शिगावचे तलाठी ठरताहेत कोरोनाविरोधातील "सिंघम"
तलाठी धनंजय टेके करताहेत सिंघम स्टाईलने धडक कारवाई
विनोद पाटील, शिगाव
शिगाव: शिगाव (ता. वाळवा) गावचे तलाठी धनंजय टेके यांनी महसूल प्रशासनाच्या वतीने सिंघम स्टाईलने धडक कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. गावातील नागरिक विनाकारण विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्यांना त्यांनी शर्ट काढून तोंडाला बांधायला लावून मगच घरी पाठवले. त्यामुळे बेशिस्त वागणाऱ्यांना चांगलाच चाप बसत आहे. या सिंघम स्टाईल कारवाईचे कौतुक मात्र सर्वसामान्य जनतेमधून होत आहे.
याआधी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणाऱ्यांच्यावर तसेच गावात मावा, गुटखा, तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याच्यावर कडक कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला. गाव तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी गावातील सर्व राजकीय नेते मंडळींना एकत्रित आणून वैयक्तिक हेवेदावे सोडून गावच्या सुरक्षितेसाठी मीटिंग बोलावून तसेच ग्रामदक्षता कमिटी सोबत गाव पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या पद्धतीने गाव शंभर टक्के तीन दिवस बंद झाले. यासाठी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, कोतवाल, सर्व पक्षांचे नेते मंडळी, सर्व ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी, ग्राम सुरक्षा रक्षक, पोलीस मित्र, गावातील सामाजिक कार्यकर्ते आदींच्या सहकार्याने गाव बंद ठेवण्यात यश आले.
त्याचबरोबर आष्ट्याचे काही तरुण कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात वारणा नदीच्या बंधाऱ्यावरून गाडी उचलून घेऊन गावात प्रवेश करताना दिसताच तलाठी धनंजय टेके यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करून दोन हजार रुपये दंड ठोठावला.
" गावच्या सुरक्षितेसाठी हे माझे कडक धोरण "
सर्वसामान्य जनतेसाठी मी ही कडक भूमिका घेतली आहे. चार-दोन लोकांमुळे संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात जाणार असेल तर मी ते तसं होऊ देणार नाही. जो कोणी कायदा मोडेल त्यांच्यावर गुन्हा हा अटळ आहे.
धनंजय टेके
तलाठी शिगाव
No comments:
Post a Comment