Tuesday, 30 May 2023

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजचा बारावीच्या निकालाचा चढता आलेख कायम..... !!! आमची पोर लय हुशार !!!!


केंद्रात निकाल एक नंबरी.....!!


मुरगुड विद्यालयाची सह्याद्री कमळकर , वैष्णवी सुतार कला शाखेत कागल तालुक्यात प्रथम
 
तर समरजीत घोरपडे विज्ञान शाखेत केंद्रात प्रथम,प्रज्ञा कदम द्वितीय. निरंजन कुंभार केंद्रात तिसरा....

कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येतील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील सह्याद्री गणपती कमळकर व वैष्णवी आनंदा सुतार या दोघींनी 88.83% मार्क मिळवून कला शाखेत कागल तालुक्यात प्रथम तर समरजीत दीपक घोरपडे याने 82.17 टक्के गुण प्राप्त करून विज्ञान शाखेत केंद्रात प्रथम , तर प्रज्ञा कदम हिने 82 टक्के मार्क मिळवून केंद्रात द्वितीय  क्रमांक पटकावला. निरंजन कुंभार याने 80.33 टक्के गुण मिळवून केंद्रात तिसरा क्रमांक पटकावला. मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज चा 96.67 टक्के निकाल लागला आहे.
    
शाखा निहाय निकालामध्ये विज्ञान विभाग 100 टक्के, वाणिज्य विभाग 96.67 टक्के तर कला विभाग 94. 47% निकाल लागला आहे. प्रविष्ट विद्यार्थी...333, परीक्षेला बसले...331, गैरहजर..2,  एकुण पास...320

शाखा निहाय गुणानुक्रमे ......

विज्ञान शाखा

  समर्जित दीपक घोरपडे (82.17 केंद्रात प्रथम मुरगुड  ), 
प्रज्ञा गणपती कदम( 82केंद्रात दुसरा सोनगे ),  
निरंजन सुरेश कुंभार( 80.33.केंद्रात तिसरा कुरुकली ) प्रतीक्षा संभाजी चौगले( 76.33 चिमगाव)
    
कला शाखा..
   सह्याद्री गणपती कळमकर 88.83 कागल तालुक्यात प्रथम .‌..सुरूपली )
वैष्णवी आनंदा सुतार( 88.83 कागल तालुक्यात प्रथम.निढोरी  ) 
पूजा दत्तात्रय ढोणे( 80 केंद्रात चौथी.यमगे   )
दिशा बबन फगरे (78.50.केंद्रात पाचवा  ) 
वर्षा तानाजी पाटील (78 केंद्रात सहावा,यमगे)
 अनुराधा मारुती शिंदे (75 .50.कंरजिवणे) 
प्रतिक्षा पुंडलिक रजपूत (74 .50, )
आरती राजेंद्र पाटील (74. 17 निढोरी) 
धनश्री तानाजी रेपे( 73 .33 चौंडाळ)

वाणिज्य शाखा..
 मनाली अशोक पाटील( 77. 17 प्रथम)
 साक्षी सदाशिव कळंत्रे( 76 दुसरा)
 तन्वी नामदेव जाधव (72 .67 तिसरा)
 वैष्णवी पांडुरंग पाटील( 72. 50 चौथा)
  
  यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई साहेब, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे ,युवा नेते , पेट्रन कौन्सिल मेंबर , दौलतराव देसाई, कोजिमाशीचे ज्येष्ठ संचालक, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील यांचे प्रोत्साहन व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जुनिअर कॉलेजचा यावर्षीचा निकाल चांगला लागल्याने पालक, विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे.

भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड


हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या विद्यमान संचालक शौमिका महाडिक यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी मागील 3 वर्षे भाजप महिला मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. राज्य कार्यकारिणीत कोल्हापुरातून निवड होणाऱ्या त्या एकमेव महिला पदाधिकारी आहेत. भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याबाबतची घोषणा केली.

आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना नामोहरम करणाऱ्या शौमिका महाडिक यांनी कोल्हापूरच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला आहे. भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्यातील धडाडीच्या महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. गोकुळ मध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराला वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम शौमिका महाडिक यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या राजाराम कारखाना निवडणुकीत महाडिक यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना विरोधक निरुत्तर झाल्याचे चित्र होते. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूरचा बुलंद आवाज आता राज्यभर गाजणार अशी चर्चा आहे.

Sunday, 28 May 2023

हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री. छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा संपन्न

हेरले / प्रतिनिधी

     पत्रकार माजी सरपंच कै. बाळासाहेब कोळेकर यांनी स्थापन केलेली 
श्री.छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था या रोपट्याचे वटवृक्षात रूपातंर संस्थेच्या उत्कृष्ट कारभारामुळे झाले आहे. या संस्थेत २०१७ मध्ये माजी सभापती राजेश पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांनी सत्ता स्थापन करून सभासदांना कर्ज वाटप करून ती कर्जे शंभर टक्के वसुल केली म्हणूनच संस्थेच्या विकासासाठी व ऊर्जितावस्थेसाठी हे कार्य महत्त्वाचे ठरून संस्था नावारूपास आली आहे.सभासदांचे हित समोर ठेवून संस्थेने  ७ कोटी कर्जे वाटप करून वसुल केली, संस्थेने भविष्यात १७ कोटी रुपयांचे कर्जे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री. छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या रौप्य महोत्सव सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
     माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले, गेली चार वर्षात ऊसास तीन हजार रुपये दर मिळाला आहे. मात्र सद्या नांगरट, खते, बी बियाणे यांचे दर वाढले असल्याने एकरी १३ हजार रुपये ऊस उत्पादन खर्च वाढला आहे. तसेच एकरी ऊस उत्पादन ७ टनाने घटले असल्याने ३५ हजाराची पोकळी निर्माण झाली आहे. शेतक-यांचे शेती उत्पादनासाठी विकास सेवा संस्थेतील कर्जांचे फिरवा फिरवीत आयुष्य गेले होते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस पिकास दर मिळविण्यासाठी २००१ सालामध्ये चळवळ सुरू केली.आपल्या संघटनेच्या व्यापक चळवळीने ऊस दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढून विकास झाला आहे.
    प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै. बाळासाहेब कोळेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात सभासदांना भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. संस्थेचे नुतन पदाधिकारी, संचालक , ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचे माजी खासदार राजू शेट्टी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक संचालक स्वप्नील कोळेकर यांनी केले. सरपंच राहुल शेटे, प्रा. राजगोंड पाटील, चेअरमन अशोक मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनिर जमादार, विजय कारंडे आदींनी मनोगते व्यक्त केली.
    माजी सभापती राजेश पाटील म्हणाले, संचालक व सभासदसह सर्वांनी स्फुरण दिल्याने १ कोटीची संस्था ७ कोटीवर गेली. सर्वांनी सहकार्य केले आहे. सभासद अडचणीत असतांना त्यांना संस्थेने सहकार्य केले. त्यामुळे संस्था विकासात्मक घौडदौड करत आहे. सर्वांचे सहकार्य असेच सदैव राहु दे. भविष्य काळात सभासदांना काहीच कमी पडणार नाही.
   डॉ. सनथकुमार खोत म्हणाले, सहकार संस्था चालविताना २ टक्के फायदयामध्ये संस्थेचे प्रशासन चालवावे लागते. जास्तीत जास्त स्वभांडवल उभा केल्यास संस्थेचा विकास होण्यास
 स्व:भांडवल फायदेशीर ठरते त्यासाठी स्वयंभू बना. सहकारा शिवाय जगू शकत नाही. ऊस दर योग्य मिळत नाही.
खर्च पाहता ऊस पिक परवडत नाही. संस्था स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे तरच ऊर्जितावस्था येऊ शकते. सभासदांनी संस्थेत लक्ष दया. तीन संस्था एकत्र येऊन मोठी संस्था उभा करू शकता. खाजगीकरण येऊ लागल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे सहकार जगवा.
  सूतगिरणीचे  चेअरमन माजी जि.प. सदस्य डॉ. अशोक माने म्हणाले,
सहकार चळवळीमुळे सामान्यांना ताकद आहे. बँकांनी योजना लागू केल्या आहेत. विकास योजना सहकार विश्वासावर चालतात. कोल्हापूर जिल्हयात सहकारामुळे हाजारो लोकांना काम मिळाले. सहकार चळवळीने सभासद व शेतकऱ्यांना बळ दिले. माजी खासदार
राजू शेट्टी यांनी चळवळ केली त्यामुळे कारखाने जागे झाले अन शेतकऱ्यांना दर मिळाले.खते, औषधे स्वस्त मिळावेत म्हणून शासनावर दबाव आणला पाहिजे. बेरोजगारांना उदयोग वाढीसाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करावी असे आवाहन केले. या संस्थेने सभासदांना भेट वस्तू वाटप केले हा उपक्रम स्तुत्य आहे.
    या प्रसंगी माजी सभापती सावकर  मादनाईक, जवाहर साखर कारखाना व्हा.चेअरमन बाबासो चौगुले, माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, माजी पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, विलासराव नाईक, लक्ष्मण निंबाळकर, श्रीकांत सावंत,
 उदय चौगुले, अमर वड्ड, ॲड. प्रशांत पाटील, अरविंद चौगुले,  अभयसिंह पाटील,अबुबकर जमादार, आदी मान्यवरांसह विविध सहकार संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.आभार व्हा. चेअरमन कपिल भोसले यांनी मानले.सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
    फोटो 
हेरले: माजी खासदार राजू शेट्टी बोलतांना शेजारी माजी सभापती राजेश पाटील, सावकर मादनाईक, बाबासो चौगुले, अशोक माने,डॉ. सनथकुमार खोत, अशोक मुंडे व अन्य मान्यवर

Friday, 19 May 2023

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना डॉक्टरेट प्रदान


-- तामिळनाडू येथील सालेम- येरकूट येथे शानदार सोहळा ; 
इंटरनॅशनल यु सी एज्युकेशन कौन्सिल विद्यापीठाकडून गौरव 

कोल्हापूर / प्रतिनिधी
 इंटरनॅशनल युसी एज्युकेशन कौन्सिल फ्रान्स विद्यापीठाच्या वतीने  शिरोळचे जेष्ठ पत्रकार व  सामाजिक कार्यकर्ते दगडू श्रीपती माने यांना सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी
प्रदान करण्यात आली.  तामिळनाडू येथील सालेम येरकूट मधील
 हॉटेल आराधना - ईन सेव्हन स्टार सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत  डी-लिट प्रदान चा शानदार सोहळा झाला. यावेळी विद्यापीठाचे प्रमुख विश्वस्त तसेच मान्यवर उपस्थित होते.
     या  समारंभात  इंटरनॅशनल युसी एज्युकेशन कौन्सिलचे
 संस्थापक चेअरमन डॉ एम आय प्रभू,  विद्यापीठ कौन्सिल अँम्बीसिटर डॉ समोचिना इलिना यांच्या हस्ते दगडू माने याना सन्मानपूर्वक डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर  डॉ गणेश वाईकर, हेल्पिग प्लाम्स  फाउंडेशन कर्नाटक डायरेक्टर  डॉ कविता कारामिने,
तमिळनाडू एज्युकेशन डिपार्टमेंट सेक्रेटरी 
डॉ स्वेता जीवननाथम,  तुतीकोरिन 
डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ एम शेथलकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या समारंभात सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       ज्येष्ठ पत्रकार, रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांनी सर्वसामान्य गोरगरीब, उपेक्षित , निराधार व दिव्यांग घटकासाठी गेली 30 वर्षे आदर्शवत कार्य केले असून लोकसेवेसाठी त्यांनी संघर्ष अनुभवला आहे.  महापुराच्या काळात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी  जनजागृती करून प्रशासनाविरोधात त्यानी आंदोलनात्मक लढा दिला . कोरोना काळात नागरिकांना जीवनावश्यक व आरोग्यविषयक  सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काम केले . लोकराजा  शाहू महाराज यांच्या नावाने 25 वर्षे  शाहूू महोत्सव आयोजित करून त्यांनी सामाजिक न्याय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून लोककलेचे संवर्धन केले आहे, कोल्हापूर जिल्ह्यात फुले -शाहू - डॉ आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ते परिचित आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदे तर्फे आचार्य  प्र के अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. जिल्हा व राज्य पातळीवरील समाजरत्न,लोकनायक, समताभूषण, आदर्श रंगकर्मी,  दिव्यांग सेवा गौरव तसेच राष्ट्रीय  संघर्षनायक अशा अनेक पुरस्काराने त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. 
   ---------------

Wednesday, 17 May 2023

मौजे वडगांव येथील मुख्य रस्ता तात्काळ करावामाजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्राद्वारे सार्वजनिक बांधकामकडे मागणी


हेरले / प्रतिनिधी 
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील गौस हजारी ते स्वामी समर्थ केंद्रापर्यंतचा मुख्य रस्ता तात्काळ करावा आशा मागणीचे पत्र माजी आमदार अमल महाडिक यांच्या शिफारस पत्राद्वारे ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर येथील कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .
               सांगली कोल्हापूर फाट्याकडून व मौजे वडगावातून पेठ वडगावकडे जाणारा सार्वजनिक बांधकामकडे वर्ग असणारा गौस हजारी ते स्वामी समर्थ मंदिरा पर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने तो तात्काळ करण्यात यावा . सदरचा रस्ता तीन मीटर रुंदीचा डांबरीकरण न करता. तो दोन्ही साईटच्या गटारी पर्यंत सिमेंट कॉक्रिटचा करणेत यावा. सदरचा मुख्य रस्ता असलेने ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर , मुरुमाचे अवजड डंपर , आशा विविध अवजड वाहनासह इतर मोठी वाहने पेठ वडगांवकडे ये - जा करत असतात. सदरच्या रस्त्यावर गावातील रस्त्यालगतचे रहिवाशी असणाऱ्या ग्रमस्थांची खाजगी वाहने रस्त्यावर पार्किंग करत आसल्याने इतर वाहनांना ये -जा करणे जिकिरीचे होऊन ट्रॉपिक जाम होते. व वादावादीचे प्रसंग घडतात. त्यामुळे हा रस्ता दोन्ही साईटच्या गटारी पर्यंत रुंदीकरण करून कॉक्रिटचा करणेत यावा.
         या शिष्टमंडाळात उपसरपंच सुनिल खारेपाटणे  , माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, माजी ग्रा. पं . सदस्य अविनाश पाटील , ग्रा. प . सदस्य रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले , सामाजिक कार्यकर्ते अमोल झांबरे , यांचा समावेश आहे.

        फोटो
गावातील मुख्य रस्ता तात्काळ व्हावा या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देतांना ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ

Saturday, 13 May 2023

संजय घोडावत अकॅडमीचे जेईई मेन्स 2023 परीक्षेत घवघवीत यश


   हेरले /प्रतिनिधी
जेईई परीक्षेमध्ये संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या 24 विद्यार्थ्यांनी 99 पसे॔टाईल पेक्षा अधिक गुण मिळवून उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली.
     तनिष्क चिरमे(99.97)भक्ती पाटील (99.97)शिवतेज घाटगे(99.82) हर्षल पाटील(99.79) शिवानी साळुंखे(99.69) दुर्वेश गांगवा(99.68) शंतनु बेनके(99.68) युवराज पवार(99.68) आदित्य बोराटे(99.66) मिहीर सहस्त्रबुद्धे(99.65) स्वातम दोशी(99.64) राजवर्धन रेपे (99.51)वैष्णवी मोरे(99.40) प्रणाली पाटील(99.31) श्रेयांक शहा(99.21) शुभम पाटील(99.20)  श्रुतम दोशी(99.18) राजवी शहा (99.17)चारुता कराड (99.14)प्रणव मगदूम(99.09) यश शहा(99.06) वेदांत जाधव(99.00) या विद्यार्थ्यांनी 99 पसे॔टाईल पेक्षा अधिक गुण मिळविले. तसेच अकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांनी फिजिक्स व एका विद्यार्थ्याने मॅथ्स आणि एका विद्यार्थ्याने केमिस्ट्री मध्ये अशा एकूण पाच विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. घोडावत अकॅडमीने सातत्याने गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले आहे.
      अकॅडमीचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अकॅडमीचे संचालक श्रीनिवास (वासू) कोंडूती सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
      याबद्दल बोलताना संचालक श्री वासू म्हणाले,की आयुष्यात ध्येय निश्चित असेल तर आत्मविश्वासाने जिद्दीच्या बळावर कोणतेही यश आपण प्राप्त करू शकतो. हेच या निकालावरून दिसून येते.

Friday, 12 May 2023

छ.शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा तुलनात्मक अभ्यास विषयावर अर्थतज्ञ यशवंत थोरात यांचे 16 रोजी गारगोटी येथे व्याख्यान



पत्रकार शामराव पाटील यांचा होणार गुणगौरव 

कोल्हापूर /प्रतिनिधी 

अनुबोध प्रकाशन संचलित मासिक अनुबोधच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त छ.शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ञ यशवंत थोरात यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम माजी आमदार बजरंग देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संपादक मिलिंद प्रधान यांनी यावेळी दिली. वर्धापन दिनाच्या औचित्य साधून काही संस्था व काही व्यक्तींना गुण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रम गारगोटी येथील शाहू वाचनालयात 16 मे 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे.
      डॉ. अस्मिता प्रधान लिखित कोरोना आणि भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राज्य मीडिया पुरस्कारासाठी किर्लोस्कर ऑइल इंजिन खडकी पुणे (सामाजिक बांधिलकी विभागांतर्गत) शाहू वाचनालय गारगोटी (शताब्दी वर्ष पूर्ण केले) पत्रकार प्रा. शामराव पांडुरंग पाटील यांनी पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ,संभाजी यादव यांना सामाजिक कार्याबद्दल विशेष गुणगौरव पुरस्कार देऊन  यावेळी गौरवण्यात येणार आहे.   
    भुदगडच्या तहसीलदार अश्विनी वरुटे, राधानगरी गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, गडहिंग्लजचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, गगनबावडाचे गटविकास अधिकारी माधुरी परीट, गडहिंग्लजचे गटविकास अधिकारी शरद मगर, चंदगड चे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे,  मौनी विद्यापीठ चेअरमन मधुकर देसाई, विश्वस्त पल्लवी कोरगावकर, गारगोटी चे सरपंच संदेश भोपळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Tuesday, 9 May 2023

चौगुले दांपत्याकडून लोकसेवा शिक्षण संस्थेस एक लाख आकरा हजार एकशे आकरा रुपयेचा धनादेश प्रदान


      हेरले / प्रतिनिधी 
 गेल्या ३ ते ४ दशकापासून गावातील एकही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचीत राहू नये या उद्देशाने १५ जून १९८५ साली स्थापन केलेल्या लोकसेवा शिक्षण संस्था प्रणित बालावधूत हायस्कूलची मुहर्तमेढ रोवलेल्या सदाशिव चौगुले व सोनाबाई चौगुले या दांपत्याचा भव्य नागरी सत्कार लोकसेवा शिक्षण संस्थेच्या वतीने बालावधूत हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आला.
       सत्कार प्रसंगी सदाशिव चौगुले म्हणाले की, भविष्यातील काळाची गरज ओळखून स्थापन केलेल्या या हायस्कूल मधील कित्येक विद्याथी डॉक्टर , इंजिनिअर , शिक्षक, उद्योगपती , आशा विविध क्षेत्रामध्ये आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. याचा मला सार्थ अभिमान असून मला मिळणाऱ्या पेन्शन मधील मी हायस्कूल साठी एक लाख आकरा हजार एकशे आकरा रुपयेचा धनादेश प्रधान करित आहे. सदर रकमेचा धनादेश संस्थेच्या वतीने स्विकारण्यात आला . यावेळी माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
          यावेळी अँड. विजयकुमार चौगुले, कराळे सर , नारायण संकपाळ, कोळेकर सर, श्रीकांत सावंत, रावसो चौगुले, उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रां. प . सदस्य सुरेश काबरे, रघूनाथ गोरड , स्वप्नील चौगुले, अविनाश पाटील , अमोल झांबरे, महादेव शिंदे, आण्णासो पाटील ,अमर थोरवत , मुख्याध्यापक आर. बी. पाटील, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अंजली पाटील यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव संजय चौगुले यांनी मानले.

    फोटो 
लोकसेवा शिक्षण संस्थेस एक लाख आकरा हजार एकशे आकरा रुपयेचा धनादेश प्रधान करतांना चौगुले परिवार

Friday, 5 May 2023

शिक्षण हाच आमचा तरणोपाय --- राजर्षी शाहू महाराज


१९व्या शतकातील बहुजन समाजाला लागलेले दोन मोठे रोग म्हणजे अज्ञान व दारिद्र्य. याचे मूळ कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव म्हणजेच अविद्या. या अविद्येने शूद्रातिशूद्र समाजात किती अनर्थ केले आहेत, याची आपल्या बांधवांना पहिली जाणीव करून देणारे थोर पुरुष म्हणजे महात्मा जोतीराव फुले हे होत.
महात्मा जोतीराव फुल्यांनी शूद्रातिशूद्रांना जागे करून त्यांच्या मुलामुलींसाठी शाळा काढल्या; हयातभर मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांचे हेच कार्य, पुढे शाहू महाराजांनी आपल्या राज्यात चालू ठेवले. शिक्षणाची महती सांगताना महाराज म्हणतात, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात, उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. या बाबतीत आमचा गतकाल म्हटला म्हणजे इतिहासातील एक अंधारी रात्र आहे. फक्त एकाच जातीने विद्येचा मक्ता घेतला होता. मनू आणि त्याच्या मागून झालेल्या शास्त्रकारांनी, त्या त्या वेळेच्या ध्येयाला अनुसरून निरनिराळ्या जातींच्या व्यवहारास बंधनकारक असे निर्बंध रचिले आणि कमी जातींच्या लोकांना विद्यामंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यांचे स्वतःचे धर्मग्रंथ आणि वेद हेसुद्धा वाचण्याची त्यांना मनाई होती."
म. फुल्यांच्याप्रमाणे शाहू छत्रपतींनीही सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला. मागासलेल्या वर्गांची मानसिक गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी त्यांना किमान प्राथमिक शिक्षण तरी दिले गेले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच नाशिकच्या भाषणात त्यांनी उद्गार काढले होते, "खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर व ज्ञानावर, हे जे जड व जुलमी जू लादले गेले आहे, ते झुगारून देण्याची शक्ती बहुजन समाजाच्या अंगी येण्यास सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची फार जरुरी आहे."
तसेच समाज समृद्ध व बलवान करण्यासाठी बहुजन समाजातून उत्तम शेतकरी, उत्तम शिक्षक, उत्तम व्यापारी, उत्तम उद्योगपती, उत्तम सैनिक निर्माण झाले पाहिजेत आणि त्यासाठी शिक्षण-गंगेचे पाट खेड्यापाड्यांतील गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत नेले पाहिजेत, असे शाहू महाराजांना वाटत होते. महाराज उच्च शिक्षणाच्या विरोधात नव्हते; पण जिथे समाजातील मागासलेल्या वर्गास प्राथमिक शिक्षणाची 'कोंड्याची भाकरी'ही मिळत नव्हती, तिथे उच्च शिक्षणाच्या 'पंचपक्वानाच्या ताटा'चा विचार ते करू इच्छित नव्हते. उच्च शिक्षणाचे पंचपक्वान्न झोडणाऱ्या वरिष्ठ वर्गास, समाजातील मागासलेल्या वर्गास प्राथमिक शिक्षणाची कोंड्याची तरी भाकरी मिळते आहे का नाही, याकडे लक्ष देण्याची गरज भासत नव्हती.
मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा आपल्या राज्यात प्रजेसाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, या विषयावर शाहू महाराज, १९१२-१३ सालापासून गांभीर्याने विचार करत होते. पुढे त्यांनी शिक्षणाच्या सार्वत्रिक प्रसारासाठी 'वतनी शिक्षका'सारखे काही अभिनव प्रयोगही केले; पण ते फार यशस्वी झाले नाहीत. १९१७ साली मात्र, त्यांनी या संदर्भात निश्चित पाऊल उचलले. २४ जुलै रोजी महाराजांनी जाहीर केले, “येत्या गणेश चतुर्थीपासून (३० सप्टेंबर) करवीर इलाख्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचे आहे. सध्या असलेल्या सर्व प्राथमिक शाळांतील फी सदर दिवसापासून माफ करण्यात येत आहे.” सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची नियमावली तयार करण्यासाठी करमरकर, मराठे व प्रो. पंडितराव अशा तीन ब्राह्मण शिक्षणतज्ज्ञांची समिती नेमली गेली. एज्युकेशन इन्स्पेक्टर डोंगरे यांच्याकडे अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी सोपविली गेली, तसेच या सक्तीच्या शिक्षण योजनेवर १ लाख रुपये खर्च करण्याचे जाहीर केले गेले. त्यापैकी ८० हजार रुपये दरबार खजिन्यातून तर २० हजार रुपये देवस्थान फंडातून खर्च होणार होते. या रकमेतून खर्च होऊन शिल्लक उरणारी रक्कम ट्रेनिंग कॉलेज, शाळांच्या इमारती, शिक्षणोपयोगी साहित्य यांवर खर्च होणार होती.
लवकरच २१ सप्टेंबर १९१७ रोजी, शिक्षणतज्ज्ञांच्या समितीने तयार केलेल्या नियमावलीवर आधारित असा 'सक्तीच्या शिक्षणाचा कायदा', खास जाहीरनामा काढून प्रसिद्ध करण्यात आला. त्याच्या उद्देशात 'करवीर इलाख्यातील आमच्या सर्व प्रजाजनांना लिहिता-वाचता येऊन आपली स्थिती ओळखून सुधारण्यास समर्थ व्हावे' म्हणून कायदा केल्याचे म्हटले होते. या कायद्यान्वये, 'शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठविण्याची आईबापांवर सक्ती करण्यात आली. त्यांनी तशी पाठविली नाहीत, तर त्यांना प्रत्येकी एक रुपया दर महिना दंड करण्याची तरतूद करण्यात आली.'
प्राथमिक शिक्षण कायद्याची अंमलबजावणी या कायद्याची अंमलबजावणी कसोशीने केली गेली. साधारणपणे ५०० लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात, प्राथमिक शाळा सुरू केली गेली. प्रारंभी गावातील चावडी, देवळे, धर्मशाळा आदी इमारतींत शाळा सुरू केल्या. जिथे अशा इमारती मिळाल्या नाहीत व जिथे एखादे मंदिर असणे आवश्यक वाटले, तिथे देवस्थान निधीमधून तुळजा भवानीचे मंदिर बांधावे आणि त्या मंदिराच्या एका सोप्यात शाळा व दुसऱ्या सोप्यात गाव चावडी ठेवावी, असा आदेश दिला गेला. काही ठिकाणी शाळांसाठी खास इमारती बांधल्या गेल्या. वर्षभरात संस्थानातील खेड्यापाड्यांत अशा ९६ नव्या शाळा सुरू झाल्या. अशा पहिल्या नव्या सक्तीच्या शाळेचा उद्घाटन सोहळा, चिखली गावी खुद्द शाहू महाराजांच्या हस्ते संपन्न झाला (४ मार्च १९१८). शाहूचरित्रकार लठ्यांनी - म्हटले आहे की, या योजनेमुळे सुमारे पाऊण लाख खेडूत लोकांच्या टप्प्यात प्राथमिक शिक्षण प्रथमतः आले आणि त्यांच्यापैकी साडेचार हजारांवर मुले शिक्षण घेऊ लागली.
शाहू महाराज, प्राथमिक शिक्षणावर एक लाख रुपये खर्च करत होते. पुढे ही रक्कम तीन लाखांवर गेली. ही रक्कम आज आपणास किरकोळ वाटत असली तरी, त्याकाळी ती प्रचंड होती. कारण, त्याकाळी शिक्षकाचा पगार १२ रुपये होता. विशेष म्हणजे या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व सिंध इतक्या अफाट प्रदेशांवर पसरलेल्या अख्ख्या मुंबई इलाख्याचीही शिक्षणातील तरतूद एक लाख रुपये इतकी नव्हती. पुढे दहा-बारा वर्षांनी १९३० साली, ही तरतूद एक लाख रुपयाची करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शाहू महाराज आपल्या संस्थानच्या उत्पन्नातून एक लाख रुपये प्राथमिक शिक्षणासाठी खर्च करीत होते, ही गोष्ट हिंदुस्थानच्या शैक्षणिक इतिहासात अपूर्व मानली पाहिजे.महाराजांनी हा पैसा संस्थानातील प्रत्येक घरावर एक रुपया, अशा नाममात्र शिक्षण कराच्या रूपाने उभा केला. या एका रुपयात रयत लोकांच्या घरांतील सर्व पोराबाळांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था महाराजांनी केली होती. समाजात जी इनामदार, सरंजामदार यांसारखी बडी मंडळी होती, त्यांच्या उत्पन्नावर शे. १० ते २० टक्के 'शिक्षणपट्टी' बसविली गेली. यानंतर लवकरच संस्थानातील सावकार, वकील, डॉक्टर व दरबाराचे वरिष्ठ प्रतीचे अधिकारी; यांच्यावरही 'शिक्षणविषयक कर' बसविण्यात आला. अशा प्रकारे प्राथमिक शिक्षण योजनेस भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात आले. प्रजेच्या उद्धाराची खरी तळमळ असेल, तर राज्यकर्त्याला पैसा कमी पडत नाही, हे महाराजांनी आपल्या कृतीने सिद्ध केले होते.
प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. त्यापैकी पहिल्या निर्णयानुसार संस्थानातील अस्पृश्यांसाठी अस्तित्वात असलेल्या शाळा बंद केल्या गेल्या. अस्पृश्यांची मुले आता स्पृश्यांच्या मुलांसोबत शिकू लागली. दुसरा निर्णय शेतकऱ्यांच्या मुलांसंबंधी होता. खेड्यातील शेतकरी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास फारसा राजी होत नसे. याचे एक कारण असे होते की, या मुलांचा शेतीच्या कामात हातभार लागत असे. शेतीवर शेतकऱ्यांचे पोट चालत असल्याने शाळेपेक्षा शेती त्यांना महत्त्वाची वाटत होती. यावर उपाय म्हणून महाराजांनी खेड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सकाळी किंवा संध्याकाळी दोन तास शाळेत यावे व बाकीचा वेळ शेतकामात घालवावा अशी सवलत दिली (जुलै १९१९). यावरून प्राथमिक शिक्षणासंबंधीचे महाराजांचे धोरण किती लवचिक व वास्तववादी होते याची प्रचिती येते.
१९१७-१८ सालात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना कार्यान्वित झाली, त्या वेळी या योजनेखाली २७ शाळा व १२९६ मुले होती. पाच वर्षांच्या कालावधीत, १९२१-२२ सालापर्यंत, त्यात वाढ होऊन शाळांची संख्या ४२० व मुलांची संख्या २२,००७ अशी झाली. १९२२ सालापर्यंत या योजनेवर होणारा खर्च तीन लाखापर्यंत गेला.
सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाच्या योजनेची अंमलबजावणी करीत असता गरीबांच्यासाठी हायस्कूलचे मॅट्रिक्युलेशनपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा विचार शाहू महाराजांच्या मनामध्ये येऊन गेला होता, याचा दाखला त्यांच्या एका आदेशात पाहावयास मिळतो. २५ मार्च १९१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात महाराजांनी म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षणाच्या योजनेवर खर्च करून राहिलेली रक्कम दुसऱ्या कोणत्याही बिगर शैक्षणिक बाबीवर खर्च करावयाची नसून "अशा प्रकारचे शिलकेचा विनियोग सवडीप्रमाणे मॅट्रिक्युलेशन परीक्षेपर्यंत शिक्षण सर्व जातींचे गरीब विद्यार्थ्यांना मोफत देण्याकडे करण्यात येईल.” महाराजांना जर आणखी काही वर्षे आयुष्य लाभते तर त्यांनी हे माध्यमिक शिक्षणही सर्वांसाठी मोफत करून ठेवले असते.
राजर्षी शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने राजे नव्हते तर ते लोकांचे राजे होते.

संग्राहक लेखक:डॉ अजितकुमार पाटील,कोल्हापूर ( पीएच डी,मराठी )

Thursday, 4 May 2023

अविनाश बनगे यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड

हेरले /प्रतिनिधी
   कोल्हापूर जिल्हा दक्षता समितीचे सदस्य व हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश बनगे यांची कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली.
   निवडीचे पत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख  रवींद्र माने यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

मौजे वडगांव दत्तसेवा संस्था चेअरमनपदी अँड. विजय कुमार चौगुले

        हेरले ( प्रतिनिधी ) मौजे वडगांव ता. हातकणंगले येथील श्री दत्त विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी अँड. विजयकुमार चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच सुरेश कांबरे यांनी केले. यावेळी व्हा. चेअरमन महालिंग जंगम, विलास सावंत, शिवाजी जाधव, मधुकर अकिवाटे , दिपक थोरवत, बापू शेटे, प्रकाश कांबळे, आदम हजारी , दिपा सावंत, यांच्यासह माजी सरपंच रावसो चौगुले, आनंदा पोवार, अमोल झांबरे , उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगले निबंधक येथील आर. जी. कुलकणी व सचिव पोपट बेडेकर यांनी काम पाहीले . आभार उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांनी मानले.