दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले.
नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.
पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा
उच्चरवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नृसिंहजयंती, रामनवमी व इतर सनकादीक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात.
नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं.
साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी नृसिंहवाडीचा विस्तार तुलनेनं मर्यादित होता. गर्दीदेखील मर्यादित होती. विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठय़ा प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय, वेद उपासनेच्या सुविधा यामुळे क्षेत्र बाराही महिने गजबजलेले असते. नदीकिनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे. २००५ च्या महापुरात जवळपास संपूर्ण गावालाच पाण्यानं वेढलं होतं.
वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही.
या क्षेत्री पोहोचण्यासाठी सांगली २२ कीलोमीटरवर आहे. तर नजीकचे रेल्वे स्टेशन मिरज हे १५ किलोमीटरवर आहे. तर कोकणातून, कर्नाटकातून येताना कोल्हापूरहून जयसिंगपूर अथवा इचलकरंजीमार्गे येता येते. नृसिंहवाडीच्या नजीकच दोन किलोमीटरवर असणारे कुरुंदवाड संस्थानकालीन ठाणं आहे. कृष्णा पंचगंगेच्या संगमानंतर कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या कृष्णेच्या तीरावरील संस्थानिकांनी बांधलेला घाट व विष्णू मंदिर पाहण्यासारखं आहे. तर आवर्जून पाहावं असं इतिहासकालीन कोपेश्वराचं मंदिर असणारं खिद्रापूर २५ किलोमीटरवर आहे.