Wednesday, 10 June 2020

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना ४१ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर - पालकमंत्री ना. सतेज डी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


 
     कोल्हापूर - दि. 10,जून 2020 

 गेल्यावर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात अनेकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त बाधितांना राज्य शासनाकडून मदत स्वरूपात अनुदान द्यावे अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज डी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावास मंजूरी देवून तात्काळ अनुदान उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये अनेक नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त बाधितांना मदत वाटप करण्यासाठी वेगवेगळ्या बाबींसाठी आणि वेगवेगळ्या लेखाशिर्षनिहाय सुमारे ३२१ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले होते. हे अनुदान नुकसानग्रस्त बाधितांना सर्व तालुकास्तरावर वाटप करण्यात आलेले आहे. परंतू काही नुकसानग्रस्तांचे अनुदान वाटप प्रलंबित असून याबाबत शासनाकडे मार्गदर्शनही मागविण्यात आले आहे. त्याचबरोबर कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून लॉकडाऊन कालावधीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये कमीत कमी कर्मचारी उपलब्धतेवर शासकीय कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उपाययोजनांतर्गत कोषागार कार्यालयामध्ये २० मार्च २०२० नंतर कोवीड-१९ उपाययोजनांशी संबंधित बिले स्वीकारली जातील असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर अन्य बाबींची बिले तालुक्याकडून कोषागार शाखेमध्ये स्वीकारली गेली नाहीत. ३१ मार्च २०२० रोजी सर्व वित्तीय नियमाप्रमाणे सर्व निधी शासनास समर्पित करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांकडून सदरचा निधी शासनास समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांचे अनुदान वाटप करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभागाच्या सचिवांकडे लेखाशिर्षनिहाय सादर केला आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी नुकसानग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त बाधितांना राज्य शासनाने ४१ कोटी ५८ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले. याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्यांना अनुदान मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment