Tuesday, 2 June 2020

mh9 NEWS

जगात भारी आम्ही कोल्हापूरी - क्वारंटाईन मध्ये काय अनुभव आला ?

कोल्हापूर प्रतिनिधी 
वसईवरुन कोल्हापूरला कुटुंबासहित आपल्या घरी येण्यासाठी अतुल कवडे धडपडत होते. ते वसईमध्ये एका रिएल इस्टेट कंपनीत अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांना अखेरीस कोल्हापूरला यायला परवानगी मिळाली पण इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन होण्याच्या अटींवर. यापूर्वी अनेक लोकांचे सरकारी क्वारंटाईन बाबत अनुभव ऐकून मन चिंताग्रस्त झाले कारण सोबत फॅमिली पण होती. पण पुढे काय घडले ते त्यांच्याच शब्दात वाचा. 
दै. जनमतशी बोलताना त्यांनी कोल्हापूर प्रशासन व महानगरपालिका यांच्या या सेवेला शतशः धन्यवाद मानले.


वसईवरून कोल्हापूरला यायचा ई पास ४ वेळा रिजेक्ट झाला. काय करावे समजेना. आधी कारण काय - तर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली, नन्तर आपला पास रिव्ह्यू मोड मध्ये आहे. त्यानंतर तर पालघर जिल्ह्याचे नावच सिलेक्शन लिस्ट मधून गायब झाले. शेवटी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून त्यांना अडचण समजावून सांगून ई पास ऍप्रुव्ह करवून घेतला. 

वाटेत प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडुन ई पास बद्दल विचारले जात होते, पण कोणाशी डायरेक्ट संपर्क होऊ नये म्हणून ई पास पुढच्या काचेवरच चिटकवला होता. त्यामुळे गाडीतून खाली उतरलो ते किणी टोल नाक्यावरच.

तिथली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली आणि आमच्या तिघांच्या नावाचे ३ टोकन घेऊन गाडी डायरेक्ट डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये आणली. हॉस्पीटलमध्ये पोहोचण्यापूर्वी न विसरता फोन केला तो म्हणजे अनिल भंडारेना (को. म. न. पा. प्रभाग स्तरीय)
 अनिल भाऊंशी तसे आधी ४ दिवस संपर्कात होतोच पण त्या फोनवर त्यांनी एवढेच सांगितले की अतुल तू तिथे पोहच, तोपर्यंत मी कुठे व्यवस्था उपलब्ध आहे ते बघतो. या एका वाक्याने आम्हा सर्वांनाच धीर मिळाला. याला कारणही तसेच होते - कारण अशा गोष्टी ऐकल्या होत्या की इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन मध्ये लोकांचे खूप हाल होत आहेत. राहण्या खाण्याची व इतर सुविधांची पुर्ण गैरसोय आहे. त्यात आम्ही रेड झोनमधून आलेलो त्यामुळे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन हे ठरलेलंच होतं. कुठेही रहाताना अडचण येऊ नये म्हणून सोबत सतरंजी, बेडसीट, चटई असे साहित्य मुद्दामच बरोबर घेतले होते. 

ई पास त्यावेळी बंद होते, त्यामुळे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये काहीच गर्दी न्हवती. चेकिंग काऊंटरवरच्या व्यक्तीने किणी टोल नाक्यावर दिलेल्या स्लीपचे टायमिंग बघितले आणि विचारले,  काय साहेब, टोल नाक्यावरून डायरेक्ट इकडेच आलाय वाटतं ? मी हो म्हणालो आणि असे का विचारले असे म्हणाल्यावर तो म्हणाला की बरेच लोक घरी जातात, जेवतात, आणि निवांत संध्याकाळ पर्यंत येतात, काही वेळा तर आम्हाला शोधायला देखील जावे लागते. मनातल्या मनात म्हणालो, हेच कारण असेल कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढायचे. 
असो... आमचे सर्वांचे चेकिंग तसे २ तासात पूर्ण झाले आणि शेवटी हातावर इन्स्टिट्युशनल क्वारंटाईचा शिक्का पडला. आता सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे कोणत्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार ?

अनिल भाऊंना पुन्हा फोन केला, तर काही सांगायच्या आधीच त्यांनी सांगितले - अतुल विवेकानंद कॉलेज मधील गर्ल्स होस्टेल मध्ये राहण्याची व्यवस्था झाली आहे. आणि हॉस्पिटल मधील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेट ते तुम्हाला पुढील प्रोसेस समजावून सांगतील. तेथील अधिकाऱ्यांना भेटलो असता त्यांनी सांगितले की साहेबांचा फोन आला होता आणि तुमची व्यवस्था विवेकानंद कॉलेज मधील गर्ल्स  होस्टेल मध्ये केली आहे. 

तेथून आम्ही थेट विवेकानंद कॉलेजच्या गर्ल्स होस्टेलवर संध्याकाळी ६.३०ला पोहोचलो. तेथील रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांने आम्हाला आमची खोली दाखवली. ती खोली बघताच आलेलं सगळं टेन्शन कुठं आणि कधी गेलं हे कळलंच नाही. 

आम्हा तिघांसाठी १ स्वतंत्र खोली दिली गेली होती. खोलीत ३ बेड, त्यावर स्वच्छ बेडसीट, उशी आणि नवीन पांघरूण अशी व्यवस्था होती. खोलीत 2 टेबल, ४ खुर्च्या, जेवणासाठी फायबर प्लेट्स, आणि इतर साहित्य पण होते.
गाडीतले सर्व साहित्य खोलीत आणून ठेवले. अंघोळ केली आणि रात्री ८:०० च्या सुमारास ग्राउंड फ्लोअर वर घंटा वाजली. घंटा कसली वाजली हे पहिले तर तिथे राहणाऱ्या सर्व लोकांनी मास्क घालून, सोशल डिस्टनसिंग पाळत , हातात प्लेट्स घेऊन जेवण घेण्यासाठी रांग लावली होती. जेवणासाठी तिथे बुफे काउंटर लावला होता. आणि कंत्राट दिलेले, स्वच्छता पाळलेले दोन व्यक्ती सर्व लोकांना अगदी आपुलकीने आणि आग्रहाने जेवण वाढत होते. रात्रभर प्रवास केला होता, दिवसभरात हॉस्पिटलजवळ सुद्धा सर्व बंद असल्यामुळं काहीही खायला मिळाले न्हवते. दुपारी अनिल भाऊंनी मी डबा घेऊन येतो असे सांगितले होते पण आम्हीच नको म्हणून सांगितले. कारण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये ही म्हण लहान असताना शिकलो होतो.  पण आता भूक पण खूप लागली होती. प्लेट्स घेतल्या आणि आम्ही पण रांगेत उभे राहून प्लेटमध्ये जेवण घेऊन आमच्या खोलीत परत आलो आणि अक्षरशः जेवणावर ताव मारला. जेवण साधेच होते (चपाती, भात, भाजी, आमटी) पण महत्वाचे म्हणजे तेलकट, मसालेदार असे अजिबात न्हवते. मिठसुद्धा अगदी बेताचेच की कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना त्याचा त्रास होऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली होती. 

सर्व गोष्टींची माहिती अनिल भाऊंना फोन करून सांगितली आणि त्यांचे तसेच कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या सोयीचे मनापासून आभार मानले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० च्या सुमारास पुन्हा घंटा वाजली आणि जिन्यावरून वाकून पाहिले तर चहा नाश्त्यासाठी तशीच रांग लागली होती. आम्ही सर्वांनी चहा नाष्टा केला. साधारण ९:३० वाजता डॉक्टर आले म्हणून हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या सर्वाना पुन्हा खाली बोलावले. डॉक्टर अनिरुद्ध काळेबेरे व त्यांच्यासोबत असलेल्या महिला मदतनीस यांनी सर्वांची थर्मल टेस्ट केली आणि २ ते ३ वेळा सर्वाना विचारले की कोणाला काही त्रास होतोय का ?
असेल तर सांगा... अतिशय आपलेपणाने चौकशी केली व काही इमर्जन्सी मदत पाहिजे असेल तर स्वतःचा मोबाईल नंबर सर्वाना दिला. दुपारी १ ते १:३० च्या सुमारास दुपारच्या जेवणाची घंटा, संध्याकाळी ५:३० च्या सुमारास चहाची घंटा आणि पुन्हा ८- ८:३०च्या आसपास रात्रीच्या जेवणाची घंटा हे आता रोजचे वेळापत्रक झाले आहे. बरेच मित्र विचारायचे आहे का रे नीट सर्व, काय लागले तर सांग आणून देतो, तर त्या सर्वांना मी काहीही का मागितले नाही याचे उत्तर मिळाले असेल.

कोल्हापुरात स्वतःचे घर असून देखील असे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन मध्ये राहावे लागले याचे दुःख आता अजिबात वाटत नाही पण अशा सोयी सुविधा देणाऱ्या कोल्हापुरातील आम्ही कोल्हापुरी असल्याचा अभिमान मात्र नक्कीच वाटत आहे. बरेच लोक अशा सोयी सुविधा घेतात, पण यात राबलेल्या यंत्रणेचा उल्लेख कुठेच होत नाही. महानगरपालिका सुविधा देत नाही, अधिकारी मदत करत नाहीत, सरकारी डॉक्टर दुर्लक्ष करतात, शिपाई सुद्धा कामचुकार असतात अशी बोंब मारणारे बरेच असतात तर त्यांच्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे हे नियोजन म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. 

कोरोना रोगाच्या संकटकाळात केलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या या उल्लेखनीय कामगिरीची ही पोच पावती सर्वांच्या पर्यंत पोहोचावी, त्यांच्या पाठीवर पण शाब्बासकीची थाप मिळावी, त्यांचा उत्साह व मनोधैर्य द्विगुणीत व्हावे  म्हणून हा लेख लिहिण्याचा खटाटोप.

पुन्हा एकदा कोल्हापूर महानगरपालिकेच्या या उपक्रमासाठी राबलेल्या सर्व यंत्रणेचे मनापासून आभार व खूप खूप धन्यवाद.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :