हेरले / प्रतिनिधी
भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदाराने मोठ्या प्रमाणात मतदान करून हा लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले. ते शिरोली हायस्कूलच्या पटांगणावरती आयोजित मतदार जनजागृती अंतर्गत स्विप कार्यक्रमात बोलत होते. निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व संविधानावर चालणारा देश आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीपथावर नेता यावे यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी मानवी साखळीच्या माध्यमातून स्विप, व्होट इंडिया,आय विल व्होट, तिरंगा आदींचे विद्यार्थ्यांनी प्रदर्शन केले. पथनाट्य,प्रभात फेरी,चित्रकला, रांगोळी स्पर्धा पालकांना पत्र लिहून मतदान करणे विषयी व त्यांच्या हक्काविषयी जागृती करणे यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघात ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे शिरोली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम एस स्वामी यांनी स्वागत प्रास्ताविकामध्ये सांगितले.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, शक्ती कदम यांनी आपल्या मनोगतातून मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, तालुका गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील, नोडल अधिकारी इम्तियाज म्हैशाळे, नागाव केंद्रप्रमुख कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.
या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस मारापुरे यांनी केले. आभार सौ एस एस गाडेकर यांनी मानले.
या कार्यक्रमास शिरोली व नागाव केंद्रातील सर्व शाळांचे विद्यार्थी ,मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो.....
पुलाची शिरोलीत मतदार जनजागृती अभियानातंर्गत फुग्यांचा गुब्बारा हवेत सोडताना एस.कार्तिकेयन, संजय शिंदे, एकनाथ आंबोकर, कल्पना ढवळे, शबाना मोकाशी, एम.एस.स्वामी व इतर.
No comments:
Post a Comment