कोल्हापूर / प्रतिनिधी
जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर कोणतेही यश सहज मिळवू शकतो याचेच उदाहरण म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.आण्णासाहेब मोहोळकर. अल्पेर-डोजर (एडी) सायंटिफिक इंडेक्स ने ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या टॉप जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये डॉ.मोहोळकर यांना सलग ५ व्यांदा स्थान मिळाले आहे. आपल्या संशोधन अभिवृत्तीस चालना देऊन त्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त झाला आहे. या सर्वेक्षणात ऊर्जा क्षेत्रात शिवाजी विद्यापीठात त्यांनी अव्वलस्थान पटकावले आहे.
संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल डॉ.मोहोळकर यांना आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक क्रमवारीत टॉप २ % शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये सलग ५ व्यांदा स्थान मिळाले आहे. डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने त्यांना अॅडजंट प्रोफेसर म्हणून गौरविले आहे. सध्या ते सौर ऊर्जा, गॅस सेन्सिंग, सुपरकपॅसिटर, वॉटर स्प्लिटिंग, हैड्रोजन एनर्जी इ.विषयावर पुढील संशोधन करीत आहेत.
डॉ. मोहोळकर सातत्याने समाज आणि मूलभूत विज्ञानाशी सुसंगत संशोधनाला प्राधान्य देतात. त्यांनी गरजू, हुशार विद्यार्थ्यांना पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासासाठी परदेशात पाठवून विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण केली आहे .समाजाला विज्ञानाची ओळख करून देणे हे त्यांचे सतत ध्येय असून समाजउपयोगी संशोधनावर त्यांचा भर आहे.
ते सध्या जगभरातील विविध प्रतिष्ठित जर्नल्ससाठी संपादक आणि समीक्षक म्हणून काम पाहतात. त्यांनी आठहून अधिक मोठे प्रकल्प पूर्ण केले असून त्यांना भारत सरकारकडून दीड कोटींहून अधिक निधी मिळाला आहे यामाध्यमातून त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप ऑफर करून त्यांना आर्थिक व शैक्षणिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. एकंदरीतच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रात केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे.
No comments:
Post a Comment