कोल्हापूर / प्रतिनिधी
दोन दिवसात हल्लेखोरांना अटक झाली नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर पालक व शिक्षक यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी लाड यांनी दिला.आज मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत
अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
स्व. मीरासाहेब मगदूम यांनी स्थापन केलेली माझी शाळा ही अत्यंत उपक्रमशील व विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करणारी असून या शाळेतील संजय सुतार या शिक्षकांवर काल प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ तीव्रपणे निषेध करत आहे व हल्लेखोरांना त्वरीत पोलीसांनी अटक करून त्यांच्यावर तातडीने खटले दाखल करावेत अशी मागणी आज झालेल्या कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत करण्यात आली.
माझी शाळा येथील संजय सुतार या शिक्षकांवर झालेला प्राणघातक हल्ला कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा आहे.असे प्रकार होत राहिल्यास शिक्षकांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन त्यांचेकडून अध्यापनाचे कार्य व्यवस्थित होणार नाही. म्हणून हल्लेखोरांना त्वरीत पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यास शिक्षण क्षेत्रातील भितीचे वातावरण नष्ट होईल, हल्लेखोरांना अटक करण्याच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप होऊ नये, जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयावर विद्यालयातील विद्यार्थी पालकांचा मोर्चा नेण्यात यावा, शाळा महाविद्यालयांच्या सभोवताली उपद्रव करणाऱ्या टोळक्यांचा बंदोबस्त करावा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लेखी निवेदन द्यावे, शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने पावले उचलावीत अशा विविध प्रकारच्या सूचना सभेत शैक्षणिक संघटनांच्या पदाधिका-यांनी केल्या.
या सभेस शिक्षक नेते दादा लाड, भरत रसाळे, डॉ. डी एस घुगरे, खंडेराव जगदाळे, प्रा. सी. एम. गायकवाड, प्रभाकर हेरवाडे, शिवाजी माळकर, इरफान अन्सारी, सुधाकर निर्मळे, मिलींद बारवडे, काकासाहेब भोकरे,राजेश वरक, संतोष आयरे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, जगदीश शिर्के, राजेंद्र कोरे,दत्तात्रय जाधव आदीसह विविध शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी व माझी शाळेतील संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
हल्लेखोरांना त्वरीत अटक करण्यात यावी या विषयी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने बुधवार दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता शाहुपुरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येणार आहे. तरी कोल्हापूर शहर व लगतच्या सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर सेवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
फोटो
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड व अन्य मान्यवर
No comments:
Post a Comment