Tuesday, 10 December 2024

कॉपीमुक्त बोर्ड परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शाळांना गृहपाठ



कोल्हापुरात विभागीय मंडळाची १७ डिसेंबर रोजी सभा 

कोल्हापूर / प्रतिनिधी

दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढविणे आणि परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकार मुक्त करण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागीय मंडळाने तिन्ही जिल्ह्यात दोन टप्प्यात शाळाप्रमुखांच्या बैठकांचे आयोजन केले आहे. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात मंगळवार दिनांक मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सभेवेळी पूर्वतयारी करूनच प्राचार्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना विभागीय मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. साताऱ्यात ११ व सांगलीत १२ डिसेंबर रोजी सभा आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दहावी बारावी परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त करून निकालातील गुणवत्ता वाढवण्याचा मनोदय पदभार घेतेवेळी व्यक्त केला होता, त्या दृष्टीने मंडळाच्या हालचाली सुरू झाल्या असून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांच्या बैठकीस महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळेची परीक्षेच्या अनुषंगाने प्रशासकीय, शैक्षणिक, तांत्रिक माहिती मुख्याध्यापक सभेसाठी विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी मागवली आहे. तर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित करण्याबाबत जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

येत्या मंगळवारी सकाळ सत्रात आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले व कागल या सात तालुक्यांची तर दुपार सत्रात करवीर, कोल्हापूर शहर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी व शिरोळ या सहा तालुक्यांची सहविचार सभा कोल्हापुरात होणार आहे. 

शाळा परिसर व वर्गातील सीसीटीव्ही, दिव्यांग विद्यार्थ्यांबाबतची माहिती, नोंदणी व शिक्षण संक्रमण मासिक, चालू वर्षीच्या परीक्षार्थी संख्येत झालेली वाढ किंवा घट, राज्य मंडळ व विभागीय मंडळ संकेतस्थळाचा वापर, मंडळाच्या मोबाईल ॲपचा विद्यार्थी व शिक्षकांकडून वापर, मागील वर्षाच्या निकालाची टप्पेनिहाय माहिती, उल्लास साक्षरता कार्यक्रमातील शाळेचा सहभाग, स्कूल प्रोफाइल, परीक्षक- नियामक, योग्यता व पात्रता प्रमाणपत्र, प्रात्यक्षिक परीक्षेची पूर्वतयारी, शास्त्रीय व लोककला संस्थांची माहिती, खेळाडू एनसीसी स्काऊट गाईड मधील वाढीव गुणांबाबत, प्रीलिस्ट दुरुस्ती, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रयोगवही बाबतची माहिती, टंचाईग्रस्त व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्तीबाबत यासह अनुषंगिक बाबींची शाळाप्रमुख यांनी पूर्वतयारी करून माहितीसह उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे मंडळाने कळवले आहे.

 त्यास अनुसरून कोल्हापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी शाळांना बैठकीपूर्वी एक तास उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनुपस्थित राहिल्यास लेखी कारणे द्यावी लागणार आहेत.

बोर्ड परीक्षेची सर्वंकष माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच येणाऱ्या परीक्षेची आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने विभागातील प्रत्येक जिल्ह्यात दोन टप्प्यात बैठकांचे आयोजन केले आहे.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ

No comments:

Post a Comment