*
हेरले / प्रतिनिधी
हरीश मनोहर शिंदे यांना शिवाजी विद्यापीठाच्यावतीने रसायनशास्त्रातील पीएच.डी. पदवी मिळाली आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. के. एम. गरडकर व डॉ.बी.एस.शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले.
हरीश शिंदे यांनी सिंथेसिस कॅरॅक्टरायझेशन ॲंड ॲप्लिकेशन ऑफ झर्कोनियम ऑक्साईड नॅनोकॉम्पोजिट्स या विषयावर विद्यापीठाकडे शोधप्रबंध सादर केला होता.
डॉ. शिंदे यांचे विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी विविध परिषदा व चर्चासत्रात भाग घेतला आहे.
प्रा. डॉ. के. एम. गरडकर यांच्या प्रयोगशाळेत झर्कोनियम ऑक्साईड नॅनोमटेरिअल हे जगात पहिल्यांदाच वडाच्या पानापासून तयार केले आहे. झर्कोनियम ऑक्साईड अतिशय उपयोगी असून याचा वापर दातांमध्ये सिमेंट म्हणून वापर केला जातो कारण हे ऑक्साईड जैवसुसंगत असल्यामुळे शरीराला कुठलीच हानी होत नाही. हे ऑक्साईड अतिशय उच्च तापमानाला टिकत असल्यामुळे हे रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणून फरनेस मध्ये त्याचा वापर केला जातो व तसेच हाडातील झीज भरून काढण्यासाठी व हाडाच्या मजबुतीकरणासाठी याचा वापर केला जातो.
हे ऑक्साईड तयार करण्यासाठी प्रोफेसर गरडकर सर यांनी पर्यावरण पूरक पद्धत विकसित केली असून या पद्धतीचा अवलंब करून मोठ्या प्रमाणात हे ऑक्साईड तयार केले जाते विशेष म्हणजे यामध्ये फक्त पानांचा वापर करून पाच ते दहा नॅनोमीटर इतक्या छोट्या आकाराचे आणि अतिशय प्रभावी ऑक्साईड तयार केले आहे.
डॉ.गरडकर यांच्या प्रयोगशाळेत आजपर्यंत अनेक विविध नॅनो मटेरियल्स तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने झिंक ऑक्साईड , टिटॅनियम ऑक्साईड, गोल्ड आणि सिल्वर नॅनो पार्टिकल्स यांचा समावेश आहे. या नॅनो मटेरियल्सचा उपयोग त्यांनी रंग मिश्रित पाणी शुद्ध करणे, कॅन्सर वरील उपचार तसेच बीज रोपण करण्यासाठी केला आहे. त्यातील महत्वाचे म्हणजे कृषी विभागातील महत्वाचे नॅनो मटेरियलचा वापर करून बीज उगवण प्रक्रिया हे शोध कार्य नव्याने सुरू झाले आहे. या नविन तंत्रज्ञानामुळे कृषी उत्पादकता वाढल्याचे दिसून येत असून त्याचा उपयोग शेतकरी बांधवासाठी होणार आहे. आज पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थी पीएच.डी पूर्ण केलेली असून सध्या आठ विद्यार्थी या विषयावर संशोधन करीत आहेत.