरुस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

        फोटो

हेरले येथील रविंद्र काटकर यांच्या घराची दोन्ही भिंती पडलेल्या व साहित्य अस्ताव्यस्त झालेले.

No comments:

Post a Comment