Wednesday, 29 September 2021

एकता आणि अनुशासन हे जीवनात उतरविण्यास कोणतेही ध्येय कमी वेळेत साधता येते : ब्रिगेडियर समीर साळुंखे

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.29/9/21
    महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत नियमित अभ्यासक्रमास सोबत राष्ट्रीय छात्र सेनेतील सहभाग आपणास देशसेवेचे आवश्यक असणारे बालकडू तर देतेच शिवाय व्यावहारिक जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये ही आत्मसात करण्यास बळ देतात.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील पिढ्यानपिढ्या चालत आलेले गुण देश सेवेकरिता नेहमी आत्म प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन  ग्रुप कमांडर एनसीसी कोल्हापूरचे ब्रिगेडियर समीर साळुंखे  यांनी केले.
      सोमवार  २० सप्टेंबरपासून एनसीसी भवन कोल्हापूर येथे  १६ महाविद्यालयातील एनसीसी छात्र यांसाठी  वार्षिक प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरात ड्रील ,फायरिंग , गार्ड ऑफ हॉनर , बेस्ट कैडेट आणि सांस्कृतिक या साठी स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी ब्रिगेडियर समीर साळुंखे बोलत होते. गत दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या बंद झालेली एनसीसीची वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरचे प्रशासन अधिकारी  लेफ्टनंट कर्नल किशोर कुमार मोरे  यांनी तत्परतेने आणि कोरोनाची खबरदारी घेऊन यशस्वीरित्या केले.  
       या शिबिरात विवेकानंद कॉलेज कोल्हापुरने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचे पारितोषिक पटकाविले . या वार्षिक प्रशिक्षण शिबिरासाठी लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, लेफ्टनंट प्रशांत पाटील, लेफ्टनंट स्वाती चौगुले, सुभेदार मेजर एच.डी. शिंदे,सुभेदार प्रशांत जमनिक, सुभेदार शिवानंद नागारी, सुभेदार शेटके, कार्यालयीन प्रशासकिय सेवक वर्ग  यांनी विशेष परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक लेफ्टनंट कर्नल किशोर कुमार मोरे यांनी केले.  आभार लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट अभिषेक हावळे व आदिती पवार यांनी केले .
    फोटो 
कोल्हापूर : एनसीसी भवन येथील वार्षिक प्रशिक्षण शिबीरामधील पारितोषिक वितरण समारंभामध्ये ब्रिगेडियर समीर साळुंखे यांच्या सोबत  लेप्ट. कर्नल किशोर कुमार मोरे एनसीसी अधिकारी प्रशिक्षक व एनसीसी कॅडेट.

Tuesday, 28 September 2021

गोदाम फोडणाऱ्या चौघांना अटक

हातकणंगले / प्रतिनिधी

   मास एक्स्प्रेस कार्गोचे गोदाम फोडणाऱ्या चौघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर एकास बाल सुधार गृहात पाठवण्यात आले. शुभम संजय मिठारी, अक्षय संजय कांबळे ( दोघेही रा. नागाव, ता. हातकणंगले ),  शुभम नंदकुमार गव्हाणे व आदित्य भिकाजी पाटील ( दोघेही रा. महाडीक कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) अशी त्यांची नावे आहेत. पेठ वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोरील न्यायालयात सर्वांना हजर करण्यात आले होते. आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांशी यांचा संबंध तसेच उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलिस कोठडी मिळावी अशी विनंती केली होती. 
मास एक्स्प्रेस कार्गो  लि. पुणे या कंपनीचे शिरोली एमआयडीसी येथील टोप हद्दीत असणारे गोडाऊन फोडून सुमारे दोन लाख एकोनसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या पाच जणांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी काल अटक केली होती. त्यांच्याकडून कॉटन किंग कंपनीचे पॅन्ट, शर्ट, टी शर्ट, तसेच मोबाईल अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटवेअर, मोबाईल असा सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली  चार लाख पन्नास हजार रुपये किमतीची मोटार असा एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत मास एक्स्प्रेस कार्गो चे कर्मचारी  उमेश गोपाळ मरगज ( वय ३०, रा. आर. के. नगर, कोल्हापूर ) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.  
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व उप विभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, अविनाश पोवार, समीर मुल्ला, प्रवीण काळे, सतिश जंगम, महेश अंबी, निलेश कांबळे, महादेव पाटील आदींनी ही कारवाई केली. 
.....................
फोटो 
शिरोली : गोदाम फोडणाऱ्या चौघांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे व त्यांचे शोध पथक

Sunday, 26 September 2021

कोजिमाशि' स्वखर्चाने सभासदांचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरणार - - - - - कर्जमर्यादा ३५ लाख रुपये तर व्याजाचा दर कमी करण्याचा निर्णय

   
    कोल्हापूर / प्रतिनिधी
    
    'कोजिमाशी ' पतसंस्था स्वखर्चाने सभासदांचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरणार असून   कर्जमर्यादा ३५ लाख रुपये तर व्याजाचा दर ११टक्यावरून १० टक्के  करणे , भागभांडवल मर्यादा ३० हजारावरून ३५ हजार रुपये करणे, २४ टक्के दराने विक्रमी लाभांश देणे , वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सभासदत्व देणे , असे महत्वाचे निर्णय कोजिमाशि पतसंस्थेच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले .
                        कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक ( कोजिमाशि) पतसंस्थेची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २६ रोजी संस्थेच्या शाहूपुरी प्रधान कार्यालयातून व्ही .सी. द्वारे  खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . सकाळी ११ वाजता सुरू झालेली सभा तब्बल साडेतीन तास चालली . यावेळी विविध विषयावर चर्चा होऊन सभासद व संस्थाहिताचे निर्णय घेण्यात आले . शिक्षकनेते व तज्ञ संचालक दादासाहेब लाड , संस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर , मुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली .
         सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर होते . प्रारंभी अहवाल सालातील दिवंगत सभासदांना श्रध्दांजली वहाण्यात आली .              शिक्षकनेते व सहकार तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी स्वागत केले .मार्च २०२१ या अहवाल सालात संस्थेला ४ कोटी २२ लाख ७२ हजार ५८० रुपये इतका नफा झाला असून सभासदांना विक्रमी २४ टक्के लाभांश दिला जाणार आहे . संस्थेच्या ठेवी  ४६६ कोटी ३९ लाख ५३ हजार रुपये इतक्या असून गुंतवणूक १६२ कोटी ६९ लाख ८३ हजार रुपये तर भागभांडवल १९ कोटी ४० लाख ६९ हजार इतके आहे . असा संस्थेच्या प्रगतीचा आढावा चेअरमन बाळ डेळेकर यांनी प्रास्ताविकातून विषद केला . मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवाल वाचन केले . अहवालावरील सर्व विषयावर चर्चा होऊन  सभासदांनी सर्वानुमते मंजूरी दिली..
                 सर्व शाखात सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत , सभासदांच्या मुली पाल्यासाठी शहरात मुलींचे वसतिगृह सुरु करावे , दिपावली भेट म्हणून १५ किलो तेलाचा डबा द्यावा , वैद्यकिय उपचार कर्ज योजना सुरू करावी , मंगळवार पेठ शाखा इमारतीचे नुतनीकरण करण्यात यावे, जुन्या पेन्शन योजनेसह शैक्षणिक समस्यावर विचारविनिमय व्हावा या उद्देश्याने सातही शिक्षक आमदारांना कोल्हापूरात बोलावून गोलमेज परिषदेचे संस्थेमार्फत आयोजन करावे असे अनेक प्रश्न सभासदांनी विचारले .
         विरोधक कर्जाचा व्याजदर ८ टक्के करण्याची मागणी करीत आहेत मात्र हेच संचालक ज्या संस्थेत नेतेगरी करतात त्या संस्थेचा व्याजदर बारा टक्के आहे . मग तेथील सभासदांनी दाद कुणाकडे मागायची ? असा खोचक सवाल चेअरमन बाळ डेळेकर यांनी विरोधकांच्या प्रश्नास उत्तर देताना केला व सात हजार कोटी ठेवी असणारी केडीसीसी बँक  ११ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करते . मग कोजिमाशिने ८ टक्के व्याजदर केला तर संस्थेच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसेल याबाबत विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे ..
                       ऑनलाईन सभेत संजय परीट, सूर्यकांत चव्हाण, निशिकांत चव्हाण ,सुधाकर डोणोलीकर ,रमजान मुल्ला, अशोक मानकर, सचिन पाटील ,नामदेव घोलपे ,एस .पी .पाटील ,विनोद उत्तेकर ,दत्ता जाधव, रमाकांत बुध्दीसागर, राजेंद्र पाटील, एन .जी नलवडे, संजय रोडे, तात्यासाहेब गोते ,सुहास पाटील, यासिम सय्यद, अकबर पन्हाळकर ,प्रतापराव पाटील ,गोरक्ष पाटील ,अनंत भोगम ,रफिक पटेल ,संजय देसाई, सचिन शिंदे, संदिप मगदूम, नेताजी डोंगळे , जीवन पाटील , राजू भोरे , प्रकाश कोकाटे , राजाराम शिंदे , विनायक सपाटे , किसन डोंगळे , मनोहर पाटील , आदीसह सभासदांनी सहभाग घेतला .
        यावेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते .
     आभार व्हाईस चेअरमन सुभाष पाटील यांनी मानले .

चौकट-१ ) महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ..
           या सभेत सौ . सुषमा पाटील , निशा साळोंखे ऋतुजा पाटील उज्ज्वला सातपुते यांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या व संस्थेच्या पारदर्शी कारभाराचे कौतुक केले .
      २ ) सन २०-२१ अहवाल सालात संस्थेने मयत सभासदांचे २ कोटी ८० लाख, २३ हजार ४४७ रूपये कर्जमुक्ती निधितून माफ केले आहे असा निर्णय घेणारी राज्याच्या सहकार क्षेत्रातील एकमेव संस्था आहे .तसेच कन्या योजनेअंतर्गत ९३ सभासदांना २ लाख३२ हजार रूपयांचे वाटप केले आहे . अशी माहीती तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली .
      ३ )कोविड महामारीच्या काळात २८५ सभासदांना १४ लाख २५ हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे वाटप केले त्याचबरोबर पुरग्रस्त शाळा व सभासदांना १३ लाख २ हजार रुपये अदा केले आहेत तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे २ लाख ५० हजार इतकी रक्कम संस्थेने प्रदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .
        ४ ) कर्जाचा व्याजदर ११टक्यावरून १० टक्के करणे तसेच कर्जमर्यादा ३५ लाख रूपये करणे , भागभांडवल मर्यादा ३५ हजार करणे असे सभासदाभिमुख निर्णय होऊन येत्या दिपावलीला हि सुखद भेट असेल असे दादा लाड यांनी घोषित केले
   ५ ) कोरोना संसर्गग्रस्त सभासद व पुरगस्त शाळा व सभासद यांना आर्थिक मदत दिल्याबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव एस .पी. पाटील , पी .डी. जाधव यांनी मांडला.
६ ) दादांची धास्ती ... ?
   सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तज्ञ संचालकासह सर्व संचालक मंडळ बांधिल असते . दादांची समर्पक उत्तरे सभासदांना भावतात असे असताना दादां लाड यांच्या हस्तक्षेपाबाबत विरोधकांना दादांची धास्ती का ? असा सवाल डेळेकर यांनी केला .
    ७ )  जे विरोधी सभासद , संचालक , नेते अन्य शिक्षक संस्थेत नेतेगिरी करतात  मात्र कर्ज  कोजिमाशितून काढतात आणि याच मातृसंस्थेची विविध प्रसारमाध्यमाद्वारे बदनामी करून संभ्रम निर्माण करतात . अशांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव प्रा .पी .एस . पाटील यांनी मांडला . 
७ ) शिक्षकनेते दादासाहेब लाड हे कोजिमाशि परिवारातील सर्व सभासदांच्या सुख : दुःखात सहभागी होणारा मराठी मनाचा दिलदार माणूस आहे अशी बिरुदावली  यासिन सय्यद ( आजरा ) यांनी केली . -

फोटो  -ऑनलाईनसभेत सभासदांना समर्पक उत्तरे देताना तज्ञ संचालक दादासाहेब लाड ,चेअरमन बाळ डेळेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद पाटील . इनसेटमध्ये प्रश्न विचारणारे सभासद .

-

Saturday, 25 September 2021

कोजिमाशि सभासदांना २४ टक्के दराने रुपये ४ कोटी २८ लाख लाभांश देणार


कोल्हापूर / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
  कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर ( कोजिमाशि) सभासदांना १५ + ९ असा एकूण २४ टक्के दराने रुपये ४ कोटी २८ लाख इतका लाभांश देणार व संस्थेच्या सर्व सभासदांना ए.टी.एम. कार्डचे वितरण करणार असल्याची माहिती चेअरमन बाळ डेळेकर यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२६/०९/२०२१ रोजी संस्थेच्या प्रधान कार्यालयातून ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार आहे. सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील. जास्तीत जास्त सभासदांनी या सभेत ऑनलाईन उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन बाळ डेळेकर यांनी केले आहे.
    मार्च २०२१ अखेरच्या आर्थिक वर्षात संस्थेने गरुडझेप घेत ४ कोटी २२ लाख ४ ७२ हजार ५८० इतका नफा झाला असून कोजिमाशि सभासदांना उच्चांकी २४ टक्के लाभांश देणार आहे. संस्थेचा ऑडीट वर्ग अ कायम राखला आहे. या आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या ठेवी ४६६ कोटी ३९ लाख ५३ हजार इतक्या असून कर्ज वाटप ३९० कोटी ४१ लाख ३४ हजार इतके केले आहे. संस्थेची गुंतवणूक १६२ कोटी ६९ लाख ८३ हजार असून निधी ३२ कोटी १५ हजार इतका आहे. संस्थेचे भागभांडवल १९ कोटी ४० लाख ६९ हजार इतके आहे.
   कोजिमाशि संस्थेने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात संस्थेने २ कोटी ८० लाख २३ हजार ४४७ इतके कर्ज कर्जमुक्ती निधीतून मयत सभासदांचे कर्ज माफ केलेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी सांगितले. अभिमान कन्या जन्म व अभिमान कन्यासाडी योजनेअंतर्गत ९३ सभासदांना २ लाख ३२ हजार ५०० रु.चे वाटप केल्याचे चेअरमन बाळ डेळेकर यांनी सांगितले. तसेच ३५१ सभासदांच्या गुणवंत पाल्यांना पारितोषिक व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यांत आला.
सभासद हिताचा कारभार करण्याचा मानस आणि सभासदांची मागणी लक्षात घेवून भाग भांडवल मर्यादा वाढ करणे, नविन सभासद वाढीसाठी सभासद होणेसाठीची पात्रता आदी उपविधी दुरुस्तीसाठी ठेवले असल्याचे चेअरमन बाळ डेळेकर यांनी सांगितले.
     कोविड महामारीच्या काळात २८५ सभासदांना रुपये १४ लाख २५ हजारची रक्कम चेकने मदत म्हणून वाटप केली असून पूरग्रस्त शाळा व सभासदांना रुपये १३ लाख २ हजार इतकी अदा केली आहे. त्याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे २ लाख ५० हजार इतकी रक्कम प्रदान केली आहे. महापूर व कोविड महामारी काळात सभासदांना आर्थिक मदत करणारी कोजिमाशि ही महाराष्ट्रातील एकमेव वित्तीय संस्था आहे.
    विमानवारी योजनेअंतर्गत सभासदाला देशांतर्गत विमान प्रवासासाठी रुपये १० हजार व देशाबाहेर विमान प्रवासाठी रुपये २० हजार बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचे चेअरमन बाळ डेळेकर यांनी सांगितले.
   असे प्रसिद्धी पत्रक चेअरमन बाळ डेळेकर, व्हा.चेअरमन सुभाष पाटील, तज्ञ संचालक दादासाहेब लाड तसेच सर्व संचालकांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Tuesday, 21 September 2021

संच मान्यता जुन्या निकषाप्रमाणे व्हावी - जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.


कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.21/9/21
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोल्हापूर यांच्या मार्फत शिक्षण आयुक्त कार्यालय प्राथमिक  शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांना संच मान्यता निकष या संदर्भात लेखी निवेदन देऊन सखोल चर्चा करण्यात आली.
    यापूर्वी  २०१९ साली व तत्पूर्वी झालेल्या संचमान्यतेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी  ६१ च्या पुढे कितीही पट असला तरी 30 पटास  १ शिक्षक अशी मान्यता होती व इयत्ता पहिली ते पाचवी साठी मुख्याध्यापक  १५१ पटसंख्या निकष असला तरी पात्र शाळेसाठी दहा टक्के सवलत होती म्हणजे १३६ पटा पेक्षा जास्त पट असणाऱ्या शाळेत मुख्याध्यापक पात्रता व पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेत १०१  पटास एक मुख्याध्यापक मान्यता होती व त्यातही दहा टक्के पात्र शाळेसाठी सवलत होती म्हणजे  ९१ पट असला तरी मुख्याध्यापक पात्र होत होता.
 यावर्षी  २०२१ ची नवीन संच मान्यता ही आरटीई ऍक्ट २००९ नुसार होणार असून त्यामध्ये मध्यंतरी राज्य सरकारने पत्र काढून जी सवलत दिली होती ती आता असणार नाही. त्यामुळे अनेक चांगल्या शाळा मोठ्या शाळा या शिक्षकांअभावी मोडकळीस येणार असून अनेक मुख्याध्यापक अपात्र होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांवर एकीकडे चांगले काम करूनही, पट वाढवूनही, अतिरिक्त होण्याची नामुष्की ओढावणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीब व बहुजनांच्या विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे म्हणून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर च्या वतीने   प्राथमिक विभाग महाराष्ट्र संचालक दत्तात्रय जगताप  यांची कार्यालयात भेट घेतली.  त्यांनी  सर्व बाजूने चर्चा करून विषय समजून घेतला व तशा पद्धतीने वरिष्ठांना कळवण्याची हमी दिली. त्याचबरोबर आधार सक्तीमुळे अनेक शाळांची संच मान्यता अडचणीत येणार आहे त्यासाठी मुदत वाढ द्यावी अशीही मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील, महिला अध्यक्षा लक्ष्मी पाटील,  सरचिटणीस सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, सुनील एडके, रोहिणी लोकरे, शुभांगी सुतार,सविता पाटील, संगीता खिल्लारे , जी .जी. पाटील आदी पदाधिकारी उपस्थीत होते.

        फोटो 
पुणे : येथे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांच्याशी चर्चा करतांना जिल्हाअध्यक्ष रविकुमार पाटील लक्ष्मी पाटील , सुनील पाटील व अन्य पदाधिकारी.

Saturday, 18 September 2021

पुस्तक हेच ज्ञानाचे -- डॉ अजितकुमार पाटील

प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर अंतर्गत मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये हराळे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न झाला भारतवीर मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष विलास भोसले सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉक्टर राजकुमार पाटील व ज्ञानराज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज ,श्यामची आई ,स्वामी विवेकानंद, बोलणारा गुलाब, चिकट मामा, रणरागिनी झाशीची राणी यासारखी पुस्तके शाळेला म ल ग हायस्कूलच्या शिक्षिका शीतल हराळे यांच्या वाढदिवसानिमित्त गोष्टीची पुस्तक प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी डॉ अजितकुमार पाटील यांनी आज कोरोनाकाळामध्ये पुस्तक वाचन कमी होत आहे साने गुरुजींच्या सारखे उदात्त व्यक्तिमत्व असणारे व्यक्तिमत्व अनमोल ठेवा आहे या ठेवा मध्ये बोधपर कथा वैचारिक लेख यासारखे विचार सध्याच्या युगात महत्त्वाचे आहेत. एकविसाव्या शतकाला प्रेरक ठरणारे आहेत समाजामधील अस्पृश्यता नष्ट होऊन एकता निर्माण होण्यासाठी व शेतकरी कामकरी वर्गाचे दैन्य दारिद्र्य दूर होऊन सर्वत्र समाजवादी स्थापना व्हावी या हेतूने लहान मुले स्त्रिया तरुण दीनदलित यांना सत्वाची जाणीव निर्माण व्हावी व देशाच्या कार्याची उत्तमोत्तम विचारांची देणगी मिळाली असे कार्य साने गुरुजी यांनी या पुस्तकांमधून दिलेले आहे आणि हेच विचार सध्या आधुनिक काळात महत्त्वाचे आहेत. वैचारिक पातळीवर विचार करायचा ते पुस्तक आहे त्याचे वाचन करण्यात यावे असे प्रतिपादन डॉ अजितकुमार पाटील यांनी केले.                     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तमेजा मुजावर यांनी केले आभार उत्तमराव सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवशंभु गाटे, आसमा तांबोळी ,सुजाता आवटे ,हेमंतकुमार पाटोळे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नीलम पाटोळे सारिका कारंडे सोनाली जमदार दीपाली चौगुले स्नेहा दाभाडे नीता घाडगे उपस्थित होते.

Tuesday, 14 September 2021

हेरले क्रीडा मंडळ यांच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान

हेरले / प्रतिनिधी
दि.14/9/21

हेरले ( ता. हातकणंगले) येथील हेरले क्रीडा मंडळ हेरले यांच्या वतीने  खासदार धैर्यशील  माने यांच्या हस्ते गावातील सर्व डॉक्टर, हेरले  मेडिकल असोसिएशनचे सर्व प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी कोरोना संसर्ग काळात जनतेची अखंडीत आरोग्य सेवा केल्या बद्दल त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार समारंभ संपन्न झाला.
       खासदार धैर्यशील माने यांनी कोरोना  संदर्भात घ्यावयाची काळजी तसेच कोणते नियम आपण पाळले पाहिजेत याबाबत आपल्या मनोगता मधून सर्वांचे प्रबोधन केले. सर्व नागरिकांना कोविड लस घेण्यासाठी  प्रवृत्त करावे व गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन केले.सर्वांनी मास्क वापरावे वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत आदीसह कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक संदेश मनोगतातून व्यक्त केले.
 प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी छत्रपती शाहू महाराज,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  गणी  देसाई  यांनी केले. समाजसेविका निलोफर खतीब, डॉ.प्रविण चौगुले, अभिषेक मोहिते, वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख ,डेव्हिड लोखंडे  पर्यवेक्षिका एस.ए.कोळेकर, ग्रामपंचायत सदस्या निलोफर खतीब  यांनी मनोगते व्यक्त केली.  
     या समारंभास हेरले क्रीडा मंडळाचे सर्व आजी माजी खेळाडू,मंडळाचे  आधारस्तंभ, ग्रामस्थ व युवक उपस्थितीत होते.सूत्रसंचालन प्रा. विलास हराळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार  अमर वड्ड यांनी मानले.
       फोटो 
हेरले : येथे क्रीडा मंडळाच्या सत्कार समारंभ सोहळयात बोलतांना खासदार धैर्यशील माने शेजारी अन्य मान्यवर.

Monday, 13 September 2021

मांगले परिसरात वेबसिरीज चित्रीकरणाचा शुभारंभ

३२ शिराळा : (मांगले) 

येथे SSS प्रॉडक्शन फिल्म निर्मित बिन बेंबीचा बॉस RAMANO डिजिटल या OTT प्लॅटफॉर्म वरील वेबसिरीज चे शूटिंग चालू या शूटिंगचा महूर्त  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा शुभ हस्ते करण्यात आला. या वेबसिरीज चे निर्माते सुनील साळुंखे, अश्विनी सुनील साळुंखे,  लेखक/दिग्दर्शक: वैजनाथ चौगुले, कार्यकारी निर्माता: रंगराव घागरे, कॅमेरामन: आनंद काळे, कलाकार : जयराज नायर, मुकेश जाधव, संदीप गायकवाड, नितीन बोडारे, कविता, मेघा, शशी केळकर, प्रशांत तपस्वी, राजू बावडेकर,आवदूत सुतार, अक्षय ढमाळे,रंगराव घागरे,आप्पा नाना हे कलाकार आपली कला सादर करत आहेत.  स्वप्नील देसाई, राजेश पाळेकर, अभिजित कुंभार हे प्रॉडक्शन सांभाळत आहेत याप्रसंगी संदीप भापकर,मानसिंग जाधव, पै विजय पाटील,पांडुरंग चौगुले, विजय पाटील (मांगले), चित्रपट निर्माता: प्रशांत शिंगटे, अभिनेता: समद खान, किरण जाधव, उपस्थित होते. लवकरच ही वेबसिरीज RAMANO डिजिटल वर आपल्या भेटीस येत आहे.

माले (ता. हातकणंगले) येथे काँक्रीट रस्त्याचे व पथ दिव्यांचे उद्घाटन

हेरले / प्रतिनिधी
दि.13/9/21

माले (ता. हातकणंगले) येथे पंचायत समितीच्या सदस्या मेहेरनिगा जमादार यांच्या फंडातून काँक्रीट रस्त्याचे व पथ दिव्यांचे उद्घाटन माजी सभापती
 डॉ. पद्माराणी पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.
       या प्रसंगी  सरपंच प्रताप  पाटील , डी आर माने , सुधीर पाटील , महेश पाटील ,संतोष खोत ,सर्जेराव खोत , मुनिर जमादार, उपसरपंच पाटील , ग्रामपंचायत महिला सदस्या गावडे , खोत,आदी मान्यवर उपस्थित होते.
    फोटो 
माले : येथे विकास कामाच्या उद्‌घाटन प्रसंगी माजी सभापती डॉ. पद्माराणी   पाटील  पंचायत समिती सदस्या मेहेरनिगा जमादार सरपंच प्रताप पाटील व अन्य मान्यवर.

Sunday, 12 September 2021

मौजे वडगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध-आमदार राजूबाबा आवळे.



हेरले प्रतिनिधी

मौजे वडगाव गावास जास्तीत जास्त विकास निधी देऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करेन असे मत आमदार राजू बाबा आवळे यांनी व्यक्त केले.  ते मौजे वडगाव  (ता. हातकणंगले) येथील त्यांनी 20 लाख रुपयांचा आमदार फंड मंजूर केला आहे. त्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यामध्ये दहा लाख हायमास्टसाठी  व दहा लाख गटर्ससाठी दिला आहे.
    मुसळे कोपरा, कुंभार कोपरा, झेंडा चौक, लोहार कोपरा, माळवाडी बिरदेव मंदिरासमोर, दसरा चौक, स्मशानभूमी, गावातील शेंडगे कोपरा, चर्मकार समाज व बौद्ध समाज अश्या दहा ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आला आहे. गणेशोत्सवामध्ये हायमास्ट चालू करण्यात आले. यामुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वागत व प्रास्ताविक हातकणंगले तालुका संजय गांधी कमिटीचे सदस्य डॉ. विजय गोरड यांनी केले.
     या प्रसंगी सरपंच  काशिनाथ कांबळे,  उपसरपंच सुभाष अकीवाटे, पोलीस पाटील अमीर हजारी,तंटामुक्ती अध्यक्ष  महेश कांबरे, नितीन घोरपडे, सुनील गरड, नारायण संकपाळ, इम्रान पटेल, संजय जंगम, कृष्णात सावंत, भगवान कांबळे, जावेद हजारी, हायमास्ट कॉन्ट्रॅक्टर  मगदूम, संतोष लोंढे, बशीर हजारी, बाळासो बारगिर, तसेच तसेच ग्रामपंचायत सदस्य सरताज बारगिर, अश्विनी लोंढे, तानाजी गोरड, काँग्रेसचे  कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सतीश कांबरे यांनी मानले.

 फोटो 
मौजे वडगांव : येथे विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजूबाबा आवळे डॉ. विजय गोरड सरपंच काशिनाथ कांबळे व शेजारी अन्य मान्यवर.

Friday, 10 September 2021

विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव काळामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी - - डॉ अजितकुमार पाटील

कोल्हापूर दि 09 सप्टेंबर 2021:

 कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे राजर्षी शाहू मध्ये सी आर सी सात मध्ये ऑनलाईन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणेशोत्सव काळामध्ये घ्यावयाची  काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.                            
     कोल्हापूर प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी श्री एस के यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अजितकुमार पाटील यांनी गणेशोत्सव काळामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल नियोजन करण्यात आले होते.                           सामाजिक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील पर्यावरण मित्र यांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सव काळामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक अभ्यास कसा करावा व याबद्दल काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.               कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समितीकडील बोंद्रे नगर विद्यालय चे अध्यापक व सर्पमित्र यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात व आजूबाजूला सर्प आले तर ते कसे ओळखावे व त्याबद्दल सावधगिरीची कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. राजेंद्र पाटील यांनी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना कसे बसावे व आपल्या भागातील तरुण मंडळे असतील किंवा परिसरातील लहान मोठे तरुण मंडळे असतील त्यामध्ये आकर्षक देखावे तयार करत असताना थर्माकोलचा वापर टाळावा, प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यावरणाला हानी होणार नाही त्याबद्दल आकर्षक देखावे व आकर्षक सजावट कसे करता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना व पालक शिक्षक यांना ऑनलाईन झुम च्या माध्यमातून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.          शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना सोशल डिस्टनचा वापर करावा ऑनलाइन असलेला अभ्यास व्हिडीओ असेल माझी शाळा माझे टीव्ही,सेतू अभ्यासक्रम ,शाळा बंद पण शिक्षण चालू, तसेच यू ट्यूब च्या माध्यमातून येत असलेले शिक्षकांची व्हिडिओ पाहून त्यामधून जास्तीत जास्त चांगला अभ्यास करण्यात यावा असे आवाहन केले. प्रशासनाअधिकारी एस के यादव साहेब यांनी या ऑनलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पालकांनी विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेत असताना ताणतणाव येणार नाहीत याची काळजी घेऊन अभ्यास जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पूर्ण करून घेण्यात यावा असे आवाहन केले.       शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई यांनी शुभेच्छा दिल्या .                                                        शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी ऑनलाइन सुरू असलेल्या माझा टीव्ही माझी शाळा,सेतू अभ्यासक्रम.याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त कादंबरी बलकवडे मॅडम, उपायुक्त रविकांत आडसुळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले शैक्षणिक उपक्रम यांची माहिती दिली.     कोरोणा काळामध्ये शाळा बंद व शिक्षण चालू याबद्दल असलेल्या सुट्टीचा सदुपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती त्यामध्ये त्यांनी वापर करताना बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी भाजीपाला मार्केट मधील लहान मोठ्या वस्तू आणत असताना तोंडाला मास्क लावावा त्याने त्याचा वापर करावा योग्य अंतरावरून बाजार खरेदी करावा गर्दीच्या व इतर ठिकाणापासून घरी आल्यानंतर साबणाचा वापर करून स्वच्छ हात धुवावेत दैनंदिन जीवनामध्ये मास्क व हातरुमालचा वापर दररोज करावा यामुळे हवेमार्फत किंवा इतर संपर्कातून आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही याची कोणतेही रोग होणार नाहीत याची खरंच याची खबरदारी घेण्याचे उपाय सांगितले ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक विजय कुरणे सर व इतर शाळेतील विद्यार्थी पालक व मुख्याध्यापक उपस्थित होते झूम ॲपच्या माध्यमातून शाळेतील टेकनोसिव्ही टीचर तमेजा मुजावर ज्येष्ठ शिक्षक उत्तमराव कुंभार यांनी नियोजन केले होते या कार्यक्रमासाठी झुम अपच्या ऑनलाइन माध्यमातून गणेशोत्सव काळामधील घ्यावयाची विद्यार्थ्यांनी खबरदारी उपायांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते त्यांचे आभार विजय कुरणे सर यांनी मानले

वडगांव विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण आणि सीसीटीव्ही कॅमेरे देऊन कृतज्ञता व्यक्त

पेठ वडगांव / प्रतिनिधी
दि.10/9/21
मिलींद बारवडे
 वडगाव विद्यालय जुनियर कॉलेज वडगावच्या माजी विद्यार्थ्यांनी ३० हजार रूपये खर्च करून वृक्षारोपणाच्या उपक्रमातून शाळेच्या निसर्ग  सौंदर्यात भर घातली व शाळेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून ३० हजार रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे युनिट शाळेस भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
    प्राचार्य आर. आर. पाटील यांच्या आवाहनास  विद्यालयाच्या १९८९ च्या दहावी बॅचने प्रतिसाद देऊन शाळेच्या परिसरामध्ये जेसीबीने खड्डे काढून विविध प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण केले. तसेच पी.व्ही. सी. पाईपलाइन करून व ठिबक सिंचनची सोय करून प्रत्येक रोपास कायमच्या पाण्याची सोय केली. शाळेच्या नैसिर्गिक सौंदर्यात भर घालण्याच्या या उपक्रमासाठी ३० हजार रुपये वर्गमित्रांनी वर्गणी काढून खर्च केले. या उपक्रमामध्ये विक्रम माने, मुकुंद पारीसवाड, यु. सी. पाखरे आदीसह त्यांच्या मित्रांनी सहभाग घेऊन आर्थिक मदत केली.
         प्राचार्य आर. आर. पाटील यांच्या आवाहनास  विद्यालयाच्या  १९९६ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी डॉ.भरत भोसले यांनी प्रतिसाद देऊन शाळेस ३० हजार रुपये मदतीचे सी. सी. टीव्ही कॅमेरे युनिट भेट दिले. यामध्ये चार कॅमेरे, डी. व्ही. आर. मशिन व केबल आदी साहित्याचा समावेश आहे. या सीसीटीव्ही कॅमेरे युनिटमुळे शाळेतील सर्व परिसर एका दृष्टिक्षेपात येऊन सर्व विभागावर लक्ष राहण्यासाठी मदत झाली आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महिला आघाडी यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून वडगाव विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार महाराष्ट्र राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष प्रविता शिवाजीराव सालपे, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष  निर्मला सावर्डेकर ,हातकलंगले तालुका अध्यक्षा सुनिता पोळ , वडगाव शहराध्यक्ष गीता  पोतदार , सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्षा रीना घोटणे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष फिरोज बागवान आदी मान्यवरांनी केला.
    या प्रसंगी प्राचार्य आर.आर.पाटील, उपमुख्याध्यापक एस. डी. माने, पर्यवेक्षक डी. के. पाटील, कार्यवाह के. बी. वाघमोडे, तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी, डी. एस. शेळके, डी. एस. कुंभार, मिलींद बारवडे, अध्यापिका आर. आर. पाटील, एस. एस. चव्हाण आदी मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.
     फोटो 
वडगांव विद्यालयाच्या १९८९ च्या दहावी बॅचच्या विदयार्थ्यां सोबत प्राचार्य आर. आर.पाटील

Wednesday, 8 September 2021

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनचा प्रश्न सुटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : बाबा पाटील


कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.9/9/21
      दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी शासन, न्यायालयीन स्तरावर तसेच रस्त्यावरची लढाई करावी लागणार असून पेन्शनचा प्रश्न सुटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी प्रतिपादन केले. शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे याप्रश्नासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
       मुख्याध्यापक संघ, विद्याभवन कोल्हापूर येथे जुन्या पेन्शन योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत कार्याध्यक्ष बाबा पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते.
      कृती समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील यांनी जुन्या पेन्शन बाबत 
आतापर्यंत झालेले प्रयत्न व पुढील आंदोलनाबाबत माहिती दिली. पेन्शन योजनेत अडथळा ठरणारी १० जुलैची अधिसूचना रद्द करण्यासाठी विधानसभा अध्यक्षासह १८ मंत्री, १७ खासदार, १६३ आमदारांची पत्रे घेतली होती. या प्रयत्नामुळेच १० जुलैची अधिसूचना रद्द झाली.
        यावेळी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, कोजिमाशिचे संचालक शांताराम तौदकर, सुदेश जाधव (करवीर), अशोक पाटील (राधानगरी),  प्रकाश पाटील (भुदरगड), बाबुराव पाटील (करवीर), श्रीधर गोंधळी, सुभाष पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, संपर्कप्रमुख अशोक हुबळे, एम. आर. पाटील, सखाराम चौकेकर, श्रीकांत पाटील, बबन इंदुलकर, माजित पटेल, बाजीराव साळवी आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत संघाचे सहसचिव अजित रणदिवे यांनी केले. तर आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.

फोटो : विद्याभवन, कोल्हापूर येथे जुन्या पेन्शन योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत बोलताना बाबा पाटील सोबत सुरेश संकपाळ, मिलिंद पांगिरेकर, अशोक हुबळे, एम.आर.पाटील, श्रीकांत पाटील, बबन इंदुलकर आदी.

चौकट
जुन्या पेन्शनचा शब्द घेऊनच निवडणुकीतून माघार : बाबा पाटील
       विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी करायची म्हणून प्रयत्न ठेवले होते. पण 'कोल्हापूरचा आमदार' करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आवाहनानुसार माघार घेत असताना १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याबाबतचा शब्द दिल्याने माघार घेतल्याचे सांगून यासाठी शासनस्तरावर आम. जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी सांगितले.

Sunday, 5 September 2021

निराधारांचा आधार म्हणजेच आमदार राजू बाबा आवळे - डॉ.विजय गोरड.

हेरले / प्रतिनिधी

हातकणंगले मतदारसंघात आजपर्यंत निराधारांना आधार देण्याचे जेवढे काम आमदार राजूबाबा आवळे यांनी केले आहे तेवढे काम यापूर्वी कोणत्याही आमदारांनी केलेले नाही. ते निराधारांचे खरे आधार आहेत असे गौरवोद्गार  संजय गांधी  कमिटी सदस्य डॉ. विजय गोरड यांनी काढले.

     हेरले (ता.हातकणंगले ) येथे संजय गांधी मंजूर पेन्शन पत्र वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आमदार  राजू बाबा आवळे यांची होती. 
यावेळी अतिग्रे, चोकाक, माले , हेरले आणि मौजे वडगाव येथील ७६ लाभार्थ्यांना मंजूर पेन्शन पत्राचे वाटप आमदार  राजू बाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी  मंडलाधिकारी कोरडे ,  तलाठी एस ए बरगाले,  तलाठी जाधव , तलाठी इंगळे हेरले ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण , हेरलेचे उपसरपंच  सतीश काशीद, मौजे वडगावचे सरपंच  काशिनाथ कांबळे,  राजू कचरे, अर्जुन पाटील, माजी उपसरपंच राहुल शेटे, विद्या चव्हाण, महंमद जमादार, इम्रान पटेल, जावेद हजारी, भगवान कांबळे, कृष्णात सावंत, बशीर हजारी, संजय जंगम  यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सूत्रसंचालन हसीम मुल्लांनी यांनी केले तर आभार माजी सरपंच रियाज जमादार यांनी मानले.
        फोटो 
हेरले : आम. राजू बाबा आवळे लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचे वाटप करतांना शेजारी अन्य मान्यवर

Wednesday, 1 September 2021

श्रीरंग जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान.


       हेरले ( प्रतिनिधी ) 
 कोरोना महामारी च्या काळात फ्रन्टलाइन  वॉरियर म्हणून आव्हानात्मक कालावधीत covid-19 चे संक्रमण थांबविण्यासाठी लढणाऱ्या श्रीरंग जाधव यांचा लोकसेवा शिक्षण संस्था संचलित बालावधुत हायस्कूल च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे येथील कोविड सेंटरवर बालावधुत हायस्कूल, मौजे वडगाव चे लिपिक श्रीरंग जाधव हे संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथील covid-19 सेंटरमध्ये स्वॅब टेस्टिंग चे कामकाज ऑनलाईन करण्यासाठी डेटा ऑपरेटर म्हणून गेले चार महिने कार्यरत होते. सदर केंद्रात त्यांनी डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कामकाज पार पाडले आहे. त्याबद्दल त्यांचा लोकसेवा शिक्षण संस्था संचलित, बालावधुत हायस्कूल च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक सदाशिव चौगुले, अध्यक्ष कराळे सर, उपाध्यक्ष नारायण संकपाळ, सचिव संजय चौगुले,  मुख्याध्यापक  एस .ए. चौगुले, यांच्यासह शिक्षक ,शिक्षकेत्तर, कर्मचारी पालक, उपस्थित होते.

 फोटो 
      श्रीरंग जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करताना सदाशिव चौगुले,  कराळे सर,  नारायण संकपाळ,  संजय चौगुले, व इतर मान्यवर (छाया सुरेश कांबरे)