Tuesday, 7 January 2025

विद्या मंदिर मौजे वडगाव शाळेत सावित्रीच्या लेकींचा गौरव

हेरले (प्रतिनिधी )

 मौजे वडगांव (ता . हातकणंगले) येथील विद्या मंदिर मौजे वडगांव या शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींचा गौरव करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ज्येष्ठ अध्यापिका सायली चव्हाण यांनी केले. अध्यापिका सविता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
        पुणे लॉ फर्म च्या वकील दिपाली पाटील आणि मलकापूर वनक्षेत्राच्या वनरक्षक आफ्रिन देवळेकर या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वकील दिपाली पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सांगत आजच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कसे वागले पाहिजे ,याबाबत मार्गदर्शन केले. वनरक्षक आफ्रीन देवळेकर यांनी आपल्या वनरक्षक पदापर्यंतचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांच्या समोर उलघडला.
              यावेळी मौजे वडगावच्या सरपंच सौ कस्तुरी पाटील यांच्या हस्ते दोन्ही प्रमुख पाहुण्यांना गौरवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अमर तराळ यांच्या सहकार्याने दरवर्षी दिला जाणारा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार यावर्षी सई नलवडे या विद्यार्थिनीला देण्यात आला. अमर तराळ यांच्या वतीने विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
                 शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांचा आणि उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा  सावित्रीचा वारसा हे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे होते.
       अतिग्रे रोटरी क्लबचे अध्यक्ष राजू थोरवत यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी थोरवत आणि सावली कांबरे या विद्यार्थिनींनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुतार वहिनी आणि तराळ वहिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी  विशेष परिश्रम घेतले.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण


गुरुबाळ माळी यांना जीवन गौरव तर
संतोष मिठारी व ज्ञानेश्वर साळुंखे यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर : 
   कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांना जीवनगौरव, संतोष मिठारी यांना उत्कृष्ट पत्रकार ( प्रिंट मीडिया शहर ), अशोक पाटील यांना उत्कृष्ट जिल्हा पत्रकार व ज्ञानेश्वर साळुंखे यांना उत्कृष्ट पत्रकार ( इलेक्ट्रॉनिक मीडिया ) असे पुरस्कार जाहीर करण्यात आले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते  व दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, संचालक डॉ. विराट गिरी व बी चॅनेलचे कार्यकारी संपादक ताज मुल्लांनी हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असतील. रविवारी ( दि. १२ जानेवारी २०२५ ) रोजी अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे व सचिव सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धनाजी गुरव यांना उत्कृष्ट सेवा,  दीपक ऐतवडे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार व शिवाजी भोरे यांना उत्कृष्ट सोशल मीडिया नेटवर्क असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 
   याव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके व सीमा भागातील निपाणीसह तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राधानगरी तालुका  बाजीराव विष्णू सुतार (दैनिक पुढारी) हातकणंगले तालुका सचिनकुमार हिंदुराव शिंदे (दैनिक सकाळ) सचिन बाबासो पाटील (दैनिक पुण्य नगरी )शकील इमाम सुतार (दैनिक लोकमत )पन्हाळा तालुका सरदार हिंदुराव चौगुले(दैनिक  लोकमत) नंदकुमार बाबू बुराण 
(दैनिक पुण्य नगरी ) कागल तालुका प्रकाश लक्ष्मण कारंडे( दैनिक पुढारी)  एकनाथ आप्पासो पाटील
(दैनिक पुढारी )निपाणी तालुका  तात्यासाहेब रामचंद्र कदम(दैनिक महासत्ता) चंदगड तालुका संजय मारुती कुट्रे( न्यूज चॅनेल युवा संवाद),करवीर तालुका संभाजी शामराव निकम (दैनिक सकाळ) शाहुवाडी तालुका भिमराव महादेव पाटील (दैनिक तरुण भारत)
  गडहिंग्लज तालुका शिवकुमार प्रकाश संसुदी
( टाईम्स २४ ) शिरोळ तालुका सुभाष इंगळे
(  दैनिक महान कार्य ) जमीर पठाण(दैनिक पुढारी )
 भुदरगड तालुका शिवाजी दिनकर खतकर
( दैनिक पुण्य नगरी) संदीप बाबुराव दळवी
( दैनिक महासत्ता )आजरा तालुका  रवींद्र महादेव येसादे दैनिक लोकमत / दैनिक नवराष्ट्र
गगनबावडा तालुका संतोष निवृत्ती साखरीकर
( संपादक साप्ताहीक दिनदयाळ ) आदी
 १९ पत्रकारांना उत्कृष्ट तालुका पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
   कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन ही कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी कल्याणकारी सेवा करणारी संघटना आहे. या संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध माध्यमातील माध्यम प्रतिनिधींना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्याचबरोबर ग्रामीण  पत्रकारांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उपक्रम राबविले जातात. संघटनेकडे जिल्ह्यातील ४०५ पत्रकार आजीव सभासद असून सुमारे नऊ लाख रुपयांची ठेव आहे. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी जागल्या ही विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात येते. या स्मरणिकेस मिळणाऱ्या जाहिरातीच्या उत्पन्नातून वर्षभरातील विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी दिली. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, जागल्या स्मरणिकेचे संपादक, कौन्सिल मेंबर प्राध्यापक रवींद्र पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी, संघटनेचे कोअर कमिटी मेंबर सतीश पाटील उपस्थित होते.