** कोल्हापूर प्रतिनिधी
डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या दोन बालकांना आज डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ वैशाली गायकवाड यांच्यासह डॉक्टर आणि स्टाफने या दोन्ही बालकांचे टाळ्या वाजवून निरोप दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ.डी.वाय .पाटील हॉस्पिटलमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना सर्व सोयी सुवीधा देण्यात येत आहेत.या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेला दोन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आज चौदा दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. आज या दोन्ही बालकांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर यांना डिस्चार्ज देण्यात आला. दहा वर्षांच्या आतील बालक आणि पन्नास वर्षावरील नागरिकांना कोरोनाचा जास्त धोका असतो. अशा व्यक्तींना कोरोना झाला तर जास्त काळजी घ्यावी लागते. हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या दोन्ही बालकांची अत्यंत काळजी घेतली.आज या दोन्ही बालकांवर डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. त्यामुळेच हे दोघे कोरोनामुक्त झाले. यामध्ये हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
याबद्दल हॉस्पिटलचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल तत्पर आहे .अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आ.ऋतुराज पाटील, अधिष्ठाता डॉ.आर.के.शर्मा यांच्या प्रयत्नांतुन हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणीसाठी अद्ययावत लॅब सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या एनएबीएल या संस्थेने खास कोरोना तपासणीसाठी मान्यता दिलेली खाजगी हॉस्पिटलमधील पहिली कोरोना तपासणी लॅब आहे.
आतापर्यंत २७३० जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत विशेष दक्षता घेऊन यशस्वी उपचार केले आहेत. यापुढेही रूग्णांना जास्तीत जास्त सेवा हॉस्पिटलमार्फत उपलब्ध करून देण्यात येतील.
दरम्यान हॉस्पीटल स्टाफने घेतलेल्या प्रयत्नामुळे कोरोनामुक्त झालेल्या या दोन बालकांना अत्यंत उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैशाली गायकवाड,बालरोग तज्ज्ञ डॉ.अनिल कुरणे व बालरोग विभागातील सर्व डॉक्टर, कोरोना वॉर्डच्या नोडल ऑफिसर डॉ.सुषमा जोतकर, डेप्युटी रजिस्ट्रार संजय जाधव, असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील आणि सर्व स्टाफ उपस्थित होते.