कोल्हापूर प्रतिनिधी
शेती पंप जोडणी, वीजबिल प्रश्न लवकर मार्गी लावावेत, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. ऊर्जामंत्री ना. नितीनजी राऊत यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि महावितरण अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत आमदार ऋतुराज पाटील यांनी विविध मुद्दे मांडले.
यावेळी आ.ऋतुराज पाटील म्हणाले, सध्या जी वीज बिले वाढून आली आहेत, त्याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत. नेमकी बिले वाढून का आलीत? याबद्दल लोकांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे.त्यांच्या शंका दूर करणे क्रमप्राप्त आहे.
मिशन रोजगार च्या निमित्ताने शिरोली एमआयडीसी मधील उद्योजकांशी मी चर्चा केली. उद्योगांना भेटी दिल्या. वीज बिल कमी करावे, हा विषय सर्व उद्योजकांनी प्रकर्षाने मांडला . त्यामुळे उद्योगांचे वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.
गेल्या वर्षी पुरामुळे अनेक शेती पंप पाण्याखाली गेले होते. आम्ही डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातुन वळीवडे गाव दत्तक घेतले होते.आणि यामध्ये शेती पंप सुद्धा दुरुस्त करून दिले होते. जर शेती पंप बंद होते तर शेतीपंपाची बिले का येतात ? हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्याचा गंभीरपणे विचार व्हावा.
कोल्हापूर दक्षिण हा निम्मा मतदारसंघ ग्रामीण आहे. त्यामधील अनेक शेतकरी बांधवाना शेती पंप जोडणी घेण्यासाठी दिरंगाई होत आहे.त्याबद्दल योग्य कार्यवाही करावी अशी विनंती आ.पाटील यांनी केली.
ऊर्जामंत्री ना.राऊत यांनी या सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही दिली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आ.प्रकाश आवाडे, आ.राजेश पाटील, आ.चंद्रकांत जाधव ,राज्य ग्राहक संघटना अध्यक्ष प्रताप होगाडे, इररिगेशन फेडरेशनचे विक्रम पाटील यांनी विविध विषय मांडले.