Wednesday, 30 October 2024

गणितातील फुले वेचणारे डॉ. दिपक शेटे : उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे


हेरले /प्रतिनिधी

गणितायण लॅब निर्मितीसाठी गेली सोळा वर्ष  देशातील विविध ठिकाणी जाऊन गणिताची विविध मापे वजने यांचा संग्रह करणारे डॉ . दीपक शेटे हे गणितातील फुलेच वेचत आहेत असे गौरव उद्गार जिल्हा परिषद कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षण विभागाचे  उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी काढले .
    डॉ .दीपक शेटे नागाव (ता. हातकणंगले )यांनी सुमारे ४५ लाख रुपयांची स्वखर्चाने तयार केलेली गणितायन डीएम लॅब पाहण्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे सर्व उपशिक्षणाधिकारी व सर्व विस्तार अधिकारी आले होते.त्या प्रसंगी ते बोलत होते.

    गणित हा विषय काही जणांना काटेरी वाटत असला तरी फणसाप्रमाणे आतला  गणितीय गर गोडच आहे . गणिताची हीच गोडी चाखावी या उद्देशाने आज महाराष्ट्राची ओळख बनत असलेली डॉ .दीपक शेटे नागाव तालुका हातकणंगले यांनी सुमारे ४५ लाख रुपयांची स्वखर्चाने तयार केलेली गणितायन डीएम लॅब पाहण्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे सर्व उपशिक्षणाधिकारी व सर्व विस्तार अधिकारी आले होते.गणितायन लॅबमधील  विविध राज्याची मापे,वेगवेगळी वजने,विविध आकाराची तराजू, गुंजू ते तोळा याचा प्रवास, कवडी पासून ते नाणी , विविध दुर्बीण,विविध पेन,वाळूचे घड्याळ ते डिजिटल घड्याळ,विविध मापनाच्या पट्ट्या,विविध देशातील पेन्सिल,गुंटूर साखळी ते मीटर टेप,जुनी गणित व विज्ञान पुस्तके, साडेसहा हजार पोस्ट तिकिटांचा संग्रह, विविध गणितीय तक्ते,नोटांमधील अंकांच्या गमती.
डॉ. दीपक शेटे यांचा सोळा वर्षाचा गणितीय प्रवास ऐकताना व पाहताना सर्वजण आश्चर्यपणे पहात व माहिती घेत होते.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा कसा लाभ देता येईल याविषयी चर्चा झाली .
या सर्वांची माहिती देत असताना  मान्यवरांनी 
जिज्ञाशा पोटी विचारत विविध प्रश्नांची चर्चा घडवून येत होती .या सर्व नाविण्याच्या विविध गोष्टी पहात तब्बल अडीच तास वेळ दिला .
            यावेळी जिल्हा परिषद कोल्हापूर  माध्यमिक विभाग येथील  उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे , विस्तार अधिकारी जयश्री जाधव , विस्ताराधिकारी डी.सी. कुंभार  ,  विस्तार अधिकारी धनाजी पाटील ,विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे  या मान्यवरांनी गणितायन लॅबला भेट दिली.
       फोटो 
 उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे डॉ. दीपक शेटे यांचा सत्कार करतांना त्यांच्या समवेत उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे , विस्तार अधिकारी जयश्री जाधव , विस्ताराधिकारी डी.सी. कुंभार  ,  विस्तार अधिकारी धनाजी पाटील ,विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे आदी मान्य वर.

Monday, 28 October 2024

डॉ.आण्णासाहेब मोहोळकर सलग ५ व्या वर्षी जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीतअनोखा विक्रम; शिवाजी विद्यापीठाला मिळाला आंतरराष्ट्रीय बहुमान


कोल्हापूर / प्रतिनिधी
जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर कोणतेही यश सहज मिळवू शकतो याचेच उदाहरण म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.आण्णासाहेब मोहोळकर. अल्पेर-डोजर (एडी) सायंटिफिक इंडेक्स ने ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या टॉप जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये डॉ.मोहोळकर यांना सलग ५ व्यांदा स्थान मिळाले आहे. आपल्या संशोधन अभिवृत्तीस चालना देऊन त्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त झाला आहे. या सर्वेक्षणात ऊर्जा क्षेत्रात शिवाजी विद्यापीठात त्यांनी अव्वलस्थान पटकावले आहे.
संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल डॉ.मोहोळकर यांना आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक क्रमवारीत टॉप २ % शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये सलग ५ व्यांदा स्थान मिळाले आहे. डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने त्यांना अ‍ॅडजंट प्रोफेसर म्हणून गौरविले आहे. सध्या ते सौर ऊर्जा, गॅस सेन्सिंग, सुपरकपॅसिटर, वॉटर स्प्लिटिंग, हैड्रोजन एनर्जी इ.विषयावर पुढील संशोधन करीत आहेत.
डॉ. मोहोळकर सातत्याने समाज आणि मूलभूत विज्ञानाशी सुसंगत संशोधनाला प्राधान्य देतात. त्यांनी गरजू, हुशार विद्यार्थ्यांना पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासासाठी परदेशात पाठवून विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण केली आहे .समाजाला विज्ञानाची ओळख करून देणे हे त्यांचे सतत ध्येय असून समाजउपयोगी संशोधनावर त्यांचा भर आहे.
ते सध्या जगभरातील विविध प्रतिष्ठित जर्नल्ससाठी संपादक आणि समीक्षक म्हणून काम पाहतात. त्यांनी आठहून अधिक मोठे प्रकल्प पूर्ण केले असून त्यांना भारत सरकारकडून दीड कोटींहून अधिक निधी मिळाला आहे यामाध्यमातून त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप ऑफर करून त्यांना आर्थिक व शैक्षणिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. एकंदरीतच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रात केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे.

सायन्टिफिक टेंपरामेंट आणि क्रिटिकल थिंकिंग विषयावर एक दिवसाची कार्यशाळा संपन्न वैज्ञानिक दृष्टी आणि चिकित्सक विचारांनी विवेकी समाज घडविणे शक्य - अंजली चिपलकट्टी


      हेरले / प्रतिनिधी
वैज्ञानिक प्रवृत्ती आणि चिकित्सक बुद्धीच्या विकासाने माणूस संवेदनशिल आणि विवेकी बनतो. आजच्या धर्माध आणि विद्वेषी वातावरणात विवेकी विचार घडविणाऱ्या कार्यशाळेला विशेष महत्व आहे. असे 
अंजली चिपलकट्टी यांनी प्रतिपादन केले. 
सेंटर फॉर रेनेसाँ , हेरले या रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूटच्या वतीने कॉलेज युवकांसाठी एक दिवसाची कार्यशाळा रविवार  रोजी आयोजित करण्यात आली होती. माणूस असा का वागतो? या पुस्तकाच्या लेखिका अंजली चिपलकट्टी (पुणे) यांनी तज्ञ म्हणून या कार्यशाळेत त्यांनी मांडणी केली. 
      कोल्हापूर, सांगली, आणि सातारा जिल्ह्यातील कायदा , मेडिसिन , एआय , कॉम्पुटर सायन्स , मेकॅनिकल इंजिनियर , नॅनो सायन्स , स्ट्रक्चरल इंजिनिअर अशा विविध शाखेतून ६० हुन अधिक विध्यार्थ्यानी या कार्यशाळेत भाग घेतला . या कार्यशाळेत वैज्ञानिक वृत्ती आणि  चिकित्सक विचारक्षमता म्हणजे काय ? मानवी विकास प्रक्रियेमध्ये मेंदूचा विकास कसा घडला ?परिणामी आज आपल्या विकसित मेंदूच्या क्षमता काय आहेत ? त्यांचा विकास कसा होतो ? केला जाऊ शकतो ? या विषयावर पहिल्या सत्रात मांडणी आणि चर्चा झाली . 
दुसऱ्या सत्रात माणसामध्ये निसर्गतः चिकित्सक प्रवृत्ती आणि  विचार करण्याची क्षमता आहे . त्यामुळे माणूस भौतिक गरजांच्या पलीकडे भावनिक आणि आध्यात्मिक अंगानी सुद्धा विचार करतो. त्यामुळे खासकरून धर्मविचाराचा विकास कसा झाला ? आज संघटित धर्म कसा घडला ? त्याचे राजकीय सांस्कृतिक आणि मानवी संबंधावर काय परिणाम होतात ? या विषयावर सखोल मांडणी झाली . विविध उदाहरणे , कोडी आणि विचार प्रवृत्त करणारे प्रश्न देवून विद्यार्थ्यांना अंजली चिपलकट्टी यांनी बोलते केले त्यामुळे अत्यंत सघन चर्चा घडली. माणसाचा विचार बंधिस्त झाला कि त्याचा व्यवहार संकुचित होतो . अशा माणसांना प्रोपगंडा आणि वास्तव यात फरक समजत नाही ही माणसे धार्मिक कट्टरता आणि भडक अतिरेकी अहंकारी विचारधारेला सहज बळी पडतात .  
   या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन बशीर पठाण , मुन्ना पठाण, मुसा शेख, रेहाना मुरसल, रासिका मुल्ला , गौस खतीब, डॉ. सुरज चौगुले , डॉ.झाकीरहुसेन संदे , मोहम्मद सैफ मुल्ला आदीने केले.
         फोटो 
हेरले: सायन्टिफिक टेंपरामेंट आणि क्रिटिकल थिंकिंग विषयावर  कार्यशाळेत बोलतांना अंजली चिपलकट्टी

Sunday, 27 October 2024

संजय घोडावत विद्यापीठामध्ये विधानसभा मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण

हेरले / प्रतिनिधी

प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण सत्रांमध्ये जे प्रशिक्षण दिले जात आहे. ते अगदी मनापासून व शांतपणे आत्मसात करावे जेने करून प्रत्यक्ष मतदाना दिवशी कोणत्याही अडचणी शिवाय मतदान प्रकिया सुरळीतपणे पार पाडता येईल. लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन २७८ हातकणंगले विधानसभा ( अ.जा)मतदार संघाचे
निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी केले.
      ते संजय घोडावत विद्यापीठामध्ये आयोजित २७८ हातकणंगले विधानसभा (अ.जा.) मतदार संघाच्या वतीने आयोजित पहिले प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते.

   निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम पुढे म्हणाले सर्व मतदान केंद्रावरती नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर प्रशासन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व सहकार्य करीत राहील. प्रशिक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मनामध्ये किंतू-परंतू न ठेवता आपल्या शंकाचे निरसन  अधिकाऱ्यांकडून घ्यावे व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी.
      संजय घोडावत विद्यापीठामध्ये शनिवार दि.२६ व रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी दोन सत्रामध्ये प्रशिक्षण आयोजीत केले आहे. शनिवार सकाळच्या सत्रांमध्ये मतदान अधिकारी प्रशिक्षणार्थी  केंद्राध्यक्ष - (८२)क्रमांक एक मतदान अधिकारी  (११३ )  क्रमांक दोन व क्रमांक तीन मतदान अधिकारी ( २१४ ) सह एकूण ३९९ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.दुसऱ्या सत्रांमध्येही - ३९९ पैकी वरील संख्येप्रमाणेच मतदान अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १५९२ मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.प्रथम दिनी दोन्ही सत्रातील प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.
       या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी अजय नरळे, निवडणूक नायब तहसिलदार संजय पुजारी, निवासी नायब तहसिलदार संदीप चव्हाण,मणुष्यबळ व्यवस्थापक सुरेश बन्ने, गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगले आदींचे मार्गदर्शन लाभले.

    फोटो 
 मार्गदर्शन करतांना निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम,
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर आदीसह शेजारी अन्य मान्यवर.

Friday, 18 October 2024

हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी पदी रवींद्रनाथ चौगुले रुजू

       हेरले / प्रतिनिधी
हातकंणगले पंचायत समिती शिक्षण विभागात 
गटशिक्षणाधिकारी पदी रवींद्रनाथ चौगुले रुजू झाले आहेत. उपशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगुले हे शिक्षण उपनिरीक्षक पदी उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे ऑगस्ट २०२१ पासून तीन वर्षे कार्यरत होते. तेथून त्यांची बदली हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी पदी झाली आहे.त्यांनी करवीर येथे तीन वर्षे गटशिक्षणाधिकारी पदी व भुदरगड तालुक्यात ४ वर्षे गटशिक्षणाधिकारी पदी कार्य केले आहे.तसेच नूतन विस्तार अधिकारी पदी नेमिनाथ पाटील व विस्तार अधिकारी पदी गुलाब गंजेली हे दोन विस्तार अधिकारी पदोन्नतीने रुजू झाले आहेत.

Saturday, 5 October 2024

शैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षण एक समन्वय : डॉ अजितकुमार पाटील, केंद्रमुख्याध्यापक - कोल्हापूर.

कोल्हापूर : 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये शैक्षणिक स्तरांची पुनर्रचना करण्यात आली. ही पुनर्रचना प्रामुख्याने अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र पद्धतींशी संबंधित आहे. या धोरणात सुचविल्यानुसार, ५+३+३+४ या नवीन संरचनेमध्ये, वय वर्षे ३-८ या पहिल्या पाच वर्षांच्या टप्प्याला 'पायाभूत स्तर' असे संबोधण्यात आले आहे. या स्तरावर देण्यात येणाऱ्या शिक्षणाची मूलतत्त्वे कोणती असावीत यावर धोरणामध्ये सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. या विवेचनाच्या आधारे पायाभूत स्तरासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (२०२०) व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (२०२२) यांतील आशयाचा संदर्भ घेऊन, महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक पार्श्वभूमीला सुसंगत ठरेल, अशा प्रकारे हा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे.

अभ्यासक्रम :

अभ्यासक्रम म्हणजे, शिक्षणाची ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने, कोणत्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध अनुभवांची सुसंबद्ध रचना.

अभ्यासक्रमामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो :

ध्येये, लक्ष्ये, पाठ्यक्रम, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा आशय, शिक्षणशास्त्रीय पद्धती आणि मूल्यमापन, शैक्षणिक साधने, शैक्षणिक वातावरण, शिक्षण व्यवस्थेची संस्कृती इ. काही घटक असे आहेत, की त्यांचा अभ्यासक्रमाशी जवळचा संबंध आहे आणि ते अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर प्रत्यक्ष परिणाम करतात. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी शिक्षक आणि त्यांच्या क्षमता, पालक आणि समुदायाचा सहभाग, शिक्षणसंस्थांमधील प्रवेशप्रक्रिया, उपलब्ध साधने, प्रशासन व्यवस्था हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात.
*अभ्यासक्रम आराखडा* :

भारतातील वैविध्य लक्षात घेऊन, ते जोपासणारे अभ्यासक्रम विकसित करू शकणाऱ्या, सक्षम शैक्षणिक संस्था आणि शिक्षणवेत्ते देशामध्ये तयार होतील, असे भाकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये केले आहे. अशाच प्रकारे आपल्या राज्यातील वैविध्य लक्षात घेऊन, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सर्व राज्ये संविधानानुसार व RTE नुसार वचनबद्ध आहेत हीच अपेक्षा अभ्यासक्रम आराखड्याकडूनही केली जाते. आराखड्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे, ध्येये आणि संरचना यांचा अंतर्भाव असतो. या घटकांच्या आधारे पाठ्यक्रम, अध्ययन-अध्यापन साहित्य, कार्यपुस्तिका, पाठ्यपुस्तके आणि मूल्यांकन पद्धती विकसित करणे अपेक्षित आहे.

*राज्य अभ्यासक्रम आराखड्याची उद्दिष्टे* :

धोरणामध्ये सांगितल्याप्रमाणे  अभ्यासक्रम व शिक्षण पद्धती यांच्याद्वारे राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, हे राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे उद्दिष्ट आहे. हा बदल केवळ शिक्षणविषयक
बालकांचे संगोपन आणि शिक्षण' अशी केली जाते.0

*पायाभूत स्तर*

अ) *प्रामुख्याने घरामध्ये व्यतीत होणारा कालावधी* : वय वर्षे ० ते ३ बहुतांशी बालकांचा जन्मापासून तिसऱ्या वर्षापर्यंतचा काळ, हा प्रामुख्याने घरातील वातावरणात, कुटुंबासमवेत जात असतो, तर काही बालकांचा हाच काळ पाळणाघरात जातो. वयाची तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर, बहुतांश बालके त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण काळ हा अंगणवाडी आणि पूर्वप्राथमिक शाळा अशा प्रकारच्या संस्थात्मक व्यवस्थेमध्ये घालवतात. तीन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या बालकांना संस्थात्मक व्यवस्थेमार्फत गुणवत्तापूर्ण व शास्त्रशुद्ध शालापूर्व शिक्षण देण्यात यावे, हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील अनेक प्राधान्यांपैकी एक मुद्दा आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत घरातील वातावरण हे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण यांचा पाया तयार करते. पोषक आहार, आरोग्याच्या चांगल्या सवयी, सुजाण संगोपन, सुरक्षा आणि संरक्षण तसेच प्रारंभिक बाल्यावस्थेतील अध्ययनासाठी दिले जाणारे उत्तेजन इ. घटक एकत्रितपणे या वयोगटाची पायाभरणी करतात.
वयाच्या तिसऱ्या वर्षाच्या आधी घरातून मिळणाऱ्या प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षणामध्ये केवळ खेळ, सुरक्षितता व पोषण यांचाच समावेश होतो असे नाही, तर संभाषण, खेळ, हालचाल, संगीत व ध्वनींचे श्रवण तसेच दृष्टी व स्पर्श या संवेदनांचे उत्तेजन यांचाही समावेश होतो, त्यामुळे तिसऱ्या वर्षाच्या शेवटी सर्वांगीण विकासाच्या शारीरिक व कारक, बोधात्मक, सामाजिक, भावनिक, संख्याज्ञान व भाषा या सर्व क्षेत्रांमध्ये बालके इष्टतम संपादणूक प्राप्त करतील. याठिकाणी असे लक्षात घेतले पाहिजे, की सर्वांगीण विकासाची सर्व क्षेत्रे परस्परव्यापी अर्थातच परस्परावलंबी आहेत.
वय वर्षे ०-३ वयोगटाच्या बालकांसाठी घरामध्ये दिले जाणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सक्षम करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि पद्धती, महिला आणि बाल विकास विभागामार्फत (MWCD) विकसित आणि प्रसारित केलेल्या आहेत.
ब ) संस्थात्मक व्यवस्थेमध्ये व्यतीत होणारा कालावधी वय वर्षे ३ ते ८
वय वर्षे ३ ते ८ वयोगटातील बालकांसाठी संस्थात्मक व्यवस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे सुयोग्य आणि गुणवत्तापूर्ण प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण (ECCE), हे सर्व बालकांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. राज्यात संस्थात्मक व्यवस्थेतर्फे सामान्यतः प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सर्वसामान्यपणे खालीलप्रमाणे कार्यान्वित केले जाते.
१) वय वर्षे ३ ते ६ वय वर्षे ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी अंगणवाड्या, बालवाड्या आणि
खाजगी बालशिक्षण केंद्रांतून प्रारंभिक बाल्यावस्था शिक्षण दिले जाते.
२) वय वर्षे ६ ते ८ : वय वर्षे ६ ते ८ या वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण (इयत्ता १ ली आणि इयत्ता २री) हे शासकीय अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधून दिले जाते.
बालकांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते आठ वर्षांपर्यंत, प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण यामध्ये आरोग्य, सुरक्षितता, संगोपन आणि पोषण या बाबींकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः पुढील घटक जास्त महत्त्वाचे आहेत. स्व-मदत कौशल्ये, कारक कौशल्ये, स्वच्छता, घरच्यांपासून दुरावण्याची चिंता हाताळणे, हालचाल आणि व्यायामा‌द्वारे शारीरिक विकास, पालक व इतरांपर्यंत विचार आणि भावना पोहोचविणे आणि व्यक्त होणे, आपल्या समवयस्कांच्या बरोबर सहजतेने वावरणे, काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ देणे, नैतिक विकास व चांगल्या सवयी रुजविणे इ.

(SCF) महत्त्वाचा आहे.पायाभूत सुविधा आणि इतर बाबी कार्यान्वित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, त्यामानाने अभ्यासक्रम आणि शैक्षणिक बदल समांतर आणि जलद गतीने होऊ शकतात. राज्यातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा घडवून आणणे, हे राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे उद्दिष्ट आहे.
*जगभरातील पायाभूत शिक्षणासंबंधीचे विचार*

जगभरात रुसो, फ्रोबेल, ड्युई, मॉन्टेसरी, एरिकसन आणि पेस्टॉलॉजी सारखे विचारवंत बालशिक्षण चळवळीचे प्रवर्तक होते.

दैनंदिन अनुभव हे शिकण्याच्या उत्कृष्ट संधी देतात, यावर ड्युई यांनी भर दिला आणि त्यांच्या मते, बालकाच्या स्वप्रवृत्ती, कृती आणि आवड हे शिक्षणाचे आरंभबिंदू असावेत. तात्पर्य असे आहे, की बालक त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार आजूबाजूच्या वातावरणात सहभागी होत असते म्हणून, शिक्षकांनी बालकाच्या तात्कालिक सामाजिक वातावरणानुसार आणि आवडीनुसार विषय निवडले पाहिजेत. फ्रोबेल यांच्या मते कृती आणि प्रत्यक्ष निरीक्षण हे बालकांना शिक्षित करण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत; म्हणजेच बालकांसोबत खेळण्यामध्ये आणि इतर कृतींमध्ये रममाण होणारा एक सजग शिक्षक, प्रभावी अध्ययन-अध्यापनासाठी महत्त्वाचा असतो.

अलीकडच्या काळातील पियाजे, ब्रूनर, वायगॉटस्की, उरी ब्रॉनफेनब्रेनर आणि गार्डनर यांसारख्या वैकासिक मानसशास्त्रज्ञ आणि बालविकास तज्ज्ञ यांच्या संशोधनानुसार, खेळ आणि कृती यांवर आधारित बालकांच्या नैसर्गिक शिक्षण पद्धतींवर भर दिला आहे, तसेच अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ बालकाच्या अध्ययनावर आणि विकासावर परिणाम करतात असे वरील तज्ज्ञांचे मत आहे.

जॉन पियाजे यांच्या मते, बालके अनुभव व ज्ञान आत्मसात करतात, आपल्या आकलनानुसार समजून
घेतात व ज्ञानाची निर्मिती करतात. बालके अनुभव समजून घेण्यासाठी सतत नवीन माहिती आत्मसात करतात. वायगॉटस्कीच्या मते, बालक सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभवांमध्ये सक्रियपणे गुंतलेले असते, तसेच अध्ययनाच्या आणि विकासाच्या प्रक्रियेत बालके आणि इतर अनुभवी व्यक्ती यांमध्ये सक्रिय आंतरक्रिया होत असते; म्हणजेच बहुवर्ग, बहुस्तरीय वर्गांमध्ये; जेथे समवयस्कांकडून शिकणे शक्य असते, अशा बालकांचे लहान गट पाडून कृती घेण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. जेरोम ब्रुनर यांनी प्रस्तावित केले, की बालकांनी त्यांच्या स्मृतीमधील माहितीचे आणि ज्ञानाचे सादरीकरण, कृती, प्रतिमा, भाषा, चिन्ह यांवर आधारित केले पाहिजे. हे वलयाकार अभ्यासक्रम या संकल्पनेद्वारे, कसे शक्य होऊ शकेल, याचे स्पष्टीकरण दिले आहे; ज्यामध्ये माहितीची रचना

5555
करणे समाविष्ट होते; जेणेकरून जटिल / कठीण कल्पना प्रथम सोप्या स्तरावर शिकवल्या जाऊ शकतात. जेथे बालके ठोस अनुभवांद्वारे शिकतात आणि नंतर अधिक काठिण्यपातळीवर पुन्हा ते विचार अनुभवतात, (म्हणजेच वलयाकार/पुन्हा फिरून येणे.) म्हणून हळूहळू वाढत जाणाऱ्या काठिण्यपातळीनुसार घटक शिकविला जातो. याचे तात्पर्य असे की, वर्गामध्ये स्पष्टीकरणासाठी अशा विविध पद्धती वापरल्या गेल्या पाहिजेत. (जसे प्रत्यक्ष, चित्र-आधारित आणि भाषा किंवा चिन्हावर आधारित.) सुरुवातीच्या वर्षांच्या अभ्यासक्रमात पूर्ण तीन वर्षांच्या कालावधीसाठी बालकांच्या समान गटासाठी मध्यवर्ती कल्पना किंवा विषयाची पुनरावृत्ती करण्याचा हाच आधार आहे.या विचारांमुळे अभ्यासक्रमाचा आशय निश्चित करण्यामध्ये संवेदनात्मक व व्यावहारिक कृतींना स्थान मिळण्यास मदत झाली. भारतीय विचारवंतांनीदेखील त्यांच्या निरीक्षणाधारे बालक व त्याच्या आवडीचा विचार करून कृतींमध्ये विविध अध्ययन-अध्यापन साधनांचा वापर करण्याचे सुचविले आहे. यामुळे खेळ, कला, ताल, बडबडगीते, शारीरिक हालचाली, शोध घेणे याचा पायाभूत स्तरावरील शिक्षणात समावेश झाला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चा दृष्टिकोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये, भारतीय लोकमानसात रुजलेल्या शिक्षण व्यवस्थेची कल्पना केली आहे. ही व्यवस्था समाजात परिवर्तन घडवेल, शाश्वतपणे एक समान आणि चैतन्यपूर्ण ज्ञान देईल, तसेच सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवेल.

अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दल मूलभूत कर्तव्ये, घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना, नातेसंबंध, बदलत्या जगात आपल्या भूमिका तसेच जबाबदाऱ्या यांबद्दल जाणीवपूर्वक जागरूकता निर्माण होईल, असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये नमूद केले आहे.

मन, बुद्धी व कृतीत भारतीय असण्याचा अभिमान खोलवर बिंबवणे. तसेच ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि संवेदनशीलता बालकांमध्ये विकसित करणे हा या धोरणाचा मुख्य हेतू आहे, त्यामुळे मानवी हक्कांची जाणीव, शाश्वत विकासमूल्ये आणि विश्वबंधुत्वाची भावना प्रतिबिंबित होणारा तो बालक एक उत्तम जागतिक नागरिक बनेल.
पायाभूत स्तरावर बालके कशी शिकतात
बालके स्वभावतःच अध्ययनार्थी असतात. बालके क्रियाशील असतात, अध्ययनास उत्सुक असतात आणि नावीन्यपूर्ण गोष्टींमध्ये रस घेऊन प्रतिसाद देतात. त्यांच्यात कुतूहलाची सहज भावना असते. बालकांकडे सभोवतालचे जग जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या आंतरिक कुतूहलातून, आश्चर्य व्यक्त करणे, प्रश्न विचारणे, शोध घेणे यांद्वारे सभोवतालची परिस्थिती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. कुतूहलाच्या भावनेतून कृती करताना त्यांचे शोध घेणे, शिकणे सुरू राहते.

*बालके कृती आणि खेळातून सर्वोत्तमरीत्या शिकतात*. 
बालकांना धावणे, उड्या मारणे, रांगणे आणि तोल सांभाळणे आवडते. ते पुनरावृत्तीचा आनंद घेतात. ते लयीला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. ते बोलतात, विचारतात आणि ते तर्क करतात, तसेच त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. शोध, प्रयोग व कृती यांचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष अनुभवांद्वारे ते शिकतात.साहित्य, कल्पना, विचार आणि भावना यांच्या माध्यमातून बालकांची सर्जनशीलता, लवचीक विचार आणि समस्या सोडवण्याच्या क्षमता विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे एकाग्रता, लक्ष आणि चिकाटी वाढते. वास्तविक परिस्थितीची पुनर्रचना अथवा काल्पनिक जगाची निर्मिती करताना, बालके त्यांचे विचार, शब्दसंग्रह, कल्पनाशक्ती, संभाषण व श्रवण कौशल्य खेळाद्वारे विकसित करतात.
पायाभूत स्तरावर अध्ययन ही एक क्रियाशील आणि परस्परसंवादी प्रक्रिया आहे. बालके खेळातून आणि इतर बालकांशी होणाऱ्या आंतरक्रिया व अधिक अनुभव असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधत शिकतात. बालके त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभवांद्वारे क्रियाशील होतात. बालके त्यांच्या धारणा आणि पूर्वानुभव यांच्याआधारे सतत नवीन माहितीचा अर्थ लावण्यात क्रियाशील होतात.बालके इतरांसोबत सक्रिय सहभागी झाल्यामुळे, तसेच त्यांच्यातील स्वतंत्र
अध्ययन कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, नवनिर्मिती व समस्या निराकरण यांना नैसर्गिक व वास्तववादी साहित्यांच्या वापराने विकसित होण्याची संधी दिल्यामुळे त्यांचे खेळणे आणि खेळकरपणा अधिक समृद्ध होतो.
पायाभूत स्तरावरील बालकांचे अध्ययन त्यांच्या सभोवताली असणाऱ्या व्यक्ती सोबतच्या हितसंबंधांशी निगडित असते, म्हणून असे हितसंबंध जोपासणे आवश्यक असते. यामुळे बालके स्वतःला सुरक्षित समजतात, तसेच ते आशावादी, जिज्ञासू व सुसंवादी होतात.
*बालकांना निसर्गतः कृतीतून खेळ आवडतात*
विद्यार्थ्यांना कृतीतून खेळायला आणि त्यात सक्रिय राहायला आवडते. खेळणे आणि शिकणे ही द्विमार्गी परस्परावलंबी प्रक्रिया आहे. खेळामुळे बालकांना इतर प्रौढांशी आणि बालकांशी सामाजिक संवाद साधण्यास व अध्ययन सक्षम होण्यास संधी मिळते.
जेव्हा आपण खेळात गुंतलेली बालके पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येते, की : खेळात पर्यायांची निवड करण्यास वाव आहे बालके जेव्हा खेळत असतात, तेव्हा ती त्यांचे ध्येय निवडतात व त्याची निश्चिती करतात. (उदा., मला कोडे पूर्ण करायचे आहे, ब्लॉकचा टॉवर बनवायचा आहे किंवा बाहुलीघरात चहा बनवायचा आहे). या प्रकारे निवड त्यांना सक्रिय आणि व्यस्त ठेवते.खेळात आश्चर्य आहे खेळ हे बालकांना विचार करण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करतात. (उदा. फुगा इतका मोठा होत आहे, पतंग आकाशात किती दूर गेला आहे, रुमाल कुठे गायब झाला आहे ही जादू आहे का?).
*खेळातुन आनंददायी शिक्षण*
 बालके ही राष्ट्रीय संपत्ती आहे. विद्यार्थी स्वतःमध्येच आनंदी रहात असतात आणि खेळण्यासाठी आतुर असतात. बालके जे जे करतात, ते आवडीने करतात. त्यातून अर्थपूर्ण सामाजिक आंतरक्रिया घडून येतात व शिकत राहण्याची इच्छा वृद्धिंगत होते. या कृतींमधून, बालके जगाची जाणीव करून घेणे, समस्या सोडवणे, स्वतःबद्दल शिकणे, इतरांबद्दल शिकणे आणि भाषा व गणित या सर्व गोष्टी शिकत असतात, अशा प्रकारे बालकांचे अध्ययन आणि विकास यांचा केंद्रबिंदू खेळ हा आहे. विकासाची सर्व क्षेत्रे व अभ्यासक्रमाची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खेळ हे बालकांना अनेक संधी उपलब्ध करून देतात. निवड, आश्चर्य आणि आनंद हे बालकांच्या खेळाचे प्रमुख पैलू आहेत. निवड, आश्चर्य आणि आनंद या तीन पैलूंच्या आधारे बालकांची वर्गांतर क्रिया अधिक उत्तम होणे सुलभ होईल.बालके खेळताना सक्रिय असतात: सभोवतालच्या जगाशी आंतरक्रिया करून त्याची अनुभूती घेत असताना, माहितीची मांडणी करतात, नियोजन करतात, कल्पना करतात, बदल सुचवितात, परस्परांबद्दल मते मांडतात, विस्तार करतात, शोध घेतात आणि नवनिर्मिती करतात.

*खेळातून अध्ययन कला*
बालक शिकत असतांना हस्तकला, संगीत, हालचाल बालके कलेच्या माध्यमातून कोणत्याही अडथळ्याविना स्वतःला व्यक्त करतात, कल्पना करतात आणि निर्मिती करतात. कलांचे मुक्त स्वरूप आणि खेळकर स्वरूप स्व-अभिव्यक्ती, अंतर्ज्ञान, तर्कशक्ती, कल्पनाशक्ती आणि संप्रेषणाला प्रोत्साहन देतात. बालकांना चित्र काढणे, रंगवणे, छाप उठवणे, कोलाज तयार करणे, ठोकळ्यांची रचना करणे यांसाठी विविध संधी मिळणे आवश्यक आहे. बालकांना विविध शारीरिक हालचाली करणे, नाचणे, शोधणे आणि स्वतःच्या शारीरिक हालचालींत सुधारणा करणे आणि वाद्य वाजवणे देखील आवडते.

*खेळातून अध्ययन संभाषण, कविता, कथा यांचे शिक्षण*

बालकांना संभाषण, कथा आणि कवितांमधून अध्ययनाचा आनंद मिळतो. बालकांस स्वतःला सादर केल्यामुळे, अंदाज बांधण्यासाठी प्रोत्साहित केल्यामुळे आणि संदर्भीय प्रश्न विचारण्याने त्यांच्यामध्ये कुतुहलाची नैसर्गिक भावना, सखोल विचार कौशल्ये व मूल्ये विकसित होण्यास मदत होते. संबंधित प्रश्न विचारणे, शब्दकोडी किंवा कोडी यांमुळे बालकांच्या अध्ययनास पूरक आधार प्राप्त होऊन आकलनाच्या नवीन स्तरावर जाण्यास मदत होते.बालकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे, त्यांच्या प्रश्नांना अर्थपूर्ण प्रतिसाद देणे, त्यांना आवड निर्माण होण्यासाठी संबंधित योग्य ते प्रश्न विचारणे आणि विचार करण्यास प्रवृत्त करणे यांमुळे बालकांना अध्ययन करण्यास मदत होते.
बालकांना संभाषण, कविता आणि कथांद्वारे गुंतवून ठेवणे, हा देखील त्यांच्याशी पोषक आंतरसंबंध जोपासण्याचा एक चांगला मार्ग आहे.
*कृतीयुक्त खेळ व आनंद* 
कृतीयुक्त खेळातून बालक अध्ययन साहित्य, खेळणी खेळण्याचा वापर करून खेळणे यातून बालके आनंद घेतात आणि शिकतात. बालकांना खेळणे हाताळता येईल व त्यांना तोडता जोडता येईल, त्याआधारे ते स्वतः विचार करू शकतील, अशा आनंददायी व अर्थपूर्ण खेळ कृतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही वस्तू या खेळणी असू शकतात. बालकांना शिकण्यासाठी महागड्या किंवा विशेष खेळण्यांची गरज नसते, हे दाखवण्यासाठी पुरेसा अनुभव आणि पुरावे आहेत. लहान बालकांसाठी खेळणी वापरल्याने, कारक कौशल्ये आणि हस्त-नेत्र समन्वय, अवकाशीय तर्क, बोधात्मक लवचिकता, भाषिक कौशल्ये, सर्जनशील क्षमता, भिन्न विचार करण्याची क्षमता, सामाजिक क्षमता आणि अभियांत्रिकी कौशल्ये सुधारतात.

*खेळातून अध्ययन सभोवतालच्या उपलब्ध वातावरणाचा वापर करणे*
बालके स्वाभाविकरीत्या जिज्ञासू असतात आणि त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाचा शोध घेणे, प्रयोग करणे, हाताळणे, निर्मिती करणे आणि जाणून घेणे यांसाठी संधींची आवश्यकता असते. बालके त्यांच्या इंद्रियांद्वारे वातावरणाचे निरीक्षण करतात, वस्तू स्पर्श करून, धरून, हाताळून पाहतात, आवाज ऐकतात, संगीत आणि ताल यांचे श्रवण करून त्या आवाजांना प्रतिसाद देतात, वेगळ्या आवाजाने उत्साहित होतात.

जस जशी बालके हे लोक, वस्तू आणि वास्तविक जीवनातील परिस्थितीचे प्रत्यक्ष अनुभवांद्वारे अवलोकन करत शिकत असतात.त्याप्रमाणे त्यांची विचारसरणी विकसित होत जाते. बालके त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर आणि संदभाँवर, तसेच त्यांच्या स्वतःच्या क्षमतेच्या आधारावर त्यांच्या कल्पना, आवडी, समजुती मांडतात.
जेव्हा शिक्षक आणि कुटुंब, बालकांना त्यांच्या सभोवतालचे जग समजून घेण्याची, प्रयोग करण्याची, शोध घेण्याची, तुलना करण्याची, प्रश्न विचारण्याची, जवळून निरीक्षणे करण्याची, विचार करण्याची आणि त्यांची निरीक्षणे आणि अंदाजांबद्दल बोलण्याची संधी देतात, तेव्हा त्यांना त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्यास आणि अधिक शोध लावण्यास मदत होते. घरातील आणि शाळेतील प्रत्यक्ष अनुभवांद्वारे, सभोवतालच्या जगाचा शोध घेण्यासाठी, बालकांची स्वाभाविक 'जिज्ञासा टिकवून ठेवणे याद्वारे अध्ययनाचा पाया घातला जातो.

*खेळातून अध्ययन वर्गा बाहेरील खेळ*

सुरुवातीच्या काळात बालके एकाच ठिकाणी दीर्घकाळ बसू शकत नाहीत व त्यांना इकडे तिकडे फिरणे आवश्यक असते. बाहेर खेळण्याने त्यांना नैसर्गिक वातावरणाचा शोध घेण्याची, त्यांच्या शारीरिक मर्यादांची चाचणी / कसोटी घेण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, यामुळे एकूण कारक कौशल्ये, शारीरिक स्वास्थ्य आणि संतुलन राहण्यास मदत होते.

या स्तरातील बालके त्यांना मिळालेल्या जागेवर मिळेल त्या त्या ठिकाणी खेळत असताना पळणे, उड्या मारणे, चढणे या स्वातंत्र्याचा आनंद घेत खेळतात. वर्गाबाहेरील मित्रांच्या समवेत व परिसरातील खेळ अनेक बालकांची अतिरिक्त ऊर्जा शमवितात, त्यांना शांत होण्यास मदत करतात आणि बालकांसाठी हे खूप गमतीचे असते !

*सारांश* : पायाभूत शिक्षणामध्ये बालक विविध अनुभवातून ,मित्रांच्या समवेत त्या त्या वयोगटात खेळा‌द्वारे शिकतात, ज्यामध्ये विविध कृतींची श्रृंखला आणि प्रोत्साहन देणारे अनुभव यांचा समावेश असतो. बालके शिकण्यासाठी भावनिक आणि मानसिकरीत्या प्रेरित राहतील, यासाठी या सर्व कृती आणि अनुभव विशिष्ट पद्धतीने आयोजित केले जाणे आवश्यक आहे.
खेळाच्या या व्यापक कल्पनेत हे लक्षात घेतले पाहिजे; की बालके निरीक्षण, प्रत्यक्ष कृती करणे, ऐकणे, वाचणे, बोलणे, लिहिणे, विचार करणे आणि सराव यातूनसुद्धा शिकत असतात. ते नवीन संकल्पना आधारे नवीन अनुभव शिकतात, त्यांचा अर्थ लावतात आणि या नव्याने ओळख झालेल्या माहितीचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी संबंध जोडतात. त्यामुळे बालके जेव्हा अंक व अक्षरे शिकण्यास सुरुवात करतात, तेव्हा स्पष्ट आणि पद्धतशीर अध्यापन, सराव आणि उपयोजन आवश्यक असते.
*पायाभूत स्तरावरील शालेय शिक्षण*
बालकांच्या शिक्षण आणि अध्ययनाच्या प्रक्रियेत कुटुंब, समवयस्क, समुदाय, शैक्षणिक वातावरण आणि शिक्षक हे सर्व घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

या पाचपैकी प्रत्येकाची भूमिका आणि त्यांचा सापेक्ष प्रभाव बालकांची जशी वाढ होत जाते, तसे बदलतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ अर्भक अवस्थेत, केंद्रस्थानी आई आणि जवळचे कुटुंब आहे. समवयस्कांचा प्रभाव उत्तर बाल्यावस्थेत आणि तरुण प्रौढावस्थेत अधिक वाढतो.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये, अभ्यासक्रम आणि शिक्षणाचा आकृतिबंध ५+३+३+४ याप्रमाणे ३ ते १८ वर्षे वयोगटासाठी आहे. वरील पाच घटक प्रभावीपणे बालकांच्या शिक्षणावर परिणाम करतात. हा राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF) विशेषतः, पायाभूत अवस्थेतील ३ ते ८ वर्षे वयोगटातील बालकांच्या वयानुरूप शैक्षणिक गरजांसाठी बांधील आहे. उदा. पायाभूत स्तरासाठी संगोपन हा शिक्षणाचा आधार असला पाहिजे.

*कुटुंब आणि समुदायाचे महत्त्व*

बहुतांश बालके स्वतःच्या कुटुंबात जवळच्या नातेवाईकांच्या तसेच शेजारच्या कुटुंबातील लोकांच्या सहवासात वाढतात. बालकांची वाढ आणि विकास यांमध्ये पालकांची महत्त्वाची भूमिका असते.
    बालक म्हणजेच विद्यार्थी ही आजी-आजोबांसोबत मोठ्या कुटुंबातसुद्धा बालक वाढते. बालक कुटुंबातील, समुदायातील, शेजारील कुटुंबातील अनुभव स्वीकारते आणि ते गरजेनुसार उपयोगात आणते.

पायाभूत स्तराच्या या कालावधीमध्ये कुटुंबातील नातेसंबंध अधिक प्रभावी असतात, जे पुरेसे पोषण, तसेच सामाजिक आणि भावनिक आधाराची खात्री देतात. चांगले, पालनपोषण करणारी आणि जबाबदार कुटुंबे बालकांच्या निरोगी विकासात आणि सकारात्मक अध्ययनात योगदान देतात. उदाहरणार्थ, बालके योग्य प्रकारचा आहार घेत आहेत याची खात्री करणे, त्यांचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी त्यांच्याशी मातृभाषेत बोलणे, चांगली मूल्ये असलेल्या पारंपरिक कथा सांगणे किंवा स्थानिक इतिहास सांगणे,
सुरुवातीच्या काळात बालक आणि कुटुंब यांच्यातील नातेसंबंध आणि गुंतवणूक बालकाच्या विकासाचा सर्वांत महत्त्वाचा निर्देशक आहे. कुटुंबातील व्यक्ती हे बालकांचे पहिले शिक्षक असतात,पालक-बालक, नातेसंबंध आणि परस्पर मधील असलेली आंतरक्रिया बालकांच्या सुरुवातीच्या काळात अध्ययन आणि विकासावर खोलवर परिणाम करतात.

*शाळा, कुटुंब आणि समुदाय* शाळा,कुटुंब आणि त्याचा परिसरातील समुदाय हे बालकाच्या विकासातील आणि अध्ययनातील भागीदार आहेत. सुरुवातीच्या काळात शालेय वर्गक्रियांमध्ये हा महत्त्वाचा घटक लक्षात घेतला पाहिजे.
स्थानिक आणि भारतीय संदर्भाची केंद्रियता बहुतेक बालके ही त्यांच्या कुटुंबातील व समुदायातील खास कथा, गाणी, खेळ, खादयसंस्कृती, विधी व सण-उत्सव यांसोबतच पोशाख, कार्यप्रणाली, प्रवास व जीवनपद्धती या त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वपूर्ण अविभाज्य भाग असलेल्या अनुभवातून वाढत असतात.
अध्यापन आणि अध्ययनाच्या समकालीन कल्पना हा अभ्यासक्रमाचा भाग असला पाहिजे, तसेच हे महत्त्वाचे आहे, की बालकांच्या, कुटुंबांच्या आणि त्यांच्या समुदायाच्या विविध अनुभवांना वर्गात स्थान मिळावे, स्थानिक कथा, गाणी, खाद्यपदार्थ, कपडे, कला, संगीत आणि नृत्य हे शाळेतील बालकांच्या अध्ययन अनुभवांचा अविभाज्य भाग असले पाहिजेत.

*पायाभूत स्तर व  अभ्यासक्रम*
हा स्तर बालके ज्या सांस्कृतिक व सामाजिक संदर्भात, ते वाढत आहेत; त्या जीवनातील परिचित अनुभवांतून आलेला आशय व अध्यापनशास्त्र यांवर आधारित असायला हवा, त्यामुळे दृढसंबंध निर्माण होतात, जे शिक्षक आणि बालक दोघांची अभ्यासातील भागीदारी विकसित करतात.
अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती, भारतीय व स्थानिक संदर्भ, लोक संस्कृती व लोकजीवनाशी दृढपणे जोडलेले असावे. संस्कृती, परंपरा, वारसा, चालीरीती, भाषा, तत्त्वज्ञान, भूगोल, प्राचीन व समकालीन ज्ञान, सामाजिक व वैज्ञानिक गरजा, भारतीय व पारंपरिक अध्ययनाचे मार्ग या रूपाने बालकांना जास्तीत जास्त सुसंबद्ध (relevant), मनोरंजक व प्रभावी शिक्षण देण्यासाठी त्याचा अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रात समावेश असायला हवा. कथा, कला, खेळ, उदाहरणे, समस्या या मूळ भारतीय आणि स्थानिक संदर्भ असलेल्या असाव्यात. शिकण्याच्या मुळाशी हे असेल, तेव्हा कल्पना, अमूर्तता आणि सर्जनशीलता खरोखरच उत्तम प्रकारे विकसित होते.

विशेषतः सर्व भाषांचे वर्गात स्वागत केले पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पायाभूत स्तरावर बालकांना गृहभाषेत अभिव्यक्त होणे, आंतरक्रिया करणे आणि या माध्यमातून शिकण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. गृहभाषा आणि इतर भाषा (घरची किंवा परिचित बोलीभाषा हे व्यासपीठ मानून) वापरून विविध संदर्भामध्ये श्रवणाच्या आणि बोलण्याच्या संधी, बालकांना मौखिक अभिव्यक्ती शिकण्यास उत्तम प्रकारे मदत करतात. बालकांमध्ये भाषा, बोधात्मक आणि सामाजिक-भावनिक कौशल्ये विकसित करण्यासाठी, त्यांचे विचार कल्पना यांबाबत चिंतन करणे आणि जाणीवपूर्वक, शिक्षक, समवयस्क यांच्यासमोर व्यक्त होण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिली पाहिजे. विशेषतः
स्थानिक आणि भारतीय संदर्भात रुजलेल्या कथा, कविता, बडबडगीते, गाणी, खेळ, नाटक याबाबी भाषाशिक्षण मनोरंजक, रोमांचक, प्रासंगिक, प्रभावी आणि सांस्कृतिकदृष्ट्या परिपूर्ण बनविण्यास मदत करतात.

(वर्गात बहुभाषिकता, भाषा प्रवीणता आणि साक्षरता विकसित करताना, गृहभाषेचा योग्य आणि सतत वापर सुनिश्चित करण्यासाठी, अधिक तपशीलवार तर्क आणि कार्यनीतीसाठी, 
संस्थात्मक विविधता वास्तव (Ground Reality) पालक, कुटुंबे आणि समुदायाच्या साहाय्याने, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थात्मक रचना पद्धतशीरपणे साहाय्य करतात. पारंपरिक ज्ञान, शोध-आधारित ज्ञान / (चिकित्सक ज्ञान), प्रयोगाधारित अनुभव आणि स्थानिक संदर्भानुसार संस्थात्मक रचना या बालकांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्याकरिता शिकण्याच्या संधींची रचना आणि अंमलबजावणी करतात.

पायाभूत स्तरातील बालके सध्या विविध संस्थात्मक वातावरणात शिकतात.

● ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके अंगणवाडी, बालवाडी, पूर्वप्राथमिक शाळेत जातात किंवा इयत्ता पहिली आणि दुसरी असलेल्या मोठ्या शाळांतील पूर्वप्राथमिक शाळेत जातात.

● ६ ते ८ वर्षे वयोगटातील बालके, ही इयत्ता पहिलीपासून पुढचे वर्ग असलेल्या शाळेत किंवा पूर्वप्राथमिक शाळेपासून पुढचे वर्ग (इयत्ता पहिली आणि दुसरी) असलेल्या अशा शाळांत असू शकतात.

उपरोक्त उल्लेखलेल्या प्रत्येक वातावरणात, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि अध्ययन संसाधने भिन्न असतात. या प्रत्येक संस्थात्मक वातावरणातील शिक्षक वेगळे असतात. वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारे त्यांची भरती केली जाते त्यांची पात्रता भिन्न असते आणि त्यांच्या सेवांतर्गत व्यावसायिक विकासातील प्रक्रिया भिन्न असतात. काही संस्थात्मक रचनांमध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या देखील वेगळ्या आहेत.

पायाभूत स्तराचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र, वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ८ व्या वर्षापर्यंत आहे. अभ्यासक्रम रचनेच्या तपशिलांचा विचार करताना विविध संस्थात्मक संरचना विचारात घेतल्या जाव्यात.

अशा प्रकारे, पायाभूत स्तरातील सर्व संस्थात्मक रचनांसाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF) लागू करण्याचे उद्दिष्ट आहे.

Thursday, 3 October 2024

जिल्हा स्तरीय योग स्पर्धेमध्ये हेरलेतील गजानन पोतदार यांचा प्रथम क्रमांक

      हेरले / प्रतिनिधी
   गडहिंग्लज येथे  २९ सप्टेंबर रोजी जिल्हा स्तरीय योगस्पर्धा आयोजित करण्यात  आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध वयोगटामधील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धे मध्ये हेरले (ता. हातकणंगले) येथील योगशिक्षक  गजानन पोतदार यांनी या स्पर्धेमध्ये ५० ते ६५  वयोगटामध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाने ही स्पर्धा जिंकली. या प्रथम क्रमांकाच्या यशामुळे त्यांची अमरावती येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच हेरले येथील शकील जमादार यांनी२३ ते ४०  वयोगटामध्ये सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
     गजानन पोतदार हे गेली 20 वर्षे हेरले येथे नियमित योग वर्ग चालवत आहेत, तसेच त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हेरले पंचक्रोशीतील अनेक नागरिकांना लाभ झाला आहे.
    फोटो 
जिल्हा स्तरीय योग स्पर्धेमध्ये हेरलेतील गजानन पोतदार यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस वितरण करतांना मान्यवर व स्पर्धेचे आयोजक.

Tuesday, 1 October 2024

कोल्हापूर मुख्याध्यापक संघाच्या संचालक पदी राजेंद्र माने यांची बिनविरोध निवड


हेरले / प्रतिनिधी

 छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज  पेठ वडगाव ,संस्थापक अध्यक्ष व प्रशालेचे  मुख्याध्यापक राजेंद्र रा. माने यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या स्वीकृत संचालक पदी निवड झाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आले.