प्रतिनिधी एस. एम. वाघमोडे
उजळाईवाडी (ता. करवीर ) येथील जिल्हा परिषद संचलित विद्या मंदिर उजळाईवाडी मध्ये यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गातील प्रवेशासाठी थेट शाळेत येण्या ऐवजी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवेश घेण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती व प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सोशल मीडियावर लिंक व्हायरल करण्यात येत असून सदर लिंक वरती क्लिक केल्याबरोबर प्रवेश फॉर्म येत असून या प्रवेश फॉर्ममध्ये प्रवेशासंबंधी सर्व माहिती भरून सदर फॉर्म ऑनलाईन सबमिट केल्यास संबंधित वर्गातील प्रवेशासाठी ची पुढची प्रक्रिया शाळेमार्फत राबवली जाणार असून या अभिनव संकल्पनेमुळे मुलांच्या प्रवेशाच्या चिंतेत असलेल्या पालकांना 'ऍडमिशन फ्रॉम होम' म्हणजेच घरातूनच पाल्याचा प्रवेश घेता येणार आहे. त्याचबरोबर ज्या पालकांच्याकडे इंटरनेट नसेल त्या पालकांनी थेट मुख्याध्यापकांना फोन करूनही प्रवेशासाठी अर्ज करू शकतात .विद्या मंदिर उजळाईवाडी चे मुख्याध्यापक बी. एस. संकेश्वरी यांच्या प्रेरणेतून ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे.
दरम्यान विद्या मंदिर उजळाईवाडी मध्ये वर्षभर नवनवीन संकल्पना राबवून आनंददायी शिक्षण देण्यात येत असल्यामुळे खाजगी शाळांच्या तुलनेत या शाळेची गुणवत्ता उत्तम असून या शाळेत स्थानिक मुलांच्या बरोबर एमआयडीसीतील परप्रांतीय मजुरांच्या मुलांची ही संख्या लक्षणीय आहे. जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.