Friday, 24 January 2020

फसव्या कर्जमाफीविरोधात दि. 28 ला शेतकऱ्यांचा मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी): महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची निव्वळ घोषणा केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून ९० ते ९५ टक्के शेतकरी वंचित राहणार आहेत. पात्र शेतकरीही या लाभापासून वंचित राहणार आहेत. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार नाही. कोणतीही अट, निकष न लावता सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने पाळावे, याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी २८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी माहिती भाजपचे  ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मंगळवारी सकाळी १० वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे.  या मोर्चात जिल्हातील २० हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. राज्यातील हा पहिला मोर्चा असून त्याची सुरवात कोल्हापूरातून केली जाणार आहे.

कोल्हापूर शहरातील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेसाठी रुपये १.५० कोटींचा निधी मंजूर

कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
दि. 24 जानेवारी 2020
कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम व सुव्यवस्थित करण्यासाठी वाहतूक नियंत्रण आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे
याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेसाठी रुपये १.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 

कोल्हापूर शहरातील वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे शहराच्या अनेक प्रमुख ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून वाहतूक नियंत्रण यंत्रणा आधुनिकीकरण निर्णय झाला यामध्ये, नवीन ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसविणे, जुनी ट्रॅफिक यंत्रणा दुरुस्तीबरोबरच सिंक्रोनायझेशन करणे, सौर उर्जेवर चालणारी ६० ब्लिंकर्स बसविणे, आवश्यक वाहतूक नियमांचे साईन बोर्ड्स, रोड मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग आदी कामांचा समावेश आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीला आळा बसण्यास मदत होणार आहे. 

नवीन ट्राफिक सिग्नल्स बसविण्यात येणारी ठिकाणे
- मुक्त सैनिक वसाहत चौक
- दसरा चौक
- माधुरी बेकरी चौक
- बागल चौक 
- शेंडा पार्क चौक
- साई मंदिर चौक
- चिवा बाझार चौक   

सिंक्रोनायझेशन करण्यात येणारी ट्रॅफिक सिग्नल्स
- उमा टॉकीज चौक
- पार्वती टॉकीज चौक
- बागल चौक 
- जनता बाझार चौक 
- टाकाळा चौक 


महिला सक्षम तर कुटुंब सक्षम - - प्रतिमा पाटील यांचे महिला रोजगार मेळाव्यात प्रतिपादन

कोल्हापूर प्रतिनिधी - महिलांना सर्व क्षेत्रातील ज्ञान मिळावे, त्याचबरोबर विविध कौशल्य आत्मसात करता यावीत आणि रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी या उद्देशाने प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि बाफना ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोतवाल नगर येथे 'महिला रोजगार मेळावा' घेण्यात आला. या कार्यक्रमाला भागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.

      महिलांनी आपले आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. महिला सक्षम तर कुटुंब सक्षम असते. आजच्या या युगात पुढची पिढी भक्कम बनवण्याचे महत्वपूर्ण काम महिलांच्यावर आहे. सतर्क राहणे आणि सक्षम राहणे आरोग्यपूर्ण राहणे हे महिलांसाठी गरजेचे आहे. फौंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवून महिलांना समर्थ बनवण्यासाठी नेहमी अग्रेसर असेल असे मत माननीय सौ.  प्रतिमा सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
   
आजच्या कार्यक्रमास नगरसेविका सौ. रीना कांबळे, शिवगर्जनाच्या सौ. रेणू यादव , बाफना ज्वेलर्सच्या सौ.अपूर्वा माळी, सौ. छाया मेथे, सौ. वैशाली किरण पाटील, सौ.  अमृता बबलू भोंगाळे, सौ. सुनीता देसाई तसेच सामजिक कार्यकर्ते धनंजय उर्फ बबलू भोंगाळे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, 22 January 2020

जनमानसातील आमदार सावकार विनय कोरे

गिरोली - प्रतिनिधी. दि. 22 जानेवारी 2020

आमदार म्हणजे आलिशान एसी कार, पीए, कार्यकर्त्यांचा गराडा, रुबाबदारपणा या गोष्टी आल्याच. पण जनमानसाशी नाळ जोडलेले असं एक व्यक्तीमत्व म्हणजे आ. विनय कोरे सावकार. लोकांमध्ये मिसळण्याची त्यांची कृती जनतेच्या काळजाला हात घालते.
अशीच घटना घडली
 पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार डॉ विनयरावजी कोरे सावकार यांनी त्यांचे कट्टर समर्थक असणारे गिरोली गावचे सौरभ पाटील यांच्या शेतात "वरण्याची आमटी" जेवणाचा बेत केला. आमदार कोरे यांनी स्वतः उपस्थित राहून वरण्याची आमटी करून स्नेहभोजन केले.यावेळी पन्हाळा शाहूवाडी संपर्क प्रमुख श्री.रवींद्र जाधव,मा.सौरभ पाटील,श्री.बाळासो कळंत्रे, श्री.संजय पाटील,राहुल पाटील,सरपंच मधुकर कांबळे,शोभा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

आता वाहनधारक व्यवसाय करदात्यांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे व्यवसाय कर भरणा सक्तीचे

कोल्हापूर : ज्ञानराज पाटील 

वाहनधारक व्यवसाय करदात्यांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे व्यवसाय कर भरणा करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरच्या परिक्षेत्रातील व्यवसाय करदात्यांनी www.mahagst.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून शासन नियमानुसार ऑनलाईन प्रणालीव्दारे व्यवसाय कर भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस.टी. अल्वारिस यांनी दिली.
ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय कर भरणा करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे यापूर्वी कार्यालयामध्ये व्यवसाय कर रोखपाल यांच्याकडे भरण्याच्या पध्दतीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत असून सर्व संबंधितांनी सुधारित कामकाज पध्दतीचा अवलंब करायचा आहे.
ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय कर भरणा करणाऱ्या करदात्याने सर्वप्रथम प्रादेशिक कार्यालयाच्या परिवहन शाखा व्यवसाय कर विभागातील व्यवसाय कर लिपीक यांच्याकडून त्यांच्या नावे प्रलंबित व्यवसाय कर व चालू व्यवसाय कराचे मूल्यांकन करून घ्यावे. व्यवसाय कर लिपीक यांनी सदर मूल्यांकन त्यांचे सही व शिक्क्यानिशी प्रमाणित करावे. वाहनधारक व्यवसाय करदात्याने या कार्यालयाने मूल्यांकित करून दिलेला व्यवसाय कर ऑनलाईन पध्दतीने भरल्याची रिसीट कार्यालयात सादर केल्यानंतर सादर पावती ही व्यवसाय कर लिपीकाने करून दिलेल्या मूल्यांकन रक्कमेएवढी आहे किंवा कसे हे तपासावे. व्यवसाय कर लिपीक यांनी सादर ऑनलाईन पावती GST विभागाने कार्यालयास चलन पडताळणीसाठी दिलेल्या लॉगीन चा वापर करून सादर पावती क्रमांक, व्यवसाय कर दात्याचे नाव, रक्कम इ. बाबी पडताळून पहाव्यात व सादर केलेल्या पावतीची सत्यता तपासावी. 
सदर ऑनलाईन रिसीट असल्याचे खात्री झाल्यानंतर व्यवसाय कर लिपीकाने कर दात्याने सादर केलेल्या कागदपत्रांवर  Verified and Found Correct  असा शिक्का मारून स्वाक्षरीव्दारे प्रमाणित करावे. प्रमाणित केलेली व्यवसाय कराची एक पावती संबंधित कार्यालयाने अभिलेखनात जतन करावी आणि दुसरी प्रत वाहनधारकास परत करावी. 
प्रमाणित केलेली ऑनलाईन व्यवसाय कर रिसीट वाहन धारकाने संबंधित वाहनाच्या परमिट/ फिटनेस/बोजा नोंद व कमी करणे/ हस्तांतरण इ. सेवांकरीता आवश्यक कागद पत्रांसह जोडावी व प्रकरण कार्यालयात सादर करावे. परमिट / हस्तांतरण इ. सेवांशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी सदर प्रकरणांमध्ये वाहन व्यवसाय कर दात्याने जोडलेली व्यवसाय कर ऑनलाईन रिसीटची छायांकित प्रत व्यवसाय कर लिपीक यांचेकडून सत्यतेकरिता पडताळून घ्यावी. पडताळून न घेता काणत्याही प्रकारची सेवा वाहनधारकास दिल्यास संभाव्य होणाऱ्या महसूल हानीस संबंधित अधिकारी/कर्मचारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.  व्यवसाय कर लिपीकाने त्यांच्याकडे अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडून आलेली व्यवसाय कर ऑनलाईन रिसीट छायाप्रत त्यांच्या अभिलेखातील प्रमाणीत पावतीशी पडताळून पहावी आणि त्यावर Verified and Found Correct  असा शेरा मारून प्रमाणित करावी. अशा प्रकारे व्यवसाय कर यांनी Verified and Found Correct असा शेरा मारलेली ऑनलाईन रिसीट खरी मानून त्या प्रित्यर्थ सेवा पुरवावी. व्यवसाय करदात्याने सादर केलेली ऑनलाईन रिसीट खोटी आढळून आल्यास संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांनी खोट्या पावतीच्या विरोधास योग्य ती कार्यवाही करावी.