शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील अब्दूलाट येथे जुलै 2019 मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते ,शासनाने दिलेल्या मदत वाटपात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून फेर सर्व्हे करावा,तसेच बेकायदेशीर अनुदान लाटलेल्यांवर फौजदारी दाखल करून शासनाचा पैसा वसूल करावा आणि वंचितांना लाभ द्यावा, या घोटाळ्यात सामील असणारे शासकीय अधिकारी,कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचेवर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन आज शिरोळ च्या तहसीलदार अर्चना धुमाळ यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले , दिरंगाई झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला.
2019 साली आलेल्या महापुरावेळी शासनाने महापुराचे पाणी घरात आलेल्या कुटुंबाना प्रत्येकी 10,000 रु,अंशतः पडझड झालेल्याना प्रत्येकी 6000रु तर पूर्ण घर पडलेल्यांना 95100 रु तसेच त्यांना 6 महिन्याचे घरभाडे म्हणून 24000 रु यांसह शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेकटर नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने करोडो रुपयांचा निधी दिला होता.
मात्र यामध्ये वस्तुनिष्ठ पंचनामे न करता शासकीय अधिकारी कर्मचारी आणि काही लोकप्रतिनिधी यांनी संगनमताने नुकसान न झालेल्या आपल्या जवळच्या लोकांना , तसेच काही टक्केवारी घेऊन बऱ्याच लोकांना बेकायदेशीर लाभ मिळवून दिला आहे,शासनाच्या करोडो रुपयाचे अनुदान हडप केले असल्याच्या अनेक घटना आता समोर आल्याने गावात खळबळ माजली आहे तर अनेक पात्र लोकांना लाभापासून वंचित ठेवल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अनेक दिवस लाभार्थ्यांची यादी मागूनही तलाठी आणि ग्रामसेवक ही यादी मिळत न्हवती मात्र परवा राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आढावा बैठकीत नागरिकांनी मागणी केल्याने मंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर यादी प्रसिद्ध झाली आणि हा घोटाळा बाहेर आला.या घोटाळ्याची चौकशी करावी,दोषींवर कारवाई करावी,अनुदान बेकायदा हडप करणाऱ्यांवर फौजदारी करून रक्कम वसूल करावी आणि फेरसर्व्हे करून वंचितांना लाभ द्यावा अशी मागणी शिरोळ तहसीलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे आज येथील सामाजीक कार्यकर्त्यांनी केली आहे तर यामध्ये दिरंगाई झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात प्रा,संजय परीट, मा,उपसभापती विद्याधर कुलकर्णी, डॉ दशरथ काळे, शिवसेनेचे महावीर गाडवे, मराठा महासंघाचे प्रमोद साळुंके , यांचेसह गावातील अनेकांचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment